तिघंही भावंड बाळूच्या खोलीत मग्न होते. बालपणाच्या आठवणींना उजाळा देत उद्याच्या स्वप्नात रमले होते. पण खाली काही वेगळीच चर्चा जन्माला आली होती. आईच्या मनात धाकधूक होतं होती, राजन रावांचा फोन वाजला, जरा बिजनेस संबंधित होता मग ते बाहेर गेले बोलायला. ते निघताच आई म्हणाली,
“अहो आता बाळूच आणि अनुच लग्न आपण लांबवू या... उगाच मध्ये-मध्ये
नको... माझ्या मुलीच नातं नवीन आहे. आणि घरची गोष्ट कशाला सर्वांसमोर आणायची, आता
अनु वावरलीच ना सून म्हणून... घेतलंय की मी सांभाळून, मग थांबवूया ना?”
बाबा तिला म्हणाला, “अग हरकत काय! अशे ते लोकं मला हेवे
दावे करणारे वाटले नाही.“
सदा काका म्हणाला, “आरती माणसं मोठी असली की मनही मोठी
असतात ग, आणि त्यांनी तर शून्यातून विश्व निर्माण केलंय... कशाला काळजी करतेस,
दोन्ही कार्यक्रम एकत्र करूया ना, हवं तर आपल्या सानूला विचार... तिला तरी पटेल
काय. भावाच्या आनंदात विर्जन घालायला.”
“नाही हो जिजू, अनु घरची आहे, आता उगाच काही नको बाबा,
माझ्या मुलीच्या लग्नाला अजून काही अडखळे”
“अग पण, पोरं उत्साहात आहेत ग.”बाबा आईला समजावत म्हणाले
“तर काय! बहिणीसाठी येवढ नाही करू शकत काय! आम्ही किती
पचवलं त्याचं.”
“ताई नको ग, काही होतं नाही, हवं तर मी सांगते मासाहेबांना,
त्यांच्या मुलीनेही असं लग्न केलंय, समजून घेतील त्या.” मावशी आरतीला म्हणाली.
“त्या समजून घेतील ग, पण मला नकोय... काही होणार नाही
हप्त्या भरानंतर लग्न लावून दिलं तर तसही त्यांनी केलंच आहे ना!”
“हो, मग तू त्यालाही तर मानत नाहीस” बाबा म्हणाले.
“हहम... ते काही नाही.”
“तुझा अट्टाहास आहे, घरी रीतसर लग्न करवून देण्याचा.”
“मग काय चुकीचा आहे?”
राजन राव बाहेरून घरात येताच परत सर्व शांत झाले. आई आणि
आराध्या स्वयंपाक घर आवरायला निघून गेल्या. तिथेच उभी असणार्या अनुच्या डोळ्यातून
पाणी वाहत होतं आणि ती अलगद पुसत राणीच्या खोलीत शिरली.
इकडे हॉलमध्ये राजन रावांशी गप्पा रंगल्या होत्या, दुपारची
संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. आईची नजर अनुवर पडली आणि तीने ती चोरली, मान हलवत
ती पुढे निघून गेली. अनुला मात्र वाईट वाटलं होतं. तरीही तिने स्वीकारलं, शेवटी
मुलगी आहे सानू आणि कितीतरी दिवसांनी तिच्यासाठी घरात आनंद होता मग आपण कशाला
विर्जन घालावं ह्या विचाराने ती शांत होती. त्यात बोलतांना आईनेच अनुला ती घरचीच आहे म्हणून
म्हटलेले. शिवाय आईचा शब्द घरात अंतिम होता, कुणाला पटो वा ना पटो हे तिला चांगलाच
माहित झालं होतं. उगाच काही बोलून आपणच रोष पत्करून घ्यायला नको हे तिच्या लक्षात
होतं. ह्या रविवारी नाही तर पुढच्या रविवारी म्हणून तिने मनालाच समजावलं.
दुपार गप्पा करण्यात कधी गुंतली समजलं नाही. संध्याकाळी
राजन रावांनी निघण्याची घाई केली, राणीचा घरात आवरा आवरीचा गोंधळ सुरु होता, तिला
तिचं कॉलेज सुरू करायचं होतं मग सगळं सामान राजन आणि राणी आवरत होते. आणि मग
निघण्यासाठी तयार झाले. आईने दोघांची आरती ओवाळली, दीठ काढली, आणि राणीसाठी खास
करवून घेतलेला चांदीचा पाळणा आणि त्यावर झुलता कृष्ण तिने तिच्या हातात ठेवला. लाजलेल्या
राणीला राजनने हळूच धक्का दिला आणि दोघांनी आशीर्वाद घेतला. बाळूने सामान गाडीत
ठेवलं आणि सर्वच बाहेर उभे होते. घरच्या पाठवणीत आणि हॉलच्या पाठवणीत काय फरक असतो
आज आईला जाणवलं होतं, डोळ्याचे किनारे भरून आले होते पण मुलीच्या चेहर्यावरचा
आनंद त्याला वाहू देत नव्हता. राणी आणि राजन गाडीत बसले आणि सर्वाना नमस्कार करत
निघून गेले.
घरात येताच आईने सर्वांना सांगितलं,
“आता सर्व ऐका, सानूचा साखरपुडा आपण येत्या रविवारी करतोय
आणि अनु अंकीतच लग्न त्याच्या पुढच्या रविवारी, उगाच गोंधळ नकोय घरात.“
बाबा आईला म्हणाले, “अग पण ते आधी ठरलंय ना, आपण साखरपुडा
लांबवू... ऐकतील ते. अनु आणि अंकितला वाईट वाटेल, मन दुखतील त्यांची.”
“मन कशाला दुखतील, आपण काय नाही म्हणत आहोत का? तसाही उठून
उभा केलेला थाट आहे तो... करू हो पुढच्या रविवारी, आलिया भोगाशी आम्ही झालो सादर
.....”
आता मात्र अंकित रागात म्हणाला,
“काय सुरू आहे आई
तुझं, येवून जावून तुझं माझं आणि अनुच्या नात्यावरचं येवून अटकते. ऐकतोय ना आम्ही
सर्व म्हणून हे बोलणं येत आहे. सारखी तुझी मनमानी सूर आहे.”
बाबा ओरडत म्हणाले, “अंकित! आईशी बोलत आहेस तू... मी बोलतोय
ना ? मध्ये बोलू नको. आणि मी तिच्या शब्दा बाहेर काहीच करणार नाही... मलाही तिला
जपण्यात सन्मान वाटतो, मी माझ्या बायकोशी बोलत आहे आता. तू गप्प बसं!”
“बाबा पण आईच काय सुरू आहे, हे मला नाही पटत, आणि मी पटवून
घेणार नाही.” म्हणत तो बाहेर निघून गेला.
बाबा आईला शांत स्वरात म्हणाले, “आरती आपण बोलूया
मासाहेबांसोबत आणि ठरवू ना नंतर, तसही मी वेळ मागीतला आहे त्यांच्याकडे, म्हणून मी
सकाळी होकार दिला नाही ना. एकाच मन जपताना दुसर्याला का ग दुखवायचं?”
“ते मला माहित नाही, आजवर माझ्या मुलीने खूप सहन केलंय, आणि
खूप काही केलंय ह्या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी तिने स्वत:चा आनंद बाजूला
ठेवला. काय हा बाळू विसरला का? किती लाड पुरवते ती त्याचे, त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च तिने काढला आहे
, मार्क्स कमी पडले होते, पेमेंटशीटवर इंजिनिअर झालंय तो. आणि ह्या अनुला सर्वांत
आधी तिने समजून घेतलं... मग जरा ह्यांना धीर धरायला काय होईल. आणि अगदीच आपण
स्वीकारलं नाही असं तर नाहीच ना?”
“अग पण ती कुठे काही बोलते, तिला सगळं कळतंय घरातलं... तुझा
मुद्दा बरोबर आहे, मलाही सानूचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे, अनु घराची मुलगी आहे
आणि सोबतच असणार आहे पण हे असं गृहीत धरून तिच्या आनंदाला आपण का म्हणून थांबवायच...?
आई बाबांना मध्येच थांबवत म्हणाली,
“हो ना, मुलगी आहे, सोबतच असणार आहे, मग थांब म्हणावं अजून
जरा, कसली घाई आली आहे.”
“आरती किती थांबणार ग मुलं... त्याच्या भावनांना का
कोमेजवतेस, दोन महिने होतील आता दोघेही एकाच घरात आहेत पण... सोबत खोलीत नाहींत...नवरा
बायको आहेत पण अजून नाहीत... मला बोलायचं होतच तुझ्याशी...”
“मी म्हणाले ना, तुम्ही मला सांगू नको हो, मला माझ्या सानूसाठी
काही करायला मिळत आहे आणि आता मला कुठलाही अडथळा नको त्यात.”
“झालं, काही बोलून अर्थ आहे आता, साहेबांचा हुकून आलाय,... हेडकमांडने
आदेश दिलाय...“ बाबा गुमान नाराज झाल्या सारखे गप्प सोफ्यावर बसले.
भीमा काका आणि अस्मित कुमारही सर्व ऐकत गुमान गप्प होते.
शांतता होती खोलीत. तर सानू माळ्यावरून सुमंतशी फोनवर बलून हसत खाली आली आणि
म्हणाली,
“आई मला जरा बाहेर काम आहे मी जावून येते.”
आणि विषय बदलला, तिला बाहेर निघताना बघून अस्मित कुमार
म्हणाले,
“सानू, मलाही फ्लाईट आहे, निघायचं आहे मी ही येतो, सोबत
निघूया, तुला सोडतो, कॅप बुक केली आहे मी. येईलच एवढ्यात.”
आणि मग ते आरध्याला म्हणाले, “माझी बॅग भर लवकर , मी निघतो,
कळव मला काय ठरते ते, मी नक्की येईल.”
“अन्ना निघायला हवं, खूप काम घेवून आलोय इकडे, आणि आईची
तब्येत पण बरी नाही, जरा राहिल मी तिकडे, पण सानूसाठी आणि अंकितसाठी वेळ आहे
माझ्याकडे. कधीही बोलवा.”
“आणि आम्ही आता रविवार नंतर नाही थांबू शकत इकडे,
आराध्यासाठी आईने बऱ्याच वेळा विचारलं आहे, तेव्हा आराध्या तुही तयार हो, रविवार
नंतर आपल्याला बंगलोरला राहावं लागेल.” अस्मितकुमार आराध्याला म्हणाले.
“हो हो, मला माहित आहे,” म्हणत आराध्याने मान हलवली. आणि ती
खोलीत अस्मिताची बॅग घ्यायला निघुन गेली.
सानू आणि अस्मित कुमार सोबत बाहेर निघाले. बाळू मात्र बाहेर
गाडीवर गुमान बसला होता, त्याला असं बघून सानू त्याला म्हणली,
“ये शेंबड्या, का रे बाहेर? आता हो ना तयार... तुला पाठवते
मी तुझ्या खोलीत लवकरच, मग तिकडे वाट बघ ना अनुची... इथे काय वाट बघतोस?”
बाळूला तसही सानूच्या आनंदाला थांबवायचं नव्हतं, तोही हसला,
हो का, पण हे वादळ सुटलंय ना अवेळी... माझी पूर्ण वाट
लावणार आता... माझा तर प्लॅन भसकला.”
सानू खूप खुष होती, तिला कळालं नाही त्याच्या बोलण्याचा रोख
पण ती हसली आणि म्हणाली, “वादळ स्थिरावलं बाळू... तुला भिण्याची गरज नाही आता ...”
आणि कॅप आली, ती गाडीत बासली आणि निघून गेली. अंकित अजूनही
तिथेच बसून होता.
त्या दिवशी तो कुणाशीच बोलला नाही. गप्प होता. घरात खूप
आनंद होता पण जरा कुठेतरी अंकित आणि अनु परत दुखावले होते.
आईच्या मनात खूप उत्साह भरला होता पण समोर अनु दिसली की
तिलाही चुकल्यासारखं वाटत होतं, पण मनाला समजवायची, मनातच म्हणायची,
“माझ्या सानूसाठी हेही, कधी नव्हे ते मुलीच्या मनात प्रेम
शिरलंय, तिलाही घेवू देत जरा विसावा, आजवर
खूप केलय माझ्या मुलीने, हिला काय ना बँड ना बारात आली दारात आणि सरळ घरात, आणि
वरून माझ्यावर शिरजोर तो बाळू, घेईल सांभाळून नंतर आधी माझी मुलगी.”
मनातच मनाला सावरून आणि कठोर करत आरती मग्न होवून कामाला
लागली होती. रविवारी काय काय करायचं हा पूर्ण बेत तिचा तिने ठरवून टाकला होता.
सानूला तर प्रेमाच वांर लागलं होतं, आईच आणि अनुच काय सुरु
आहे हे तिला माहीतही नव्हतं, कधी नव्हे ती तिच्या धुंदीत मस्त होती, सकाळीच
सुमंतचा फोन येवून गेला होता, आणि ती आनंदात त्याच्यासोबत नवीन बंगला बघायला
जाण्याचा प्लॅन करत होती. दुपारच्या जेवणानंतर आई आणि अनुचा सामना स्वयंपाक घरात
झाला आणि आईने तिच्याशी बोलणं टाळलं, तेव्हा सानूच लक्ष आईवर गेलं पण तिने फारसं
लक्ष दिलं नाही, ती परत सुमंतने बोलावलेल्या ठिकाणी निघण्यासाठी तयारीला लागली.
अनु अचानक रडत खोलीत आली पण सानू खोलीत दिसताच तिने डोळे लपून पुसले आणि लागलीच
निघून गेली. इकडे आई बाळूच्या खोलीतल्या बाल्कनीत तोरणासाठी आंब्याची पानं तोडायला
आली होती. आणि ती बाल्कनीत होती तर बाळू रागात खोलीत शिरला...
बघूया पुढच्या भागात काय होतं ते....
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments