जोडीदार तू माझा भाग ५४

 जोडीदार तू माझा



Bhag 54

आई बाबा परत त्यांच्या तीखट चटणी सारख्या रुचकर वादातून अलगत मुलांच्या काळजीने गोड झाले. बाबांचा आवाज मंदावला,

“हो बोलतो आज, आणि माझ्या राणीलाही कळवं, तिचं कधी जमतं इकडे त्या दिवशी यायला. मुलगी आहे आधी ह्या घरची ती...”

अहो कालच ती तिकडे गेली ना! मग

मग काय? तिला कधी जमेल हे महत्वाच आहे आता. तोच तर मान असतो, नाहीतर काय नाती ग, हीच तर निभल्या जायला हवी... मुलगी सासरी आहे येवू शकत नाही असं बोलून आपण काय दाखवतो, माहित आहे, आपल्या नात्यातली पोकळी.... अरे माझ्या मुलीला जेव्हा जमेल तेव्हा घरात कार्य असेल. मी बोलले तिच्या घरच्यांशी, तसंही काही कार्य असलं की नुसतं मुलीला म्हणून चालत नाही, मुलगी यायला हवी असं वाटत असेल तर तिच्या सासरच्या मंडळींना रीतसर आमंत्रण आणि कामावर गोष्ट टाकायला हवी.... आणि मी ते करणार.” 

“हो... आलं, हा आलं लक्षात...कुणाला टोमणा होता हा... तुमच्या सोबत जरा काही मनातलं बोललं की घुमून फिरून तुमचं माझ्यावरच येते... व्हा बाजूला काम आहेत, जाते मी ओ माय गॉडकडे...”

आणि ती जोरात हसली, बाबा परत म्हणाले,

“कळाल, का म्हणतो मी तिला ते, कशी मजा येते म्हणताना, जा आणि विचार अस्मित कुमार कधी पर्यंत पोहचणार आहे...”

 

“हो माहित आहे मला, का वाट बघत आहात तुम्ही अस्मित कुमारांची...? येणारं आहेत ७ पर्यत सकाळी बोलली ती.”

आता मात्र बाबा उठले आणि पुटपुटले,

“चला कामाला लागा, भीमा, सदाला सांगतो ... अजून कोण होतं बऱ ....”

आणि बाबांनी त्यांचा फोन काढला आणि नंबर शोधत होते.

आई त्यांना तसं सोडून इकडे सानूकडे आली, जिथे सर्व जण बसून लग्नाचे फोटो बघत होते. आणि आईची नजर अंजली आत्याच्या नवऱ्यावर पडली, म्हणाली,

“अग बाई, जावई आले होते का? अंजली बोलली नाहीस ग तू...”

अंजली काहीच बोलली नाही, बाळू म्हणाला,

“आई, आले होते आणि अंजली आत्याला मांडवातून ओढत नेत होते. मी चांगलं थोबाडीत लावली त्यांच्या अन घरी सोडलं त्यांना, उगाच तमाशा झाला असता मांडवात.”

“अग बाई, कारे? कधी नव्हे ते आले होते.... सांगायचं ना मला, मी बोलले असते.”

“अग ते पिऊन आले होते, तुझं ऐकणार होते का?”

आई पुढे काहीच बोलली नाही, सर्व शांतच झाले. सानू बोलली,

“काय आई सारां पचका केला आमच्या मुडचा, चल अनु मस्त चहा करू आपण, तू कर मस्त ट्रेन मधल्या सारखा करतेस, तो बळबळ्या कैलास आला होता तेव्हा केलेला ना तू तसा !!

“काय ताई, काहीही हा...”

आत्ता मात्र सर्व हसले.

मावशी लगेच म्हणाली, ओ माय गॉड, तर आश्चर्य आहे, सासू आणि सूनेचा एकच स्वर आहे...”

अनु जरा लाजली आणि खोलीतून निघाली, अंकित तिच्या मागेच आला. अनु आणि अंकित स्वयंपाक खोलीत चहाची तयारी करत होते. दोघांना वेळ मिळाला होता अनुच्या घरी काय बोलायचं आणि कसं जायचं ह्याचा विचार करायला.

इकडे आराध्या मावशीने सानूला खोलीत गाठलं,

सानू खूप झाली ग उडवा उडवी ची उत्तर तुझी, यंदा तुझ्या लग्नचा विचार आहे ग, घे ना जरा सिरिअस, मुलगा चांगला आहे, आवडले बघ तुला, माझ्यावर विश्वास नाही का तुझा?”

अग ये मावशी, आता यार तू इमोशनल ब्लॅकमेल करू नको यार... येऊदे कोण येतोय तो, मला काय! एकदा अजून करते नट्टा पट्टा.”

म्हणत ती मावशीच्या गळ्यात पडली.

ओ माय गॉड, कधी तर सेरीअस उत्तर दे ग, बघ ह्या वेळीस तू होच म्हणणार, मला माहित आहेत.”

“काय ग, तुझं आपलं काहीही, सुट्टी कधी घायची ते सांग, माझा एक खडूस बॉस येणारं आहे, त्याचा शेडूल बघते आणि सांगते तुला.”

मावशी ने अजून काही विचारलं नाही, आणि सांगितलंही नाही, तिला अस्मित कुमारांचा फोन आला आणि ती बिझी झाली.

सावंत वाडा-

दुपारची जेवणं झाली होती आणि पाहुणे हॉलमध्ये चर्चा करत बसले होते, काही निघणार होते तर काहींना अवकाश होता. राणीच्या सासूने जे पाहुणे निघणार होते त्यांना गिफ्ट द्यायला सांगितलं, राणीला तर हे नवीन होतं. सासू तिच्या हातात सामान देत होती आणि कुणाला द्यायचं ते रोहिणी तिला सांगत होती. जवळपास सर्व निघणाऱ्या पाहुण्यांना गिफ्ट आणि मिठाई देवून झाली होती. आणि सासूने तिला हळदी कुंकुवाचा करंडा देवघरातून आणायला सांगितला, राणीची सकाळीच देवघराशी ओळख करवून दिल्या गेली होती तरीही त्या भव्य वाड्यात तिला काही देवघर नक्की कुठे आहे हे कळत नव्हत, राजनला ती दुरून दिसली. तो जवळ आला आणि त्याने तिला देवघर दाखवलं, समजवून सांगितलं की देवघर हे कुठे आहे ते. जवळ येतातच त्याने तिला स्वतःला आवरायलाही सांगितलं,

“राणी जरा केसं वगैरे नीट कर, इथे नावं जास्त ठेवली जातात, तशीही तू सावंताची एकुलती एक सून आहेस आणि मुख्य म्हणजे माझी पसंत आहेस, इथे अशी बरीच नाती आहेत ज्यांना त्यांच्या नात्यातल्या मुलींना ह्या घरची सून करायचं होतं, पण तू आलीस आणि बरीच नाती रुसली आहेत.”

राणीला हे माहितच नव्हतं, ती अवघडली, काहीच बोलली नाही,

“अग घाबरू नको, तुला घाबरवण्यासाठी नाही बोललो मी, बोललो ह्यासाठी की चुकून काही तुझ्या कानावर पडलं आणि तुला वाईट वाटलं तर माझी वाट लावशील ना रात्री....”

“काय हो, काहीही.”

“काहीही नाही, माझी बायको आहेस, राणी नावं आहे ना तर मिजासही राणीसारखा ठेव, बोलणाऱ्यांना बोलू द्यायच, आपल्यावर फरक पडू द्यायचा नाही, काय कळलं काय?” म्हणत राजनने तिला स्वतः कडे ओढलं. एक गच्च मिठी मारली आणि म्हणाला,

“तुला कळत नाही का ग, कुठेही काहीही करायला लावतेस, देवघरा समोरही.....”

आणि तो हसून निघून गेला.

राणी मात्र मनात हसली, जरा लाजली, आणि आधी स्वतःला आवरायल गेली, केसं आवरले, लिपस्टिक परत लावली. दागिने बरोबर केले, साडी नीट केली आणि देवघरात जावून तिने करंडा उचलला.

हॉलमध्ये आली आणि तिला बघून सासूला ह्यास वाटलं, फ्रेश वाटत होती, सासूने नजरेने तिला हळदीकुंकू लावण्याचा इशारा केला. आणि ती लावायला लागली, प्रत्येकाला वाकून नमस्कार करत होती आणि स्मित हसत होती. दुरून समोरच्या वरांड्यात पुरुष मंडळी बसली होती, राजनही होता, तिला बघून डोळ्याने खाणा-खुणा करत होता. सासूने राणीला जवळ बोलवत म्हंटल,

“राणी, अम्मा काकीला चहा टाकायला सांग.”

ती निघालीच होती तर परत राजनच्या काकूची कुजबुज सुरु झाली, खर तर तिला तिच्या भावाच्या मुलीला राजन साठी सांगायचं होतं पण झालं नाही ना, मग बोलली,

“सुनबाई सुंदर आहे हो ताई तुमची, काय पण मोहित्यांकडून काही आलं नाही का, इकडल्या पाहुण्यासाठी.”

सासूने सहज उत्तर दिलं, “नाही, नाही आलं...”

“अग बाई, रीत बीत आहे कि नाही त्यांना, की बसं मोठ्या घरी मुलगी दिली कि झालं...”

“काहीही काय ग!”

“ताई तुला तरी काय बोलायचं,”

राणीच्या सासूला तिला इशारा कळला होता, तीही सावंत वाड्यात खूप काही मोठ्या घरून आली नव्हती, पण... काहीसं आता तिलाही वाटलं होतं. बायकोंमध्ये कुजबुज वाढत होती. आणि ती राणीने ऐकली होती. तिची नजरा नजर सासूशी झाली, आणि सासू तिला जवळ येवून म्हणाली,

“मनावर घ्यायच नाही, मीही हे भोगलं आहे, आणि ह्यांच्या समोर मी काहीही बोलली तरी तेही मनावर घेवू नकोस. बोलावं लागतं कधी कधी.”

म्हणत ती बायकांमध्ये जावून बसली.

राणी मात्र आधीच हळव्या मनाची, असं कुणी बोललेलं तिला लागलं होतं, राजनने सांगूनही तिचं मन त्या गोष्टीत शिरत होतं, राहून राहून वाटत होतं, मी छोट्या घरची मुलगी आहे, अम्मा काकीने चहा आणला आणि राणी तो सर्वांना दिला. गुमान खोलीच्या दिशेन वळली होती तर राजन परत काही कामासाठी आतमध्ये आला, तिला असं गप्प बघून म्हणाला, “ह्हम, ऐकल्या वाटते गोष्टी राणीसाहेबांनी?”

“नाही हो, काही नाही,.. जरा लागलं...”

“लागू दे, काही होतं नाही, अश्यांना बोलायचं नसतं दाखवून द्यायचं असतं, आणि लक्षात ठेव इथे कुणीही तुला आपलसं बोलणार नाही, आणि बोलले तरी माझ्या नात्या मुळे बोलतील, इथे तू माझी आहेस.... आणि मला हे मान्य नाही की तू कुणाच्या काहीही बोलण्याने नाराज व्हावी, जर मी बोललो तर... मात्र...”

“काहीही काय राजन... तुम्ही पण बोलणार काय?”

“हो, का नाही! मला सांगितलं आहे बाळूने की तू मस्त भांडतेस म्हणून... मग मला भांडायचं असलं की मी तर बोलणार...”

“असं!”

बोलता बोलता राजन ने राणीचा हात धरला आणि दोघेही खोलीत गेले.

सासरी मन गुंतावातांना जोडीदाराची साथ लागते, सुरवातीच्या काळात तर ती हवीच असते, कारण तोच तिचा असतो तिथे.... ज्याच्या मुळे नाती असतात त्यालाच ती जपावी लागतात. त्याची पकड जास्त मजबूत असायला हवी तेव्हाच त्याच्या जोडीदारावर बोट उचलल्या जात नाही.

Post a Comment

0 Comments