जोडीदार.... प्रवास तुझा माझा... अंतिम भाग

 जोडीदार.... प्रवास तुझा माझा... अंतिम भागपुढच्या काही महिन्यात अनुची गोड न्यूज आली, आणि आईचा घरात परत गोंधळ सुरू झाला, कारण अनु इकडे येणार होती. अंकित काही महिने मुंबईत राहून इंग्लंडला जाणार होता.
आज परत वर्ष भरानंतर मोहिते निवासात सातवा महिना होता. आणि सावंत वाड्यात राणी रडत बसली होती.
राजन, “राणी तयार हो ग, तुझ्यासाठी सगळे वाट बघत आहेत म्हणे बाळू. सारखा फोन येत आहे त्याचा.”
“मला नाही हो जायचं आता तिकडे. करमत नाही मला.”
“का ग, तुझ्या आई बाबांचं घर आहे.”
“नाही जायचं, आता माहेर आहे ते माझं, सारखं सारखं काय जायचं.”
“अनुला कसं वाटेल. अंकितने सगळं तुझ्यासाठी थांबवलं आहे. आणि आपण करतोय ना प्रयत्न ,आता ह्या वेळी राहणार असं बोलले ना डॉक्टर. आणि तुला ग का काळजी पडते मी असताना. चल तयार हो.”
राणी नाही नाही म्हणत तयार झाली. आज मोहिते निवास तिला खायला उठलं होतं सारखी इकडे ती दचकत होती. अनुचा सातवा महिना आईने मोठ्या आवडीने केला होता, मनात असलेल्या सर्व इच्छा तिने पूर्ण केल्या होत्या. मुलींपेक्षा अनु तिच्या जवळची झाली होती. सुनेच्या आनंदासाठी वाटेल ते तिने केलं होतं. राणीला तेही बोचत होतं. पण राणीला समजून घेत सगळे आनंदी होते.
काही दिवसात अनुला मुलगी झाली, नातीच करण्यात परत अरुण आरती बिझी झाले होते. वेळ कसा वाऱ्याच्या पंख लावून उडत गेला आणि आरुषी तीन महिन्याची झाली... अंकित सर्वांना घेऊन इंग्लंडला निघून गेला. त्याचा कामावर जम बसला होता, परत येवून इकडे स्वत:च काहीतरी सुरू करण्याचा त्याचा विचार मनात पक्का होत चालला होता.
मधल्या काळात अरुण आरती शिकागोला जावून आले. तीन महिने लेकीकडे राहून सगळी हौस झाली होती खरी पण मनातून त्यांना घरी जाण्याची घाई झाली होती. सुमंत सोबत आलेला त्यांच्या आणि इकडे काही दिवस राहिला. आता मासाहेब राहिल्या नव्हत्या त्यालाही आता सानूचे आई बाबांच होते.
आता आई बाबांना कळून चुकलं होतं, त्याच्या प्रवासात ते दोघेच होते ते, आणि अजून अंतिम स्थळ येणे बाकी होते.
हळूहळू त्यांना कुणाचं येणं किंवा कुणाचं जाणं काहीही वाटत नव्हतं. ते दोघांच्या विश्वात रममाण झाले होते.
सदा अचानक वारला आणि जरा दोघांना धक्का बसला. त्याच्या मुलाने घर विकायला काढलं. भीमा आणि सुनिता तेवढे मोहिते निवासात अधूनमधून येत असत. त्यांनी स्वत:चा व्याप वाढवला होता. स्वत: आरोग्य सांभाळत ते दोघेही आनंदी होते.
काही दिवसांत राणीची वार्ता कळली. आणि परत आनंद आरती आणि अरुणच्या आयुष्यात आला. राणीच करण्यात त्यांना खूप आनंद होता. परत नवीन सुरुवात करत आई बाबा नव्याने जगायला लागले होते. राणीच्या घरी तर उत्सव होता, राणीला जुळे झाले होते, मुलगा आणि मुलगी. सावंत वाड्यात प्रतीक्षा संपली होती. राणी आता तिच्या वाड्यात राज्य करत आनंदात होती. घरात सर्वांचा रोष पत्करून राजन आयव्हीएफ ट्रीटमेंट मध्ये तिच्या पाठीशी राहिला होता. तिला सांभाळत त्याने घरच्यांना सांभाळलं होतं. राजन आणि राणी ह्या ट्रीटमेंट मुळे अजूनच जवळ आले होते. राणीचे रूसवे फुगवे काढण्यात राजनने पदवी मिळवली होती तर राणी राजनला पुरे पुर ओळखून होती.
अरुण आणि आरतीचे तिन्ही मुलं आनंदी आणि त्याच्या जोडीदारासोबत त्याच्या आयुष्याच्या जवाबदऱ्या सांभाळत होते. गेल्या पाच वर्षात सारं चित्र बदललं होतं. अरुणने वयाची साठावी गाठली होती आणि आरती पंचावन वर्षाची होती पण दोघात उत्साह वाढला होता.
एवढ्या मोठ्या घरात दोघेच असल्याने त्यांनी आता घरी भाडेकरू ठेवले होते. अंकित भारतात परत येवून तसाही ही वास्तु पाडणार हे त्यांना अनुकडून समजलं होतं. त्याच्या ह्या निर्णयाला काहीही न बोलता त्यांनी सहमती दिली होती. पण सध्या त्यांना गरज होती ती माणसांची, आणि मुलांना अडकवून त्याच्या प्रगतीच्या आड तर येणं मंजूर नव्हतं दोघांना. शिवाय त्यांच्याकडे पाहुणे म्हणून राहण्यात त्यांना आनंद होता. कायम स्वरुपी बंधन बांधून राहायचं नव्हतं.
आता रोज अरुण चहा मांडत असायचा, आणि आरती सोफ्यावर बसून पेपर वाचून सांगत असायची .
कुणाचं काही असलं की दोघेही सोबत भेट द्यायला जात असत. आज त्यांच्या गरजा बदलल्या आहेत. दोघांना सोबत राहायला आवडत होतं. एकमेकांची काळजी घेत ते आता जरा समाज सेवा करत असत. हल्ली ते अनाथ आश्रमातल्या मुलांना जाऊन गप्पा गोष्टी सांगत. अधून मधून नातवांशी बोलणं होत असतच. श्री त्यांचा मोठा नातू, तोही प्रेमाच्या नात्याचा, त्याच्याशी खास नातं जुळलं होतं दोघांच. ह्या वर्षी दहावीला होता. अरुणला त्याच्या अभ्यासातलं काही कळत नव्हतं पण तरीही त्याला नुसतं विचारण्यात आणि त्याचं ऐकून घेण्यात त्यांना गंमत वाटत असायची. सानूशी बोलणं होत नसलं तरी नातवाकडून सगळं कळत होतं. राणी तिच्या राज्यात खुष होती, मुलं सहा महिन्याची झाली आणि तिने ऑफिस परत सुरू केलं. आता तिला कुणी घरात बोलत नसायचं, पण तिच्या भवती सारच गुंतलं असल्याने घरात तिचा आवाज हळूहळू वाढत होता. सत्ता आता तिच्या सासूची राहली नव्हती, तिजोरीच्या किल्या तिच्या हातात पडल्या होत्या. सारे आर्थिक निर्णय राणी आणि राजन घेत असायचे.
अनु आई बाबांची काळजी इंग्लंडला राहूनही घेत होती. बाबांना रागवणं. डॉक्टरांशी बोलणं सगळं ती सांभाळत होती. अंकित दिवसे न दिवस प्रगती करत होता. त्याला परत येवून स्वत:चा सेटअप उभा करायचा होता. त्याची प्लानिंग सुरू होती. अनुला दुसर्यांदा दिवस गेले होते.
सगळं आता सेट होतं, पण प्रत्येकाच्या मनात आई बाबांची काळजी तेवढी होती.
पण.. तरीही आई आणि बाबा आयुष्याच्या ह्या वळणार जोडीदार म्हणून नवीन प्रवासाला निघल्याचा आनंद घेत त्याच्या आयुष्याच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यांच्या पैकी कोण कधी आधी पोहचेल हे त्यांना माहीत नव्हतं पण त्या अंतिम क्षणा पर्यंत त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत जायचं होतं.
आज बऱ्याच दिवसांनी परत दोघे अंगणात बसून आयुष्याच्या पुस्तकाच्या पानांना चाळत बसले होते आणि जाणवलं,
“अरु तुझं नी माझं नातं हेच नातं ग. सांग ना तुझ्या माझ्या नात्यात रक्ताचा धागा सुद्धा नाही तरीही आता हेच नातं माझ्या धमण्यात वाहत असतं. तुझ्या शिवाय चैन पडत नाही आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय राहवत नाही. आपण पालक झालोत आणि आयुष्यभर असू, पण जरा ह्या वळणावर असा विसावा तुझ्यासोबत मला आनंद देणारा आहे.”
“हो ना, अनु बरोबर बोलली होती, सारी नाती वेळ काढून नेतात पण हे नातं सगळ्या वेळी सोबत असतं. आता मला कधी कधी आपली जुनी भांडण आठवतात, हसायला येते हो.”
“हुमम, तू त्या दिवशी घरातून निघून गेली होतीस.”
“नाही हो, जरा बघत होते, तुम्हाला किती काळजी आहे माझी ते.
“असं...”
“आणि तुम्ही काही मला शोधलं नव्हतं, माझी मीच घरी आले होते. वाटलं होतं तुम्ही मला शोधत याल मग रूसवे फुगवे.. पण काही नाही, उलट तुम्ही माझ्या आईला कळवलं होतं, किती रागवली होती ती. असा राग आला होता तूमचा.”
“अग पण कशाला जायचं होतं तू, आई तर तुला रागात बोलली होती, निघ म्हणून...”
“ हुमम, आता वाटते ना तसं, आपण बावळट होतो म्हणून. माझ्यामुळे आई आजारी पडल्या होत्या आणि तुम्ही महिना भर बोलले नव्हते. आपल्यात बोलण्याच काम सानू करायची. मला आजही वाईट वाटते आई माझ्यामुळे आजारी पडल्या होत्या म्हणून.”
“जावूदे ग, आता कुठे तसं होणार नाही, तू कुठे जाणार नाहीस हे पक्क माहीत आहे मला. आणि मी बरा तुला जावू देईल.”
आरती केस विंचरत होती, तर अरुण म्हणाला,
“आण तो कंगवा इकडे, तुला येत पण नाही ग केस विंचरता.”
“अग बाई, आणि तुम्हाला येते काय?”
“अरे येते म्हणजे, तुझे आधी किती लांब केस होते, तू विंचरत उन्हात बसायची तेव्हा आई पुढे असायची...”
“मग हो, काय होतं त्या वेळी मनात?”
“काही नाही, तुझ्या केसांना हात लावून मस्त त्यात शिराव असं वाटत होतं, तुला म्हणायचो तर म्हणाली होती, काय वेड आहे हे म्हणून. आता काय परत येणार आहेत ते तुझे लांब केस.”
“अग बाई!”
“ये आता, मी वेणी गुंफून देतो.”
अरुणने कंगवा घेतला, आरती हसली, “काय हो वेणी गुंफता येते का, आता माझी वेणीपण खूप लांब नाही ना.”
“काही होत नाही, माझ्या दोन्ही मुलींच्या वेण्या गुंफत होतो मी तू कामात असल्यावर.”
“अरे हो, सानूला तर तुम्हीच हवे असायचे. आणि आता?”
“आता तिच्या आयुष्यात तिचा जोडीदार ग... माझी भूमिका तेवढीच होती.”
“आपल्या सगळ्या भूमिका वेळेनुसार आयुष्यात येतात आणि निघून जातात, शेवटापर्यंत जाते ती जोडीदाराची भूमिका.. अहो, आजपर्यंत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा हो, सगळी नाती जपतांना किती ओढ तोड झाली आपली, पण कोण कुठे आता आपल्या सोबत, आपण दोघांनी आपला विचार क्वचितच केला असेल ना हो. सारं आयुष्य दुसर्यांचा विचार करण्यात गेलं.”
“मग! म्हणूनच आता आपला विचार कर... घे झाली वेणी, किती केस पांढरे झालेत ग. ह्या रविवारी आपण डाय करूया त्यांना. तू माझ्या कर मी तुझ्या करेन..”
“बरं, पण डाय कुठे आहे घरी.”
“आहे ना, मागे मी अनुने मला मोठं पाकीट आणून दिलं होतं. म्हणाली होती, लावून देतो म्हणून पण मीच तिचा पसरा बघून नाही बोललो. आपण लावू ना ग.”
“अग बाई, आधी सानू आणि आता तुमची सून.”
आता रोज काही ना काही त्यांच असायचं. त्यात मुलांच येणं जाणं लागून होतं. जरा विसाव्याला आल्या सारखे सर्व येत, भेटून निघून जात. अनुला मुलगा झाला होता आणि सानूला मुलगी... राणी तिच्या दोन जुडया मुलात मग्न होती... विसर कुणाला पडला नव्हता पण आता प्रियोरिटीज बदल्या होत्या...
एका संसारातून तीन संसार उभे झाले होते, नवीन पिढी उभी झाली होती आणि जुनी अस्ताला आनंदांत निघाली होती...
कसं असतं ना ह्या आयुष्याचं, सारेच गणित वेगळे असतात आणि उत्तर सुद्धा वेगळी असतात. पण ह्या साऱ्या प्रश्नात आणि उत्तरात एक उत्तर कायम सारखं...
नातं हो कुठलं जे सदा सोबत असतं?
जोडीदारच... तुझं नि माझं...
कथेचे नायक नायिका त्यांच्या आयुष्यात जोडीदारासोबत प्रवासात होते... प्रत्येकांचा प्रवास वेगळा होता. मग आपली मुख्य जोडी कशी मागे राहणार होती, त्यांच्या मुलांच्या आयुष्याच्या प्रवासात ती कुठे असणार होती... त्यांनी त्यांचा मार्ग न थांबता पुढे चालण्याचा निर्णय घेतला होता, हातात हात धरून दोघही निघाले होते त्याच्या प्रवासाला...
जोडीदार कथा मांडण्या मागचा उद्देश एवढाच, हे जगातलं एकमेव नातं आहे, जे आपल्या सोबत आयुष्यभर असतं आणि त्याच्या आयुष्यानंतरही जगण्याची उमेद देऊन जातं,
तो आयुष्यात यावा म्हणून किती काय काय करतो आपण,
नको नको म्हणता त्याच होऊन जातो आपण.
काही सुचत नाही जेव्हा प्रेमात असतो आपण
म्हणूनच हे नातं मनात जपतो आपण...
म्हातारे झालो म्हणून गोडवा कमी होत नाही...
तिच्या शिवाय त्याला करमत नाही
तिचं रूसण त्याचं रागावण आता सवय होतं
काय सांगाव राव,
जोडीदाराच्या सहवासात गोड होतो आपण...
ती गेली तर माझं काय होईल,
त्याच्या शिवाय मी तुटून जाईल
हे जेव्हा मनाच्या गाभाऱ्यात बसतं
मग एकमेकांना जीवापाड जपतो आपण
वय झालं तरी मग प्रेमात पडतो आपण...
मग ह्या नात्याला आयुष्यात जास्त मान असावा, हो की नाही...
जगात कुठलंच नातं साथ देत नाही पण हे नातं कुठल्याच नात्याशिवाय नातं म्हणून उभं राहतं.
तू माझी मी तुझा म्हणत आयुष्याचा श्वास होवून जातं...
प्रेमाचा नवीन अध्याय सुरू करणार एकमेव नातं....
मित्र मैत्रिणींनो आपल्या जोडीदाराशी प्रेमाने रहा, तो चुकला तर तुम्ही पुढे व्हा... आयुष्याच्या वळणार तो तुमच्यामुळे दुखी होता कामा नये... सर्वांच्या इच्छा पूर्ण करतांना त्यालाही विसरू नका, सर्वांची काळजी घेतांना त्याची काळजी शिरोमणी असू द्या... तो असतो म्हणून आयुष्यात मजा असते... आयुष्याचे आनंदाचे आणि कुटुंबांसोबतचे दिवस काढतांना लक्षात असू द्या आयुष्याची परत दुसरी इनिंग तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काढायची आहे. अरुण आणि आरती सारखी...
तू माझी मी तुझा..
मग ना कसली बाधा,
साथ असावा सदा तुझा
जोडीदार तू माझा!!
धन्यवाद!
भेटूया परत नवीन कथे सोबत
@everyone
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल-

Post a Comment

0 Comments