जोडीदार तू माझा.. भाग ६३

 भाग ६३



भविष्य! किती विचार करतो ना आपण त्याचा, कधी-कधी तर वर्तमान काळही डावलवतो आपण त्याच्या विचारात, विसरतो... की आता ह्या वेळेला आपण आनंद घेऊ शकतो जे आपल्या हातात असतं, तरीही हातात नसलेल्या काळात डोकावत हातची वेळ निसटवतो, आणि मग उरतो पश्चाताप...

मी हे करायला हवं होतं

मी ते करायला हवं होतं...

मी ते का केलं नाही....

नाही का!

आरतीने स्वतःला असं सावरलं की जणू तिने सारं काही एका क्षणात आवरलं, पसरलेल्या मनांना जराश्या निर्णयाने परत एकत्र आणलं होतं. घर सुंदर सजलं होतं परत जरा गदगदून हसलं होतं. घरातली सर्व पाखरं आज आनंदी होती.

आईच्या निर्णयाने घरात गोंधळ उडाला होता खरा पण मनात आनंद वाढला होता. सारेच जणू उत्साहाने कामाला लागले होते.

आईने परत ओरडत हॉलमध्ये आली,

“अहो जरा राजन रावांना सांगा...”

“अरे हो, ते निघालं होतं माझ्या डोक्यातून...”

“काय बाई सगळं मलाच सांगावं लागतं ह्या माणसाला, हे आणि ह्यांचे ते मित्र...अहो येताय ना.!”

“आलो, आता तुचं मला हे सगळे तोरणं बदलायला लावले ना, बघ किती सुरेख विणले आम्ही आणि मस्त दिसत आहेत.”

“हो, दिसले, हो... चला तेवढं तरी काम जमतंय... तुमच्या पलटनला...”

“ये पलटण कुणाला म्हणतेस ग, जिगरी आहेत माझे...”

“असुद्या!”

“काय म्हणत होतीस?”

“अहो जावयांना फोन करून सांगा ना, राणीला घेवून आले तर बऱ होईल ना... म्हणजे कळतेय मला, आताच येवून गेलेत पण... बोलाना, म्हणावं दोन तासासाठी तरी या जोडीने... “

“हुम्म्म, असं म्हणतेस, आण माझा मोबाईल इकडे.”

अरुणने राजन रावांना फोन लावला आणि सगळं खरं खर सांगितलं, येण्यासाठी आग्रह केला. राजनने ही अलगत होकार दिला होता, सकाळी ते लग्नाच्या वेळी पोहचणार होते. आणि दुपारी परत निघणारा होते.

आईला आज अनुपासून नजर चोरावी लागत नव्हती. तीही खुश होती आणि अनुही.

घर सजलं होतं परत जरा हसलं होतं, नातं सासू सूनेच आज परत बहरलं होतं.

घरालाही काय हवं होतं, घर म्हणून त्याला नुसतं उभं राहायचं नव्हतं... हसायचं, रमायचं आणि आठवणी जपायचं होतं.

येणाऱ्या भविष्यासाठी त्याला भूतकाळाला सोबत ठेवून वर्तमानकाळाला जगायचं होतं.

संध्याकाळी आईने, हळद भिजवली, घरच्या मागच्या अंगणात तिने अनु आणि अंकितला जोड्याने बसवून घरच्यांच्या मदतीने ती लावली, हा लग्न सोहळा जरा वेगळाच होता, जणू आरतीच अनुची आई झाली होती. आणि अनुच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. माहेर जरा विसरली होती अनु. त्या जखमांना हळदेचा मलम लागला होता. हळवं मन हळदीने पिवळं झालं होतं, स्वप्नाच्या राज्यात शिरलं होतं. हळदीच्या छोट्श्या कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना हळद लावली आणि हळदीच्या निमित्याने मन सुंदर झाली होती.

आई आणि अंकितची नजर भेट झाली आणि, अंकितने आईला गच्च आलिंगन दिलं,

“आई तू ना... समजायची नाहीस ग मला कधी...”

आईही म्हणाली, “समजायला तू आई नाही ना होवू शकत, आणि माझी तर आता सहा मुलं होतं आहेत... प्रत्येकाला समजून घेण्यात वेळ लागतो बाळा... माफ कर मला... तुला समजायला मला अनुचा साथ घ्यावा लागला...”

अंकित हसला, आणि म्हणाला, “तो कसा ग...?”

“जावू दे ना... जे होतय तेच हवंय ना आपल्या सर्वांना... सोड ते आमच्या दोघीत राहू दे...”

अंकितने आईला परत मागून मिठी मारली आणि म्हणाला,

“हुम्म तर पार्टी बदलली का ग तू?  तू काही आता माझी ती आई राहिली नाहीस... तू ना... सासूबाई झालीस... तीन तीन जणांची...”

“काय? मी आईच आहे... हो बाजूला, कामं आहेत मला. आणि काय रे सासू काय आई नसते... उगाच सासू नावाचा तुम्ही लोकं गैर अर्थ काढता.”

“ये आई तू सासू पण गोड आहेस... कशाला करतेस ग कामं... सांग तुझ्या त्या सुनेला..,. येतं काय तिला, लेक्चर देत राहते नुसती...”

“हो रे, थांब आता उद्यापासून तिची शिकवणी सूर करते, बघ कसं ट्रेन करून सोडते तिला, आणि बाळू तू हिचा काय तो बायोडेटा की काय त्या पाध्ये फॅशन स्कुल मध्ये दे ना, शिकवेल बघ छान.”

“अरे आई... मला कसं सुचलं नाही ते...”

“बाळू... तू आई नाहीस ना म्हणून...”आणि आई सामान गोळा करत कामाला  लागली.

आज घरात कुणीच रुसलं नव्हतं, घरात सर्वांनी मिळून जेवण केलं, हॉलमध्ये सर्व खालीच बसले होते, गप्पा आणि गोष्टीत मजेत वेळ गेला. सर्व आवरत वेळ निघून गेला, सानूला परत सुमंतचा फोन आला आणि ती खोलीत बोलायला निघून गेली. मावशीने तिच्या मुलाला उचललं आणि तीही झोपण्यासाठी निघून गेली. आई बाबा आणि भीमा काका, काकी, अरुणच्या खोलीत आपल्या आपल्या औषधी घेत गप्पा करत होते. हॉलमध्ये अनु आणि अंकितच होते. अनु स्वयंपाक घर आवरत होती आता तिला खूप काही माहित झालं होतं घरातलं, भांडी लावतांना दचकत नव्हती, आत्मविश्वास शिरला होता, अंकितही मोबाईल मधून निघून स्वयंपाक खोलीत आला, दोघांची नजरा नजर झाली,

 “अनु, हळू हळू राज्य करते आहेस तू. ..आता उद्या पासून माझ्या खोलीतही तुझंच राज्य चालणार.”

“असं... मी कुठे करते, इथे तर तुझ्या मनासारखं होतं आहे.”

“हो... म्हणजे मी आईला बोललो का ?”

“मला काय माहित... मी तर काही नाही बोलले. त्यांनीच मला बोलावलं आणि ... “

“आणि काय... ?”

“आणि काय रे... तुला सगळं माहित आहे. तू बघत होतास चोरून.”

“नाही, मी तर सहज डोकावलं, तुम्ही ऐकमिकांना मिठी मारत होत्या तेव्हा ... “

“हं... किती चिडला होतास तू. मला तर भीती वाटली होती... पण जे होतंय ते योग्य आहे ना?”

“म्हणजे? आई बोलली ना सर्व... मग कशाला भीती... अब सब ठीक है!”

“हा जी! अभि तो आपको सब ठीक ही लगेगा... मगर हम भी हम है!”.

“अरे जानी... कल से आप मेरी पुरी अर्धांगिनी... अभि तक तो थी घरवाली... अभि तो आप ही हो इस नादान का वली...”

“असं ! काहीपण हा तुझं... घे, ते ताट दे माझ्याकडे, जरा मदत कर...”

“वो वो... बस !! हेच राहिलं होतं, कशाला लावतेस तू, मीच पुसतो आणि मांडतोही रॅकमध्ये, तू बस ग, थकलीस...”

अनु हसली, “बरं, लावं... “

अंकित ताट रॅकमध्ये लावण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही कळत नव्हतं कुठल्या साईजच कुठल्या ठिकाणी ताट ठेव्याचं, प्लेटस कुठे ठेवायच्या,आणि तो म्हणाला,

“हरलो... “

अनु मात्र बसून कुठेतरी मग्न झाली होती. तिला असं बघून अंकित तिच्या जवळ आला,

“काय ग काय झालं? आता का चेहरा पडला?”

“अंकित माझे आई बाबा आले असते, तर किती छान झालं असतं ना.”

“तेही... पण असुदे... आपण कुठे सर्व लढाई अजून जिंकलो, आता तर सुरुवात झाली आहे... पण एक आयडिया आहे, थांब मी आलियाला कॉल करतो.”

आणि त्याने अनुच्या लहाण बहिणीला फोन लावला, आलियाला त्याने सांगितलं, आणि विनंती केली की आईला घेऊन ऑनलाईन राहा म्हणून पण तिने त्याला सगळं सरळ सांगितलं की तिच्या बाबांना माहित झालं तर ते आईशी परत भांडतील... त्या दिवशी झालेला प्रकार अजून बाबा विसरले नाहीत हेही तिने सांगितलं. अंकितने गुमान सर्व ऐकून घेतलं, तेवढ्यात त्याला अनुच्या बाबांचा आवाज ऐकायला आला ते आलियावर ओरडत होते, आणि तिला विचारात होते, कुणाचा फोन आहे म्हणून आणि आलियाने भीतीने अंकित बद्दल सांगताच ओरडले,

“कोण तो आपण ओळखत नाही ना मग कशाला बोलतेस, एकदा सांगिलंय ना तुला... माझं नातं नाही म्हणून तिच्याशी, अरे कोण कुठला तो मुलगा, ठेव फोन.”

आणि आलियाने फोन ठेवला, तसा अंकित घाबरला आणि त्याने फोन ठेवला.

“मला द्यायचा तर होता, मीही बोलले असते.”अनु फोन ठेवताच म्हणाली.

अंकित पटकन म्हणाला, “अग ते सर्व तुमच्या गावी गेले आहेत म्हणे, आणि तिकडे फोनची रेंज नसते. असं ती बोलली... म्हणून मी फोन ठेवला. आपण नंतर बोलू ना!.”

अंकितने काहीही अनुला सांगितलं नाही, तशी त्यालाही काळजी वाटली होती आणि मनात सलतही होतं की का फोन केला म्हणून. पण त्याला अनुचा मूड घालवायचा नव्हता, घरातले सर्व आपल्या सोबत आहेत हे तो जाणून होता, जे होईल ते बघू ह्या नादात तो अनुकडे हसऱ्या चेहऱ्याने वळला. 

अनु परत गप्प झाली. अंकित तिला म्हणाला,

“आपण आपले फोटो पाठवू ना आलियाला... आई बघेल आणि देईल आशीर्वाद, तू तुझ्या आईने देलेला हार घाल ग, आपल्या दागीण्यासोबत, मस्त दिसशील, बघ एक दिवस तुझे बाबा स्वतः येतील ह्या मोहिते निवासात...आणि मी उभा असेल त्यांच्या स्वागतासाठी...”

“अरे असं होईल का पण?”

“का नाही... आपण प्रयत्न करू... तू एवढं करत आहेस इथे तर मी ही करेन ना... विश्वास ठेव... मान्य आहे, आपल्या आनंदात आपले आई बाबा असले की त्या आनंदाची मजा काही और असते... पण विचार कर... तोही आनंद खूप वेगळा असेल ना जेव्हा तुझे आई बाबा आपल्या नात्याला सहमती देतील... रुसले आहेत ते... त्यांच्या प्रेमात त्यांची इच्छा शिरली ना म्हणून... जेव्हा आपली इच्छा त्यांना कळेल तेव्हा तेच जवळ करतील... “

अनु शांत झाली होती तर अंकितने तिचा हातात हात घेतला,

 “तू साथ देशील तर सगळं होईल, उद्या पासून नवीन सुरुवात आहे आपली...”

आणि हळूच कानात त्याने गुड नाईट म्हटलं ...

अनु त्या आवाजाने शहारली, अंगात तिच्या श्वासाच्या आवाजाने गुर्मी शिरली, तीही हळूच म्हणाली, “गुड नाईट..”

अंकित,” अच्छा गुड नाईट ... “

आता मात्र अंकित मिश्किल हसला, तिच्या अगदीच जवळ आला, श्वासात श्वास मिसळत होते, त्याने अनुला गच्च धरून मिठीत ओढलं, स्पर्शाने अनुची मुग्ध झाली, त्याने हळूच ओठ तिच्या माथ्यावर टिपली आणि ओठांपर्यंत येत म्हणाला,

“अनु एक ... “

अंतर बाह्य शहारलेल्या अनुने स्वतः त्याच्या मिठीतून सोडवलं, त्याच्या ओठावर बोट ठेवलं आणि म्हणाली,

“तोह माफ़ करना इस बात के लिए,

आज रात के लिए हम तुम जुदा हो जाते हैं

अच्छा चलो सो जाते हैं!”

स्वतः ला सोडवत अनु सानूच्या खोलीकडे वळली, अंकितही मागेच वळला, तिचा हात परत पकडला,

“बदले हुए हालात के लिए

आज रात के लिए,

 हम तुम जुदा हो जाते हैं

 अच्छा चलो सो जाते हैं”

अनु परत त्याच्याकडे गुर्मीत बघत खोलीच्या दारात पोहचली,

“ये... गुड नाईट रे ...नवरोबा! “ आणि तिने दिवे विझवले.

“गुड नाईट बायको ...”म्हणत अंकित त्याच्या खोलीकडे पायऱ्यांनी चढत गाणं गुणगुणत होता,

“कल की हसीन मुलाक़ात के लिए आज रात के लिए

हम तुम जुदा हो जाते हैं

अच्छा चलो सो जाते हैं!“

बाहेर छान टिपोर चांदण पडलं होतं, रात्र  उद्याची वाट बघत हळूच झोपीच्या कुशीत शिरली होती. जणू तीही गुणगुणत होती...

कल की हसीन मुलाक़ात के लिए आज रात के लिए

हम तुम जुदा हो जाते हैं

अच्छा चलो सो जाते हैं!“

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

 

Post a Comment

0 Comments