जोडीदार तू माझा... भाग ६९

 जोडीदार तू माझा...

भाग ६९  



रात्रीचे जेवण आटोपले होते. अनु स्वयंपाक घर आवरत होती तर आरती तिच्या जवळ आली,

“अनु, जा तू तुझ्या खोलीत, राहू दे हे असचं.”

“मी करते ना, काही हरकत नाही.

“नाही ग बाई, मुलींना कधी वाचक लावली नाही तुला ग का! मी आणि सुनीता आवरून घेवू. बोलता बोलता, जा तू... ”

“नाही ना आई, मी करते, काय वेळ लागणार ह्याला.”

“राहूदे, आणि आज स्वयंपाक जमला हा तुंला, गोबीची सुखी भाजी मस्त केली होतीस.”

अनु हसली, “तुम्ही बसा बाबांसोबत, आज जरा अंकित जास्तच बोलला नाही..”

“नाही ग, जास्त बोलला नाही, त्याने आम्हाला आमची चुकी दाखवून दिली, आणि तू मला माझी चूक कळवून दिलीस ग, निदान मी तरी अंजूच मन जाणायला हवं होतं...”

“आई मी, नाही मी अजून एवढी मोठी नाही आई... तुम्ही ...”

“नाही ग, कधी कधी लहानांना जे समजतं ना ते मोठ्यांना कळत नाही... आणि जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेली असते, बाळू मात्र असा नाही... त्याला त्याचा राग योग्य वेळी योग्य ठिकाणी दाखवता येतो... आणि तुही त्याला समजून त्याला थांबवत नाहीस... त्या रागाला योग्य मार्ग दाखवत शांत करतेस.

“आई तसं नाही, मला तर खूप काही माहित नाही आत्याबद्दल पण हे जाणवलं की त्यांची त्यांच्या जोडीदाराने काय मनस्थिती केली ते. आणि अजून काय हवं, आपण स्त्रीया सारं काही मागे सोडून त्याच्या भरोसे नवीन विश्वात पाय ठेवतो आणि त्यानेच असं काही केलं तर कुठे जायचं... निदान कुणी नाही पण जोडीदाराने आपली साथ सोडू नये, दगा देवू नये.... त्याच्या नजरेत आपला मान असला कि मग तो कुणाच्या नजरेत दिसलाही नाही ना तरी आयुष्य मजेत असतं ...”

आई हसली, अनु आईला परत म्हणाली,

“आई हे मी तुमच्या आणि बाबांच्या नात्यातून जाणलं बऱ... बाबा तुमची बाजू बरोबर ओळखतात, तुम्ही कधी बरोबर असता, कधी नाही, हे त्यांना बरोबर माहित असते.”

“अग बाई, असं का?”

‘अरे हो तर...”

“म्हणजे तुही आता बाबांच्या पार्टीत सामील तर ...”

“नाही हो आई, मला तुमच्या दोघाच्या पार्टीत जागा द्या.”

अनुने बोलता बोलता सारं स्वयंपाक घर आवरलं होतं, फ्रीजमधून पाण्याच्या बाटल्या काढल्या, एक आईच्या हातात दिली आणि एक तिने हातात ठेवली,

”घ्या, झोपा बघू आता, मी ही...”

आई तिला म्हणाली, “अग बाई झालंय की आवरून..”

मग आणि बोलून पण झालं ना आपलं, आपण कुठे असं आरामशिर बसून बोलणार होतो. चल आता काही विचार करू नका, झोपा..”

“अग हो तुही जा खोलीत, तुझ्या खोलीत !”

अनु हसली आणि हॉलमधून पायऱ्या चढत ती आज तिच्या खोलीत गेली.

अनु खोलीत आली तेव्हां अंकित त्याच्या लॅपटॉपवर छकुलीसाठी जवळपास शाळा शोधत होता. अनुही त्याच्या जवळ बसून त्याला प्रतिसाद देत होती. दोघात मंदसा संवाद होतं होता. अनुने त्याला प्रश्न केला,

“अंकित तुला अंजली आत्या बद्दल विचरलं तर चालेल का?”

अंकितने जवळपास शाळेची यादी तयार करत लॅपटॉप बंद केला, तो दहा मिनिट अनुच्या प्रश्नावर काहीच बोलला नाही, अनुही गप्प होती.

अंकितने मोठा सुस्कारा दिला,

“अंजू आत्या! जेव्हा पासून कळायला लागलं तेव्हापासून तिला बघतोय. तिच्या अंगाखांद्यावर खेळत आम्ही मोठे झालोत. अंजू आत्या आणि आराध्या मावशी मैत्रिणी आहेत, आराध्या मावशी तिचं इंजीनियरिंग करण्यासाठी आपल्याकडे राहिली होती. आणि अंजू आत्या तिच्या  एमएसडब्लूच्या अंतिम वर्षात होती, मी आठवीत होतो तेव्हा, आकर्षण वगैरे नुकतच कळायला लागलं होतं. अंजू आत्या आणि आराध्या मावशीच्या गोष्टी चोरून ऐकायचो, अमित काका, हो काकाच म्हणायचो आम्ही त्यांना, समाजसेवक होते ना!

अंजू आत्याला एमएसडब्लूचा प्रोजेक्ट करायचा होता मग ती त्यांना भेटायची, आणि मग प्रेम झालं तिला त्यांच्याशी. अमित काका काही करायचे नाही, बारावी पास होते फक्त, पण घरी शेती खूप होती, आणि लहान मोठ्या शेतकऱ्यांचा माल खेड्यातून घेवून ते शहरात विकायचे. आणि समाजसेवा करायचे. एक दोन-दा निवडणुकीत उभेही राहिले होते, पण पडले. त्यांना काहीही न करण्याचा स्वभाव बाबांना आवडायचा नाही पण अंजू आत्याला अमित काकाच समाजसेवा करणं आणि सगळं आवडायचं, मग तिला समजावणं साऱ्यांना कठीण गेले. आणि वाईट काय होतं त्यात, अमित काका घरचे वाईट नव्हते, पण स्वतः काहीच करत नव्हते. आत्याने कुणाचेच काही ऐकलं नाही आणि लग्न केलं. आराध्या मावशीलाही तिचं प्रेम कळत होतं कारण तिनेही अस्मित काकाशी लग्नाचा निर्णय घेतला होता. दोघींनीही एकाच वर्षी लग्न केलं, अंजू आत्याने घरातून पळून जावून तर आराध्या मावशीने घरच्यांना विश्वासात घेतलं, अस्मित काकाही नुकतेच जॉब करायला लागले होते. दोघींनी सोबत प्रवास सुरू केला होता.

पुढे साधारण दोन तीन वर्ष आत्या खूप खुश होती, म्हणजे घरच्यांना तिच्या निर्णयावर खंत नव्हती, पण नंतर अमित काकाने निवडणूक लढवली, आणि ते हरले, मग काय, त्यांचे वडील वारले आणि सगळं वाहून गेलं, दारूची लत लागली त्यांना. मग आत्याला मारायचे, तिला बाळ होतं नाही म्हणून त्रास द्यायचे. तिने सर्व सहन केलं, आशा होतीच ना तिला, पण मग गुंता खूप वाढला, अमित काका जरा मध्ये सुधारले, परत समाजसेवा करायला लागले, आणि त्यातच ते एका बाईच्या नादी लागले, आणि अचानक एक दिवस त्या बाईने छकुलीला त्यांच्या  घरी आणून सोडून दिलं आणि ती निघून गेली.

छकुलीला बघताच आत्या मधल्या आईने जन्म घेतला, तिने सगळं माफ करून नवीन सुरवात करायचं ठरवलं, काका परत काही दिवस चांगले राहिले पण लत ते लत, ते तिला खूप मारायचे, मग दारूत त्यांनी सर्व शेती विकली, त्याच्या उद्धटपणा मुळे त्याचं धान्य विक्रीच लायसनपण गेलं आणि मग सारंच बदलत गेलं आणि आता त्यांच्याकडे ते फक्त रहातं घर आहे, त्यांची आई तर आत्याला सगळ्यासाठी जवाबदार ठरवते.  खूप जोशात म्हणते ती, माझ्या जोडीदारा सोबत मी मोठ्या रुबाबात सारं वैभव मिळवलं आणि तू आलीस आणि त्याला साथ देवू शकली नाही... असं काय काय बोलते ती...

कधी कधी तर अमित काका आत्याला ओळखतही नाहीत, बाईला ही घरी घेवून येतात, आता छकुली मोठी झाली तर आत्या त्यांना म्हणत असेल मग वाद होत असतील त्यांच्यात आणि मग आत्या खूप मार खात असेल. नेमकं काय बिनसलं मलाही काहीच कळाल नाही पण आजही आठवते, आत्या रडत आली होती, अमित काकांना कायमच सोडून पण बाबा गुमान गप्प होते आणि आत्या परत रागात तिकडे निघून गेली होती. माझे आजोबा आत्याची दशा बघून हृदय विकाराच्या झटक्याने वारले आणि मग आत्याने तिचं दु:ख कुणाला सांगण्याच धाडस केलंच नाही, आजही ती इथे येते तर कधीच काही बोलत नाही, पण तिचे डोळे बोलून जातात तरीही ती आणि आम्ही सारे गुमान गप्प असतो. ती घरच्यांना बघते आणि आम्ही तिला, घरात सुरु असलेल्या विषयावर ती बोलते आणि निघून जाते. किती सहन करायचं ग एखाद्या जीवाने. जीव आता तिचा अडकलाय त्या छकुलीत, मग आज ती जरा नमली, आत्ता नाही जावू देणार तिला मी तिकडे. बघू अमित काका सुधारले तर... निदान आत्या समोर नसल्यावर तरी त्यांना तिची गरज जाणवेल, नाहीतर राहिल आत्या इथेच, तुला काही हरकत नाही ना?”

“नाही तर, तसाही त्यांचा स्वभाव त्रास देणारा वाटला नाही. आयुष्याच्या ह्या वळणाने त्यांना शांत केलंय.”

“हु हु, तिने खूप वाट बघितली ग की अमित काका सुधारेल म्हणून पण आज १५ वर्ष झाले असतील, पण काहीच सुधारणा नाही त्यांच्यात, ही मात्र वाटच बघत आहे. ती ह्या आधीच वेगळी झाली असती तर निदान नव्याने अजून उभी राहिली असती.... पण कदाचित ती हिंमत करू शकली नाही आणि कुणी तिला ती दिली नाही... उलट आरध्या मावशी, लग्न आणि सारचं स्वतःच्या मनं मर्जीने करत सर्वांची मन मर्जी तिने राखली. आज दोघांच्या यशाने सारे भारावून जातात. त्याच्या प्रेमाचा दाखला आपल्या कुटुंबात दिल्या जातो. दोघांनी शून्यातून साम्राज्य उभं केलंय. आराध्या मावशीने जी साथ अस्मित काकांना दिली त्यासाठी तिला तिच्या सासरी खूप मान आहे. सुरवातीला तिलाही खूप सहन करावं लागलं असणारच ना पण दोघांची साथ कायम होती आणि आहे, मग बघ, आणि आता तर अस्मित रेड्डी काकांच्या घरात आराध्या मावशीची हुकुमत चालते म्हणे. मावशीचे सासू आणि सासरे तिला मुली सारखं वागवतात, नाहीतर ती इकडे आपल्याकडे आधी आली असती का ग? आता बघ आपल्या कडून मावशी तिकडे बंगलोरला जाणार तिकडे तिची सासू वाट बघत असेल तिची. बघ ना ग जोडीदाराची साथ किती महत्त्वाची असते ह्या दोन नात्यांमुळे मला जाणवली, ही दोन्ही नाती मी माझ्या नजरे समोर उभी झालेली बघितली, एक आज उद्ध्वस्त आहे आणि एक तटस्थ उभं... आपल्याला खूप काही शिकायचं आणि करायचं आहे अनु... साथ देशील ना? ”

अनुने अलगद हात त्याच्या हातात दिला. जरा वेळ दोघात शांतता होती, बाल्कनीतून दिसणारा चंद्र नभातून दोघांना बघत होता. अनु जरा उठली, अंकितने तिला हात ओढला, त्याचे डोळे जणू बोलत होते,

“शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी

चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

अंकित ने ज्या भावनेने आज अनुचा हात धरला होतो तो खूप काही सांगणारा होता, लग्नाची पहिली रात्र होती त्यांची, अनंत स्वप्न आणि साथ हवी होती दोघांना, अनुच्या भावना जणू तिच्या स्पर्शातून बोलत होत्या,

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा

तू असा जवळी रहा”

क्षणात अंकितने तिला ओढलं, आता मात्र अंगा-अंगात शहारा भरला होता, काटे उभे झाले होते. अंकितने तिला गच्च मिठीत धरलं आणि खोलीच दिवे मंद झाले. प्रेमाचे दिवे प्रकाशित झाले होते, अंकितच्या त्या स्पर्शाने सुखावलेली अनु हळू-हळू अंकितमय झाली होती. रात्रीने प्रेमाच अंथरून घेतलं होतं, अंकित अनुच्या अनु अनुत शिरत अनुंकीत झाला होता.

Post a Comment

0 Comments