जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २3

 

सावंत वाडा 

राणी आणि राजन घरी आले, तेव्हा रागिणी रवींद्रसोबत घरी होती. आई बाबा त्यांच्याशी गप्पा करत होते. विषय गंभीर होता. रागिणीला दिवस गेले होते आणि त्यांना आता एकही महिना घालवायचा नव्हता.



बाबा, “हुमम, आता तुमचे ठरलं आहेच तर, लग्न उरकून घेवूया, पण रविद्र तू तुझ्या घरी बोललास का?

“हो बाबा, त्यांना काही हरकत नाही, आई माझी रागवली आहे पण तिने मान्य केलय.”

राजन दिसताच सर्व गोंधळले, रागिणी जरा लाजली, राणी तिच्या जवळ येवून बसली, हळूहळू तिला आणि राजनला सर्व समजलं पण दोघेही गुमान शांत होते.

राजन हळूच म्हणाला, “मग येत्या रविवारी घरीच करायचा सोहळा.”

रवींद्र, “मी बोललो आहे माझ्या बाबांशी, ते म्हणाले की आपल्या घरी करूया म्हणून.”

राजनने मान हलवत होकार दिला, “काही हरकत नाही, आम्हाला काय करायचं आहे ते सांगा.”

“काही नाही दादा, तुम्ही बस तिकडे या, तसंही मला तर काहीच नको. आणि आता ही वार्ता ऐकल्यावर तर  मला रागिणी समोर हवी आहे.”

“हुमम, काही हरकत नाही. मग पाहुणे वगैरे बोलवायचे की नाही तेही सांगा.”

“बाबा तर म्हणाले होते, घरच्या मंडळीतच सर्व करूया.”

“घरच्या म्हणजे? आता राणीच्या घरचे म्हणजे काही बाहेरचे नाही, आणि आता ही गोष्ट काही लपून राहणार तर नाहीच, सर्वांना सर्व समजते.”

“हो दादा, पण मी एकदा बोलून घेतो बाबांशी.”

“म्हणजे हरकत नाही, आता आम्ही तेही समजू शकतो पण आता बघ जूनमध्ये लग्न होतंच, तुम्ही तीन महिन्या आधी म्हणत आहात, आम्ही बऱ्याच जवळच्या नात्यातल्या लोकांना सांगून ठेवलं होतं ना.... म्हणजे अवघड काही नाही पण अवघड होणार असं दिसते.”

“ते काही नाही हो दादा, ज्यांना जे समजायचं ते समजू देत, मला रागिणी महत्त्वाची.”

“बसं हेच ऐकायचे होतं रवींद्र, तू एवढ्या वेळेचा बाबांना विचारून सांगतो, बाबांना बोललो हेच बोलत होतास... मला माझ्या बहि‍णीची चित्ता होती बस तुझ्या ह्या शब्दाने मिटली, आता तू आणि रागिणी दोघांनी मिळून एखाद्या देवळात जरी लग्न केलं ना तरी हरकत नाही माझी.

“काय हो बाबा आई...

राजनचे बाबा, “हो रे राजन, किती वेळचा मी माझ्या मुलीसाठी येण्यासाठी आतुर होतो.

“रविंद्र बस तुला रागिणीची चिंता हे महत्त्वाच आहे रे आम्हाला, आता हे जे समोर आलंय त्याचा मार्ग तर आपण काढणारच पण...

रवींद्र, “बाबा तुम्ही काळजी करू नका, रागिणीचा जोडीदार म्हणून मी कुठेच कमी पडणार नाही, हे जे झालंय त्यात मीही सहभागी होता मग मला लाज कशाला, मला रागिणी हवी आहे माझ्या समोर, त्यासाठी मला माझ्या बाबांचीही अनुमती नको. पण आता हे सगळं असं पुढे आलं मग त्याच्या मनाला समजून घेत मी काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे करण्याच्या ठरवल्या.”

“बरं आमची काही हरकत नाही आता. सगळं सुरळीत असायला हवं.”

राजनची आई,” रागिणी डॉक्टरकडे जावून आलात ना, बाळ ठीक आहे ना ग?

“हो आई, सगळं ठीक आहे. आपण बोलू ना.”

“बरं, मग आज इकडे थांबता कि?”

रवींद्र, “मी निघतो, उद्या परत येतो, आणि इथून मग राजकोटला निघतो, आठवडा भर सुट्टी टाकतो आणि येतो मग.”

रवींद्र निघाला आणि रागिणी तिच्या खोलीत गेली. हॉलमध्ये, राणी राजन आणि आई बाबा गप्प बसून होते. शब्द कुणाच्याही मुखातून निघत नव्हते. शेवटी आईला दाटून आलेला हुंदका गिळता आला नाही आणि ती रडायला लागली,

राजनचे बाबा तिच्याकडे गेले,

“रंजू, काय हे! आपण तर ठरवलं होतं ना, काहीही झालं तरी मुलांची बाजू सोडायची नाही.”

“अहो पण ह्यात आणि अश्यातपण का?

“काय वाईट आहे ह्यात, ते दोघे घेत आहेत ना जवाबदारी, शिवाय रवींद्रच्या घरी काही अडचण नाही, मग आपण का अडचण असावं.”

“अहो पण रागिणीला कळायला हवं होतं ना.

“त्यात दोघांची सहमती असणार, आपण काहीही बोलू शकत नाही बोलूही नको.”

“काय तुम्ही सारखं माझं तोंड दाबत असता. मलाच म्हणा, हे मुल त्यांची मनमानी करतात आणि आपण ठेवायच्या भावना मनात.”

“रंजू तू आधी खोलीत हो, आपण बोलूया.”

“राणी बाळा चहा ठेव आणि घेवून ये आमच्या खोलीत.

राणीने होकार दिला आणि ती निघाली होती स्वयंपाक खोलीत तर बाबा परत म्हणाले,

“राणी रागिणीला सांभाळ, तिची परिस्थिती नाजूक आहे, तिलाही अवघडल्या सारखं वाटत असेल, तू तिला तसं जाणवू देवू नकोस. आपण असंच समजूया की, नातं तर होतंच ना, आपण सगळे त्यांच्या दोघांच्या नात्याला ओळखून होतो. मग आता येणाऱ्या बाळाचा विचार करून सगळं करूया.”

राणीने मान हलवली, आणि ती काहीही न बोलता चहा टाकायला निघून गेली. राजन गुमान हॉलमध्ये बसून होता. त्यालाही रागिणीचा राग येत होता पण करणार काय, जे व्हयाच ते होवून गेलं होतं आणि रवींद्रने जवाबदारी घेतली होती. तोही राणीकडे स्वयंपाक खोलीत आला,

“राणी काहीतरी अवघड झालंय ना सगळं.”

“हुम्म्म, जरा शांत राहा, बोलून आता मार्ग निघणार नाही, त्यांचा त्यांनी काढला आहे.

“मी काय म्हणतो, रविंद्रच्या घरी आपण नकोच सगळे जायला.”

राणी गप्प झाली आणि मग काही वेळाने चहा गाळात म्हणाली,

“ठीक आहे तुम्ही टेन्शन घेवू नका, माझ्या घरी बोलेल, काहीही वाटणार नाही कुणाला. आपण आपल्या घरचेच जावूया तिकडे.”

“तुला काही हरकत नाही ना?”

“नाही, पण मी एक दोन दिवस तिकडे जावून येईल, ताई उद्या निघणार आहे., मग बाबांना जरा...”

“अरे हो यार, निघूनच गेलं माझ्या डोक्यातून. आपण सानवीदीला बोललो ना, अग ऐक ना तूच ये जावून आणि..”

“हो मला समजलं, नाही राहणार तिकडे, दोन दिवस राहील फक्त.... इकडे माझी गरज आहे आता.”

राजन राणीच्या जवळ आला, मागून त्याने तिला आलिंगन दिलं.

“राणी सॉरी ग.”

“सॉरी कशाला? मी ओळखते तुम्हाला, सगळं नीट झालं कि आपण दोघेही मोहिते निवासात राहूया आठवडाभर...

“मस्त, मग मला आईच्या हातचा पोहो खायला मिळेल, तुला तर अजूनही जमत नाही तसा.”

“हुम्म्म, पण तिच्या सुनेला जमतो ना.”

“पण ती तर नाही ना इकडे. अरे हो, अंकितला फोन करायचा राहून गेला. तू चहा घेवून जा, मी करतो त्याला, बघतो माझा एकुलता एक साला करतो काय तिकडे. आणि गोष्ट जरा कानावर टाकतो ग, तो येणार होता सुट्टी काढून, म्हणाला होता आतापासून सांगून ठेवणार म्हणून त्याच्या बॉसला.”

“हुम्म्म, करा तुम्ही मी येते आईं बाबांशी बोलून.

“राणी लव यू ग.”

“असं!

“उत्तर आलं नाही अजून, वाट बघतोय मी.”

“आताच हवंय का?”

“म्हणजे आज तुझा काही वेगळा प्लॅन आहे तर उत्तर देण्याचा.”

“राजन... तुमच्या ना डोक्यात तेच सुरू असते हो.”

“आहाहा लाजली रे बायको... ये बायको आज उत्तर मिळेल काय?”

“देते ना, या खोलीत.”

“आलोच ग साल्याला फोन करून...”

राणीने ट्रे उचलला आणि ती आई बाबांच्या खोलीकडे निघाली. खोलीत आई बाबा गुमान शांत होते. राणीने चहा दिला  आणि म्हणाली,

“अहो आई बाबा, कशाला एवढा विचार करता, आपल्याला रागिणीताईचा आनंद महत्वाचा, चला आनंदी व्हा, नातू होणार आहे तुम्हाला. हे कसले चेहरे करून बसला आहेत तुम्ही दोघं.”

आईने चाह्चा कप हातात घेतला आणि हसली,

“राणी मला ना राजनच बाळ आधी घ्यायचं होतं ग हातात, हिच्याकडून तर एवढ्या लवकर अपेक्षा नव्हती.”

“अहो तेही घ्याल, पण आता आपल्या रागिणीची बातमी आहे, मग! मी तर जाम खुश आहे बाबा, मी आत्या होणार आहे लवकर.”

चहा आईचा घेवून झाला होता ती हळूच म्हणाली,

“राणी जरा रागिणीकडे बघतेस का ग?

“हो का नाही, मी आता चहा घेवून जाते तिच्याकडे, बघते काय काय हवंय तिला, सांगते मग तुम्हाला.”

ती निघून गेली आणि बाबा आईला म्हणाले,

“बघितलंस किती मनमिळाऊ मुलगी आहे ही, सगळं वातावरण सांभाळून घेईल बघ. तू काळजी करू नकोस. ते दोघं आहेत जोडीला जोड. आहे राणी थोडी हळवी पण अश्या प्रसंगामध्ये तिच्यात हिंमत येते.”

मोहिते निवास

सानूला वेध लागले होते सुमंतला भेटण्याचे, महिना झाला होता तिला इकडे, तसं रोज तास तास बोलून होत होतं. पण तिला आता राहवत नव्हतं, ती सामान भरातांनाही सुमंतशी बोलत होती. आई बाबा तिला मदत करत तिच्याशी बोलण्याची वाट बघत होते. सानू मात्र सुमंतशी बोलता बोलता खोली सोडून माळावर निघून गेली.

आता खोलीत आई आणि बाबा च होते, आईने बाबांच्या हातात हात दिला आणि म्हणाली, त्याची जन्मभराची जोडीदार आहे ती. आपण आता मागे आशीर्वाद देण्या साठी नुसते. चला तुम्ही तिचं बोलणं झालं की येईल ती. आपण हॉल मध्ये बासुया.”

बाबा आगीच स्मित हसले. आरतीचा हात त्यांनी धरला, पकड जरा घट्ट केली आणि ते हॉलमध्ये आले, आई त्यांना म्हणाली,

“काय हो आज काय जेवणार तुम्ही. आता ही काही घरी जेवायची नाही, रात्री आठची फ्लाइट आहे बोलली. आणि आता निघेल ही, आपल्याला नेणार एयरपोर्ट पर्यंत की नाही तेही अजून बोलली नाही. “

“तिचं बोलणं सुरू आहे सुमंतसोबत, त्याच्या नवीन डील बद्दल बोलत होती ती, समजलं मला काही काही. सुमंत रशियाला जातोय पुढल्या महिन्यात, आणि तो सानूला घेवून जाण्याच बोलत असावा.”

“अग बाई, मग हो?”

“मग काय, त्याचं असेल ग काही, आता काय सानू बिजनेस टायकून की काय त्याची पत्नी आहे. मोठ्या मोठ्या डील ती आधीच करत होती आता तर सुमंतची जोडीदार, त्याच्यासोबत भरारी घ्यायला तयार आहे.”

आई बाबांचे नुसते अंदाज सुरू होते. त्यांनाही सानूशी बोलायचं होतं पण ती नुसती सुमंतशी बोलण्यात व्यस्त होती. सानू माहेरी आली होती ती मोहित्यांची मुलगी म्हणून पण ती आज भासत होती ती फक्त सुमंतची बायको....

कथेचा पुढचा भाग लवकरच.

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments