जोडीदार... प्रवास
तुझा माझा.... भाग
२७
बाबांना दिवसभर बोर
होत असायचे, आपल्याच कोषात शिरायचे, तास तास मुलांचे फोटो आणि वस्तु बघत बसायचे.
आई घरातल्या कामात स्वत:ला व्यस्त करून घेत असायची. आता सानू इकडे सहा महिन्यासाठी
येणार म्हणून तिची तयारी सुरू झाली होती. तर तिला बाबा हळूच म्हणाले,
“आरती ती इकडे नाही
ना राहणार ग, त्यांचा बंगला साफ करायला दिला आहे तिने. तू नको काळजी करूस. आपण
दोघेच असणार इकडे. सानू आता बायको आहे सुमंतची, राणे कंपनीची मालकीण आहे, तिला
इकडे नाही करमायचे.”
“अहो असं का बोलता!”
“अग स्वत:ला तयार
करतोय मी, उगाच आपण आस लावून राहायचे आणि ती तिकडे बंगल्यात उतरायची.... सुमंत
येतोय सोबत. “
“हुम्म्म्म, हे
नाही आलं माझ्या लक्षात...”
“लक्षात ठेव आता,
सानूवर पहिला अधिकार तिच्या जोडीदाराचा आहे.“
“हो हो, आपली
लुडबुड बरी दिसणार नाही, तसे सुमंत राव स्वभावाने समजून घेणारे आहेत.”
“हो पण नकोच, ती
आणि ते स्वत :हून इकडे आले तर आनंद आहे, पण आलेच नाही तर आपण हट्ट करायचा नाही
तिच्याकडे.”
“नाही हो...”
“माझं बस सांगणं ग,
आपण अनुला बोलू शकतो, म्हणजे तिलाही बोलू शकत नाही पण तरीही सुनेच्या नात्याने
बोलू शकतो.”
“अहो मी तर आजवर
तिलाही कधी आवाज चढवून बोलली नाही.”
“हुमम, पण
सुरुवातीला झालाच ना तिला त्रास.”
“तो काय! माझी
मनधरणी सुरू होती मनात, नाहीतर मुलाच्या पसंतीला नकार देण्याची हिंमत तर नव्हतीच
माझ्यात.
“बरं... एकतोय बरं
मी तुझं हे, मला तर ती आधीच पसंत होती आणि आता तर माझ्या अंकितच्या बरोबरीने उभी
आहे. उत्तम सून आणि बायको आहे ती.”
“अहो, तुमची उत्तम
सून येणार आहे ना होळीला, येतो म्हणाली होती ती.”
“मग येईल ना, आपला
मुलगा येणार नाही आहे, ती येणार आहे.”
“हुम्म्म, आपल्या
एवढ्या लाडात वाढलेल्या मुली आपलं घर सोडून परक्याच्या घरी जातात आणि आपला जीव
टांगणीला लावून ठेवतात. मुलींमध्ये जीव अटकून राहतो हो. त्यांना लाहाणाचे मोठे करा,
शिकवा, हवं नको बघा, लाड पुरवा आणि एक दिवस त्या त्यांच्या राजकुमारांसोबत
आपल्याला सोडून आनंदात निघून जातात आणि आपण त्यात आपला आनंद मानण्यात आनंद समजतो. मला
तर आता कुठलीही मुलगी दिसली कि आपल्या सानू राणीची आठवण येते आणि मग मन नाराज होते
माझं...”
“का ग?”
“काय तर, काय ह्या
मुली आई वडीलांना सोडून जातात ना हो, जीव कासावीस होतो बघा मुलींना बघून आता, आता
त्या रमेशच्या मुलीचं लग्न आहे. तिच्या आई किती आनंदी आहे, मला तिचा आनंद बघून
वाटलं, काही नाही जरा वेळ, मग मुली परतून हा उंबरठा ओलांडत नाही आणि आपण त्यातच
आनंदी असतो.”
“हुम्म्म, आज हळवी
झालीस काय ग, मी असचं बोललो, सानू येईल ना ग.”
“नाही हो, आता
वाटते कधी कधी, म्हणूनच लोकं मुली जन्माला घालत नसतील ना, लडा लावा लाडोला आणि मग...”
आरती रडायला लागली होती.
“अग रडूबाई, तू तर
एकदम जन्मावर आलीस ग.”
“नाहीतर काय हो....
स्त्रीचा जन्म ना नाही कळायचा तुम्हाला... त्यासाठी...”
“त्यासाठी
स्त्रीम्हणून जन्म घ्यावा लागेल, हेच ना?”
“जावू द्या...”
“अग पण आजकाल मुलही
जातात ना आई वडीलांना सोडून, आता आपला अंकित नाही का गेला?”
“हो आता त्याच
गोष्टीने समजूत घालते ना मनाला... मुलं मोठी झाली की त्यांना त्यांची स्वप्न असतात
आणि आपण राहतो विचार करत, कारण आयुष्यभर त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून आपण
आपली स्वप्न स्वाहा केली असतात.
असतात हो अपेक्षा पण बोलून
पण आपण पालकत्वाचा अपमान करणार ना, मग गोची होती पालकांची. मुलांनी समजून घेतलं तर
बोनस आणि नाही घेतलं तर तेही गोड म्हणून घेण्यात धन्यता मिळवली तर नाती गोड हो,
शेवटी काय तर नात्यात अॅडजस्टमेंट आलीच.”
“हळवी झालीस ग तू
आज. काय बिनसलं तुझं? मी तर काही नाही बोललो ग, नको असं बोलू, मी सहज बोललो ग,
सानू येईल इकडे.”
“नाही हो...
जावूद्या.. “
“काय जावूद्या, मला
माहित आहे तू खूप अॅडजस्टमेंट केली माझ्या घरात, मोठ्या घरची होतीस, आणि मी सारं
काही कष्टाने तुझ्यासोबत मिळवलं. मेहनत मी केली पण पैसा पैसा जोडायला तुला किती
कष्ट पडली असतील माहित आहे मला.”
अरुण हरवला होता
जुन्या आठवणीत आणि हळूच म्हणाला,
“मुलं लहान होती
तेव्हा त्या निळ्या पैठणीत किती मन होतं तुझं, पण माझा पगार नव्हता ना तेवढा.”
“जावूद्या हो, आता
माझ्याकडे भरपूर पैठण्या आहेत.”
“हो ग, पण मी नाही
ना घेतली ती निळी पैठणी, अरे राहिलंच ग, पुढल्या महिन्यात लग्नाचा वाढदिवस आहे
आपल्या, मी घेतो तुला आता.”
“आणि मी आता
तुमच्यासाठी टोपरं विणायला घेते. किती वर्षाचा राहून गेलं. आता आपणच आपल्याला,
तुम्ही आणि मी...”
तेवढ्यात अरुणला
जोरात ठसका लागला, आरती पाणी आणायला धावली, अरुणने पाणी प्यायला, जरा वेळ शांतता
होती दोघात, आरती हळूच म्हणाली,
“तुम्हाला काही
झालं ना तर मी क्षणभर सुद्धा जगू शकणार नाही, किती वेळा सांगितलं, ती सुपारी खाण
बंद करा म्हणून...”.
अरुण परत जोरात
खोकलला, छातीला हात लावत चोळत राहिला, नंतर म्हणाला,
“मी कुठे राहू शकतो
तुझ्याशिवाय.”
आरती अरुणच्या जवळ
येवून उभी राहिली, अरुणने तिच्या कुशीत शिरला, म्हणाला,
“माझी जोडीदार
आहेस. तू आहेस म्हणून माझी हिंमत कायम आहे ग, आज तू हळवी झालेली बघून ना मी
कासावीस झालो. मला जिवंत ठेवायचं असेल ना तर मला तीच माझी खमकेबाज बायको पाहिजे.
म्हणजे मी माझा हळवेपणा जगजाहीर करायला मोकळा. काय हो राणीसरकार.”
“काय हो काहीही
तुमचं, कुठे मस्करी सुचते तुम्हाला... व्हा बाजूला.”
आरती बाजूला
व्हायला गेली पण अरुनची मिठी गच्च होती, सुटली नाही, तो तसाच बोलला,
“आरती समजलं ना
तुला, तू माझा आधार आहेस. माझी गरज आहेस. तू मी आहेस... कारण तू माझी मी तुझा, आता
ना कसली बाधा... जोडीदार तू माझा..”
आज परत आई बाबा,
एकमेकांचे झाले होते, मुलांच्या गोष्टी रमता रमता स्वत: त गुंतले होते. मुलांची
काळजी तेवढी सोबत होती आणि ते करू काय शकत होते, नुसत्या आठवणी आणि परत परत त्याच
आठवणींची साठवण त्यांना जोडीदारच्या अजूनच नजीक आणत होती.
--
राणे पॅलेस
सानू आज जरा लवकर
उठली आणि हॉलमध्ये आली, आज मारियाने कुणासाठीही काहीच बनवलं नव्हतं. ती सानूची वाट
बघत होती, सानू येताच तिने मुलांसाठी दूध आणि सेरियल तिला सांगितलं. मोठ्यांसाठी
ब्रेड सँडविच. आणि सक्त ताकीद दिली कुणाच्याही खोलीत नाश्ता पोहचणार नाही. इथे
हॉलमध्ये येवून सर्वा सोबत करावा लागेल.
सकाळी आठ वाजता घरचे सर्व डायनिंग हॉलमध्ये हवे होते तिला, कारण सुमंत आणि मुलं नव
वाजता घरून निघत होती.
आज डायनिग हॉलमध्ये
मुलं आणि सुमंत वेळेत होते. सांगितल्या प्रमाणे नाश्ता आता बनणार नव्हता. सुमंत
आणि मुलं निघून गेले. मारिया हॉल आवरत होती. सानू तिथेच बसली. काही वेळाने जया
आली,
“मारिया, दोन ग्लास
दूध, सहा बोईल अंडी माझ्या खोलीत घेवून ये.”
मारिया काहीच बोलली
नाही. जया निघून गेली. बराच वेळ झाला तरी मारिया आली नाही म्हणून जया परत आली आणि
ओरडायला लागली,
“ये मारिया आहेस
कुठे?”
तिला सानू दिसली पण
तिने सानूला काहीही विचारलं नाही, तरीही सानू तिला शांतपणे म्हणाली,
“मारिया नाही आहे,
ती आजपासून नव वाजेपासून तर बारा पर्यन्त तिच्या घरी जात जाणार, तिकडून ती भाजीच
आणि ग्रोसरी घेवून येणार.”
जया आवाज चढवत
म्हणाली,
“पण का, आणि
कुणाच्या सांगण्यावरून, मी तिला काही बोलले नाही. सारंगी दी...?”
“मी बोलले!!!”
सारंगीचा चढलेला
आवाज धीमा झाला,
“काय ताई, उगाच
काहीही काय. जावू द्या आज गेली तर गेली, मी करते.”
“ऐक, अजिबात करू
देणार नाही, मी सगळी सिस्टिम लॉक केली आहे. गॅस ऑन होणार नाही आणि किचन लॉक केलंय
मारियाने. आजपासून ज्यांना सकाळचा नाश्ता करायचा असेल त्यांना इथे डायनिंग हॉल
मध्ये सर्वांसोबत करावा लागेल.”
सानुचा कडक आवाजाने
ती जरा घाबरली आणि गोंधळली सुद्धा. आज बऱ्याच वर्षाने तिच्यावर कुणीतरी रागवलं
होतं.
“हो ताई...”
“बस!! मला सर्व
डायनिंग हॉलमध्ये हवेत. तीच एक भेट होते सकाळी.... तुला हरकत असेल तर नको येवू, पण
त्या नंतर नाश्ता मिळणार नाही...”
जयाला राग आला
होता, आवरला पण डोळे वर करत तिच्यासमोरून निघून गेली, तिच्या खोलीचं दार तिने
जोरात आपटलं, सारंग झोपेतून जागा झाला,
“अहो ये, झोपाळू,
ऑर्डर करा मला नाश्ता हवा आहे. ती काय सानवी राणे, राणी म्हणून ऑर्डर सोडणार, अरे
नाही घरात तर आम्ही बाहेरून मागवू ना. आता मी सारंगी दी ला बोलते. त्या आणतील तिला
वठणीवर.”
तिने इंटरकॉम
सारंगीच्या खोलीत लावला, आणि सारं काही बोलली. सारंगी खाली आली, आज बऱ्याच
दिवसांनी सारंगी आणि सानू समोरा समोर होत्या. सारंगीने किचनचं लॉक उघडण्यासाठी
पासवर्ड टाकला, पण किचन काही उघडली नाही, मग तिने सानूसमोर रेस्टॉरंटला फोन लावला,
आणि बाहेरून नाश्ता बोलावाला, सानू गुमान काम करत बसली होती.
काही वेळात बाहेरून
खाण्याचे आले, डिलिव्हरी बॉयने बिल दिलं, सारंगी सानूला म्हणाली,
“पे द बिल, नॉव.”
“सॉरी, आर यु
टॉकिंग टू मी?”
“यस, पे द बिल.”
“सॉरी, आय कॅन नॉट, इट्स यॉर डिलिव्हरी...”
“ये, लाव खात्यावर नाहीतर
दे बिल, जास्त बोलू नकोस.”
“मी कुठे बोलले, मी
सामान मागवलं नाही मी बिल पे करणार नाही. आणि आता खातं बितं सगळं बंद, कंपनी का
भरेल हे चार्जेस.”
काही वेळात स्टेविन
आला त्याने सारंगीला शांत केलं आणि बिल पे केलं. जया सारं काही तिच्या खोलीतून बघत
होती. सारंगीच्या खोलीतून मात्र बराच वेळ आवाज येत राहिला, तिचं बोलणं, रडणं, आरोप करणं संपत नव्हतं. बरंच
काही आज चार महिन्यानंतर सानूच्या कानावर येत गेलं. तीही मनात साठवून ठेवत गेली.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला
देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट
कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास
लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments