जोडीदार तू माझा.. भाग ६७

 जोडीदार तू माझा भाग ६७ 



अनुने विचारात स्वयंपाकाच आवरलं आणि घरही नीट केलं. आज हक्काने घराल्या वस्तू इकडे तिकडे ती हलवत होती. जोडीदाराच्या नात्याने तिच्या आयुष्यात खूप नाती शिरली होती. जोडीदाराला जपतांना तिला हीच नाती जपायची होती. तो इथे तिचाच होता, त्याच्याशी तिचं नातं मनाच होतं पण ह्या नात्यांना तिला त्याच्यासाठी मनाने जपायचं होतं. 

रात्रीचे आठ वाजले तरी घरी कुणीच आलं नव्हतं ना आराध्या मावशीने फोन केला होता ना कुणी. अनु सँडीशी बोलत आता सर्वांची वाट बघत होती. तोच तिच्या मोबाइलवर अंकितने काही फोटो पाठवले, अनुने पटकन फोन हातात घेतला. अंकितने अनुसाठी सुंदर ड्रेस घेतले होते, आणि अनु ते बाघतांनाही लाजत होती. तोच समोर टॅक्सी उभी राहिली, अनु धावली, आराध्या मावशी आणि अंजू आत्या छकुलीला घेवून आल्या होत्या. अनुने लागलीच हॉलच्या शेजारची लहान खोली आवरली, बेडशीट बदलली आणि सर्वांनी छकुलीला, बेडवर निजवलं, मावशीच्या सांगण्या वरून अनुने छकुलीसाठी शिरा केला आणि अंजू तिला भरवत होती.

तिला भरवतांनाही अंजु आत्या अश्रू ढाळत होती. आणि अंजु आत्याला बघून अनु आणि आराध्याही गुमान गप्प होते. जीवनाचे खेळ अनु समोर बघत होती. जोडीदाराची गरज आणि वागणूक किती महत्वाची असते हे तिला क्षणा क्षणाला जाणवत होतं. ती आराध्या मावशीला काही विचारूही शकत नव्हती, प्रत्येक नातं उमगायला आणि फुलायला वेळ हा लागतोच हे तिला तिच्या आणि आईच्या नात्यातून उमगलं होतंच. आणि नातीही नेहमी जपावी लागतात, वेळ द्यावा लागतो, आणि वेळ देऊनही सर्वच वेळी नाती आपल्या सारखी वागत नाहीत हेही तिने इथवर अनुभवलं होतं. वेळ आली की अंजु आत्या आपल्याला नक्की कळेल ह्या विचारात ती गुमान बसून मोबाईल बघत छकुलीला कुरवाळत होती. 

हसत आई बाबा घरात शिरले, सानू पिशव्या घेऊन तिच्या खोलीत जात होती तर तिची नजर शेजारच्या खोलीवर पडली, छकुलीला बेडवर बसून खातांना बघून तिने सामान तिच्या खोलीत टाकून दिलं आणि पळत खोलीत आली,

“अंजु आत्या काय झालं ग?

“आणि छकु, काय रे लागलं बाळा हे एवढं? कुठे पडली तू?”

अंजु सानूला बिलगून रडायला लागली, तिच्या रडण्याचा आवाजाने आई आणि बाबाही खोलीत आले.

आरती अंजुला रडतांना बघून घाबरली, तिने अंजुला अंगभर बघितलं, अंजुच्या हाताला लागलेलं बॅंडेज बघून तिलाही वाईट वाटत होतं. सर्व काही काहीस तिच्या लक्षात आलं होतं.

जवळ असेललं  समान तिने हॉल मध्ये तसंच टाकलं, ती तिच्या जवळ येवून बसली,

“अंजु काय ग झालं? आणि छकु... तू आली पण नाहीस सकाळी. “

“वहिनी, अमितने खूप मारलं ग तिला, म्हणतोय घरी राहू नको म्हणून, मी खर्च करते ना तिचा मग, म्हणतो पैसा लागतो, जा म्हणतोय तिला तिच्या आईकडे.“

आईने तोंडावर हातच ठेवला,

“अग पण  एवढं मारलंय!”

आणि मग तिने अनु कडे बघत तिला विचारलं,

“अनु तू काही सांगितलं तर नाहीस ना बाळूला, त्याचा काही नेम नाही, तिकडूनच जाईल त्याला मारायला. आणि हे वाढेल बऱ अजून.”

अनु घाबरल्या सारखी म्हणाली,

“नाही नाही, मी अजूनतरी काही बोलली नाही, मला काही खूप माहित नाही ना आई... मी आणि अंकित तर...

“बर झालं बाई, त्याला काही सांगू नका, असं घाईघाईत, नाहीतर रागात येऊन फोडून येईल हिच्या नवऱ्याला.“

“आणि काय ग अंजु, सकाळी इकडे आली असती तर काय झालं असतं?”आई अंजुला रागावत म्हणाली.

“ओ माय गॉड, ताई, सकाळीच मारलं तिला, येणार होती ही तयारी झाली होती म्हणे तिची.“ आराध्या मध्येच म्हणाली.

“हो का ग. अग बाई, काय करावं ह्या अमित रावांच काही कळत नाही... छोटासा संसार आहे. करायचं ना सगळं.”

अरुण खोलीत येवून बहिणीला असं बघून गप्पच झाला, आता त्यांचा गप्पपणाही सानूला आणि सर्वांना काळजीत टाकत होता, सानू आता बाबांजवळ आली,

“बाबा, बरी आहे छकुली आणि अत्तु, तुम्ही जरा बाहेर चला बघू. मला तुमच्याशी बोलायचं आहे.”

बाबा सानूच्या आधाराने उठले आणि बाहेर निघाले, पण शब्द निघत नव्हते त्यांचे. बाबा आणि सानू बाहेर अंगणात येवून बसले तोच अंकित आणि अस्मित कुमार सामान घेवून घरी आले. अंकित आत शिरला तेव्हा अंजू आत्या रडत होती आणि आवाजाने अंकित त्या खोलीत शिरला, छकुली असं पडलेलं बघून त्याच्या जेमतेम लक्षात आलं होतं सांर, बघताच हातातलं सामान त्याने फेकलं आणि घरातून तो सुसाट निघाला, त्याला थांबवायला सगळेच धावले, सानू बाहेरचं होती तिने अंकितला थांबवलं.

“बाळू, थांब नुसता गोंधळ वाढवू नकोस, त्यांना काही कळत नाही, पण तुला कळतं ना ?”

“कळते म्हणून काय गुमान गप्प राहू, कधीही मारतात ते आत्याला आणि छकुला? त्यांना काय वाटतं, आत्तुला कुणी नाही? “

आणि मग बाबांकडे बघत म्हणाला,

“बाबा तुम्ही ना आजही गप्प राहा, कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय हो, आता काय अत्तु आणि छकुचे मृत शरीर बघितल्यावर तुम्ही बोलणार काय? दहा वर्षा आधी अत्तु आली होती घरी, तुम्ही बोलला होता तू ऐकलं नाहीस आमचं, आता भोग म्हणून, मला आजही ते शब्द अत्तुला बघितलं की आठवतात. भोगतेय ना ती, तेव्हाच बहिणीच्या मागे उभे राहिले असते तर आज अत्तुची ही दशा नसती. हिंमत नाही का बहिणीला ठेवून घेण्याची, मीही असचं करावं का जर माझ्या...”

बाबा आता ओरडले,

“अंकित! माझ्या मुली माझ्या घरच्या कणा आहेत, त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे ह्या घरावर, जेवढा तुझा आहे...”

“आणि अत्तु चा?”

बाबा गप्प होते... आणि सानू त्यांना धरून उभी होती. अनु अंकित जवळ येवून उभी झाली. त्याच्या हातात हात देत हळूच म्हणाली,

“बाबा नाही बोलत, तू बोल... आपण सांभाळू शकत नाही का अत्तुला...”

 आता मात्र अंकित परत म्हणाला, “आपली गावाकडेची जमीन विकून तिला बुटिक साठी मदत करणार होते तुम्ही, काय झालं त्याच? उद्याच जाहिरात देतो मी, अत्तुला पायावर उभं करा... तिची ती बघेल ना मग, पण आता ती राहिल इथेच.”

आता मात्र अंजू आत्या त्याच्या जवळ आली,

“बाळू, शांत हो रे, माझं काहीच म्हणणं आणि मागणं नाही बाबा... मला काहीच नको. आधीच मी अशी नुसाद्या जीवाची... संपल माझं सर्व... इथेच तर येत राहते, मदत मागते, अजून काही नको.”

“का नको? तुझ्या ह्याच स्वभावाने सर्व गप्प आहेत. तशीही तुचं कमावतेस आणि ते काका सर्व ओढून घेतात तुझ्याकडून... अग कळत का नाही तुला जोडीदाराच नातं दोन्हीकडून जपावं लागतं... तू एकटी भार वाहत आहे. तोड ते सारं, फेक ते उपरण जे तूच ओढत आहेस... आयुष्य उभं आहे... एखाद दिवशी दिसणारं नाहीस आम्हाला, आणि आम्ही रडत राहू आमच्या चुकीसाठी... आणि हे बाबा ओक्साबोक्शी रडतील आणि काही बायी होवून बसले.”

अंजू काहीच बोलली नाही, तर अंकित परत म्हणाला,

“हे बघ आत्या निदान त्या अनाथ मुलीवर जीव लावलास तिचा तरी विचार कर, तिची तर आई तिला ओळखत नाही, ना बाप ठेवायाल तयार आहे. एक चांगलं आयुष्य दे तिला, तुझ्या पदरात टाकली ना त्याने! कशाला त्या दरोड्या माणसाच्या धाकात वाढवतेस, मान्य आहे तुझं प्रेम आहे काकांवर पण प्रेमाला प्रेम हवं असतं... तिरस्कारत प्रेम गुदमरून मरतं, अग तो वापरतोय तुला. काय दशा झाली आहे तुझी, माझी ती अत्तु कुठे गेली, जिच्या बोलण्यात आणि चालण्यात प्रचंड विश्वास असायचा. कॉलेजची मॉडेल होतीस ग तू, तुझ्याकडे बघून आम्ही भावंड मोठे झालो... आणि तू हरलीस आयुष्यासमोर.“

“बाळू गप्प रे आता... त्रास होतोय...  नाही शिरायचं मला त्या भूतकाळात... खूप निर्णय चुकलेत माझे. तू म्हणशील ते बाबा, जगायचं आहे मला माझ्या छकुसाठी, काल भीती बघितली मी... आता गप्प व्हा सारे. “

म्हणत अंजू आतमध्ये गेली. मागेच सारे निघाले. सानू बाबांसोबत होती. बाबा खूप वेळ गप्प होते, नंतर सानूला म्हणाले,

“बरोबर बोलतोय तो, नाही करू शकलो ग मी काही अंजलीसाठी, पण बाळूने मला त्या वेळीही तुझ्यासाठी रोखलं, आणि आजही त्याची भूमिका बरोबर आहे.”

आता सानू त्यांना म्हाणाली, “कुठल्या वेळी बाबा, तुम्ही माझ्या बाबतीत बोलत आहात का ?”

“हो, तुला तर माहितही नाही, अग आपला बाळू खरच मोठा झालाय, आणि मी बघितलं आहे अनु त्याला बरोबर साथ देते ना?”

“हो अनु समजदार मुलीगी आहे, बाबा मला सांगा, काय माहित नाही मला.”

बाबा स्मित हसले, “बघ ना, आज हा प्रसंग घडला नसता तर कदाचित तुला सांगण्याचा योग आला नसता..”

सानूला तर चान्स मिळाला होता बाबांना विचारातून बाहेर आणण्याचा, तीही जोर देवून म्हणाली, “बाबा सांगा मला... कळू देत माझा शेंबडा भाऊराया मोठा झालाय ते.”

“अग, राणीच्या लग्नाआधी, सावंतसाहेबांकडून तुझ्या साठी त्यांच्या बहिणीच्या मुलाच स्थळ घेवून आले होते, त्याने तुला पसंत केलं होतं, तो विधुर होता, गोष्ट अडचणीत टाकणारी होती, नाही बोललो तर राणी त्या घरची होणारी सून होती, आणि हो बोललो तर तू होतीस... मी तर पार गार झालो होतो. त्या दिवशी बाळू घरी होता आणि सगळं त्याच्या खोलीतून ऐकत होता, रागात खाली आला आणि खडसावून उत्तर दिलं, कि तुझ्या साठी मुलांची कमी नाही, ते तर तू लग्नाला तयार नाहीस म्हणून... “

“मग?

“मग काय पुढचं तो बोलत गेला आणि पाहुणे समजले सर्व, गोष्ट टळली, कधी कधी ह्याचा राग उत्तम असतो बघ, रागातच बोलला होतो तो त्या दिवशीपण आणि आजही... मी माझ्या बाबांसारखं नाही झालो पण हा पठ्ठा माझ्या बाबांसारखा होवून माझा बाप झाला आज... माझ्या बाबांचाही राग योग्य ठिकाणी दिसायचा, तसे ते आईच्या मागेच असायचे पण त्यांना पटलं नाही की अशेच रागात येत असायचे, आज अंकित माझा बाप झाला ग...”

“हो ना बाबा, अंकित मोठा कधी झाला समजलं नाही, मीही आज त्याला आजोबांच्या रुपात बघितलं. आणि अनुही त्याच्या सोबत होती ना!”

“इथेच बघितलं मी, योग्य जोडीदार सोबत असला कि माणूस खूप काही करू शकतो, अनु त्याला थांबवू शकली असती, पण तिने तसं केलं नाही, आता खात्री पटली, हे दोघ मी जे करू शकलो नाही ते अंजलीसाठी करतील. मी विकतो जमीन आणि बुटिकसाठी रक्कम देतो तिला, तिच्याच वाटणीची आहे ती. माझीच टाळांटाळ सुरु होती, चुकलो मी... पण तुमचा भाऊ आहे बरका तुमच्या सोबत उभा... काहीही झालं तरी, मुलींचं माहेर कायम असावा असं मला माझ्या मुलीसाठी वाटलं पण अंजलीसाठी नाही वाटलं हे दाखवून दिलं त्याने. ती यायची इथे, पण मी...

सानूने बाबांना थांबवलं,

“जावूद्या बाबा, आता सांभळू द्या बाळूला ते.”

सानू बाबाला समजावत होती. आणि बऱ्याच दिवसांनी त्यांच्यात संवाद सुरु होता.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments