जोडीदार तू माझा... भाग ३०

 जोडीदार तू माझा...  भाग ३०



घरात नुसता गोंधळ होता, कुणी कुणाचं नव्हतं तरीही सर्व सर्वांचे होतेच ना! आई स्वतः आवरून घरतल्या प्रत्येकाच्या खोलीत डोकावत आवरून घ्यायला सांगत होती. तिचा एक पाय मांडवात आणि दुसरा घरात होता. कुठे कोण काय करत आहे हे तिच्या नजरेतून लपण्यासारखं नव्हतं.

राणी आणि सानू खोलीत एकमेकींना आवरत होत्या तोचं बाळू खोलीच्या खिडकीतून डोकावत म्हणाला,

“तायडे ती आली आहे स्कुटीवाली, भेटवून देवू का तुला?”

“अरे म्हणजे, कुठे आहे.” सानूहि खिडकीतून डोकावत म्हणाली.

“बाहेर आहे, मी कसं आणू तिला?”

“ये शेंबड्या, इथून काय सांगतोस? घेवून ये आमच्या खोलीत.”

“अग पण आई आणि बाबा आहेत ना तिकडे दारात, मी कधीचा वाट बघतोय आई दार सोडेल म्हणून पण ती सारखी घर बाहेर करत आहे. मग कसं? ”

“अरे हो,  आईची घाई सुरु असणार, ही आयडी पण ना, ना स्वतः स्वस्त बसत ना कुणाला बसू देत. मी येते तिकडे, मी घेवून येते तिला.”

सानू लागलीच खोलीतून बाहेर आली, आईने सहज नजरेने विचारपूस केली.

“आई माझी एक मैत्रीण येते आहे.” म्हणत सानू पुढ गेटवर पोहचली.

बाळू धापत आला, आणि म्हणाला,

“ताई, ही अनया.... बाकी तू हिला विचार. मी चाललो, तिकडे काम आहे मला...”

“अरे पण, तुझे कपडे बदल ना, तयार हो, पाहुणे येणारच आता.”

“ताई तू जा हिला घेवून, मी करतो नंतर, माझी काळजी नको करू, तिकडे कॅटरिन वाल्यांना स्वागतासाठी शरबत भरायला लावलं आहे, तुम्ही निघा मी आलोच तिकडे.”

बाळू पाठमोऱ्या शरीराने मांडवात जात बोलला.

भावाची गडबड बहिणीच्या लग्नात काय असते माहित आहेच आपल्याला, बाळू त्याच गडबडीत होता. त्याला कसलीच सुध नव्हती. त्यात अनया आल्याने त्याच्या जीवाची घालमेल अजून वाढली होती. दूर जावून त्याने सानूला हात दाखवला.

आज बाळूने पहिल्यांदा त्याच्या तिला घरी बोलावलं होतं. आणि सारंकाही सानूवर सोडून मांडवात कामात बिझी झाला होता, सानू अनयाला घेवून आत शिरली.

आईने जरा नजर रोखून बघितलं कारण सानूच्या सर्व मैत्रिणी आईला माहित होत्या. आणि जवळपास सर्वांची लग्न झाली होती. एवढ्या लहान वयातली कुणी सानूची मैत्रीण तिच्या लक्षांत येत नव्हती. तरीही तिने एक हलकीशी स्माईल दिली आणि काहीच बोलली नाही.

अनया घरात शिरताच, बाहेर रेकॉर्डिंग चेक करणाऱ्याने गाणं वाजवलं होतं,

“लेक लाडकी या घरची होणारं सून मी त्या घरची...” सानू आता खदकण हसली, अनयाच्या कानात म्हणाली,

“काय ग, गाणं एकदम बरोबर वाजलं, नाही?”

अनया स्मित हसली, घरात येताच सर्व घरात प्रसन्नता बघून तिचं मन प्रसन्न झालं होतं. सानू सोबत ती त्यांच्या खोलीत आली.

हलकीशी बावरलेली अनया उभीच होती. तर सानू म्हणाली,

“राणी ही ती स्कुटीवाली. आपल्या बाळूची ग...”

“दी, सुंदर आहे ग ही. ये, तुझं स्वागत आहे माहिते निवासात.”

“मग आहे ना बाळूची जोड, तोही गोरापान आणि हीपण...आता काय गोरे गोरे नातूच असणारं मोहिते निवासात.” सानू खोली आवरत म्हणाली. 

अनया हसली, तिला असं बघून सानू परत म्हणाली,

“अनया बी कम्फर्टेबल ग.”

“हुम्म!!”

“अग हो, आम्ही मोठ्या असलो तरीही तू होणारी सून आहेस ह्या घरची हे माहित आहे आम्हाला. आणि तू नुसती हसतेसच का? बोलत नाहीस... तो बाळू तर नुसता पटर पटर बोलत असतो...”

आता मात्र अनया परत हसली, “हो ना! मीही त्याला नेहमी म्हणते किती फालतू बोलतोस म्हणून... मी आपली सदा मोजकं बोलणारी आणि हा नुसता बोलणारा ....म्हणजे!” बोलण्याच्या ओघात परत अनया थांबली.

“भारी ग, तुमची जोडी, उलटच आहे, मुलं कमी बोलतात हे माहित होतं पण इथेतर तू कमी बोलतेस,” राणी अनयाला जवळ बसायचा इशारा करत म्हणाली.

“ताई छान दिसत आहात तुम्ही, मस्त तयारी झाली तुमची, कुठल्या पार्लर वालीला बोलावलं होतं.”

“कुठल्या कशाला! माझी ताई आहे ना, ताई द ग्रेट....”

सानू स्वतःला आवरत म्हणाली, “काळजी करू नको, तुलाही करून देईल असचं मेकअप तुमच्या लग्नात.”

अनयाला असं सगळ मोकळं वातावरण बघून खूप मोकळं वाटत होतं.  नकळत तिला अंकितच्या बहीणींनी स्वीकारलं होतंच हे तिला कळालं होतं. मनात बंद असणाऱ्या कही गोष्टी तिला राणी आणि सानूला सांगायच्या होत्या. सुरुवात होत नव्हती आणि प्रसंगही नव्हता. पण मनात शाश्वती झाली होती कि बाळूसाठी थांबण्याचा निर्णय तिचा योग्य होता. 

दोन पिढ्यानंतर जन्माला आलेली अनया,  तेही तिच्या आईच्या जिद्दीमुळे, मग धाकात वाढलेली. तिच्या मागेही त्यांच्या घरात परत एक मुलगी झाली, आणि त्या दोघ्या बहिणी जणू घरात पाप करून जन्माला आल्यासारख्या मोठ्या झाल्या होत्या. मुलगी असणं म्हणजे  घरच्यांचं अंतिम ध्येय लग्न हेच तिने बघितलं होतं. त्यांच्या नंतर दुर्दैवाने तिच्या आईला बाळ झालंच नाही. आणि बाबा चिडल्यासारखे वागू लागले होते. अंकित कडून घरच्या गोष्टी ऐकल्या की तिला स्वप्ना सारखं वाटायचं. राणी आणि सानूबद्दल ती नेहमी ऐकून होती.

अनया अंकिताला कॉम्पुटर क्लासमध्ये भेटली होती. पदवी नंतर ती कोर्स करत होती आणि अंकित तिथे शिकवायला होता.  दोघांची ओळख वाढली, मैत्री झाली आणि मग हळुवार प्रेमाची चाहूल. सहा महिन्याआधी अनयाच लग्न ठरणार होतं पण नंतर काही कारणाने मुलाकडच्यानी नकार दिला आणि मग अनया लग्नाला नकार देत घरच्याना आता थांबवत होती. तीही धाकात वाढलेली मग अंकितबद्दल घरी कसं सांगावं म्हणून नेहमी काळजीत असायची. पण आज कितच्या घरातलं मोकळं वातावरण बघून तिचं मन मनातच मोकळं झालं होतं.

तिघीच्या गप्पा सुरु होत्या तर बाहेरून आवाज आला. पाहुणे पोहचले होते. स्वागत सोहळा झाला होता आणि राणीला घेऊन सानू बाहेर मांडवात आली, सानूने सोबत अनयालाही ठेवलं होतंच. तेवढ्यात अनया आणि अंकितची नजरभेट झाली, सानू हळूच त्याला म्हाणाली,

“बाळू, आधी कपडे बदल, कसा दिसतोस, जा, लवकर ये आवरून.”

बाळू एक नजर अनयावर टाकली, डोळा मारला, आणि घरात पळाला.

आईला अनया बघताच आवडली होती. तिचा शांत स्वभाव तिला भिडला होता. बाळू मध्ये मध्ये अनयाशी बोलायचा हे ही आईच्या नजरेतून लपलं नव्हतं, काहीसं तिच्या लक्षात येत होतं पण ती जरा थांबली होती. राणी आणि राजनने आनंदाने एकमेकांच्या हातात अंगठ्या घातल्या आणि साखरपुडा गोड झाला. साखरपुड्यात राजनची आत्या आणि राघव आले नव्हते. राजनची आईही जरा नाराज होती पण कुणीही फारसं बोलत नव्हतं. राजनने मांडवातच राणीची माफी मागीतली,

"राणी कालच्या प्रकारासाठी सॉरी ग, मला माहित नव्हतं की राघव दादासाठी माझ्या घरचे सानवीदीला म्हणतील म्हणून. मला जराही माहित पडू दिलं नाही.”

मग कसं कळलं, बाळूने?”

“नाही ग, बाळू नाही बोलला, तो तर राघव बोलला मला, निघतांना घरात जरा कुरकुर झाल्यामुळे."

अग बाई, नको व्हायला होतं सारं, पण ताई साठी राघव दादा, नाही ना पटत होतं.”

“हो ग, म्हणूनच सॉरी. मी बोलतो बाबांशी सुद्धा.”

“जावू द्या, आम्ही विसरलोय ते सगळं, इथे सानूदिलापण काही माहित नाही. तुम्हीही बोलू नका.”

 राणी गुमान हसऱ्या चेहऱ्याने गुपचूप म्हणाली.

"आत्या आली नाही माझी, मी तिच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा झालो, आई नौकरी करत होती मग आत्याच आई होती आमची. वाईट वाटलं मला, आईची आणि आत्याची जरा कुरकुर झाली इकडे निघण्याआधी,"

“म्हणून सगळे शांत आहात का?”

“तसं नाही ग.”

“नाही हो, मी जस्ट बोलले.”

“छान दिसत आहेस.“

“चला आता नजर पडली तर...”

“नजर तुझ्यावरच आहे माझी, आणि आता तर नेहमी राहणार, जोडीदार होणार आपण आयुष्यभरासाठी. आज आपली गाठ पक्की झाली.”

राणी गालात हसली, “हो... बघाना .... तुम्ही ताईला बघायला आले आणि गाठ आपली पडली ...”

“हो ना, आपल्याला तर ताईचे धन्यवाद मानावे लागले.”

राणी आणि राजन हळुवार संवाद साधत होते तर पाहुणे आपसात गप्पा करत होते. जवळपासची मंडळी जेवणानंतर परतली होती. आता मांडवात घरातली मोजकी मंडळी होती.  आपल्या आपल्या ग्रुपमध्ये सर्व मस्त गप्पा करत होते. कुठे हास्याचे फवारे उडत होते तर कुठे, साडी, दागिन्यांच्या चर्चा रंगत होत्या. अरुण आरती प्रत्येकाला जातीने भेटून हालचाल विचारण्यात मग्न होते. अनया आणि अंकितचे मुके इशारे मांडवात अजूनची बहरत होते. राणी राजन त्यांच्या फोटो शूट मध्ये मग्न एकमेकांच्या हळुवार स्पर्शाने फुलत होते.

आनंद सोहळा रंगला होता, तुम्ही रंगलात ना, मग भेटूया पुढच्या भागात काय होतं ते बघायला... अनया आईला भेटेल का, सानुला घेडलेला प्रकार कडेल का... बघायला भेटूया लवकरच...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments