अनुने सर्व खोलीत नजर फिरवली, कुणीच नव्हत, पण दार बंद झालं
होतं, तिच्या हातची बॅग खाली पडली, मन घाबरलं, परत तिने खोलीत नजर टाकली, कुणीच
नव्हतं पण कडी लावली होती, ती दाराकडे धावली, तोंडातून अर्धवट सानू दी म्हणून आवाज
निघणार होताच तर कुणीतरी तोंडावर हात ठेवला आणि तिला मागून दुसऱ्या हाताने कंबरेला
गच्च पकडलं....
अनु काहीशी घाबरली होती, पण काही क्षणात तिला तो स्पर्श
ओळखीचा वाटला. लगेच ओरडली,
“अंकित!”
अंकितने लगेच अनुला तसचं जवळ ओढलं,
“काय ग अनु! वाटलं होतं जरा मजा
घ्यावी तुझी, पण तू ओळखलंस?”
म्हणत अंकितने अनुला आणखीनच जवळ ओढलं, तन मन चिंब झालं होतं
त्या स्पर्श सुखाने, श्वासात गर्मी वाढली होती, दोघांच्या नजरा प्रेमात चिंब होवून
मिलन गीत गात होत्या, आणि टपकन अंकितच्या
माथ्यावर साचलेलं पाणी दोघंच्या मध्ये बरसलं, भानावर आलेले दोघे लगेच दूर झाले.
अनु स्वतःच स्वतःला आवरत म्हणली,
“ईs s ई, सकाळपासून
अंघोळ नाही तुझी, आधी कर बघू.”
तिथेच पडून असलेल्या टॉवेलने स्वतःचा घाम पुसत अंकित
म्हणाला,
“नवरीचा भाऊ आहे मी, मला कसली सूद ग, डझन भर काम
असतात, चल ना आपल्या खोलीत, मला जरा मदत कर, पटकन ब्रश आणि अंघोळ करतो.”
“म्हणजे तू ब्रशही केला नाहीस सकाळपासून... दूर हो दूर
हो... म्हणून वास येतोय.”
अंकित छाती ताणून अजून जवळ आला, “चलतेस कि घेवू अजून
मिठीत...”
“अरे पण मग आम्हाला कोण सोडणार आहे हॉलमध्ये.”
मी पाच मिनिटात आवरतो सर्व. म्हणत अंकित त्याच्या खोलीत
पळाला. अनया बाहेर आली, सानू आणि राणी गाडीत बसून होत्या, अनुने घरातून सानुला फोन
लावला,
“ताई, बसं दहा मिनिट थांबा, अंकित अंघोळ करत आहे.”
सानूही आतामध्ये आली काही सामानासाठी. आणि अनुला अंकितच्या
खोलीत जातांना बघून ओरडली,
“लवकर या दोघेही, निघायचं आहे, वरात पोहचत आहे असा फोन आलाय
मावशीचा.”
शब्द कानावर पडताच अंकितने स्वतःच आवरलं आणि दोघेही हातात
हात घालून पायऱ्या उतरले, तो क्षण अगदी मनात उतरला होता दोघांच्या. नजरा बोलत
होत्या आणि स्पर्श मोहात पाडत होता. दारावर येताच सानूने दोघांचे धडाधड फोटो घेतले
आणि पटकन त्यांना गाडीत बसायला सांगितलं. अनु मनातून सुखावली होती आणि ते
चेहऱ्यावर दिसत होतं. गाडी चालवणाऱ्या अंकितच्या चपलेवर सानूच लक्ष गेलं,
“ये बाळू काय हे, तुझ्यासाठी मोजरी घेतली होती ना रे तू
आवडीने, ह्या सूटवर घालायला, हे काय स्लीपर घातली तू.., शीट....”
अंकित हसला, “
जावूदे ना तायडे, मला कोण बघतं... नवरीच्या भावाची ही अशीच
दशा असते... आता हिने केली... लवकरच तू करशील.”
“हे मान्य, पण तुला बघणारी आहे आता... तुही वेंधळा म्हणा,
अनु सोबत होती ना, तुला कुठे सुचणार होतं. जावूद्या आहे योग त्या घालायचा घाल
तेव्हा...”
गाडी मागच्या गेट मधून हॉलमध्ये पोहचली होती, सर्वाना
नवरीच्या खोलीत सोडून अंकित मांडवात धावत आला होता. दुरूनच अंकीतच लक्ष आलीया,
अनुच्या बहिणीवर पडलं, आणि मग त्याने तिला अनुकडे जायला सांगितलं. अनुलाही आता
सोबत मिळाली होती, तीही जरा राणी पासून दूर येवून मांडवात बसली. मांडव पाहुण्यांनी
भरला होता.
आज एक जोडी बंधनात बांधल्या जाणार होती जिला अनेक जोड्यांचा
आशीर्वाद लाभणार होता. राणीचं फोटो शूट सुरु होतं आणि सानू ते फोटो राजन रावांना
पाठवत होती. राजनही राणीचं हे नवरी रूप बघण्यासाठी बेचैन झाला होता.
काही वेळातच वरात दारावर येवून ठेपली होती, आराध्या मावशी,
अस्मित कुमार, भीमा काका आणि सुनीता काकू दारावर स्वागतासाठी सज्ज होते. तोच अमित
वराती सामोरून नशेत चालत येवून मांडवात अंजली आत्याला सैर वैर शोधू लागला.
स्वतःच्या मनातल्या काळ्या भावना मनात कोंबत अंजली छकुलीला घेवून दूर बसली होती,
तिच्या मते तिची सावली नवीन जोड्यावर लग्नं मांडवात पडायला नको असंच तिला वाटत
होतं. मनातली खंत ती बोलून दाखवत नव्हती पण मनात कुठतरी जोडीदारासाठी मन दुखत होतं
आणि मग त्या जखमेने इतरांना त्रास होवू नये म्हणून ती कुठल्याही लग्नात दूरच राहत
असायची. गेल्या चार दिवसापासून ती इकडे भावाकडे होती मग तिचा नवरा अमितचे हाल झाले
होते कदाचित आणि म्हणून आज तो नशेत तिला घरी न्यायला आला होता.
तिला असं जरा सजलेलं बघून ओरडला,
“काय ग भवाने, नवऱ्याला उपाशी ठेवून इथे काय करत आहेस, चल
घरी हो, स्वयंपाक कर, कुणासाठी हा नट्टा थट्टा.”
म्हणत त्याने तिचे भर मांडवात ओढताड करायला सुरुवात केली.
गोंधळ जरा दूरच होता मग अंकित धावत तिथे पोहचला, अंजलीला अमित ओढत नेत होता तोच
अंकितने आत्याला बाजूला केलं आणि स्वतःचा हात अमितच्या हातात दिला आणि आत्याला
बाजूला व्हायला सांगितलं, नशेत त्याला कुठे कळणार होतं. मांडवात हळूच अंकित
अमितसोबत बाहेर निघाला, काही वेळ सोबत चालत होता, आत्याच घर हॉल पासून काही
अंतरावर होतं, घर येताच अंकितने जोरात त्याच्या थोकाडीत लावली, अमित पडला आणि पार
पडूनच राहिला. अंकितने एक नजर घरावर टाकली, इथेच बसून असणाऱ्या अंजली आत्याच्या
सासूवरही त्याने एक कटाक्ष टाकला. आणि धावत लग्न मंडपात पोहचला. इकडे दारावर
स्वागत सुरु होतं पण अंकित अंजली आत्याला शोधत होता. राजन लग्न मंडपाकडे वळत होता.
सर्व वातावरण लग्नंमय झालं होतं. राणीला सानूने लग्न मंडपात आणलं होतं. जोडी सज्ज
झाली होती सात जम्नाच्या गाठीसाठी. दोघांच्या नजरा बोलत होत्या आणि मन आनंदाने
मोहरत होतं. लग्न सुत बांधल्या गेलं आणि अक्षदा पडल्या. तरीही अंकीतच लक्ष आत्याला
शोधण्यातच होतं. त्याची नजर पडली तिच्यावर. तो गर्दीतून आत्याकडे गेला, त्याला असं
बघून अनुची तिच्या बहिणीला घेवून त्याच्या मागे गेली.
अंकितने आत्याला एकट्यात गाठलं,
“आत्तू, तुला किती वेळा समजावलं ग...”
“बाळू काय झालं रे, पिऊन होते ते, तुला काही बोलले का...”
“मला काय बोलणार ते!”
“मी बोलते त्यांच्याशी…
“अग आत्तु, तो माणूस बोलण्याच्या तरी तालात असतो का?”
आत्या आता घाबरली होती, डोळ्यात लाजेने पाणी आलं होतं तिच्या, पान आवंढा गिळत गप्प झाली होती, तिला असं बघून
अंकित चिडून म्हणाला,
“तोड हे नातं, त्यांना नाही ना तुझी कदर... तू आज त्यांच्या
नावाचं उपरणं काढून फेकत आहेस... मला काहीही माहित नाही, उद्यापासून तू मोहिते
निवासात कायमची राहणार आहेस.. बस्स! विषय संपला....”
अरे ऐक ना रे बाळू, रागात आहेस तू... मी बघते ना काय करायचं
ते...
“आत्तु मी बललो आता...”
अंकितने अनया जवळ आल्याचं बघितलं आणि अनुला आत्याला
सांभाळायचा इशारा करत निघून गेला.
आत्याला मनातच विचारांचे काटे उभे झाले होते, आज तिच्या
भावना तिला ते संसाराचं उपरणं फेकायला सांगत होत्या. समोर लग्नमंडपात राणीच्या
पदराला एका उपरणाची गाठ पडली होती आणि आज आत्या एक उपरणं काढून फेकण्यासाठी तयार
होती. तोच छकुलीने जवळ जावून आवाज दिला, “मम्मा रडू नको ना ग... जावूदे मी आहे ना
तुला..”
आणि मनातल्या काट्यांना मनातच आवर पडला, उठलेले काटे नमले.
फेकून देण्यासाठी सज्ज झालेलं उपरणं परत अंजलीने खांद्यावर ठेवलं.
जरा हसली, छकुलीला मिठी मारली आणि म्हणाली, “हो ग माझी
लाडो, तू आहेस म्हणून मी आहे... चल बघू
राणी ताईला, बघ कशी सुंदर दिसत आहे ना अगदी राणी सारखी, आण आपण इथूनच अक्षदा फेकू
तिच्यावर. गर्दी आहे बाळा तिथे.”
अनुही आत्याच्या जवळच उभी राहिली, तिला तर फारसं काही माहित
नव्हतं पण जाणवलं होतं की आत्याच्या आयुष्यात एका जोडीदाराची कमी आहे म्हणून आणि
असणारा जोडीदार नुसता नात्यावर कडीसारखा आहे.
खर तर ती कडीही तोडकी मोडकी आहे पण आत्या त्याला चिकटवून
ठेवते नुसत्या छकुलीसाठी आणि मनातल्या तिच्या त्या प्रेमासाठी जे आजही तिचं तिच्या
नवऱ्यावर आहे. कदाचित तिला आजही आस आहे अमित सुधारेल ह्याची, कादाचीत ती आजही तिचा
जोडीदार शोधते त्याच्यात.... पण... जोडी तर दोन्ही बाजूने असते, एकाने बांधून कुठे
जोडी बनत नाही ना... हे तिच्या भाबळ्या मनाला कुठे कळत होतं. पण ते अनुला कळालं
होतं अंकित तिच्या आयुष्यात आल्यापासून...
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments