जोडीदार तू माझा ... भाग ६५

 जोडीदार तू माझा .. भाग ६५ 


आधीचा भाग इथे वाचा भाग ६४
आधीचे भाग सर्व इथे आहेत

लग्नाचा वातावरण आणि तेही घरात म्हणजे घराला अजून काय हवं असतं, हल्ली असले कार्यक्रम घरात कुठे होतात. घराला तर हा क्षण त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात साठवून ठेवायचा होता. नवीन जोडी नव्याने जोडीदाराच्या नवीन प्रवासाला लागणार होती.

सानूला आज अनुलाही तयार करण्याचा योग आला, म्हणाली,

“अनु, बघ तुलाही तयार करत आहे मी, नात्याने लहान भावाची बायको आहेस माझ्या पण राणीपेक्षा कमी नाहीस मला.”

तोच राणी खोलीत शिरली,

“व्हा व्हा, काय सुंदर दिसत आहे ग!”

सानू लगेच म्हणाली, “म्हणूनच तो शेंबडा प्रेमात पडला ना, हि तर साधीही सुंदर दिसते आणि आज माझ्या सेप्शल मेकअप मध्ये तर सांगूच नकोस.”

राणी, “हे मी येतांना वेणी घेवून आली, मळ ग ताई तिच्या जुळ्यात.”

राणीने ती वेणी सानूकडे दिली. दोघींनी मिळून वेणी गुंफली. नंतर राणीने तिच्या सासूने अनुसाठी गिफ्ट म्हणून दिलेल्या सोन्याच्या बांगड्या अनुला घालायला दिल्या. तिने आणि राजन ने मिळून घेतलेला नेकलेस हातात दिला. तिच्या नणंदेने म्हणजे रोहिणीने दिलेला अत्तरांचा सेट दिला. सासर्यांनी अनुसाठी आणि अंकितसाठी हँड बॅग सेट्स पाठवले होते.

अनुसगळं बघून भारावली होती. सुंदर तयार झाली होती. अनुने तिच्या आईने दिलेला चंद्रहार गळ्यात घातला, सासूने दिलेली नथ नाकात घातली. सानू आणि राणीने तिचे खूप फोटो काढले. इकडे अंकितला तयार करण्यासाठी राजन त्याच्या खोलीत गेला,

“काय साले साहेब, खुश ना आता... अरे आटपा की लवकर, तिकडे मुलींची पार्टी तयार होवून खचा खच फोटो पाठवत आहे मला, हे बघ ... “

आणि मग अंकित आणि राजन सर्व सोडून फोटो बघत राहिले... राजन राणीला बघत होता आणि अंकित अनुला...

खाली हॉलमध्ये सर्व जमा झाले होते. अस्मित कुमार आताच पोहचले होते, आल्या आल्या त्यांनी आराध्याशी बोलून त्याचं काम हातात घेतलं होतं. अंकितला त्याच्या खोलीतून आणण्याचं! तोच तयार नव्हता आणि खाली आलाही नव्हता अजून. अस्मित कुमार ओरडतच पायऱ्या चढत होते,

“बाळू, झाला काय रे तयार, यु मस्ट रेडी डीअर... हरी अप , आतापर्यत घाई होती तुला आणि आता खोलीतून निघत नाही आहेस. अरे इकडे सगळा लेडीज ग्रुप तयार झालाय.”

अस्मित कुमार बाळूच्या खोलीत आले, तेव्हा राजन आणि अंकित दोघेही मोबाईलवर फोटो बघण्यात मग्न होते,

 “अबे ये, बाळू, तुझी नवरी तिकडे वाट बघत आहे... आणि काय रे प्रत्येक्ष बघ ना आता... काय फोटोत बघतो...”

“काय हो राजन रावं... तुम्ही ह्याला तयार करण्यासाठी आले होते ना?”

बाळू पटकन उठला आणि त्याने स्टोल गळ्यात टाकला, निघण्यासाठी तयार झाला, जरा हसला, काहीच बोलला नाही. अजूनही तो फोटोत होता. खाली आला आणि आता मात्र अनुला बघताच फोटोतून बाहेर आला. नाजूक आणि ताईने स्वतः मेकअप करून तयार केलेली अनु अतिशय सुंदर दिसत होती. तो तसाच सानूदीकडे आला, कानात म्हणाला,

“ताई तू मुलगी बदललीस का ग...? ही तिचं आहे ना? लेक्चर देणारी, की?”

“ये शेंबड्या, मी तयार केलंय... काही बोलायचं आहे?”

“माझी मजाल... आपने सवारा है तो बेहतरीन ही है... बसं आखो पे एकीन नाही हो राहा... हमे भी तयार करती तो ...”

“तो काय... कही और जाते... “

“नाही ग बाई... एक ही कॉफी है... “म्हणत अंकित हात जोडून सानूपासून बाजूला होता आईकडे वळला. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याचा लाड केला.

अनु आणि अंकित दोघेही जोडीने बसले आणि समारंभ सुरु झाला, अनु आणि अंकित एकमेकांना नजरने इशारे करत होते, सर्वाना सर्व कळत होतं पण तेच साऱ्यांना हवं होतं मग कळूनही आनंदाने डोळे झाकले होते. आशीर्वादांच्या वर्षावात अनु अंकित आयुष्याच्या प्रवासाला निघाले होते.

सप्त पदी सुरु झाली होती, तसं पाहिलं तर लग्न सोहळा हा जनासाठी असतो मनासाठी तर ही सप्तपदी महत्वाची असते, त्यातली ती सात वचन आयुष्यभर पाळणं म्हणजे जोडीदारच नातं जपणं! ज्यांनी ही जपली त्याचा जोडीदार सुखी असतो आणि कायम मनाने सोबत.

अंतिम वचन सूर झालं आणि भटजीच्या मंत्र उच्चारात, दोघंही एकमेकांना कायम मित्र म्हणून एकमेकाच्या सोबत राहण्याचं वचन घेतलं, आयुष्यात कितीही परिस्थिती डगमगली तरी एकमेकांशी खरं बोलू हे बोलतांना अंकित जरा बावरला होता, कारण काल अनुच्या बहिणीशी बोलतांना घडलेला प्रकार त्याने तिच्यापासून लपवला होताच, पण सातवं वचन संपलं आणि तो म्हणाला,

“अनु हे एक वाचन माझ्या कडून तुला, माझ्याशी नातं जोडलसं म्हणून तुझी नाती पार मागे सुटलीत पण वचन आहे माझं, तुझी सुटलेली नाती तुझ्या सोबत नक्की असतील, मी तुझा जोडीदार, तुझ्या वडिलांसमोर माझी योग्यता नक्की सिध्द करेन आणि एक दिवस ते इथे मोहिते निवासात मानाने नक्की येतील.”

अनुनेही त्याचा हात धरला आणि डोळ्यातले अश्रू थांबवले, म्हणाली,

“मीही सोबत असेल तुझ्या, मलाही स्वतःला सिध्द करायचं आहे की माझी निवड उत्तम आहे म्हणून... मी सोबत आहे तुझ्या.”

घरातले सर्व बघत होते, आईने तर त्याच क्षणाला हे जाणलं होतं की, दु:खाची एक कडा अजूनही मुलांच्या मनात आहे ते. घरात असणाऱ्या प्रत्येकाला जाणीव होती की अनु अंकितने काय मागं सोडलय. आई समोर आली आणि दोघांनाही तिने भरभरून आशीर्वाद दिला. घरातल्या प्रत्येकाने अनु अंकितला हार्दिक शुभेच्छा दिल्या. आरध्याने हळूच आरतीकडे विषय काढला,

“काय ग ताई, अंजू आली नाही आज. तिला सांगितलं होतंस ना ?

“अग हो, कालच सांगितलं होतं, येतो म्हणाली होती, बाई ग मलाही सकाळच्या घाईत आठवण राहिली नाही. तिला फोन करायला, येईल?”

लग्न! एक छोटासा सोहळा संपला होता आणि एक मोठाअध्याय सूर झालं होता. जोडीने दोघेही उभे होते, घरात आनंद होता, मजा मस्करी करत सर्वांनी जेवण केलं, राजन आणि राणी त्यांच्या घरी निघून गेले. दुपारी अनु आणि सानूने अनुच सामान अंकितच्या खोलीत शिफ्ट केलं, आणि मग सानूने तिला अंकितच्या खोलीत नेवून दिलं. सोहळा वेगळाच होता, अनु आणि अंकित दुपारी नवरा नवरीच्या रुपात त्याच्या खोलीत होते. आंब्याच्या झाडाची सावली खोलीत बाल्कनीत येत होती, वातावरण दुपारच होतं, वारा होता पण सुस्ती होती, अंकित मनाने तृप्त झाला होता आज, जेवलाही भरपूर होता. आल्याआल्या त्याला झोपं येत होती.

अनुला अंकीतची खोली काही नवीन नव्हती पण आज त्या खोलीत त्याची बायको म्हणून होती. अनुने खोलीत शिरताच तिला आवरणं सुरु केलं. अंकित तिच्या मागे मागे फिरत होता तर त्याला तिने बसायला सांगितलं. दोघांनी बसून गप्पा केल्या, काय करायचं काय नाही ह्याच प्ल्यानिग केलं, गोष्टीत दोघांची नजरानजर झाली की हळूच अनु लाजायची आणि अंकित तिचं ते लाजणं टिपून हसायचा. बोलण्यात त्याची झोपं उडाली होती पण मन भरकटत होतं, राहून राहून अनुच्या गालातल्या खळीत शिरत होतं.

प्रवास! आपल्याला मिळालेलं आयुष्य हे एक प्रवासच आहे. ह्याची सुरवात आपले जन्मदात्रे करून देतात, आल्याला त्या प्रसातलं कळायला लागलं की मग आपल्या सोबतचा त्यांचा प्रवास संपतो, एका वळणारुन आपण स्वतःचा प्रवास सुरु करतो, मग त्या प्रवासात सोबत हवी असते... आणि ती सोबत असते जोडीदाराची.... ह्या आयुष्याच्या प्रवासात अनेक नाती आपल्यासोबत काही काळासाठी प्रवास करतात, आयुष्य वळण घेतं तशी ती नाती त्याचं वळण बदलत त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघून जातात, काही नाती आठवणी ठेवून जातात, काही प्रेम, काही मनाला ठेचून जातात, काही नुसता अनुभव तर काही जगण्याचा जोश, तसं आयुष्यात शिरणारं प्रत्येक नातं गरज घेवूनच शिरतं ह्या मताची मी आहे... पण गरज एका काळाची असली तरी, सवय आणि सहवास ज्याला प्रेमाचा आधार असतो असं नातं आपल्या सोबत कायम असतं, प्रवासातल्या चढ उतरला सोबत आनंदाने समोर जातं आयुष्याच्या अंतापर्यंत असतं ते नातं... जोडीदाराच!

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments