जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २२

 

जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २२सोमवार उजाडला, अनु आणि अंकित बंगलोरसाठी रवाना झाले होते. सानूने तिची बुकिंग प्रीपोन केली होती. काही कागद पत्रांची जमावा जमव तिला शिकागोमधून करायची होती. श्रीकांतचा इलाज सुरू झाला होता. सानूच ऑफिसच काम आटोक्यात आलं होतं.

राणीशी तिची भेट अजून झाली नव्हती, घरी बसली होती तोच कैलास आणि गौरी घरी आले,

गौरीला दिवस गेले होते, कैलास गौरीसोबत खूप खुश होता, सानू त्याच्यासाठी आनंदी होती.

गौरीशी बोलताना तिची ओळख सानूची लहान जावू जयाशी आहे हे सानूच्या लक्षात आलं,

“गौरी, तू जयाला ओळखतेस काय ग?

“हो माझी दूरची बहीण आहे, नागपूरची, पण तिचा मोठा भाऊ तिकडे अमेरिकेत असतो. जयू तिकडे शिकायला होती. कशी आहे ती?”

“ती मजेत आहे, पण जया कशी आहे ग स्वभावाने?”

“हुमम, जरा हट्टी होती ती, आता माहीत नाही. का ग? आणि तिचा नवरा काय करतो, त्याचा तर मोठा रिसर्च सुरू होता तिकडे.”

“अहाह... काय? हो, हो ना, पण मला खूप काही माहीत नाही ग.” sसानू उत्तर देतांना अवघडली होती. तिने हे पहिल्यांदा ऐकले होते. जरा अवाक झाली होती तर गौरी म्हणाली,

“अग हो, तो टायरमध्ये इंॉवेशन करत होता ना, म्हणजे त्याच्या मेटेरियल मध्ये त्याचं काहीतरी सुरू होतं. जवळ जवळ सारं झालचं  होतं, त्याची कंपनी आहे ना तिकडे.”

सानू जरा शांत झाली, तिला ही बाजू माहीत नव्हती.  तर कैलास म्हणाला,

“काय ग सुमंतची आठवण झाली का?”

“का रे! त्याची आठवण व्हायला तो आधी दूर तर व्हायला हवा ना, हा इकडे हृदयात असतो माझ्या.”

“अरे बस खल्लास ग, अशीच रहा, आणि पुढल्या वेळी जोडीने या.”

“आणि तुम्ही तिघे व्हा... अरे ऐक ना, जरा मला मदत कर ना.”

“बोल ग.”

“ते श्रीराम अनाथ आश्रम आहे ना, तिकडे श्रीकांत आहे, मी त्याला दत्तक घेते आहे, जरा काही अडचण आली तर मदत लागेल तुझी.”

“अबे, एवढं मोठं काम आहे तुझं मी तर कधीही एका पायावर तयार असेल ग, कधीही बोल, मी आणि गौरी जावू ना त्याला भेटायला. तुला बोलायचं असलं तर सांग, आम्ही करू तशी व्यवस्था.”

“नाही आता आर मी श्रीकांतला आयपॅड घेवून देते आहे. मी असणार त्याच्या संपर्कात. पण त्याला नाही सांगितलं अजून काही.”

“हो हो, उगाच त्याला टांगणी लागून राहायची.”

कैलासची शिफ्ट होती, म्हणाला, “सानू निघतो ग मी, पण सुमंतला नक्की घेवून ये माझ्याकडे, आता ड्यूटि आहे यार निघतो मी.”

“गौरी तू बस, गप्पा कर, आईला सांगतो मी, ती येईल.”

सानू आणि गौरी गप्पा करत बसल्या, आज जया आणि सारंगच नातं सानूला नव्याने कळाल होतं. तिने विचार केला तसा सारंग नव्हता. बस जरा रागवला होता स्वत:वर. जयाशी बोलता बोलता सानूने त्याचे ऑनलाइन रिसर्च पेपर बघितले, दहा बारा तिला सारंग राणेच्या नावाने दिसले. वाचता वाचता तिला सारंगच्या कामाबद्दल कळत गेलं, ती भारावून गेली होती, मनात प्रश्न पडला होता,

“एवढा हुशार सारंग आणि कुठे बिनसलं ह्याच. नुसता सुमंतला ह्याने सपोर्ट केला तरी कुठच्या कुठे जायचा, काहीतरी चुकतंय, कुठेतरी काही तरी हरवलं आहे. मला शोधावं लागेल. एवढा हुशार माणूस आणि असा वागतोय. मूळ शोधावं आणि तसा इलाज करावा. नाहीतर हा पठ्ठा वाया जाईल आणि नुसता दोष माझ्यावर येईल.”

सानू विचारत राणे पॅलेसमध्ये जावून पोहचली होती.

--

सानू आली तर मोहिते निवासात होती पण महिन्याभरात पार बदलून गेली होती. तिला श्रीकांतच वेड लागलं होतं. त्याला न कळू देता त्याचा इलाज करायचा होता आणि मग सोबत घेवून जायचं होतं. तशी तिने प्रोसेस सुरू केली होती.

राणीच एवढ्यात मोहिते निवासात येणं झालं नव्हतं, मग आज ती राणीला आणि राजनला भेटायला नेहमीच्या त्यांच्या ठिकाणी गेली, ती पोहचली आणि राणीने तिला मिठी मारली,

“तायडे घरी यायचं ना ग, आई, बाबा विचारत होते, बाबांना भारी कौतुक असतं तुझं.”

“अग येईल ना, ह्या वेळी जरा घाईत आहे. काकांना सांग पुढल्या वेळी एखाद्या विषयावर मस्त गप्पा करू म्हणून. विषय शोधा म्हणावं, पुढल्या वेळी सुमंत असणार सोबत मग येते निवांत.”

आणि ती राजनला बोलली, “काय राजन आठवते का आपली पहिली भेट राणी सोबत इथेच झाली होती ना ?”

“हो ना ताई, नंतर आम्ही ही जागा माझ्या भेटीची निशाणी म्हणून कायम जपली, आता तर हा कॉफी शॉपवाला मला आणि राणीला चांगलाच ओळखतो.”

“मग सर्व उत्तम ना?”

“हो तुमच्या कृपने.”

“माझी कसली कृपा हो, तुमची मेहनत आहे, आणि तुमच्या राणीची साथ, खरच खूप शिकण्या सारखं आहे तुमच्याकडून, सुमंत नेहमी म्हणतो, राजन राव खूप समजून घेणारे आहेत.”

राजनसोबत गप्पा सानूच्या रंगल्या होत्या, राणीला तिच्या आणि राजनची नात्यावर अजूनच प्रेम आलं होतं, तिला असं विचारात बघून राजनने तिला डोळा मारला, आणि सानूने ते बघितलं,

“अहो, आपणच बोलत बसलो, माझी बहिणा बाई बोर झाली हो.”

“राणी कसं सुरू आहे ग तुझं कॉलेज,  तो राहिलेला विषय कढायचा आहे ना?”

“हो ताई, नाही तर पुढल्या वेळी रागिणी दी इकडे राहायच्या नाही मला शिकवायला.”

“का ग, कुठे जात आहे ती?”

“अग दी लग्न करत आहे.”

आता राजन बोलला, “हो ताई, रागिणीच लग्न करायचा विचार आहे, रवींद्रची पोस्टिंग झाली आहे राजकोटला आणि आपल्या रागिणीने पण फाईनल परीक्षा पूर्ण केली आहे. रवींद्रचे काही कांटेक्ट आहेत तो तिची पोस्टिंग करवून घेईल त्याच्या जवळपास, आणि नाहीच जमलं तर रागिणी क्लाससेस सुरू करणार आहे.”

“अरे व्हा, खूपच गोड बातमी दिली तुम्ही, मी करते रागिणीला कॉल.”

“हो नक्की करा, तिला आवडेल तुमच्याशी बोलायला, ती अमेरिकेला हनिमूनसाठी प्लॅन करत आहे. म्हणजे रवींद्रच काहीतरी आहे मग ते तसा प्लॅन करणार आहेत सोबत.”

“उत्तम, बोलते मी तिच्याशी, तिकडेच बोलवते त्यांना घरी.”

“राणी मी निघते ग... मला उद्या निघायचं आहे. काम खोळंबली आहेत माझी तिकडे, आताच नवीन प्रजेक्ट सुरू झालाय. सुमंतने रशियाचा प्रोजेक्ट घेतला आहे, मग मीच सर्व आताचे प्रोजेक्ट बघत आहे. तू बाबांची काळजी घे ग.”

“ताई मी तर आहे ग इकडे, पण तू बाबांची लाडाची ना, त्यांना कठीण जातं ग.”

“हो ग पण ते येतील का माझ्या सोबत, बोलते मी त्यांना.”

“ते नाही यायचे ग, पण होईल सवय आता, मी आणि राजन दर रविवारी जातोय तिकडे.”

सानू राजनला हात जोडत म्हणाली, “राजन राव हीच मदत हवी आहे, प्लीज जरा वेळ असला की मोहिते निवासात चक्कर टाका. मी तशी येणार लवकर मला श्रीकांतला सोबत न्यायच आहे. पण तिकडे काही खूप महत्त्वाची काम आहेत ते संपले की मग मी आणि  सुमंत येतोय सहा महिन्यासाठी, इकडे राहावं लागेल तेव्हा कुठे श्रीकांतची पूर्ण प्रोसेस होईल.”

“ताई ही मात्र खूप सुंदर कार्य आहे.”

“कार्य नाही राजन राव, मला खरच आवडेल त्याची आई व्हायला.”

राजन जरा गप्प झाला आणि वॉशरूम साठी निघून गेला, राणी सानूला म्हणाली,

“तायडे पण हे काय नवीन खूळ ग, तुझं बाळ होवू दे ना हवं असेल तर, तो मुलगा कोण कुठला, कुठल्या रक्ताचा, हवे तेवढे पैसे दे त्याच्या इलाजासाठी पण गळ्यात कशाला घालून घेतेस. आईला अजिबात आवडलं नाही, आणि माझ्या सासूला समजलं ना तर तुला काय काय बोलून ती मोकळी होणार, कशाला लोकांची बोलणी अंगावर घेतेस. तुझ्या कडे पैसा आहे देवून टाक ना, तेवढीच समाज सेवा.”

“राणी आज बोललीस पर ऐकणार नाही मी, माझं होईल तेव्हा होईल ग, पण काय हरकत आहे, एखाद्या अनाथची मी आई व्हायला. मी आणि सुमंत बघून घेवू. त्याला आणि मला काहीच हरकत नाही, मग त्याची हरकत कुणाला कशाला हवी.”

“तसं नाही ग, उगाच चर्चा नको ना चार लोकात. लोकं काय कधी चांगला भाव बघणार नाही, तुझ्यात खोड काढून मोकळे होतील.”

“अग बाई अजून तुझे ते चार लोक जीवंत आहेत का. त्यांना आधी मसनात नेऊन टाक, मला त्यांचं काहीही करायचं नाही. चार दिवस बोलतील नंतर काय.”

“ताई तू खूप वेगळी आहेस ग.”

“नाही मी वेगळी नाही, जरा वेगळा विचार करते म्हणून चार चौघात वेगळी पडते. मला समजायला वेड हवंय आणि ते सुमंतमध्ये आहे मग मला कुणाची पर्वा नाही.”

“मग, तुझा आणि जिजूचा निर्णय, आम्ही काय बोलणार, पण सगळं जपून आजकाल दत्तक प्रोसेसमध्ये खूप बघितल्या जाते. आणि तू राहतेस तिकडे.”

“हो म्हणूनच काळजी आहे. आधी श्रीकांतचा इलाज मग आम्ही येतोय इकडे सहा महिन्या साठी वगैरे. पण तू बाबांची काळजी घे ग. आता बाळू पण नाही इकडे. आणि ते त्यांच्या कडे जाणार नाहीतच. गेले तरी परत येतील.”

तेवढ्यात राजन आला,

“मग झालं का बोलून दोघींचं?”

“अहो हो राजन राव, काळजी घ्या हो माझ्या बहिणीची.”

“काय! मी घेत नाही म्हणाली का ही?”

“नाही हो, तुम्ही आहात म्हणून आम्ही बिनधास्त आहोत. तुमच्या सारखा पदोपदी साथ देणारा आहे म्हणून आम्ही चिंता मुक्त आहोत राणीसाठी. चला खूप वेळ घेतला मी आपला, बऱ्याच दिवसांनी आपण इथे भेटलो, मस्त वाटलं. आठवणी जाग्या झाल्या आणि नवीन साठवणीत पडल्या.”

सानूने राणीसाठी सोबत आणलेलं गिफ्ट दीलं आणि ती निघाली. आज राणी आणि राजनला सानू वेगळीच भासली होती. दोघांनाही जाणवलं होतं, पण तो बदल सहाजिक होता.

तिच्यात वेड होतं सुमंतचे, नशा होती त्याच्या प्रेमाची आणि आत्मविश्वास होता स्वतःवर, तिचं जग बदलण्याची खुमारी होती. जोडीदाराची साथ कशी कायम असावी ह्यासाठी तिची धडपड सुरु झाली होती. कारण हे नातं दोन्ही कडून सारखंच असतं. हो ना?


कथेचा पुढचा भाग लवकरच.---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक पहिल्या कॉमेंटला आहे. https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल/in.pinterest.

Post a Comment

0 Comments