जोडीदार तू माझा .. भाग ४७

 

भाग ४७



छकुली माळ्यावर वरच्या पायरीवर उभी राहिली आणि अंकितने अनुला हळूच मागून जरा हळद लावली, लाजलेली अनु बावरली, घाबरलीही,

“अरे काय करतोस कुणी बघेल ना?”

“बघू दे ग... बायको आहेस माझी, हक्कची जोडीदार...”

“हो ना, मग जरा शांत की... आईसाहेबांच्या हुकूम आहे... पाळा... नाहीतर पळावं लागेल आपल्याला.”

“ये, आईचा हुकूम सर्वांसमोर, इथे नाही...” म्हणत अंकितने अनुला मिठी मारली,

 तोच छकुली ओरडली, “दादा तुला शोधत आहेत, तुझ्या नावाचा गजर सुरू झालाय, आटोप लवकर, कदाचित राणी ताईला हळद लावायसाठी मामी शोधत आहे.”

अंकित अनुला मागून ये चा इशारा करत भरा भरा निघाला, अनु हसून हसून पार कोसळणार होती. छकुली आणि ती परत गुपचूप खाली आल्या, आईने तिला बघितलं, हळूच कानात म्हणाली,

“अनया, हो पुढे, हळद लाव राणीला, पण जरा जपून, मान आहे तुझा...”

अनु बघतच राहिली,  जवळ उभ्या असणाऱ्या सानूने तिला धक्का दिला आणि अनु भानावर आली, अनुने राणीला हळद लावली, अंकितची आताच लावून झाली होती, तोही जवळपास होता, राणीने नकळत मात्र दोघांनाही हाताने लावली. अनु मनातून बहरली होती... मनातली खंत जरा शांत झाली होती.

हळूहळू अनुला घरातल्या प्रत्येकाने हळद लावलीच, आणि तिच्या मनातले रुसलेले ढग कोसळून शांत झाले. रात्री खोलीत आली तेव्हा तिचा लाचा बेडवर ठेवून होता, सानूने सांगितलं की अंकितने ठेवला, अनु भारावून गेली, सानूकडे बघत म्हणाली,

“बघू का मी ताई?”

“हे काय विचरण झालं! बघ आईची निवड आहे, आवडेल तुला!”

अनुने लाचा काढून बघितला, लावून बघितला, म्हणाली,

खूप सुंदर आहे.”

“ह्हुम्म, आईची पसंत आहेच खूप छान, बघ तिने तुला शोभेल असाच घेतला...”

“ताई महाग असेल ना?”

“तर..? असू दे, तू पण तर मौल्यवान आहेस ना?”

आई घाईघाईत काही सामानासाठी खोलीत शिरली, अनुने लावून ठेवलेला लाचा तिने बघितला, जरा थांबली,

“आणला का? कसा आहे ग? मला बाई हाच रंग आवडला तुझ्यासाठी, बघ बाबा...”

अनुला आईला मिठी मारायची होती पण मामी खोलीत आली, म्हणाली,

“अग बाई आपल्या राणीचा का हा लेहंगा? खूपच सुंदर आहे ग... तिला तर खूपच सुंदर दिसेल. पण ही का लावून बघत आहे...”

आईने मामीला काहीच बोलू दिलं नाही आणि हो हो करत आईने मामीच्या हातात अहिराच पारडे एकावर एक रचून दिले, आणि मामी ते घेवून निघून गेली, आई जरा मागे वळून बघत स्मित हसली, अनुला लाचा सुंदर दिसतोय असा इशारा करत तीही निघून गेली. मांडवात आहेर समारंभ होत होता. आई बाबा आणि राणी मांडवात बसले होते. नंतर सानू आणि अंकितही बसला, मोठा कपड्यांचा ढीग लागला होता.  आईला कधी राणीच्या जागी सानू दिसत होती तर कधी अनु, कधी ती राणीला बघत होती तर कधी अनुला तर क्षणात तिची नजर फुलपाखरा सारख्या लह्रणाऱ्या तिच्याच रूपाच्या कार्बन कॉपीवर खिळत होती. मनातला आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटत होता.

इकडे अनुच्या मनाची स्थितीही काहीशी तशीच होती. सनईचे सूर राणीच्या मांडवात गुंजत होते पण चौघडा अनुच्या मनात वाजत होता. आताच भरलेला हिरवा चुडा तिच्या मनात हिरवळ बहरवत होता. आतापर्यत घरातल्या प्रत्येकाकडून तिने गिरवलेले धडे तिला मनातच खुश करत होते. सासरी आल्याचा आनंद मनामनात रुजत होता. नंतर राणीला अनु घरात घेवून आली. आणि बाहेर आहेरांची बदली सुरु झाली, सानू आणि अंकित मदतीला होतेच. बाहेरच्या मांडवात जेवणं सूर झाले होते.

अनू अंकित, सानू, राणी सगळं आटोपल्यावर अंकितच्या खोलीत जेवत बसले. मस्त गप्पा रंगल्या होत्या चौघांच्या. आईने आवाज दिला आणि सगळे आपल्या आपल्या ठिकाणी आले होते.

काही वेळाने सानू बाहेरून घरात आली आणि तिने आधी राणीला बजावलं,

“राणी ते बंद कर फोनवर बोलणं, उद्यापासून तेच आहे तुला, झोपं बघू, नाहीतर मेकअप सूट होणार नाही, तुला आराम महत्वाचा आहे,”

आणि ती ओरडली, “अहो राजनरावं, पुरे आता, तुम्हाला तुमची बायको उद्या सुंदर दिसायला नको का?”

राणीने परत मोबाईल स्पीकरवर टाकला,

“सानवी दी, तुम्ही असतांना राणी कशी सुंदर दिसणारं नाही! मी फोन ठेवतो. जशी आपली आज्ञा...”

“हो हो,....सॉरी हो, आज राणी इथे आहे आमचं ऐकू द्या.... उद्यापासून तुमचं ऐकेल ती...”

“हो जी, हा ठेवला ...”  म्हणत राजनने फोन ठेवला.

राणी आणि अनु गुमान बेडवर पडलेल्या, सानू परत खोलीतून निघून गेली. रात्र बरीच झाली होती. तिलाही बाबांना औषधी देवून झोपायचं होतं, मोबाईलवर नोटीफीकॅशन आलं, ऑफिस अकाऊंटवरून मेसेज होता, सुमंतचा, बघून सानूला आश्चर्य झालं, तिने नोटीफीकॅशन बघितलं आणि मोबाईल उलटा ठेवला, मनातच म्हणाली,

“हा कशाला भावखाऊ मला मेसेज करतो, आता आली का मी ह्याच्या रेंजमध्ये. जावूदे नाही बघायचा मला, उगाच काही सांगेल प्रोजेक्ट्च आणि आता मला लॅपटॉप उघडून बसावं लागेल.”

तिने मोबाईल तसाच ठेवून दिला, आणि बाबांकडे निघून गेली पण मन मात्र मोबाईलच्या त्या नोटीफीकॅशन मध्ये होतं तिचं, बाबांना औषधी देवून ती परत तिच्या खोलीकडे वळली, मोबाईल हाहात घेतला आणि मग राहावलंच नाही, तीनेन मेसेज बघितला, लिहिलं होतं,

“विजिटिंग इंडिया सून, लेट्स हॅव मीटिंग इन नेक्स्ट वीक, सी यू सून.”

सानू परत पुटपुटली, “कशाला येतोय हा फॉरेनर, आमची कामं वाढवायला, मी सुट्टीवर आहे पुढच्या आठवड्यात... काही जाणार नाही मी... ये म्हणावं, नाही करत रेप्लाय त्याला... आला मोठा.”

तेवढ्यात आरध्या मावशी आली,

“काय ग झोपं ना जरा, काय बडबड करत आहेस, आणि चांगली सुट्टी घे आठवड्या भर.”

“हो ना मावशी, मी घेतेच...”

“घे ग, आणि काय लग्नाचा विचार आहे कि नाही?”

“लग्नाचा विचार करावा लागतो काय? लग्न करण्यासाठी विचार करावा लागत नाही. मावशी ते आपले मोठे करतात पण झाल्यावर मात्र विचारच विचार असतो... काय पडलीस ना विचारात?”

“ओ माय गॉड, पडेल मी विचारात तुझ्या बोलण्याने... ते काही माहित नाही, ताई किती काळजी लागून राहते तुझी..”

“ती काय, तिला सवय आहे काळजीची, उत्तम करते ती...”

म्हणत समोरून येणाऱ्या आईला सानू बिलगली,

“माझी स्वीट आई... बघ कशी दिसत आहे, थकत नाही का ग तू? सारखी तुरू तुरू घारत काम करत असते.... बाबांना झोपवून आले मी. तूही जा जरा पड ना, उद्या तुझी चिडचिड व्हायची नाहीतर....”

“ह्हुम्म, तू आहेस ना माझी चिडचिड वाढवायला..”

“आयडे... किती गोड आहेस ग तू ..”

“हुमम, मग? बाबांना औषध दिलं ना?”

“हो, जेवले पण ते, मी आणि कैलास होतो त्यांच्या जवळ.”

“कैलास आलाय का?”

“हो बाळूसोबत आहे तो.”

“बऱ झालं, मोठा कामाचा मुलगा आहे तो.”

म्हणत आई आराध्याला इशारे करू लागली, सानू बघत म्हणाली,

“हे आता काय सुरु आहे तुमच्या दोघींचं.... काय शिजत आहे. हुम्म्म काहीतरी आहे... सांगणार तर नाहीच ही आयडी मला...”

आराध्या हसली, “सानू, तू नको विचार करू, मी आहे इथे, ताई काहीही करणार नाही... तू जा, आराम कर... आणि पुढच्या पूर्ण आठवडा सुट्टी टाक ग... गप्पा करू आपण.”

सानू विचारात पडली,मावशी सारखी का आठवडा भर सुट्टी टाकायला बोलते आहे हे तिच्या लक्षात येत नव्हतं. आईने मावशीला घेवून सामानाच्या खोलीत गेली.

सकाळपासून सानूच्या मेंदूत सनई सूर गोधळ घालत होते, मन कुठेतरी ओढल्या जातं होतं. कसलीतरी गुर्मी चढली होती, मानेला फिरवत सानूने बाहेर नजर टाकली, सुंदर सजलेलं माहिते निवास आनंदी वाटत होतं. जरा शांतता झाली होती. मंद पावलांनी ती घरात आली, फोन हातात घेतला, त्या मेसेजला ती परत परत बघू लागली....

घर शांत झालं होत.... हळूच स्वप्नात शिरलं होतं उघडे डोळे ठेवून...

दिवे विझले नव्हते. घराला कुठे आज झोप येणारं होती ते तर मनातच कधी रुसत होतं तर कधी आनंदाने बहरत होतं. घरातलं एक पिलू उडणार होतं त्याच्या मार्गाने त्याच्या जोडीदारासोबत आणि घरात ते आता दिसणारं नव्हतं, त्याची भरारी घेण्याची वेळ आली होती.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 


Post a Comment

0 Comments