जोडीदार तू माझा.... भाग ४८



सगळे झोपले होते जरा वेळेसाठी, पण खरच डोळे लागले असतील ना... मग काय असतं लग्नघरात लग्नाच्या आदल्या रात्री तीच तारांबळ होती प्रत्येकाच्या मनात. राणीला राज्याशी गाठ पक्की करायची होती. अनु अंकितला ह्या लग्न समाप्तीची वाट होती आणि सानूच्या मनात सुमंतच्या त्या मेसेजने उगाच गोंधळ घातला होता...

आई आणि बाबांची झोपं तर उघड होती दोघेही पहाटे उठले होते आणि अचानक मागच्या अंगणात आले होते. आरती अरुणला बघून हसली,

“काय हो तुम्हीपण!”

“अग जराशी झोप लागली मग लगेच ना... आपली राणी आता खरच राजाची राणी होणार आहे ना!”

“हुम्म, सावंत वाड्याची एकुलती ऐक सुनबाई.... मान खूप मोठा आहे. राणी निभवेल ना? अपेक्षा खूप आहेत हो सावंतांच्या तिच्याकडून आणि आपली पोरं जरा नाजूक आहे...”

“तू कशाला काळजी करतेस, तिचा जोडीदार उभा असेल ना तिच्यासोबत.”

“ते ही, पण सुरुवातीला सर्व सुंदर दिसतं हो, खरा कस तर निभवतांनी लागतो.”

“आपण राणीला बळ द्यायचं बसं, आणि निहेमी तिचा विश्वास वाढवायचा, आणि तुला बजावतो नेहमी तिला नमतं घ्यायलाही सांगायचं नाही तू... आपला काळ गेला ग, मन मारून जगणं वगैरे नाही आता... आपल्या रणीला आपली गरज तशी पडणार नाहीच पण तिलाच नेहमी शिकवणी देणं आपण करायच नाही,.. नाहीतर ती आपल्यालाच काही सांगायची नाही.

“अहो पण...”

“ते काही नाही, नेहमी नमतं घेतल्याने गृहीत धरल्या जातो आपण... माझ्या मुली मला तश्या नको. आपण नाही सावंता एवढे मोठे, म्हणून काय झालं, मुलगी देत आहोत त्यांना ही काही छोटी गोष्ट आहे का? अरे जिगराचा तुकडा काढून देतोय, हिंमत लागते.

अहो, रीत आहे ती...”

“मग, असेल, म्हणून काय माझ्या मुलीचा मान कमी होतं नाही, ना माझा!”

बाबांचे डोळे जरा पाणावले होते, पण हिंमत वाढली होती. मीचं नमतं घेतलं तर मुलीचं काय हा विचार त्यांना हिंमत देत होता. आरतीने मन ओळखलं अरुणच, तीने जवळ येवून हातात हात ठेवला. आणि बाबांचे अश्रू डोळ्यातून हातावर पडले.

“हे काय? आताच तर मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत होते तुम्ही... आणि आताच...”

आरती त्यांना जवळ घेत म्हणाली.

“मोठ्या गोष्टी माझ्या मुलीच्या मानासाठी, सन्मानासाठी, आणि हे अश्रू राणी नसणारं ना ग उद्यापासून मोहिते निवासात...”

“अहो असं काय करता, ती तर इथेच मुंबईत असणार ना, मग काय आठवण आली की यायचं फेरफटका मारून....”

“हुम्म्म....” बाबा चष्मा काढत, त्याला सदऱ्याने पुसत म्हणाले,

“तुला आठवते, सानूनंतर आपण आशा सोडली होती दुसऱ्या बाळाची... मग पाच वर्षाने राणी झाली आणि मग लगेच बाळू.... बाळू तर सरप्राईझं होता आपल्याला पण राणीने दुसऱ्या बाळाची कमी पूर्ण केली आपली... राणीच्या आजारपणाने ती मागे पडली आणि बाळू तिच्यापेक्षा कधी मोठा झाला कळाल नाही ग, माझी राणी घरात लहान झाली... बघच तू कशी सावंत वाड्यात राणी म्हणून राहिल ते.”

हो माहित आहे, अश्रू पुसा आधी... 

तोच अण्णा अण्णा असा मोठ्याने आवाज आला. अस्मित कुमार अमेरिकेवरून घरी पोहचले होते आणि ते सरळ अरुणच्या खोलीत गेले. भीमा काका आवाजाने उठले, अस्मित कुमारांना अरुण खोलीत दिसले नाही मग त्यांनी प्रत्येक खोलीत जावून आवाज दिला. आणि मग सर्व घराला माहित झालं होतं कि आता घरात पूर्ण अमेरिका आली आहे म्हणून. अरुण दिसताच अस्मित कुमारांना मिठी मारली, भीमा काकाही त्याला आलिंगन द्यायला समोर आले  मग हाताने इशारा करत आपलं सामान कुठे आहे असं विचरलं. अस्मितने मोठी बॅग जरा उघडून दाखवली, बघताच भीमा काकाने इकडे तिकडे बघून ती पटकन बंद केली. अस्मितने आरतीचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला,

“आमचं, ओ माय गॉड कुठे आहे...”

...आणि सर्व हसायला लागले. अस्मितने येताच साऱ्यांना उठवलं, आणि येतांना सर्वांसाठी विमानतळाच्या बाहेरून घेवून आलेला नाश्ता खायला दिला. आणि म्हणाला,

“आता झालो मी तयार, दे रे बाळू कामाची यादी.“

अरुण चहा पीत म्हणाला, “तू तुझ्या त्या ओ माय गॉडला सांभाळ रे, छळते ती आम्हाला. आणि आता आलास ना असाच तुझे नवीन काय ते लग्नाचे कपडे घाल आणि हो हॉलमध्ये, तुला आणि ओ माय गॉडला स्वागतासाठी उभं राहायचं आहे, भीमा आणि सुनीता येतील नंतर तुझ्यासोबत गेटवर, बघ तिकडे काय काय राहिलं ते. दहाचा मुहूर्त आहे. पाहुणे मंडळी नव पर्यंत पोहचतील हॉलमध्ये.”

“हो अण्णा, असंच करतो, चल रे बाळू...”

आणि तो बाळूला घेवून बाहेर निघणार होता तर त्याचे पाय थांबले.

“अण्णा, चिमणी कुठे आहे रे माझी?”

राणी मागूनच धावत आली आणि बिलगलीही,

“अंकल...”

“अरे चिमणा किती मोठा झाला रे तू, तुझं माझं तर रक्ताचं नातं आहे चिमणे... माहित आहे ना तुला?”

“हो अंकल म्हणूनच मी तुमचं पिल्लू आहे ना, इथे कुणाला कळत नाही मी, बाबांना सानूच हवी असते आणि आईच्या लाडाचा तो बाळू... मी तर तुमचं पिल्लू आहे. अंकल माझं गिफ्ट आणलाय ना...?” राणी लाळात येत म्हणाली.

“अरे मग, तुझं लग्न झालं तरीही मी जेव्हाही येईल ते नक्की आणणारं, आता तुला आणतो नंतर छोट्या राणीला आणेल, काय ग शेंबडे हनिमून बुक केला का...?”

राणी अस्मितच्या गळ्यात हात घालून कोपऱ्यात गेली आणि त्याचं बोलणं सुरु होतं, राणीने सर्व गोष्टी अस्मित अंकलशी शेअर केल्या होत्या, दोघेही हसत होते. मग काही वेळाने अस्मित अंकलने राणीला तिचा आवडता लोलीपोप काढून दिला.

राणी दहा वर्षाची असतांना तिला अनिमिया झाला होता, रक्त कमी झालं होतं, आणि अचानक अस्मित आणि आराध्या त्या दरम्यान मोहिते निवासात होते. आणि दवाखान्यात तेच तिच्या सोबत होते, डॉक्टरांनी रक्त द्यावं लागेल हे सांगताच अस्मिताने स्वतःहून पुढे आला होता. आणि मग राणी आणि अस्मित अंकलची कायमची गट्टी झाली होती. म्हणूनच अस्मित कामात बिझी असतानांही मेनेज करून लग्नासाठी आला होता. आणि रात्रिच निघणार होता बंगलोरला मिटिंगसाठी. 

वाऱ्यासारखा घरात शिरलेला अस्मित आल्या आल्या कामाला लागला होता. घरात सर्व उठले होते आणि कामाला लागले होते, अस्मित आणि आराध्या दोघेही एकमेकांना पूरक होते, स्वबळावर मिळवलेलं साम्राज्य होतं त्याचं, म्हणून इकडे मोहिते निवासात त्यांना खूप मान होता. अस्मित साउथ इंडिअन होता आणि आराध्या अस्सल मराठी मुलगी. सोबत इंजीनियरिंग पदवी घेतांना प्रेमाकुर फुललं होतं आणि मग अस्मित सेटल झाल्यानंतर मोठ्या चतुराईने दोघांनी प्रेमाची लढाई जिंकत लग्नाची पताका रोवली होती. आणि आज त्यांच्या प्रेमाच साम्राज्य मोठं झालं होतं. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे मान होता दोघांना. म्हणूनच कदाचित अरुण आणि आरतीचा अंजली आत्याचा प्रेमात झालेला ऱ्हास बघूनही प्रेमावर विश्वास कायम होता.

प्रेम विवाह असो वा अरेंज लग्न जोडीदारशी नातं महत्वाच असतं, ज्याचं जुळलं त्याच्या जोडीवर अनेक उन्हाळ्या पावसाळ्याच्या गाठी पडत जातात आणि नातं घट्ट होतं जाते. जोडीदाराची निवड आयुष्याचा टर्निग पॉईंट असतो, म्हणूनच लाईफ इज ऑल अबाऊट द चॉइसेस ... तुमची निवड तुमचं आयुष्य ठरवते.

घरातलं प्रत्येक नातं गुंतलं होतं एकमेकांच्या प्रेमात आणि विश्वासात. कुणीच नावापुरत आलेलं नव्हतं लग्नात हे अनुच्या चांगलाच ध्यानात आलं होतं. तिच्या घरच्या वातावरणात आणि इथे तिला जिमीन आभाळा एवढा फरक जाणवत होता. जिभेवर नात्यांच्या गुंत्याने वचक बसवली होती आणि ओठ शिवले होते नात्यातला विश्वास बघून.

सासू आरतीची घरात असणारी पकड तिला खूप काही बोलून गेली होती, जोडीदार असा असावा हे सांगून गेली होती. सासूच्या घरातल्या दरारा बघून तिला तिची सतत घाबरणारी आई क्षणोक्षणी आठवत होती. मोहित्यांच्या घरात वावरणारी प्रत्येक स्त्री तिला स्वतंत्र वाटत होती, खुश होती मनातून अंकितला निवडून आपण काहीच चुकी केली नाही हे तिला कळालं होतं. मोहिते निवासात एक दिवस तिचा आवाज राहिलं, ह्या विचाराने ती तयार होतं होती.

गाड्या येवून ठेपल्या होत्या हॉलकडे निघण्यासाठी, सकाळचे सात वाजले होते,

आईच्या आग्रहाने सर्व पाहुणे मानाने गाड्यांमध्ये बसले होते. गाड्या निघाल्या होत्या हॉलकडे. जेमतेम घर खाली झालं होतं.

राणी, अनया आणि सानूसाठी वेगळी गाडी केली होती, राणी पूर्ण तयार होवूनच हॉलसाठी निघणार होती.

अनु आणि सानू तिला तयार करायला लागल्या होत्या. लाल भरजरीचा शालूत तिचा गोरा रंग खुलून आला होता. अनयालाही सानूने तयार करून दिलं, तीही निळ्या लाच्यात उठून दिसत होती. आई खोलीत आली आणि तिची नजर दोघीवरही पडली, शब्द तर उरलेच नव्हते पण लाड तिने दोघींचाही केला. कोरड्या गळ्याने उभी असलेली अनु तिला खटकली, घाईत काहीही न बोलता तिने तिजोरीच्या किल्ल्या सानूच्या हातात दिल्या. आणि ती हॉलसाठी निघून गेलीही. सानू अनुला घेवून आईच्या खोलीत गेली, आज पहिल्यांदा सानू सासूच्या खोलीत गेली होती, खोलीत भला मोठ्या एक भारदस्त फोटो लागला होता, बघताच अनु थांबली, तिला असं बघून सानू म्हणाली,

“आजी आहे माझी, लाडाची सून होती आई माझी तिच्या. म्हणून मोठा फोटो केलाय तिने आजीचा. रोज नवीन फुलांचा हार चढतो माझ्या आजीला. वर गेल्यानंतरही थाट आहेत तिचे. बघ कशी बघत आहे तुला, ये आज्जे सुनबाई आहे हो तुझी, दे तिला आशीर्वाद.”

अनुने जवळ जावून आशीर्वाद घेतला आपण मनात धक धक भरली होती, वाटलं होतं एवढया रुबाबदार सासूची लाडाची सूनही असू शकते. पण ते खरं होतं.

नंतर तिने तिजोरी उघडली आणि एक हार काढून अनुला दिला. दोघीही परत राणीकडे आल्या, इकडे राणीचं स्वतः फोटो काढून राजनला पाठवणं सुरु होतं. सानूने स्वतःची तयारी केली. सानूतर आईची कार्बन कॉपी होती फक्त रंग जरा बाबांचा घेतला होता तिने, अस्सल गव्हाळी रंग मेकअप मध्ये उठला होता. अनुने तिला मदत केली. तिघीही तयार झाल्या होत्या.  

गाडीचा होर्न वाजला, बाळू तिघीना घ्यायला आला होता, छकुली धावत सांगायला आली आणि सानू राणीला घेवून समोर निघाली, अनु राणीचं काही सामान आवरत बॅगमध्ये भरत होती तोच दाराची कडी लागली.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments