जोडीदार तू माझा ...भाग ७३ ....

 जोडीदार तू माझा भाग ७३ ....



मंद चांदणं पडलं होतं, आकाश निळंभोर होतं. देखण्या आणि रम्य वातावरणात सोहळा पार पडला होता. बाबांच्या लाडाच्या लेकीच्या जीवनात आज सुमंत जोडीदार म्हणून आला होता. मंडपात चर्चा होतीच की सानू आता भारता बाहेर जाणार म्हणून... पण बाबाची लाडाची लेक सात समुद्रा पलीकडे जाणार हे ही बाबांना बोचत होतं. तरीही ते दुखणं आनंद देत होतं त्यांना. कारण सुमंत हीच सानूची पसंत होती. सानूलाही हे भान होतचं, लागलीच ऐक वेगळीच जवाबदारी ती अनुभवत होती. आपण जोडीदाराचा प्रवास सुरु करतोय हे ती जाणून होती. जोडीदाराशी नातं जोडतांना आधीची नाती तिला तोडायची नव्हती. ती तर अजूनच घट्ट करायची होती. आपण लग्न करतोय ही कल्पना तिच्यासाठी भन्नाट असली तरी सानू प्रक्टिकल होती. बाबांच्या नजरेतलं सारं काही तिने टिपलं होतं. समोर उभी असलेली सर्व नाती तिच्याकडे आशेने बघत होती.

कारण जिथे नाती आली तिथे गरज असतेच ना? आयुष्यात येणारं प्रत्येक नातं हे गरज घेवून शिरतं, कधी ती आपली असते तर कधी समोरच्याची. आणि मनाची नाती गुंतवायला मन गुंतवाव लागतं. आणि मनाच मनाशी असेलेलं एकचं नातं असतं .... जोडीदाराच... हा, गरज ह्याही नात्यात असतेच बरका! पण ती गरज, प्रेमाच्या सहवासाने सुटत एकजीव होवून जाते.

सुमंतनेही बाबांच्या चेहऱ्यावरची काळजी अलगद वाचली होती, सोहळा अंतिम चरणात होता, तसा सुमंत बाबांजवळ आला,

“बाबा, काळजीत दिसताय तुम्ही.”

“आ ह... नाही हो, माझी लाडाची पोरं, तिच्या मनासारखं होतंय ह्याचा खूप आनंद आहे मला.” बाबा जरा दचकत म्हणाले.

“मग काळजी कशाला! तुमची लाडाची राजकुमारी आता माझ्या साम्राज्याची राणी होणार आहे. हो पण मुलगी नेहमी तुमचीच राहणार.”

“हो हो, सुखी राहा, सुमंत रावं... “

बाबांना काही सुचलं नाही, जरा भरून आलं  त्यांना, सावरत परत म्हणाले,

“अजून काय हवं आजच्या दिवशी. हा साखरपुडा असतोच हे आश्वासन देण्यासाठी... आता बिनधास्त तयारीला लागतो आम्हीं.”

“तयारी कसली बाबा! काही करायचं नाही, कोर्ट  मॅरेज करणार आम्ही. आणि हवं तर छोटीशी पार्टी देवू नवीन बंगल्यात आणि तिकडे अमेरिकेतही, काय म्हणता!”

“आता... तुम्ही आणि सानू म्हणाल तसं...”

“अहो, मला काहीच घाई नाही.”

सुमंत आणि बाबांचा संवाद सुरू होताच तर सुमंत कळली सर्व मंडळी जमली,

सुमंतचे मामा मासाहेबांना म्हणाले,

“आता लग्न कसं राजेशाही हवंय नाही ताई.”

मासाहेब लगेच म्हणाल्या, “म्हणजे! सुमंतच लग्न आहे माधव दादा, सुमंतच! आम्हाला तर विश्वास बसत नाही, सानवी गोड मुलगी आहे, आणि ती माझी पसंत आहे. माझ्या सुमंतच्या लग्नात कशाचीच कमी पडणार नाही दादासाहेब.”

पाहुण्याच्या गप्पा सुरु होत्या. आणि बाबा हो ला हो देत होते, ते तर गोंधळले होते. पण सुमंतने त्यांना इशार्‍याने शांत केलं, घोळक्यातून बाहेर घेवून गेला, बाबा लगेच म्हणाले,

“सुमंत रावं काळजी नको, आम्ही बघतो काय करायचं ते.”

“बाबा मी सानवीला वचन दिलंय, ती म्हणेल तसचं होणार, इथे कोण काय बोललं ते फारसं मनावर घेवू नका, बोलुद्या, आता त्यांना थांबवून काय होणार, बघा शेवटी सगळं माझ्या पर्यंतच येणारं, आणि मासाहेबांना अजून माझं आणि सानूच बोलणं काय झालंय हे माहित नाही. त्यांना सानू मनापासून पसंत आहे. मग काहीच काळजी नाही. मी सांभाळतो. तुम्ही काही काळजी करू नको”

तेवढ्यात बाळू बाबांजवळ आला,

“बाबा काय झालं, तुम्ही ठीक आहात नां?”

“अरे अंकित बाबा ठीक आहेत, काळजीत पडले होते, मी बोललोय, आणि सानूशी बोलतोय मी. घेवून जा त्यांना.” सुमंत अंकितला म्हणाला.

अंकितही भांबावला, बाबांना पार घाम फुटला होता, त्याने आधी बाबांच्या शर्टचे बटण काढले, दुरून अनयाला आवाज देत पाणी आणायला लावलं. बाबांना पाणी दिलं आणि त्यांच्या खिशातल्या गोळ्याही दिल्या, म्हणाला,

“बाबा सानूदी काय तुमच्याच लाडाची आहे का? माझं ही खूप प्रेम आहे तिच्यावर. आणि काही काळजी नाही, मला विश्वास आहे सानूदी सगळं सांभाळून घेईल. तुम्ही लग्नाचा विचार करत आहात ना... अहो वेळ आहे त्याला. तीन महिन्यात तीन पगार पडतात मला आणि सेविंग आहे आपली. मला तर तशी काही परिस्थिती येईल हे वाटत नाही.”

बाबा जरा शांत झाले, म्हणाले,

“असो,  बघू आपण, सानूला काही सांगू नका. उगाच तिला अजून काळजी वाटायची.” बाबा अनुकडे बघत होते.

“हो बाबा, काही काळजी करू नका तुम्ही”, अनु होकार देत म्हणाली.

अंकित बाबांना घेवून घरात आला. आणि त्याने छकुलीला त्यांच्या सोबत ठेवलं. तो मांडवात आला तेव्हा सानू आणि सुमंत त्याच्या घरच्या मंडळी सोबत पंगतीला बसले होते.

“साक्षी होता तो सोहळा,

साक्ष होती दोन मनांची,

दूर वर समांतर चालणार होती मन,

सोबतिला साथ एकमेकांची.

पंगतीत सुमंत सानूशी बोलला,

“सानवी, तू काही काळजी करू नकोस, तू जसं म्हणशील तसं आपण पुढे करूया.”

“अरे हो, आपण बोललो ना, आता का बोलतोय? ,माहित आहे मला तू म्हातारा होईपर्यंत वाट बघायला तयार आहेस.” आणि सानू स्मित हसली.

“अग त्याच काय झालं, मगाशी घरचे सर्व लग्न थाटात करायचं म्हणून गप्पा करत होते आणि बाबा नेमके तिथे होते, मी होतो तिथे पण ते जरा घाबरले. मग अंकित ने संभाळलं त्यांना.”

“बाबा...! काय झालं त्यांना.” सानूने हातातला खास अलगत खाली टाकला.

अंकीतच लक्ष गेलं, तो तिकडे आला, “ताई, सगळं ठीक आहे, बाबांना जरा थकवा जाणवला. ते काय अनु घेवून आली ना त्यांना जेवायसाठी.”

म्हणत अंकितने ताटातला गुलाब जाम सानूला आणि सुमंतला भरवला.

आता मात्र सानूच कशातच लक्ष नव्हतं. जेवण आटपलं आणि मासाहेब तिच्या जवळ आल्या.

“सानवी,वेल कम टू साठे फॅमिली. आणि त्यांनी व्हीडीओ सूर केला, समोरून सुमंतचा लहान भाऊ त्याची बायको, मोठी बहिण तिचा नवरा, मुल, सर्व साठे फॅमिली अमेरिकेतून थेटऑनलाइन होती. सानूचा परीचय मासाहेबानी करून दिला. शुभेच्छा आणि कौतुकाच्या वर्षावात सानू मोहरून गेली होती, तिलाही आज नव्याने काळालं होतं कि गव्हाळ रंगांची ती एवढी सुंदर दिसत आहे ती. सोहळा कौतुकात पार पडला. मांडवातला प्रत्येक पाहुणा आनंदी होता सानूसाठी.

तिला पक्कं ओळखणाऱ्याना तर जरा काळजीही होती, सानूने नाती स्वतः भवती गुंतवून ठेवली होती. तिच्या शिवाय मोहित्यांकडे  आता सर्व जमणार कसं हेही काहींना वाटत होतं. निघतांना सानूने अलगत सुमंतचा हात धरला,

“सुमंत वादळ एक स्वतःही वादळ असतं रे, जसं ते समोरच्याला हलवून टाकतं ना तसं ते स्वतःही हादरलेलं असतं बघ. कंपन स्वतःला असह्य झाले ही मग बाहेर दिसतात रे.”

सुमंत हसला, “एवढे वर्ष थांबलो ते उगाच नाही. तटस्थ आणि खंबीर झालोय, तुझा थरकाप सामवून घेण्याची क्षमता आहे ग आणि हे वादळ तर मला सुखावणार आहे... येवू देतं मग. पर्वा नाही... तुला आणि तुझ्यातल्या वादळाला सामावून घेवू शकतो.” 

सानूचा हात अलगद हातात घेत म्हणाला,

“काळजी करू नकोस, आज तुला हमी दिली आहे मी. तुझ्या मनासारखंच होईल. तरच हा साखरपुडा ना?”

मनाच्या कणा कणातून मोहरलेली सानू अगदीच हलकीशी स्वत:तच बावरली होती. तिलाही जाणवत होतं की हा एवढा बदल तिच्यात कसा झालाय तो, पाहुणे परतले होते. सानू खोलीत आली होती तोच कैलास तिचा जवळचा मित्र तिच्या खोलीजवळ आला,

“सानवी येवू का आत ग?”

सानू जरा तिच्या विचारातून बाहेर आली, “अरे ये ना? खूप बोलायचं आहे तुझ्याशी.”

आणि तो येताच ती बोलायला लागली, “कैलास, मी योग्य करते आहे ना? अरे मी लग्न करते आहे. सुमंत शी... कसा वाटला तुला? अगदीच खरं खरं सांग, तुझ्यावर विश्वास आहे माझा. बाबांची काळजी वाटते रे. काल अंकित सांगत होता की त्याला नवीन प्रोजेक्ट मिळतोय अमृतसरला, आणि जावं लागेल तिकडे. मग तो आणि अनु तिकडे जातील. राणीचा तर आधीच खूप पसारा आहे. तिचं कॉलेज, नवीन संसार आणि नवीन नाती... खूप बिझी होईल ती आता. मग मीही तिकडे अमेरिकेत असणारं, मन गडबडलं रे. तू माझा बालमित्र आहेस, मला ओळखतोस, मला समजू शकतोस, सांग ना, सुमंत कसा वाटला? देईल ना मला साथ... ?माझी इथेही गरज आहे. मला माझ्या जवाबदाऱ्या सोडायच्या नाहीत आणि नवीन नाकारायच्याही नाहीत.”

“अग अग, किती बोलतेस, शांत हो, घरातले ऐकतील तर उगाच काळजी करतील, थांब आधी दार टेकतो.“

कैलासने दार टेकलं, आणि सोमोरची खुर्ची ओढून तो सानू जवळ बसला,

“सानू तुझी काळजी मी केव्हांच टिपली म्हणूनच आईला घरी जायला सांगितलं आणि मी थांबलोय, मला माहित आहे तू हे सगळं कुणाला बोलणार नाहीस. अग, सुमंतशी बोललो मी, त्याला सांगितलं तुझ्या माझ्या मैत्रीबद्दल, निघतांना मला कॉल केला त्याने, म्हणाला मला, तुझ्याशी बोल म्हणून.”

“हो.... हो का!”

“तू कशाला काळजी करतेस, त्याला काहीच घाई नाही लग्नाची. खूप निवांत आणि शांत आहे ग तो. तुझ्या मनातलं वादळ सामावेल एवढी शांतता आहे त्याच्यात. माझ्यासारखा तर मुळीच नाही. आणि आता येवढ्या मोठ्या घरात तू सून म्हणून जाणार आहेस तर त्याच्या घरच्यांच्या अपेक्षा असणार ना? असू देतं, करा म्हणावं त्यांना मोठा उत्सव. तिकडे अमेरिकेत. इकडे तर सानू म्हणेल तसचं होणार, काय ग?”

“म्हणजे तुला माहित आहे का, काय बोलणं झालं वगैरे?”

“हो, मी होतो जवळच तेव्हा, तुझ्या सासूबाई आणि मामासासरे लग्नाच्या थाटाबद्दल बोलत होते. आणि कदाचित बाबांनी ते त्यांच्या कडून अपेक्षित आहे असं समजलं असणारं.”

“अग ते मुरलेली लोकं आहेत, सुमंतने तर खूप बघितलं असणारं, वडील आणि माया काय असते हे त्याला सगळं माहित आहे. ज्याने लग्न न करता सगळ्या भावंडांना सांभाळलं. तो कसा तुला तुझ्या जबाबदारीतून मुक्त करेल! मला तर तू आणि तो सारखेच वाटलात जेव्हा मला सुमंत बद्दल सर्व कळालं.“

सानू जरा परत स्मित हसली, जरा निराशेची रेषा मिटल्या सारखी झाली तिच्या चेहऱ्यावरून. सानू सारं काही बोलत होती. तिचं मन मोकळं झालं होतं...

लवकरच पहिलं पर्व संपून नवीन प्रवास सुरू होणार आहे, कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा .. 

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...


Post a Comment

0 Comments