जोडीदार.... प्रवास तुझा माझा... भाग २५

 जोडीदार.... प्रवास तुझा माझा... भाग २५





आज निवांत होता अरुण आणि आरतीला, घरात दोघेच होते. सकाळी दोघांनी मिळून बाग साफ केली, थकले आणि झोपले होते. तेवढ्यात बेल वाजली, आई कनहत बोलली,

“कोण आलंय हो, छकु तर नाहीच, अजून वेळ आहे तिच्या शाळेला. मग आता कोण आलंय.”

बाबांनी चष्मा डोळ्यावर लावला आणि ते बोलत निघाले,

“बघायला नको, आता बेल वाजली म्हणजे कुणीतरी असणार ना!”

बाबाने दार उघडलं, दारात अंजू आणि आदर्श उभे होते,

“अग अंजू ये ना, लवकर आलीस आज, आणि छकुला नाही घेतलंस काय शाळेतून.

ये रे आदर्श कसं काय येणं केलंस बाबा...”

“दादा मी आणि आदर्श तुम्हा दोघांशी बोलायला आलोय.अंजू घरात शिरल्या शिरल्या बोलली.

आरती हॉलमध्ये आली होती. दोघेही सोफ्यावर बसले, अंजूने आदर्शलाही बसायला सांगितलं. आणि म्हणाली,

“दादा मी आणि आदर्शने सोबत रहाण्याचा निर्णय घेतला आहे.”

“बाबा, लग्न करताय का दोघं?

दोघेही सोबत बोलले, “हो!”

आई, “अरे व्हा!”

बाबा, “बरं, कधी करायचं आहे.”

“दादा, आम्ही कोर्टात अर्ज दिला आहे.”

“बरं. मग छकु?”

“छकु आमच्यासोबत असेल”, आदर्श म्हणाला.

बाबा, “तुझ्या घरी कोण कोण आहे?”

अंजु मध्येच म्हणाली, “दादा तो अनाथ आहे, बोलले होते मी मागे आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय दोन वर्षा आधी.

“हा, अरे हो, विसरलो होतो मी. फारच वाईट झालं ते. बरं, पण अंजु तुझा निर्णय पक्का आहे ना?

“पक्का नव्हता दादा, आम्ही सोबत रहाण्याचा निर्णय घेतला होता, लग्न न करता पण मग छकु सोबत असणार माझ्या...”

“बरोबर...”

“आणि तिलाही लडा लागला आहे आदर्शचा.”

“अग पण अमितची अनुमती लागले का मग, ती त्याची मुलगी आहे. आता तुझं आणि तिचं रक्ताच नाही पण प्रेमाच नातं आहे.” बाबा चिंतेत म्हणाले.

“हो तोच विचार सूर होता आमच्या दोघांचा. आम्ही छकुला त्याच्याकडून दत्तक घ्यायचं ठरवलं आहे.”

“आणि तो सहजासहजी देईल तुला?’

“देणार नाही, पण मी आणि आदर्श करू प्रयत्न. त्याला काही रक्कम देवून गप्प करता येईल ना.”

“अंजू तो कसा आहे माहित आहे तुला. तो मग नेहमी तुम्हा दोघांना त्रास देणार ग. तुम्ही दोघं लग्न करताय ही खूपच आनंदाची गोष्ट आहे पण छकु...”

“छकु माझी मुलगी आहे. मी नाही सोडणार तिला.”

आदर्श तिच्या जवळ आला, “अंजू, आपण तिच्यासाठी हे सगळं करतोय ना, अमित काहीच करू शकणार नाही. मी बघतो सर्व.”

बाबा, “ठीक आहे मी कैलासशी सुद्धा बोलतो, मार्ग निघेल. कधी आहे मग कोर्टात लग्न.”

“दादा, ह्या शुक्रवारी.”

“बरं, मी, भीमा आणि सुनीला बोलावून घेतो. आम्ही सगळे येवूच आणि मग तुम्ही सगळे इकडेच या ना राहायला. आम्हालापण जरा छकुमुळे करमते ग.”

“दादा नाही हो, बुटीकमध्ये दोन खोल्या जास्त बांधल्या आहेत ना, आम्ही विचार केलाय तिकडेच राहायचं, आदर्श बुटीकच काम ऑनलाइन बघेल आणि मी बुटीकमध्ये असेल. दोघं मिळून करू सारं. दोन टेलरपण आम्ही ठेवले आहे. आदर्शने आमचा स्वत:चा ब्रॅंड काढण्याचा प्लॅन केला आहे. त्याची तयारी सुरू आहे  माझी आणि त्याची. आपल्या सलवार आणि कुरतीला जरा महाराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न आहे आमचा.”

“असं असं, आता मला काही कळणार नाही पण अनुला समजलं असतं ह्यातलं.”

“अनुशी बोलले मी, तिनेच सांगितलं असं काही नवीन करायला. बाळू काही रक्कम देणार होता पण मी नाही म्हणाले. आदर्शकडे त्याच्या आधीच्या कामाचे पैसे आहेत. माझे आणि त्याचे मिळून पाच लाख होतात.”

“बरच केलंस ग, काही लागलं तर सांग. माझ्याकडून काही हवे आहेत का?”

“नाही रे दादा, तू आधीच गावाच्या जमीनेचे ६०%पेक्षा जास्त रक्कम मलाच दिली आहेस आणि त्यातले आहेत काही माझ्याकडे.”

“बरं, मग काही अजून, आम्हीपण येवू ना मदतीला. आता घरीच तर असतो आम्ही. काही छोट मोठं असेल तर करू आम्ही.“

“दादा नक्कीच सांगेन पण आधी हे सगळं छकुच प्रकरण हातळायच आहे. तुम्ही बोला ना कैलास सोबत.”

“हो हो मी बोलतो, तू काळजी करू नकोस, पण अंजु तुला असं तुझ्यासाठी विचार करतांना बघून खूपच आनंद झाला ग.”

“ह्याच सर्व श्रेय जातं ते अनु आणि अंकितला...”

“हुमम, माझी कमी त्याने पूर्ण केली.”

“नाही रे दादा, माझीच चूक झाली मागे, पण आज मी आदर्शला तुमच्या समोर उभं केलंय, हवी तेवढी चौकशी करा.”

“चौकशी कसली अंजु, त्याच्या डोळ्यात तुझ्या साठी भावना वाचू शकतो मी... आणि त्यापेक्षाही त्यातच काहीतरी करण्याची जिद्द दिसते, एवढे पुरेसे आहे मला आणि आरतीला. आता काहीही वाईट होणार नाही. चला जोडीने आई बाबांचा आशीर्वाद घ्या.”

अंजु आणि आदर्शने अंजुच्या आई बाबांच्या फोटोसमोर जावून आशीर्वाद घेतला, अंजुचे डोळे पाणावले होते, म्हणाली, “आई बाबा, मागच्या वेळी आशीर्वाद राहिले होते ग, आज द्या, मी नवीन सुरुवात करत आहे.”

आरतीने, खडी साखर आणली आणि सर्वांना दिली. आदर्श छकुला शाळेतून आणायला निघून गेला. अंजु आणि आरतीने सोबत मिळून आज स्वयंपाक केला. भीमा आणि सुनीता संध्याकाळ पर्यंत आले. आज परत मोहिते निवासात लग्नाची चर्चा होती.

अंजु आत्या परत लग्न करते आहे ही वार्ता सगळ्यापर्यंत पोहचली होती. सारेच खूप आनंदी होते आत्यासाठी. सगळीकडून आशीर्वाद आणि अभिनंदन होत होतं तिचं आणि आदर्शच.

--

भराभर दिवस जात होती. सानू सुमंतच नातं बहरत होतं आणि त्याचा सुवास सगळ्या राणे पॅलेसमध्ये पसरत होता. सानू फारसं कुणाला बोलत नसायची. तिला सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कलाने वळवत अलगद वळवायचे होते. तसा ह्या सगळ्यात तिला सुमंत जास्त चुकीचा वाटत होता. त्याचं वाजवीपेक्षा जास्त घरच्या लोकांना सूट देणे सानूला खटकत असायचे. त्यात तिचा बऱ्यापैकी घरच्या मंडळीचा अभ्यास झाला होता.

तिची भारतात येण्याची तयारी सुरू होती आणि आज ती मा सोबत त्यांच्या खोलीत होती,

“मा, तुम्हाला नाही वाटत की घरात जे सुरू आहे ते सुमंतच्या अश्या वागणुकीचा परिणाम आहे. त्याने वेळेत सर्वांना फटकायला हवे होते. त्यांना समजून घेवून हवं नको बघायला हवे होते, नुसते कार्ड आणि पैसा दिल्याने समस्या सूटत नसते, ती कधी कधी अंगावर येते.”

“हो, बरोबर बोललीस तू. पण वेळ नव्हता, बिजनेसचा पसारा वाढत गेला, तो वेळेची वाट बघत राहीला आणि मग वेळ त्याच्या हातातून निघून गेली.”

“आणि त्याने मलाही आल्या आल्या पार्टनर म्हणून जाहीर केलं, त्याने घरची लोकं दुखावली असं वाटत नाही तुम्हाला.”

“हो ग, पण ते गरजेच होतं असं मला वाटते. मीपण जोर दिला ना त्या गोष्टीला.”

“हो पण आता सारं अवघड होवून बसलं आहे ना.”

मासाहेब शांत झाल्या. काहीच बोलल्या नाही, तर सानू परत म्हणाली,

“मा मला हे बदलायचं आहे हो.”

आता परत त्यांच्या डोळ्यात चकाकी आली, स्मित हसत त्या म्हणल्या,

“माझी पूर्ण साथ आहे तुला.”

“मग आधी सुमंत टार्गेट आहे माझा. त्याला सगळं पट‍वून द्यावं लागेल. चूक झाली आहे त्याची. त्याला वाटत गेलं मी करतोय काम मग माझ्या बहीण भावांना काही त्रास नको आणि तो त्यांना देत गेला.... देता देता त्याने त्याचं स्वतंत्र हिरावून घेतलं. आणि आता ते त्याच्या सहवासात स्वत:ला स्वतंत्र समजतात पण नाहीत..”

“नाही ग असं नाही.”

“स्वतंत्र म्हणजे विचार करण्याच, काही करण्याच. त्यांची बुद्धी मठ्ठ झाली आहे. ते विलासात जगतात काहीच विचार करत नाहीत. आणि मला तर आता वाटते माझ्या आल्याने ते अजूनच बेफिकर झाले आहेत.

“म्हणजे ग?”

“आता बघा सुमंत एकटा होता तर कंपनी सुरू होती. त्याच्या मागे पुढेही ती माझ्यामुळे सुरू राहणार... मग ह्यांना काही करण्याची गरज काय!”

“हुम्म.... तुझं बोलणं बरोबर आहे, हेच लक्षात आलेलं दिसते सर्वांच्या. मग कसं करायचं ग?”

“ते मी बघते, आधी मला तुमच्या त्या रयीस मुलाला वठणीवर आणायचे आहे. बघा तुम्ही आता, मी तर सहा महिने तिकडे असणार त्याला घेवून पण इथे मात्र वाट लावणार मी सर्वांची. बस थोडा तुम्हाला त्रास होईल कदाचित... पण तुम्ही लक्ष द्यायचे नाही. मी मारियाशी बोलून घेणार सर्व. आता मला पंधरा दिवस राहिलीत निघण्यासाठी आणि त्याचं प्लानिंग उद्यापासून सुरू होणार आहे....”

“मी काय म्हणते, मी पण येते ना ग, तसंही मला इकडे काही करमत नाही, तू आणि सुमंत होते म्हणून जरा घरासारखे वाटते. तुम्ही दोघं तिकडे म्हटल्यावर तर मला इथे ह्या भिंती खायला उठणार ग...”

“हुम्म... बघूया कसं होते ते, पण सोबत नका येवू, मी बोलवून घेते तुम्हाला.”

“हुमम, तेही चालेल.

“आणि मा, आम्ही श्रीकांतला दत्तक घेतोय हे माहित आहे ना तुम्हाला.

“हो पण एवढ्या लवकर हा निर्णय कशाला ग...”

“मा, त्याला आता गरज आहे.”

“तोच हवा हा हट्ट कशाला ग सानू, आणि काही वर्ष गेले की तुला होईलच ना ग. म्हणजे हरकत नाही पण तुझी घाई होत आहे असचं मी म्हणेल.

“काही निर्णय घाईत घ्यायचे असतात. माझं आणि सुमंत पक्कं ठरलं आहे.”

“घ्या, मग आता मी काय बोलणार, सत्ता तुमची सगळं राजपाट तुमचं दोघांच.... मी बोलून वाईट कशाला?

“मा, तस नाही, पण हरकत काय आहे.... आपल्याकडे एवढा पैसा आहे, त्याने श्रीकांतचा इलाज आपण करू शकतो. आणि त्यानंतर त्याची काळजी सुद्धा मी घेवू शकते. आणि तो अगदीच बरा झाला कि त्याचं तो करेल ना, मी आणि सुमंत त्याला आईवडील म्हणून साथ देवू. माझा आणि सुमंतचा निर्णय पक्का आहे. आम्ही दोघं तयार आहोत...”

“हुम्म्म.... बघ तुला आणि सुमंतला काय करायचं ते करा. पण मला तरी ही घाई वाटते.”

“मा, ठीक आहे.... तुम्ही तुमची बाजू मंडली. वेळ तुमचा विचार बदलेल हीच अपेक्षा. माझं बोलून झालंय. मला मिटिंग आहे एक. येते मी.”

ती दारा जवळ गेली आणि परत आली,

“मा उद्यापासून मी स्वत:ला बदलत आहे. कारण हा बदल हवा आहे इथे, तेव्हांच ह्या घरात बदलीचे वारे वाहतील, तेव्हा काही चूक झालीच तर माफ करा. मला मिळालेल्या हक्काचा आतापर्यंत मी कुणावरही वापर केला नाही. पण मला बॉसची भूमिका उत्तम निभावता येते हे विसरू नका. ह्या घराची कायद्याने मी बॉस आहे, तेव्हा... ”

मासाहेबांनी दीर्घ श्वास घेतला. त्यांच्यासाठी आता काहीही वाटण्यासारखं राहिले नव्हते. नुसतं स्मित हास्य देत तिने हाताने तिला होकार दिला. सानू तिच्या खोलीकडे निघाली. तिने मारियाला खोलीत बोलावून घेतलं.

कथेचा पुढचा भाग लवकरच.

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments