जोडीदार... प्रवास तुझा माझा.. भाग ५

 जोडीदार... प्रवास तुझा माझा.. भाग ५दोघी मैत्रिणी भेटल्या होत्या, आणि अंजु अरु परत गप्पा करायला लागल्या, खुशाली विचारून झाली आणि आराध्या हळूच अंजूला म्हणाली,

“हॉलमध्ये नव्हतीस तू, का ग? काय झालं?”

“अरु तुला तर माहित आहे मी इकडेच आहे, मागच्या चार महिन्या पासून, बाळू काही मला तिकडे अमितकडे जावू देत नाही. म्हणतोय अमित सुधारेल तेव्हाच जायचं आणि दादाने गावाची जमीन विकली आणि बुटिकच काम पण सुरू केलंय माझ्या, बाळूने छकुलीला इकडेच शाळेत टाकलंय, माझं तर मस्त सुरु आहे ग, पण पाहुणे आहेत ना घरात नुसत्या चौकश्या नको म्हणून मीच आपल्या कामा पुरती असते तिकडे. उगाच लग्नघरात माझा विषय कशाला, सारे पाहुणे शेवटचं लग्न असल्याने जमले आहेत. नको नको ते विचारतात मी दिसले की.”

“असं होय, जावूदे. तुझं नीट आहे ना सारं, मग जावूच दे, समजलं मला, पण अमित सुधारतोय काय ग?”

“अरु काही कळत नाही, मागच्या महिन्यात तो आला होता, माफी मागत होता, घरी चल म्हणत होता, दारूही सोडली म्हणून गयावया करत होता पण बाळू त्याला नाहीच म्हणतोय. आता मागच्या आठवड्यात समजलं कि तो खोटं बोलत होता म्हणून. मी तयार झाले होते, पण... बाळू ठाम होता, मग मी ठाम आहे. आता नाही ग होणार सहन मला सारं काही... बाळूने सोडचिठ्ठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मग अमित भडकला आहे. त्याला ना दारू प्यायला पैसे मिळत ना त्याचा राग काढायला मी... म्हणून वाट लागली आहे त्याची.”

“हो का ग, चल जावूदे, त्यालाच जर सुधारायचं नसेल तर काय करायचं आपण... तू काळजी करू नकोस. सर्व आहेत तुझ्या पाठीशी.”

“हो ते तर आहेत ग पण माझं मन मलाच खात असते...”

“त्याला म्हण  खूप  ऐकलं  तुझं... आणि घाल आवर, कधी कधी मनाची गणितं चुकतात अंजू...”

“तोच विचार करून पाऊल पुढे टाकलं आता. अनु आणि अंकित असतात ग सोबत काही लागलं तर...”

“अनुने जिंकलय का ग सगळ्यांना... कसं सुरू आहे आपल्या बाळूचं?”

“तिचा खूप प्रयत्न सुरु असतो.... गोड आहे ती... दादा तर काही बोलत नाहीत तिला, वहिनी जरा करते कुरकुर... पण तुला तर माहित आहे, कशी आहे ती. एकट्या सुनेवर जीव लावायला मागे पुढे बघणार नाहीच ना... जमतंय दोघींचं. आणि आता तर अनुच्या माहेरी पण सगळं सुरळीत आहे.

“अरे व्हा... म्हणजे तिचे आई बाबा येतात का ग आपल्या मोहिते निवासात...

“हो येवून गेले, तिचे बाबा आता अंकितला खूप मानतात... तिच्या बहिणीचं लग्न झालं आणि सर्व काही पालटलं बघ... वडिलांचे डोळे उघडले आणि अंकित आवडता झाला त्यांच्या...”

“आलीया नाव ना अनुच्या बहिणीच?

“हो, तीही सुंदर आहे. तिच्या वडिलांनी जोशात तिचं लग्न त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लावून दिलं आणि आता मुलीला त्रास आहे. सारखे पैसे मागत असतात म्हणे... अनुची आई तर धास्तावली असते ग...”

“मग तिचा नवरा?

“तो बरा आहे म्हणे पण सध्या तरी आलीया सासू सासऱ्याच्या धाकात आहे असंच ऐकायला येते.”

“जोडीदार महत्त्वाचा, वेळ काढून घे म्हणाव आलियाला...”

“हो अनु तिला तेच बोलत असते, पण तिचा नवरा एकतो आईच असंही मी ऐकलं आहे.”

“ऐकू देत ना, आपला बाळूपण तर ऐकतो... ठीक होईल सर्व.”

“हुमम, पण आजकालची मुलं खूप विचारी आहेत ग, मी नाही करू शकले विचार... माझ्या जोडीदाराला नाही वळवू शकले, कधी कधी एकांतात मनाला वाटतं ग, आपण कमी पडलो म्हणून... आयुष्यात जोडीदार महत्त्वाचा असतो ग... कुणाशी मनातलं बोलायचं, कुठल्या खांद्यावर रडायच... खूप प्रश्न पडतात मला. जगावं कशाला असं वाटतं मग, पण छकु दिसते आणि उमेद वाढते माझी जगण्याची.”

“जोडीदार आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो पण त्याने दगा दिला म्हणून आयुष्य जगणं सोडू शकत नाही आपण. वेडा बाई असा काहीही विचार करू नकोस. तू सगळं करशील ग... बिनधास्त आणि बोल्ड आहेस तू...”

“तोच बोल्डनेस हरवलाय ग, आत्मविश्वास गमावून बसतो आपण असा जोडीदारावरचा विश्वास उठला की.”

“जावू दे ग, कशाला एवढा विचार करत बसतेस.”

“हुम्म्म, आधीच केला नाही ह्याने अजून विचारात शिरते मी, आजच्या मुला मुलींना बघितलं की आपण आपल्या आयुष्याचा विचार केला नाही असचं वाटतं ग, आजकालची मुलं, नाही पटलं तर देतात सोडून, आणि काही दिवसात अजून आयुष्य जगायला लागतात. हेवा वाटतो मला आजकालच्या पिढीचा. आपण नव्हतो ग असे, म्हणजे निदान मी तरी, त्याच त्याच ठिकाणी खुडत बसले मी आणि आता जाग आली असं वाटते.”

“उशिरा का होईना तुला आता ह्यातून सुटायचं आहे हे महत्त्वाच.”

“हुम्म्म, सुरु आहे प्रयत्न, अंकितने तर माझं नाव मॅट्रिमोनी डॉट कॉमला नोंदवलं म्हणे.

आराध्या हसली, “ह्याला मोठं सुचत असते ग असलं, ये, पण चांगलं आहे ना, कुणी तुला सांभाळणारा आणि साथ देणारा भेटला तर काय हरकत आहे ग...

“अरु तू पण ना... “

दोघीही सकाळी सकाळी गोष्टीत रमल्या होत्या.

तसं घरात कुणीच कुणाचं नव्हतं, शेवटच लग्न होतं, पाहुण्यांनी घर भरून होतं, आपल्या आपल्या ग्रुपने सारे एका एका खोलीत गप्पा करत होते. नाही म्हणता म्हणता मोहित्यांचा लग्नाचा पसारा वाढला होता.

घरात सर्व आपल्या आपल्यात तालात होते तोच घरासोमार मार्सेडीज उभी राहिली, सानू पटकन बल्कीनीत आली, खाली सुमंत उभा होता, त्याला बघताच सानूच्या हृदयाचे ठोके वाढले, तीन महिन्या नंतर ती त्याला बघत होती. कदाचित सुमंतला ही राहावलं नव्हतं म्हणून तो त्याच्या बंगल्यावर आईला भेट देवून इकडे मोहिते निवासात आला होता.

सुमंत येताच अरुण आणि भीमा काका त्याच्या कडे गेले,

“जावई तुम्ही आजचं इकडे! काय काही इरादा नाही का उद्यापर्यंत थांबण्याचा?”

भीमा काका गमतीच म्हणाले. अरुणने त्याचा सदरा मागून ओढला, आणि म्हणाला,

“या जावई, सकाळीच पोहचले ना तुम्ही, सगळं ठीक आहे ना? प्रवास ठीक झाला ना?”

“हो बाबा, सगळं उत्तम.” सुमंत बाबांच्या चरणांना स्पर्श करत म्हणाला. नंतर एक नजर सगळीकडे बघत त्याने भीमा काकाचाही आशीर्वाद घेतला. आता नजरा सानूला शोधत होत्या तोचं बाबा म्हणाले,

“मासाहेब आणि भाऊसाहेब, आत्या साहेबांना भेटून आलात ना?”

“हो हो, सगळं ठीक, मासाहेबांची परवानगी घेवून आलोय तुम्हा सर्वाना भेटायला, आत्या साहेब म्हणाल्या की हळद लावल्या नंतर निघता येणारं नाही, सक्त ताकीद दिली त्यांनी, आणि मी काही थांबू शकत नव्हतो. मग आलो इकडे, हरकत नसेल तर आमच्या होणाऱ्या बायकोला भेटायचं का आम्ही.”

आई लगेच म्हणली,

“का नाही, आता तुमचा अधिकार जास्त आहे तिच्यावर. मी तिला बोलावते. बसा तुम्ही.”

सुमंत स्मित हसला, “आई अधिकार नाही हो, प्रेम आहे. आणि ती माझी बायको आता होणार आहे पण मुलगी ती तुमची सदा असणारं... तिच्यावर पहिला अधिकार तुमचा आहे. माझं तर प्रेमच असू द्या...“

अरुण रावं हसले, आईला शांत करत म्हणाले,

“शब्दात तिलाही कुठली तोड नाही आणि तुम्हालाही. सानू तिच्या खोलीत आहे.”

“अनु बाळा, सुमंत रावांना सानूच्या खोलीत घेवून जा.”

आई मात्र जरा रागाने अरुण कडे बघत राहिली, सुमंत सानूच्या खोलीकडे निघाला आणि आई लगेच म्हणाली,

“काय हो अगदीच सानूच्या खोलीत होय, इथे सर्वांसोबत भेटायचं ना. सर्व काय बोलतील, घरात पाहुणे आहेत. लग्न तर आहेच ना उद्या, मग!”

“तू गप्प राहा ग, किती आतुरता होती जावयांच्या डोळ्यात. तुला ती दिसली नाही, पाहुणे काय म्हणतील हे दिसलं. मुलांच्या मनाचा तर विचार कर, बाकीचा करू नकोस.”

“अहो पण पाहुणे आहेत ना घरात, कसं वाटतं ते.”

“तर काय करू, आपले दिवस विसरतात लोकं, लक्ष नको देवू, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप काही देवून जातात... विश्वास असा जवपायचा असतो, नको त्या ठिकाणी नियम कामाचे नसतात. आपण थांबवलं तर ते मार्ग शोधतीलच, मग काय होणार, आपण वाईट! मला मुलांमध्ये वाईट व्हायच नाही. मी नाही अडवणार मुलांना, ना सुनेला ना जावयाला.”

आई गुमान गप्प झाली, पटलं तर तिलाही होतं. काहीच बोलली नाही. सर्व आपल्या आपल्या कामी लागले होते.

सुमंत सानूला तीन महिन्या नंतर बघत होता, तिचा तो मोहक चेहरा त्याला अजूनच तिच्या कडे आकर्षित करत होता. एकमेकांना बघून त्यांचे डोळे पाणावले होते. शब्द तर नव्हतेच पण तरीही खूप काही संवाद झाला होता. डोळ्यांनी एकमेकांना आश्वासित केलं होतं. पाच मिनिटा नंतर सुमंत म्हणाला,

“ह्या वादळाला सामवून घेण्यासाठी वाट बघतोय.”

“बघ बाबा, मी तर वादळ आहे, आणि असणारही, बघू आता तुझ्यात किती सहनशक्ती आहे ते...

“आता पर्यंत  माझी सगळे सहनशक्तीच तर बघत आले सानू... आणि तू बघशील ती काही औरच असेल...”

“काय रे सगळं ठीक ना? कुणी येणार नाही आहे का इकडे?

“ते काय येतात... त्यांना चकट लागली आहे झगमगाटाची, मी म्हटलं होतं सारंगीला जवायला घेवून ये म्हणून पण, नाही बोलली, मीही फोर्स केला नाही... “

“असं होय, मग येणार आहे म्हणा तुमची राणी तिकडे राज्य करायला बोललात का असं....

“ते काय बोलावं लागणार काय, तुझी कीर्ती ऐकून सारे आताच गार आहेत... राजाच्या राज्यात आता राणीची एन्ट्री होणार म्हणजे... बोलती बंद ना!”

“ये काय रे, आपण एवढ्या दिवसाने भेटलो... उगाच काय बोलत बसलो आहे...

“तुचं विषय काढला ना...

“मासाहेब खूप चिंतेत असतात ना, म्हणून मग ....

असुदे... आणि हा... आपण दहा दिवसांनी परत जातोय.”

सानू अगदीच आनंदित झाली, दहा दिवस भरपूर होते. सुमंतने अलगद तिचं मन ओळखलं हे जाणून ती आणखीनच भावून झाली, त्याला गच्च बिलगली. सानूच्या हातावरची मेहेंदी सुमंतच्या शर्टवर लागली होती. मिठीत कुणीच कुणाशी परत बोलत नव्हतं, मनांची भेट झाली होती, आणि संवाद परत सुरु झाला होता मनांचा. मिठी जरा सैल करत सानूने नजर सुमंतवर रोखली,

“काय रे वास येतोय तुझ्या शर्टचा...”

“अग, तसाच आलोय, सामान टाकून... धावत तुला भेटायला.”

“मग भेटलास का?

“कधीचा भेटलोय पण मन भरत नाही... तू नजरेसमोर असलीस की शब्द सुचत नाहीत आणि मन मात्र संवाद सादात असते... ये तुझंही असचं होतं ना?”

सानू आता लाजली, जरा मिठीतून बाहेर आली, आणि तिला सुमंतच्या शर्टवर मेहंदी लागलेली दिसली.

“अय्या, हे काय झालं! बाहेर सगळे काय म्हणतील...

सुमंत मेहंदीला बघत म्हणाला, “म्हणतील तर काय, मी लावली नव्हती तू लावून दिलीस.”

“शर्टला?””

हे बघ मला अंगाला लागली, म्हणजे हे दंडाला लागली.”

सानू हसली, “काहीही हा तुझं...

“हा डायलॉग तुझ्या आईचा... हो ना?

“काय रे, पकडतोस तू.”

“अहाहा.... लाजली ग तू.... वाटलं नव्हतं ही टीम लीडर लाजेल सुद्धा...

“झालं, सगळ्यांनी मिळून ठरवलंच आहे ना, अरे मी पण...

सुमंतने तिच्या ओठंवर बोटं ठेवलं...

“मला आवडेल, तुझं हे लाजणं... जगासाठी तू टीम लीडर, पण माझ्या साठी माझी राणी आहेस, माझ्या मनाचं साम्राज्य तुला राणी म्हणून स्वीकारायला तयार आहे जान... वाट बघतोय मी.”

“मी पण... पण जान?”

“हो जान, माझी तू आहेस, काही हरकत?

सानू आता हसली, “मला काय हरकत असणार, पण वादळ आहे मी...

“मान्य आहे मला, फक्त तू हवीस ग. आता दुसऱ्या कुठल्या  वादळांची काय भीती, जर वादळ माझ्या मनात असणार आहे...”

सानू परत येवून सुमंतला बिलगली, नजरेने परत एकमेकांना आश्वासित

करत सुमंत खोलीतून जवळपास दहा मिनिटात बाहेर आला, आरती आणि अरुण हॉलमध्ये होतेच, शर्टावरची मेहंदी त्यांनाही दिसली. सारं काही बोलून गेली होती, आईच्या आणि बाबांच्या मनात सानूसाठी खूप आनंद होता.
कथेचा पुढचा भाग लवकरच.

---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक- https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments