जोडीदार तू माझा .... भाग ६६

 जोडीदार तू माझा .... भाग ६६



अनु आणि अंकितची त्यांच्या हक्काच्या खोलीतील भेट काही औरच रंगली, बोलण्यात आणि सगळं सावरण्यात संध्याकाळ झाली, अनुने कपडे बदलले आणि खाली स्वयंपाक खोलीत आली, आई आणि मंडळी हॉलमध्ये बसून गप्पा करत होते, ती सर्वाना म्हणाली,

“चहा घेणार ना सर्व? मी टाकते आहे आता.”

आई उठत म्हणाली, “अग आमचा आताच झालाय, तू टाक दोघांपुरता.”

तोच भीमा काका म्हणाले, “अनु बाळा, मला चालेल अजून एक कप. माझ्या साठी टाक.”

आता भीमा काकाने म्हटल्यावर, सुनीकाकी तिच्या साठी थोडसा टाक म्हणाली,

तर भीमा काका म्हणाले,

“हुमम तू चहा कधीपासून घ्यायला लागलिस ग?”

“अहो घेत हो कधी कधी, आणि अनु मस्त करते, आवडतो मला तिच्या हातचा. कधीच जास्त दूध नसते तिच्या चहात अगदीच तंतोतंत असते प्रमाण... नाहीतर ही आरती, चहात पत्ती  कमी आणि दूध जास्त असते हिच्या.”

आई, “अग बाई... कर ग अनु हिच्या साठी...”

नंतर सानू खोलीतून येत म्हणाली,

“अनु, मलाही हा, माझा थंडा झाला होता, सुमंतशी बोलतांना.”

 आता मात्र घरातले सर्वच म्हणायला लागले. आई परत म्हणाली,

“टाक बाबा सर्वांसाठी, मलाही दे उरला तर...”

अनु हसली आणि तिने चहा सर्वांसाठी ठेवला, सोबत खारी काढली, फरसाण प्लेटमध्ये ठेवलं आणि तिने अंकितला आवाज दिला,

“अंकित खालीच ये, सोबत चहा घेवू.”

आणि आई बाबांना काय हवं होतं, अनुने आज मोठ्या रुबाबात अंकितला आवाज दिला होता. घरात परत एक नवरा बायकोचा खेळ सुरु झाला होता. एका रमलेल्या संसारात एक नवीन संसार सुरु झाला होता.

अनुच्या ह्या वागण्याला बघून आई आणि आराध्या मावशी हळूच हसली, आराध्या म्हणाली,

“ओ माय गॉड, काही खरं नाही बाळूच, घेतली हिने त्याची कमान हातात, ताई, आहे हा! तुझी कार्बन कॉपी असणार ही. नथ अजून घालून आहे. जरा अंगात जाडी झाली की मस्त दिसेल तुझ्या सारखी... “

आणि दोघीही हसायला लागल्या.

सर्वांनी मिळून चहा नाश्ता केला तोच सुमंतच्या आईचा बाबांना फोन आला, त्या साखरपुड्या साठी विचारात होत्या, बाबांनी फोन स्पीकरवर टाकला, आणि मग आईशी इशाऱ्यात बोलत त्यांनी मासाहेबांना रविवारी साखरपुड्या साठी होकार दिला.

आता परत आईची गडबड सुरु झाली होती, एक दिवस सोडून साखरपुडा होता. आणि तोही लाडाच्या लेकीचा. बैठक बसली होतीच, कामाची वाटणी सुरु झाली.

आई बाबा आता लगेच तयार होवून सानूसोबत कपडे खरेदीला निघणार होते. अस्मित कुमार आणि अंकित केटरीन वाल्याकडे जावून शंभर लोकांच जेवण सांगणार होते, मेनुही ठरला होता, प्रत्येकाच्या आवडीचा एक पदार्थ करत यादी वाढली होती, तरीही बाबांनी थांबवलं नव्हतं, खरं तर लग्न तीन महिन्यांनी करायचं ठरलं होतं आणि कदाचित रजिस्टर, कारण सानूला तसं हवं होतं मग निदान मुलीचा साखरपुडा दणक्यात असावा हाच हेतू होता. बघता बघता कामाची वाटणी झाली होती.

घरातून निघतांना आई सुनील म्हणाली,

“तू ना जरा विश्रांती घे ग, आणि बघ काय हवं नको ते आराध्या सोबत, मला कदाचित उशीर होईल, सर्वांसाठीच काही ना काही घ्यावं लागेल. तू जरा बघ ग इकडे.”

“अग हो मी बघते, तू काळजी नको करू. ये आरामात.”

आई मग अनुला म्हणाली,

“अनु तू आजचा स्वयंपाक करशील का? म्हणजे तुला काही हरकत नसेल आणि तुझं काही नसेल तर... तसं तुला आज म्हणायला नको. तुला जे वाटते ते कर जेवायला जमलं तर, तसं सकाळच असेलच, बघ आणि त्या बेताने कर... बघ बाबा...”

अनु हसली आणि मानेने होकार दिला तिने. तिलाही माहित होतं घरात सानूच्या आनंदासाठी सारे आनंदी आहेत म्हणून... अंकितने मात्र अनुवर डोळे वटारले होते, तो तिला गुपचूप येवून म्हणाला,  “स्वयंपाक खूप करू नकोस, मला जेवणाची भूक नाही आहे... ती .... ती,.. वाली... जेवणानंतरची....”

अनु हसली, म्हणाली,

“तुझ्या वाटनीचा तर मी करतच नाही, तू ना उपाशीच राहा... म्हणजे निदान झोपं लागणार नाही तुला...”

“आह.... मी .... आणि झोपतो... “अंकित तोंड फाडून म्हणाला.

“नाहीतर काय, दुपारी जांभोळ्या देत होतास, समोर मी होती आणि... तू पसरला होतास बेडवर...”

“आयला, तुचं म्हणाली होतीस, सुरज ढलने दो म्हणून...”

“चल रे... बघून घेईल मी...”

“असं... आयला...चोराच्या उलट्या बोंबा... थांब मीच बघून घेतो, आता काही तुला सानूदीच्या खोलीचा पर्याय नाही... “आणि तो अस्मित कुमारच्या आवाजावर पळाला.

अनु स्मित हसली, मनातच शहारली, आणि कामाला लागली. आज तिलाही घरात वावरतांना आपण ह्या घरातलं आहोत ही शाश्वती मनातून झाली होती.

ती स्वयंपाक घरात, सगळं आवरत होती तोच घरात अंजू आत्या आली,

“दादा, वहिनी....”

हॉलमध्ये तिला कुणीच दिसलं नाही, अनु मात्र आवाजाने स्वयंपाक खोलीतून बाहेर आली,

“अनु, दादा कुठे आहेत ग?”

“आत्या, तुम्ही आल्या नाही सकाळी.

“अग, ते राहू दे, दादा कुठे आहेत?”

आता मात्र अनु ने अंजू आत्याचे हावभाव ओळखले,

“आत्या काय झालंय? घरी कुणीच नाही, भीमा काका आणि काकी होते पण मीच त्यांना सदा काकाकडे पाठवलं, मी एकटीच आहे हो, काय झालं?”

“अग, मग सानू, सानू आहे का...?”

“नाही, हा, आराध्या मावशी आहेत, वरच्या खोलीत, त्याच्या मुलाला भरवत, बोलावू?”

“नको,असुदे, मी जाते.“

अनुने आत्याला जवळ घेतलं,

“आत्या मला सांगितलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर...”

“अग छकुली...”

“छकुली, काय झालं तिला?”

“तिला ह्यांनी खूप मारलं, मी सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये घेवून गेली होती...”

“मग, आता कशी आहे ती...”

“मला.. मला ....”

“पैसे हवेत का...?”

“हो... आहेत का तुझ्याकडे? म्हणजे... दे... देतेस का ग मला.”

“हो, का नाही!”

“आताच हवेत ग? मी दादाला फोन केला होता पण त्याने उचलला नाही.”

“अहो तुम्ही आधी शांत व्हा. माझ्याकडे आहेत. पाच हजाराने होईल का?”

“हो, देतस का?”

“म्हणजे! नक्कीच. थांबा,”

म्हणत अनुने खोलीत जावून पैसे आणले, आणि आराध्या मावशीलाही सांगितलं कि अंजू आत्या आली आहे म्हणून.

आराध्या आणि अंजू तर पक्क्या मैत्रिणी होत्या, अंजूला असं बघून आराध्या धावत आली, आणि तिच्या सोबत निघण्याचा आग्रह करत होती, आराध्याने अंजूचा हात धरला तोच अंजू ओरडली, हाताला खूप मार होता तिच्या. अंजू आराध्याला बिलगली,

“अरु, खूप मारलंय ग त्याने छकुला, म्हणतोय तिला तिच्या आईकडे जा म्हणून, आता ती एवढीशी मुलगी, लहानाची मोठी माझ्या जवळ झाली, तिची आई तिला माहित नाही आणि हा तिला मारून बाहेर काढत होता. छकु माझ्या जगण्याचा आधार आहे अरु. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय, नाही दिला मी जन्म तिला, पण ह्यानेच आणली होती ना घरात तिला... अग आता?”

“तू आधी शांत हो, पाच हजाराने होईल की मी घेवू अजून... चल मी येते तुझ्यासोबत  काही लागलं तर बघून घेवू. तू रडणं बंद कर आधी, आहे मी सोबत तुझ्या.“

आराध्या अनुला म्हणाली,

अनु, मी जावून येते अंजू सोबत. तू  सँडीला बघ, त्याला गेम वगैरे लावून दे, आणि जीजूला काही सांगू नकोस, मी सांभाळते, उगाच त्रास व्हायचा त्यांना आणि ताईला.

अनुने होकार दिला आणि ती तिच्या कामाला लागली, मनात असंख्य विचार शिरत होते, अंजु आत्या तिला राहून राहून आठवत होती, तिची तिच्या जोडीदाराने केलेली अवस्था तिला बघतव नव्हती. पण तरीही अंजु आत्या त्यांचा हात धरून होती हे कोडं तिला पडलं होतं.

तिचं आणि अंकितच लग्न आजच झालं होतं  आणि आजच तिने हे सगळं बघितलं... जोडीदार आयुष्याचा ट्रेनींग पॉईंट असतो हे आज तिला पक्क झालं होतं... आपल्या जोडीदारा सोबत सप्तपदीत  घेतलेले प्रत्येक वचन  तिच्या कानात परत घुमत होते. 

बघूया पुढचा भाग...

 

Post a Comment

0 Comments