जोडीदार.... प्रवास तुझा माझा भाग ३२

 जोडीदार.... प्रवास तुझा माझा भाग ३२

आज परत सानूच विमान टेक ऑफ झालं होतं. तशी तिच्या विचारांनीही टेक ऑफ घेतलं होतं. मोहिते निवासात आज परत शांतता होती. वादळ येवून सारं काही त्याच्या सोबत घेवून गेल्याचा भास आई बाबांना होत होता. सदा काका तिकडे आला,

“अरुण, खाली खाली वाटत आहे ना रे आज. सानू श्री होते इकडे तेव्हा कसं मस्त वाटत होतं. आणि निदान इकडे नाही तर राणे बंगल्यात असले तरीही एक वेगळा आभास असायचा ना रे. मला आज करमत नाही आहे घरी. श्री आणि सानू माझ्या घरी येवून दोन दिवस राहले होते तर माझा आनंद गगनात मावला नव्हता. आता आठवणीत होतो, श्रीची बासरी राहिली माझ्याकडे,  श्री आणि माझा नातू जेमतेम सारख्या वयाचे, आठवण झाली, आलो इकडे.”

“बस रे, आता पिल्लं उडाली रे ह्या घरट्यातून. आता हे खाली घरटं आहे ह्यात आम्ही दोघे आहोत. पण मजेत आहोत.”

“अरे, भीमाचा मुलगा इकडे येतोय म्हणे काही महिन्यासाठी. त्याचा प्रोजेक्ट आहे म्हणे मुंबईत.“

“सूनबाई आणि मुलं पण येत आहेत का?

“हो हो, त्यांना सुट्या आहेत महिन्या भराच्या. मग सगळे येत आहेत.”

“व्हा व्हा! उत्तम, आपला भीमा आणि सुनीता जाम खुष असणार रे, म्हणून म्हंटल तो काही आला नाही एवढ्यात, मागे सानू आणि श्रीला भेटायला आले होते दोघे, दोन दिवस इकडेच होते, बसं त्यानंतर काही माहित नाही, आणि मी पण कॉल केला नाही रे, करतो त्याला कॉल.”

“अरे आता मुलगा इकडे नाही म्हणून कधी घर नीट केलं नाही भीमाने, आता काम काढलं आहे घराच, म्हणतो माझी नातंव आणि फॉरेनर सून कशी बसणार आपल्या गावठी संडासात.”

“अरे म्हणजे संडास बांधत आहे का भीमा, बांध म्हणा, नाहीतर इकडे येत असतो आणि बसतो वरच्या संडासात..”

घरात थोडं फार काम आहे आणि संडास असं काही सुरू आहे. मी जावून आलोय काल. त्यात आपल्या सुनिताला तर तू ओळखतो. सुनबाई जेनिफर येणार म्हणून तिची धावपळ बघण्यासारखी आहे रे... तिने तर अख्ख घर बदलायला काढलंय, आणि भीमा लागलाय सुनिताच्या इच्छा पूर्ण करण्यात

“हो हो,  आनंद आहे, कधी नव्हे ते सगळे येत आहे, ह्यांनी तर आशा सोडली होती. आता निदान महिना दोन महिनाभर तरी इथे येवून राहिले तरी भीमा आणि सुनी आनंदाने जगतील, दुसऱ्यांच किती करतात ते दोघं. आयुष्यभर पडक्या घारत राहिले, मुलाला शिकवलं, विदेशात पाठवलं, तो तिकडला झाला तरी शब्द काढला नाही तोंडातून मुलाबद्दल. देव बघतो रे, बघ त्याच्या घरी आनंद अवतरत आहे आता.”

“तेही म्हणा, पण आपला सुजितने पण खूप केलंय ना सुनबाईच्या आई वडिलांचं मग तिचंही मन झालाच बघ इकडे यायचं. ती तर मराठी शिकत आहे.

“धीर रे धीर... सुजितने ठेवला, आणि आज जेनिफर इकडे भारतात येत आहे. जोडीदाराने जोडीदाराला समजून घेतलं ना कि मग सारंकाही सहज होते बघ. तसा आपला सुजित आधीपासूनच समजूतदार आहे. नाही....”

“चल रे निघतो मी.”

“नाही थांब ना तीन पत्ती खेळुया, करायच तरी काय तुला घरी जावून. थांब आरतीला ही बोलवतो.”

आणि मग अरुणने आरतीला आवाज दिला. तीही आली तिघेही बसून तीन पत्ती खेळत होते.

आज परत वेळ ढकलण्यासाठी तीन पत्ती कामी आली होती. सदा आणि आरती जिंकत होते, अरुण पटकन म्हणाला,

“ये तुम्ही दोघेच जिंकत आहात, काय जीजू साली काय गेम खेळत आहात काय माझ्यासोबत.”

सदा, “अबे तुला खेळता येत नाही.”

“ह...ह... मला खेळता येत नाही, मी शिकवलं आरतीला, आणि तू बे तुला कुठे येत होता हा गेम, साल्या मी शिकवला आणि मलाच शिकवत आहेस तू.”

“मग, चेला गुरुजीसे आगे होता है, आता बोल.” आणि त्याने पत्ता फेकला.

अरुणने सारे पत्ते फेकले आणि म्हणाला, “घ्या, खेळा तुम्हीच.”

“ मी हरला अजून, मला नाही खेळायचं आहे आता. तू आणि ही आरती चीटिंग करत आहात.”

आरती, “अहो कसली चीटिंग, तुमचं लक्ष नाही आहे, सारखे हातातल्या घडीकडे बघत आहात.”

सदा, “अबे, ही तर डिजिटल वॉच दिसते.

आरती, “मग काय, राणी आणि राजनने दिली आहे ह्यांना. आणि तो त्याच्या सोबतचा सोन्याचा पट्टा सानू आणि सुमंतने घेतला आहे.”

“अब अब... भारी मजा सुरू आहे बाबा तुझी.”

“जिजू, ह्यांना आता सानूची चिंता आहे, ती तिकडे पोहचली असणार कि नाही म्हणून बघत आहेत घडीकडे.

सदा, “अरे करेल ना कॉल ती पोहचल्यावर.

“आरती चहा कर ग तुझ्या हातचा, मस्त झक्कास, मग मी निघतो.”

आरती चहा ठेवण्यासाठी निघाली, तर अरुण सदाला म्हणाला,

“कुठे जातोस रे, थांब ना इकडे, मी ती वरची खोली नीट करून देतो तुला. कशाला जातोस घरी, राहा आता इकडेच रे.”

“नाही रे अरुण, माझी ती असते ना घरी वाट बघत... गजरा घेवून जायचा आहे, रागवेल नाहीतर.”

अरुण आणि सदा बोलता बोलता शांत झाले. आरतीने चहा आणला, चहा घेत सदा म्हणाला,

“घर सोडवत नाही रे, नाही तर लेका कडे गेलो असतो ना, माझ्या संगीताने ह्याच घरात किती आठवणी ठेवल्या आहेत तिच्या. आता त्या आठवणी असतात माझ्या सोबत. मी असे पर्यंत तिथेच राहील मी. राग मानून घेवू नकोस. तू म्हणतोस तर आता रोज इकडे येत जाणार, बघ हा नाहीतर त्रासशील माझ्यामुळे मग.

“नाही रे दोस्ता, तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कधीच बंद नव्हते, ना राहणार...  आता ह्या उतरत्या वयात मित्र मैत्रिणी तेवढ्या कमी पडतात काय!

आरती चहाचा सिप गिळत म्हणाली, “मैत्रिणी, कुठली मैत्रीण आहे अजून, सुनिताला तर मी ओळखते.”

अरुण गुमान चहा पीत राहिला. सदा काही बोलला नाही. आरती मात्र अरुणकडे बराच वेळ बघत राहिली. नंतर तिला रहावलं नाही,

“काय हो कुठली मैत्रीण?

सदा, “ये आरती कशाला चिडतेस, आमची वर्ग मैत्रिण ग चारू... ती भेटली होती मागे मला आणि ह्याला इकडे आपल्या त्या गणपती मंदिरात.”

“ही कोण नवीन आता? आणि मला कसं माहित नाही, घ्या आपण म्हणतो आपण आपल्या जोडीदाराला ओळखतो, त्याच्या सर्व गुपित गोष्टी जाणून असतो पण बघा, ह्या माणसा सोबत पस्तीस वर्ष काढली पण ही चारू काही ऐकली नाही मी. अजून किती पत्ते उघडायचे आहेत काय माहीत.“

“जीजू आता सांगता तुम्ही कि…”

“अग अग, ती चारू तिच्या भावाच्या मुलाकडे आली होती. अचानक भेट झाली ग, बोलता बोलता ओळख निघाली आणि मग आम्ही तिचा नंबर घेतला. आता तिघांचा ग्रुप होता आमचा. मग ह्याला आठव, त्याला आठव करता करता बारा मित्र मैत्रिणी झालो, बोलत असतो आम्ही.

“अग बाई, म्हणून हल्ली फोन मध्ये असतात हे. तरीच म्हटलं आजकाल तीन पत्ती का खेळायचं म्हणतात नेहमी.”

“आरती बर बारीक लक्ष असते ग तुझं.

“मग काय, तो नवीन मोबाइल घेवून काय बाळूने फक्त ह्यांच्यासाठी दिलाय, मलाही हवा असतो ना यू ट्यूब बघायला. माझा आहे पण ह्यांचा नवीन ना आता. आणि हे सारखे घेवून असतात, जरा वाजला की बघत असतात, आता लक्षात आलं का बघतात आणि हसत असतात ते. ती काय बंगलोरला असते काय?

“अग हो, तिचा मोठा मुलगा असतो तिकडे. तिकडेच राहते ती त्याच्यासोबत. आता मागे लग्नाला आली होती भावाच्या मुलाकडे.”

“अच्छा, म्हणून तर....”

“काय ग?”

“जीजू, एवढे महिने झाले बाळू आणि अनु तिकडे आहेत, तो आणि ती सारखी म्हणते तिकडे या म्हणून पण आता हे मागच्या आठवड्यात बोळूला विचारात होते. मलाही म्हणाले आपण जाऊया, बाळू आणि सुनबाई बोलावते तर. “

“असं का, बघा बाबा, तुम्ही तुमचं काय ते, मी तर निघतो आता घरी.”

सदा निघाला होता तर अरुण त्याच्या मागे गेट पर्यंत आला,

“काय बे, आज काय माझी लावायची सोय करायची ठरवून आलास काय, नाहीतर येत पण नाहीस. आज अवतरला तू आणि लावली माझी वाट. जा आता सात नंतर तू इंग्रजी बोल मी काही येत नाही मग तुला सांभाळायला.”

“अबे ये, सांगायचं ना आरतीला. आणि मी काय रोज नाही बोलत इंग्रजी, ते आपलं कधी कधी होते.”

“ जा बे मोठा आला, आणि मला वेळच मिळाला नाही रे, सांगेल म्हटल... पण तीही जासुस निघाली.”

“ तुझीच बायको, जोडीला जोड ना.”

“तुला तर बघतो मी.

“आधी घरात जा, सांग तिला आता. माझं काम झालं. मी निघतो माझ्या संगीतासाठी गजरा घ्यायचा आहे.”

“हुम्म, तू आगेत परत तेल ओतून चालालस आता मी जळतो त्यात. तुला बघतो मी.”

सदा हसत निघून गेला, आणि अरुण गुमना येवून सोफ्यावर बसला. त्याला आरती काही बोलेल म्हणून उगाच भीती भरली होती. पण ओळखून होता तिला ती काही बोलणार नव्हती.

आरती स्वयंपाक खोलीत काम करत गप्पच होती. तिला सानू तिकडे पोहचली कि नाही, काय झालं असेल तिकडे. श्रीकांतला सगळे स्वीकारतील कि नाही अशे अनेक प्रश्न पडले होते. अरुण मात्र आरतीला अधून मधून बघत हातावरच्या घडीकडे बघत हाताची घडी मारून गुमान बसला होता.

कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments