जोडीदार.. प्रवास तुझा
माझा…भाग २८
आठ दिवस निघून गेले
होते. आणि आज सर्व सकाळी आठ वाजता डायनिंग हॉलमध्ये हजर होते. सुमंत मुख्य ठिकाणी
होता अन मासाहेब त्याच्या सामोरासमोर. मारियाने ज्यांना जे हवंय ते वाढलं. जसिका
आणि मुलं खूप आनंदी होती, जसिका म्हणाली,
“मामी इट्स फील
लाइक फेस्टिवल टूडे, सो हॅप्पी. किती वर्षाने आपण सर्व सोबत बसले आहोत. म्हणजे मी
तर पहिल्यांदा बघते आहे ह्या पॅलेसमध्ये. निकोलस अंकल आणि अॅंटी, रोंनी अॅंटी ,
ग्रँडपा, ग्रँडमा आम्ही सगळे सोबत सकाळी ब्रेकफास्ट करायचो, मग रात्री सहसा जमत
नव्हतं. मामी यू आर टू ग्रेट ग... “
मासाहेब मनात आनंदी
झाल्या होत्या. सुमंतला आज सर्वासोबत बसायला मिळालं होतं. तसे सारंग, जया, सारंगी,
स्टेविन गप्प होते, तरीही सगळं वातावरण बोलकं झालं होतं. सुमंत मुलांना शाळेत
सोडून ऑफिससाठी निघणार होता. सानू उशिरा ऑफिसला निघणार होती.
पुढच्या काही
दिवसात सर्वांना हे क्षण आवडायला लागले होते. सकाळी बच्चे पार्टीसोबत मासाहेब
गप्पा करत बसून ग्रीन टी घेत असत. जया आणि सारंगीच काय ते टेबलवर ठरत असायचा.
सानूही त्यांच्या बोलण्यात हळूहळू शिरली. आता सकाळी सर्वांच्या आवडीचं सगळं
असायचं, पण अट एकचं होती सकाळी सर्वांनी सोबत नाश्ता करायचा, दुपारी ज्यांना जसं
वाटते तसं त्यांनी जेवण करावं, पण परत रात्री ज्यांना जमेल त्यांनी प्रयत्न करून
मुलांसोबत जेवायला बसावं.
जया आणि सारंगीला
पटलं होतं पण त्या बोलत नसत. सानूची भारतात निघण्याची गडबड सुरू झाली होती.
निघण्याआधी तिला इकडलं सगळं फ़िक्स करायचं होतं.
त्या रात्री ती आणि
सुमंत स्टडीरूम मध्ये बसले होते. सुमंत सारी बील्स बघत होता. सानू तीचं काम करत
होती, म्हणाली, “सुमंत आता तू सगळे सारंग
आणि सारंगीला दिलेले कार्डस बंद कर आणि त्यांच्या कार्डच पेमेंट करायचं नाही.”
“अग पण?”
“बघ तू आतापर्यंत
खूप सूट दिलीस, जरा आता सगळं बंद कर, तुला माझ्या वर विश्वास आहे ना?
“तो आहे ग, पण, बरं
दिसायचं नाही ते.”
“हे बघ जास्त ना
काळजी करू नकोस, तसंही तुझ्या अश्या पम्पेर केल्याने त्यांच्या भविष्याची वाट
लागली आहे. तुझं आपलं मस्त सुरू आहे आणि त्यांना का स्वत:वर ओढून घेतोस रे.”
“अ अ... “
सुमंत जरा विचारत
पडला आणि लॅपटॉप त्याने बाजूला केला. हातातली बील्स खाली ठेवली. कुठेतरी हरवला.
सानूने येवून
त्याला धक्का दिला आणि तो भानावर आला,
“समजलं ना? कुठे
शिरलास रे?”
“हो हो ग, चुकलं
माझं पण आता तू जे म्हणशील तसं, त्यांना पाठीशी घातल्याने त्यांनी कामाला पाठ
दाखवली ग आणि मीच परत गैरसमज केलाय.”
“हुमम, मग बंद कर
सगळे कार्ड, आताच!”
“हे घे सगळे झाले,
अजून काही, अग पण असं अचानक?”
“संकट अचानकच येते,
कळू देत की, त्याशिवाय हे सगळे मार्गी लागणार नाहीत.”
“हुम्म्म, ये पण
आपली नजर असेल ना ग.”
“अरे मग काय,
काहीही हाता बाहेर जाणार नाही. मी तिजोरी पण लॉक करते, म्हणजे कुणी प्रयत्न जरी
केला ना तरी सेक्युर्टी सिस्टम ऑन होईल आणि पोलिस पोहचण्याच्या भीतीने कुणी
प्रयत्न करणार नाही. बघूया कोण कसे मार्ग काढतो मग त्यांच्या खर्चासाठी, अति आपण
होवू देणार नाहीच ,पण ....”
“पण त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे... ओके आहे
मी.”
तेवढ्यात सानूची
नजर स्टडीरूम मध्ये पडलेल्या थिसेसवर पडली, तिने ते उचलले, पालटून बघितले, समजलं
होतं की ते सारंगचे आहेत. तरीही तिने प्रश्न केला,
“अरे सुमंत हे
कुणाचे आहेत रे? एक रिसर्च वाटतो हा, विषय छान आहे रे.”
“अग ठेव तिकडे,
सारंगचा रिसर्च आहे, नाकारल्या गेला आहे. टेस्ट
पूर्ण झाल्या नाहीत त्याच्या. सोडलं त्याने मधेच. काही होणार नाही त्याचं. बघ हात
खराब होतील तुझे.”
“अरे पण त्याचं
भविष्य खराब झालंय असं तुला वाटत नाही का?”
“अ.. आ.. हुमम... पण आपण काय करू शकतो ग, त्याने पुढे विचार
केलाच नाही ना.”
“हुमम, मग आता
करेल, हे मी रद्दी साठी काढून ठेवते बाहेर आणि मारियाला सांगून ठेवते.”
“अग पण... उगाच ती
वापरायची काही कामासाठी...”
“नाही वापरणार ती,
पण बाहेर ठेवते, आता तुझा तो रईस भाऊ इथे स्टुडिमध्ये येवून तर बघणार नाही, मग ही
रद्दी म्हणून ठेवले तर निदान त्याला काही वाटेल. उत्तम रिसर्च आहे हा...”
“म्हणजे तुझा
अभ्यास झालाय तर... “
“म्हणजे मी अशीच
बोलत नाही, माहीत आहे तुला.”
“कशी बोलतेस ग मग?”
“तुला माहीत आहे.”
सुमंतने परत त्याचं
काम सोडलं आणि स्टडीरूम आता रोमॅंटिक झाली होती. सुमंत सानूच्या अगदीच जवळ होता,
श्वासांची गर्मी वाढत होती आणि ओठ ओठांवर पडले. मंद वारा वाहत होता तरीही प्रेमाची
मंद मंद जोत जळत होती.
---
सानूने राणे पॅलेसमध्ये
तीचं जाळं पसरवलं होतं. पण घरच्यांना काही औरच वाटत होतं, सानू आणि सुमंत सहा
महिने इकडे नसणार होते. सगळी धुरा आता परत त्यांच्या हातात येणार होती असचं वाटत
होतं सर्वाना.
सानू आणि सुमंत
भारतात त्यांच्या बंगल्यावर उतरले होते. सानू तर पहिले काही दिवस माहिते निवासात
फिरकलीही नव्हती. श्रीकांतसाठी तिची धावपळ समजून घेणार फक्त सुमंत होता. म्हणूनच तिला फारसं कुणाला भेटायच नव्हतं. उगाच चांगल्या
विचाराला फाटे तिला नको होते. सारंकाही झालं कि भेटूया सर्वाना हेच ठरलं होतं तीचं.
आपल्या मातांना
समजून घेणारं सोबत कुणी असलं कि नवीन काही करण्याची खुमारी चढते, तसंच झालं होतं
सानूच. तिला साऱ्या नात्यांचा विसर पडला होता.
श्रीकांतचा इलाज
झाला होता आणि रीतसर त्याला दत्तक घेण्याची कारवाईही संपत आली होती. आश्रमाच्या
मदतीने तिने श्रीकांतला सर्व प्रोसेस पूर्ण होण्याआधीच राणे बंगल्यात आणलं होतं.
त्याची काळजी घेण्यात तिने काहीच कमी ठेवली नव्हती. महिना झाला होता पण सानू अजून
कुणाला भेटली नव्हती... सगळे तिची वाट बघत होते. बाबा आणि आई राणे बंगल्यात तिला
भेटायला येवून गेले होते पण त्यांना त्यांची सानू सापडली नव्हती, भेटली ती सुमंतची
बायको आणि श्रीकांतची आई.
इकडे राणे
पॅलेसमध्ये गोंधळ होता. कुणाचेही कार्ड चालत नव्हते. कार्डचे पेमेंट थांबले होते. घरात
खाण्या पिण्याच सामान तेवढं मारिया आणत असायची. जयाच सर्व शॉपिंग बंद झालं होतं,
तिच्या मुलांची शाळेची फिस सुद्धा भरल्या गेली नव्हती. कसं बसं तिने तिच्याकडे जमा
असलेल्या रक्कमेतून मुलांची फिस भरली.
सारंगी मात्र आता
आनंदी राहायला लागली होती. स्टेविन आणि तिचे संबंध सुधारत होते. स्टेविनने
त्याच्या भावासोबत काम सुरू केलं होतं. निकोलसने सानूच्या सांगण्या नुसार सर्व
केलं होतं. निकोलसने त्याच्या घरच्यांची समजूत काढली होती आणि सारंगी आता परत
तिकडे सासरी जात असायची. आणि ते सारं सानूला इकडे भारतात समजत असायचं.
मारिया
नेहमीप्रमाणे किचन लॉक करून सामान आणण्यासाठी गेलेली. जया घरात होती. आणि तिची
तळमळ पराकोटीला होती. तिला काहीही करून पैसे हवे होते. घरात शोध कार्य सुरू होतं
तर तिची नजर समोर ठेवलेल्या रद्दीच्या कागदांवर पडली, ती तिकडे आली, तर समजलं कि
ते सारंगचे थिसेस आहेत. तिने रागात ते सर्व उचलले आणि खोलीत जावून सारंगच्या
अंगावर फेकले,
“सारंग ह्याला
फेकून देवू का मी? की विकू, काही पैसे तर येतील. अरे कुठे होतास तू, मी ह्या
सारंगवर प्रेम केलं नाही. तू माझा तो सारंग नाहीस, मला नाही राहायचं असं, तू काही
करत नाहीस ना म्हणून माझी ही अवस्था केली आहे त्या सानवी राणेने, काय समजते काय ती
स्वत:ला, माझा भाऊ आहे इथे, जाईल ना मी त्याच्याकडे. आणि तू म्हणत होतास मी इथली
राणी आहे, दादा काही लग्न करणार नाही,आता
त्याने लग्नही केलं आणि वरचढ राणी ही घेवून आलाय इथे, तू बसं नुसत्या झोपा
काढ आणि पित बस वेळ मिळाला की, आता राहायला आणि खायला मिळते काही दिवसांनी ती राणी
आली की आपलं सामान फेकेल, मला नाही राहायचं आहे.”
सारंग झोपेतून जागा
झाला, जया रडून रडून बोलत राहिली आणि सारंग ते सारे कागद उचलत राहिला, सारं काही
धुंदलं झालं होतं त्याच्यासमोर, आपण आयुष्य वेचत आहोत हाच आभास त्याला होत होता,
तेही कुणाचं तरी फेकलेलं. त्यात जायचे शब्द त्याला मनातून कातरत होते. मेंदूवर पडलेल्या
धुळीच आवरण मनाला लागलेल्या शब्दांनी पुसल्या गेलं होतं. नकळत अश्रु गळायला लागले
होते. आणि सारंकाही स्वच्छ दिसायला लागलं होतं त्याला.
काही वेळात त्याची
मुलंही खोलीत आली आणि तिही सगळं उचलू लागली, सुमितने तर एका कागदाची होळी केली,
साशंकने प्लेन उडवलं.... तसा सारंग रागाने लाल झाला,
“अबे, थिसेस आहेत
माझे, कुणाला जमणार नाही असा रिसर्च आहे हा, एकदा का जगासमोर आला ना तर करोडोत
पैसा असेल आपल्याकडे... नाव असेल माझं ऑटोमोबाईलमध्ये.”
आणि त्याने रागात
साशंक आणि सुमित जवळची कागद ओढून घेतली, आणि जोरात ओरडला, खूप रडला, मुलं आणि जया
त्याला बघून घाबरली होती. मासाहेब त्यांच्या खोलीतून येवून सारंगच्या खोलीच्या
दारात उभ्या झाल्या होत्या. सारंगची कासावीस त्यांना बघवत नव्हती, पण सानूच्या
शब्दांनी त्यांना रोखलं होतं, काहीही न बोलता त्या निघून गेल्या, तोच सारंग परत
चिडला,
“तू ना फक्त दादाची
आई आहेस माझी नाहीस, बघ आता मी काय करतो ते. दादाने कंपनीतून मला बेदखल केलं ना
कारण त्याने ती स्वत: उभी केली आहे. पण ह्या बाबांच्या संपत्तीमध्ये माझा वाटा
आहे. तो हवाय मला.... मा मी काय बोलतो आहे. आज तू बोलली नाही ना तर मी काहीही
करेन..... मा.... मा...”
मासाहेब
रडत त्यांच्या खोलीत निघून गेल्या. सारंग
आणि जया खोलीत रडत राहिले, जया त्याला म्हणाली,
“अहो,
आपणच भरकटलो होतो, तुमच्या चार की पाच टेस्ट फेल झाल्या होत्या, त्यानंतर तुम्ही
परत प्रयत्न केला नाही... इथे चुकलो आपण, दादाही
म्हणाले होते काही वेळ ब्रेक घे, आणि मग सुमित झाला, आपणच विसरलो होतो,
दादाने काही कमी पडू दिलं नाही आजवर, पण इथे सत्ता पालटली आता, ती आली आहे, फायनान्स
तिला जबरदस्त जमातो,
दादाचा सगळा कारभार तिने हातात घेतला आहे. मी ऑफिसमध्ये गेले होते आपल्या मायकलला
भेटायला, तो बोलला आता ऑफिसमधून कुठलेच घरचे बिल मिळणार नाही, आणि चेक हवा असेल तर
रीतसर सानवी मॅडमची परमिशन हवी असणार. मी काय म्हणते माझ्याकडे काही रक्कम आहे,
आपण काम परत सुरू करूया ना, मला विश्वास आहे तुमच्यावर. एकदा आपली टेस्ट सकसेस
झाली की आपल्याला फायनान्सर कुणीही मिळेल, दादाच्या मदतीची गरज राहणार नाही. रडू नको
हो, आता राहायला आणि खायला आहेच ना, मग करूया ना आपण परत नवीन सुरुवात.”
सारंग
तयार झाला, सात वर्षा आधी त्याचा रिसर्च काही कारणामुळे अडकला होता, त्याच्या
चाचण्या फेल झाल्या होत्या, तो राणे पॅलेसच्या मागच्या आवारातल्या जुन्या बंगल्यात
गेला, कधी काळी त्याची लॅब असायची ती. आज
रागात त्याने ती साफ केली, जयाही भीत भीत
तिकडे आली आणि मदतीला लागली, सानुच्या सांगण्यावरून दुपारी मारियाही मदतीला आली.
सारंगने त्याचा रिसर्च परत सुरू केला होता. जयाही त्याच्यासोबत तिकडे तास तास बसून
त्याला आणि त्याच्या कामाला समजून घेण्यात मग्न झाली होती. दोघेही त्याचं सुटलेलं
आयुष्य परत जगत होते.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला
देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट
कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास
लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments