जोडीदार तू माझा.... भाग ४१

 

जोडीदार तू माझा.... भाग ४१



लोणचं, संसारासारखच असतं, सुरवातीला त्याला खूप जपावं लागतं, जरासं काहीही झालं तरी लोणचं जसं बिघडतं तसचं संसारच असतं. सुरवातीचा काळ गेला की संसारात सारचं रमत जातं आणि मग नातं मुरतं. मुरलेलं लोणचं जसं औषधाच काम करतं तसं नातं मुरलं की येणाऱ्या वादळांसाठी खंबीर होतं जातं..

अनुला शांत करून अंकित घाई घाईत ऑफिससाठी निघून गेला.

अनुला दारापर्यंत जायचं होतं पण तिचे पाय थांबले, नकळत मागे वळले, मन मनातच हसलं, म्हणाल,

“नको आज एवढंच पुरे. तो दिवस लवकर येईल जेव्हा मी त्याला गेट पर्यंत सोडायला जाईल.”

अनु तयार होवून येईपर्यंत सर्व नाश्ता करत होते, ती येताच आई उठली आणि स्वयंपाक घराकडे वळली, अनु परत थबकली,

“मी घेते, तुम्ही बसा ना.”

बसं ग बाई, अजून आहे माझ्या हाताला जोर, मुलींचं अजूनही करते, मी काही म्हातारी नाही झाली. तुझंही करेन जेवढ होतं तेवढ.

पण अनु काही स्वयंपाक घरातून हटली नाही, गुमान आईला बघत होती. आईने पोहे गरम करून अनुच्या हातात दिले आणि काहीही न बोलता ती परत हॉलमध्ये येवून बसली, राणीने अनुला ओढलं आणि खुर्चीवर बसवलं,

काय वहिनी झालं का बोलून बाळूशी... रुसवा काढला दिसते.”

अनु लाजून लाल झाली होती, तर सानू म्हणाली,

“ये राणी, राजन येणार आहे का आज तुला घ्यायला की आपण सोबत निघायचं...”

“तायडे थांब ग जरा....”

“अनु वहिनी माझी आई पोहे मस्त करते, शिकून घे, नाही आमच्या हाताला नाही आली ही चव तुझ्या येईल कदाचित, म्हणजे आम्ही आलो कि करून घाल नंतर... खा खा आलेत ना आयते समोर... घे मजा, अजुतरी मुलगी आहेस तू ह्या घरची, सुनबाईचं पद जेव्हा येतं ना तेव्हा आपण घरचे राजे असतो...”

सानू राणीला धक्का देत म्हणाली, “राणी, आयते तर तुझ्याही समोर आले, आणि लग्न तुझंही होणारं आहे आता... ती तर सरळ घरात आली तू रीतसर जाणार आहेस... मुलगी तुला व्हायच आहे आधी. तो नियम तुलाही लागू होतो.”

“हुम्म्म, तुला बऱ माहित असतं, कुठून आणते हे सारं ज्ञान तू .... ताईडे... काही प्रोग्रेस आहे का ग त्या अमेरिकन बॉसची…राणी तोंड वाकडं करत बोलली.

“प्रोग्रेस? त्याची कि माझी? तो तिकडे मस्त माझी मी मस्त... ”

“हुम्म्म दिसते आम्हाला...”

“ये आता उगाच काहीही बोलू नकोस, अरे त्याच्या सारखे मी माझ्या खिश्यात घेवून फिरते... गप्प राहा, तुझ्या महेंदीची तयारी केलीस का. मला नाही जमणार तुझे नखरे झेलायला. तू करवून घे कुणाकडून तरी.”

अनया मधात बोलली, “कशाला हवं कुणी, मी लावून दिली तर चालेल का राणी ताई, म्हणजे मी लग्नाचे ओर्डेर घेत असते. कोर्स केला आहे... पण तुम्हाला आवडेल काय ते माहित नाही, म्हणाल ते डिझाईन काढून देवू शकते मी.” अनया भीत भीत बोलली.

“अग मस्त, तू हिला सांभाळ मग, सुटली रे बाबा हिच्या कीच-कीच मधून...” सानू राणीला चिडवत म्हणाली.

राणी आणि अनया मेहंदीवर बोलत पोहा खात होत्या, सानू ऑफिसला निघून गेली. बाबा हॉलमध्ये बसून पेपर वाचत होते. आईने अहिराचा सामान बाहेर काढलं होतं, ती प्रत्येकाच पाकीट तयार करून नाव लिहित होती. नावं लिहिता लिहिता थबकली,

“अहो, हिच्या घरच्यांना बोलवायचं आहे का.?”

“हिच्या म्हणजे कुणाच्या आरती, तिला नाव आहे, घेशील तर काही कमी होणार नाही तुझं. आणि जेवढ्या लवकर तिला अंकितची बायको म्हणून स्वीकार करशील ना तेवढं तुझ्यासाठी ठीक राहिल.”

बाबा पेपर मधून डोकं बाहेर काढत म्हणाले.

“अहो, अनयाच्या! तुमचं संभाषण नकोय मला, सकाळी सकाळी.” आरती सामान मोजत म्हणाली.

बाबा, पेपर मधली बातमी जोराने वाचू लागली, “मुलाने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बायको घेवून घरी आला, त्याच्या नापश्च्यात सुनेचा सासरच्या लोकांकडून छड. मुलीचं माहेर तुटल्याने तिचा आत्म्हतेचा प्रयत्न.....”

“अहो काहीही काय, मी काय अशी वागते काय तिच्याशी?”

“परत... नावं आहे तिला... हवं तर तुझं आवडतं ठेव... पण नाव घे तिचं, मोहित्यांची सून आहे ती आता.”

“मी काय नाही म्हणते...”

“मग, निदान जरा नावाने बोल आणि माझी नजर आहे तुझ्यावर... आवर स्वतःला... आपल्या सारखी नाहीत आजकालची मुलं... घर तुटायला वेळ लागणार नाही आणि मग तू आणि मी रडत बसू त्या पवारांसारख... पालकत्व खूप कठीण आहे आरती. आपल्या मुलांचे पालक तर आपण कसेही होतो पण मुलांच्या जोडीदारचे पालक झालो तर ते आपले पालक नक्की होतात... वेळ सगळ्यावरच येते... आज तुझी आहे... उद्या?

“तुम्ही ना मलाच बोला, काम नको करायला आणि नुसत्या गोष्टी सांगा ह्यांना, दुपारी पत्रिका वाटायला जावून या... मुलाने एक सोंग उभ केलं आहे आणि मार्ग कुणीच काढत नाही... मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात आणि मला समोर जावं लागते... ह्यांना काय?“

दोघांची परत कुजबुज सुरु झाली होती, नवरा बायकोला कुठे कारणाची कमी असते, शेवटीपर्यंत कारणं संपत नाहीत. संसारातल्या लोणच्या सारख्या सर्व स्वादाने भरलेल्या भांडणांना काय मज्जा असते ते तर त्या दोघांनाच माहित असते. नवीन पिढी एकमेकांमध्ये मिसळत होती आणि जुनी पिढी लोणच्यासारखी नात्यात मुरली होती.

आरती आणि अरुणच नातं असचं मुरलेलं, ज्यात सर्व स्वाद भरून होते, मग त्यांना कुणाकडून काही अपेक्षा नव्हत्याच, होती ती काळजी आणि आपुलकी. नवीन नात्यांनी वेळ घ्यावा एकमेकांत मिसळण्यासाठी ह्या विचाराचे दोघेही पण अंकितच्या अश्या एकाएकी निर्णयाने दोघेही मनातून हादरले होते. अरुणच्या त्या शब्दांचा आरतीने बराच विचार केला होता. जर अंकित आणि अनयाच्या नात्याला तिचेन स्वीकृती दिली नाही तर ती लोकांच्या प्रश्नांना समोर जावू शकणार नाही. अंकित आणि अनया तर नवरा बायको होवून एकमेकांच्या सोबत उभे होते पण घरच्या सर्वांना लोकांसमोर लग्नात उभ राहायचं होतं. मनाला कितीही भावूक गारवा क्षणिक शांत करत असला तरी लग्न हे वादळच होतं. मूळ हलली नव्हती पण धक्याने त्रास तर झाला होताच. और दिल तो दिल हे... आज मान जाये और कल फिर सोचने लगे... क्या पता! मनाला वळवण्यासाठी वेळेसारख दुसरं औषध नाहीच.

लग्नाच्या तयारीत तसाही लहान सहान गोष्टीसाठी अरीतीकडे वेळ नव्हता, मग जरा काना डोळा करायची ती अनुच्या घरात असण्यावर. तिलाही राणीचं लग्न महत्वाच होतं आणि अनुलाही.

लग्न आठ दिवसांवर आलं होतं, सगळीकडे पत्रिका देवून झाल्या होत्या, जवळपास सर्व गोष्टी ठरल्या होत्या. दूरच्या नात्यातल्या जवळच्यांना, इमेल व्हाटस अपद्वारे पत्रिका पाठवल्या होत्या. काही ठिकाणी आई बाबा आवर्जून जावून आले होते. आरतीची धाकटी बहिण आराध्या अमेरिकेत होती, आज तिच्याशी स्काइपद्वारे बोलून तिला आमंत्रण द्यायचं ठरलं होतं आरतीच. तसं तिला आमंत्रण महिन्या भराआधी लग्नाची तारिक ठरताच दिलं होतं. पण आज आरतीला तिच्याशी बोलून ती येणार कि नाही हे जाणून घ्याच होतं. सगळे काम आटपून तिने राणीला कॉल लावायला सांगितला, दोघी बहिणी मस्त गप्पा करत होत्या. आराध्याची पूर्ण तयारी झाली होती भारतात येण्याची. हळदीच्या दिवशी ती इकडे पोचणार होती हे ऐकून आरती खूप खुश होती. बोलतांना अरीतीने जरा सानूसाठी काळजी दाखवली तर आराध्या म्हणाली,

“ताई एक मुलगा आहे इकडे, त्याला भारतीय मुलगी हवी आहे, खूप शिकला आहे, त्याचा जन्म आणि शिक्षण सगळं इथेच झालं आहे.”

 

“म्हणजे ग, आई वडील भारतीय आहेत ना?”

“म्हणजे काय? म्हणूनच तर त्यांना भारतीय मुलगी हवी आहे.”

“अग बाई पण तो मुलगा विदेशात शिकलेला आणि तो कसा भारतीय मुलीशी जुळवून घेणार, आणि हल्ली काय काय ऐकायला मिळत असतं ग ...”

“घरंदाज घराणं आहे ताई, इथले फेमस बिजनेस मॅन होते मुलाचे बाबा, वडील वारले आणि लहान वयात ह्याने सगळा बिजनेस हातात घेतला, कमी वयात जवाबदारीने शांत झालंय ग.  घरात सर्वांचं लग्न झालंय,  ह्याचंच व्हायचं आहे, मुलाच तसा आहे ताई, त्याला इकडल्या मुली पसंत नाहीत, घरचे श्रीमंत आहेत ग कश्याची कमी नाही. त्याची आई माझ्या चांगल्या ओळखीतली आहे. मला बऱ्याचदा बोलली ती कुणी मुलीगी आहे का म्हणून. मी तिला सानूचा फोटो दाखवला होता.

“मग ग? काय म्हणाली ती?”

“तिला सानू पसंत आहे पण अजून ती काही तिच्या मुलाशी बोलली नाही, पण...”

“पण काय?

“सानूपेक्षा मोठा आहे कदाचित, ५ वर्षाने कदाचित..?”

“हो का, चालेल तेवढं.... पण काही सांगता येत नाही आपल्या सानूच... आपल्या वेळी कसं वेगळं होतं, आता माझा आणि ह्यांचा बारा वर्षाचा फरक आणि मग तुझं लग्न झालं तेव्हा तू आणि जावई सारखेच... नाही?”

“हो ग, जमाना बदलत जातो ना... बघू जमतंय काय ते. अरे हो, मुलाचा भारतात एका प्रोजेक्ट ब्रीस्टोन कंपनीत सुरु आहे असं कळालं होतं मागे. तो ती कंपनी टेकओवर करणार म्हणत होता तो.”

ब्रीस्टोन?”

“ब्रीस्टोन लिमिटेड...”

“अग सानू मेनेजर आहे तिथे, इथल्या ब्रांचची...”

अरे हो.”

नाव काय ग मुलाच?”

“सुमंत साठे! अग मुलगा खूप साधा आहे ग, अमेरिकेत वाढला आहे पण शांत आहे... सानुला....?”

“हुम्म्म, तोचं प्रश्न आहे? तिला कोण आवडले माहित नाही. पण त्याला ती आवडली का?

“ते काही माहित नाही, पण आता तो आणि त्याची आई भारतात येणारं आहे म्हणे, तुला काही हरकत नसेल तर बोलू का मी सानूसाठी, म्हणजे ते येतील ना सानूला बघायला. पुढचं सानूडीची मर्जी...”

“अग बाई, माझ्या सानूचा काही नेम नाही ग!”

“हुम्म्म, माझी सानूडी गोड आहे ग, नको करू तिची काळजी.”

“हो ग, मला तर काळजी आहेच, आता तुला काय सांगू, घरात तरी वेगळाच घोळ झाला आहे, आता तुला सांगावंच लागेल, अग आपल्या अंकितने लग्न केलंय आणि बायको घेवून अचानक घरी आला...”

“ओह, माय गॉड... हे अतीच झालंय, काय बोलतेस! मुलगी कशी आहे, भांडणारी तर नाही, तुझ्याशी नीट वागते ना, ह्या आजकालच्या मुली ना, ह्यांना नवराच हवा असतो. घरात लग्न आहे आणि हे काय ग नवीन...”

आराध्या मावशी सुसाट प्रश्न करत सुटली होती, आरती आणि आराध्या गप्पाच्या ओघात पार दूर निघाल्या होत्या, कडी जुळत जुळत विषय कुठल्या कुठे निघाला होता...

घर आज परत हसलं, आणि नवीन येणाऱ्या वादळांसाठी परत सज्ज झालं.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

 


Post a Comment

0 Comments