जोडीदार.... प्रवास तुझा माझा.... भाग ४१

 


जोडीदार.... प्रवास तुझा माझा.... भाग ४१  

 बाबा आज निवांत बसले होते, घरात अनुच्या जर्मनीला जाण्याची तयारी सुरू होती. अनु काळजीत म्हणाली,

“बाबा, आता मुळीच कुणाची काळजी करायची नाही. तुम्हाला आता निवांत मिळणार आहे. तेव्हा तुमचं मागे राहून गेलेलं सर्व आयुष्य जागा.”

“अग, पोरी, ते जगायला तो वेळ येणार नाही ना ग, आता आम्ही म्हातारे झालोय ग.”

“अहो बाबा, आता कुठे साठी जवळ आले आहे तुम्ही, अजून खूप काही बाकी आहे, विदेशात लोकं इथून आयुष्य जगायला सुरुवात करतात.”

“असं म्हणतेस.  बरोबरही आहे तुझं, सगळे आपल्या आपल्या मार्गी लागले आता जिथे आमची गरज तिथे आम्ही असू..”

“अहो बाबा, तुमची गरज सर्वांना आयुष्यभर आहे. आतापर्यंत तुम्ही किती सामावून घेतलं सर्वाना. पण आता जरा जगा. मोकळा श्वास घ्या. मी तर माझ्या आई बाबांनाही हेच बोलून आले.”

“मग काय म्हंटले कोळी बुवा?”

“बाबा....”

“थट्टा केली ग, काय म्हणाले मग.”

“आईची माफी मागत होते, म्हणाले, आयुष्यभर तुला धाकात ठेवलं पण आता नाही, आता पुढंच आयुष्य तुझ्यासाठी काढेन मी. तू जे म्हणशील तेच करेन मी.”

आता आरती आई ओरडून म्हणाली, “शिका हो काही तिच्या बाबाकडून.”

“हुम्म, मी काय तुला त्रास दिला ग, सारखा ह्या इथे सोफ्यावर बसून राहायचो तुला बघत. आताही तेच करणार मी.”

“बघ ग अनु, काही खर नाही माझं आता, मुलांकडे गेले तर तेही जमणार नाही, महिना दीड महिना राहून परत यावंसं वाटते, करमत नाही ग, आणि आता तर हे आणि मी.”

“आई बाबा, मी समजू शकते, पण मुलांनाही काळजी असते ना, जरा अॅडजस्ट करावं ना.”

बाबा लगेच म्हणाले, “अनु आताच बोललीस ना, कि आम्ही खूप अॅडजस्ट केलं म्हणून. मला तर नाही करमत होतं तिकडे त्या बंगलोरला. नवल आहे मला माझ्या लेकाच आणि सुनेच पण नाही ना जमलं ग बाळा, नको मनाला लावून घेवू.”

“मग इकडे चला जर्मनीला...”

“नको, आता लेकीने बनवायला दिलेला पासपोर्ट तोच कधी उघडल्या जाईल माहीत नाही.”

“काय बाबा सारखी गोष्ट उडवून लावता तुम्ही. मुलांनाही वाटतं ना आई बाबांनी त्यांच्या सोबत राहावं. त्यांच आयुष्य बघावं, आता तुमच्या काळात तुम्ही जे बाहीतलं नाही ते बघावं असं वाटणं काय चुकीचं आहे त्यात.”

“बरोबर आहे तुझं पण बाळा आतापर्यंत आम्ही मुलांसाठी जगलो ना मग जरा आम्ही आमच्यासाठी जगावं असं नाही का, आता मुलं आमची पण संसार तुमचा ना, आमच्या संसारात आम्ही तुम्हाला शिरोमणी ठेवत आयुष्य काढलं तुम्ही कराल का, म्हणजे अपेक्षा नाही ग, पण आम्ही कशाला ना दोघांच्या जोडीत.”

“तुमच्या सारखा सगळे विचार करत नाही हो, लोकं तर अंकितला बोलतात, आई वडील आता एकटे इकडे राहणार म्हणून. त्याला वाईट वाटते. मला सारखा म्हणतो तुझं ऐकतात आई बाबा, सांग त्यांना आपल्यासोबत राहायला.

“मग तू म्हणून मला बोलत आहेस का?

“बाबा मलाही वाटते पण त्या वाटण्याआधी मी माझ्या आई बाबांना बघितलं नव्याने जगतांना आणि मग विचार पार बदलला माझा.”

“चला तुला समजलं, ग आम्ही आहोत जोडीला जोड, काही काळजी नाही. पुढे मागे तुम्ही याल ना इकडे.”

अनु जरा शांत झाली, तर बाबा म्हणाले, “अग नको येवू, काही हरकत नाही, बघ आम्ही उभं केलेल्या घरात तुम्ही तुमच्या सोयीने येता आणि परत येण्याची चाहूलही देत नाही, हा एवढा मोठा मोहिते निवास आम्ही आमच्या दोघांसाठी उभा केला होता का ग? नाही ना! पण प्रगतीला पंख फुटले आणि बघ ह्याचं निवासातून सर्वांनी भरारी घेतली. आमचा कुणाला दोष नाही. तू, सानू, राणी, अंकित आमच्यासाठी सगळे सारखे आहात. आता तुझ्याशी आम्ही का कुणास ठाऊक मोकळे बोलतो. एवढं तर मी सानूशी कधी बोललो नाही...”

बाबांनी चष्मा काढला, डोळे पाणावले होते त्यांचे, अनु त्यांच्या नजीक येवून बसली,

“बाबा मी तुमची सून कमी आणि मुलगी जास्त आहे. अंकित आता जावई झालंय, मला सांगतो तुमच्याशी बोलायला, हे सगळं झालं ते तुमच्या मायेने.

“नाही ग पोरी, हे सगळं झालंय ते बाळूच्या प्रेमाने. तो तुला खूप जपतो. खूप काळजी असते त्याला तुझी. आणि त्याने तुला जे स्वतंत्र तुमच्या नात्यात दिलं ना त्याने तू हे सगळं मिळवू शकली. असेच दोघेही राहा. आणि गोड बातमी द्या आम्हाला. मोहित्यांचा वारस बघू द्या आता लवकर, झाले ना तुमच्या त्या प्लॅनिंगनुसार तीन वर्ष.”

“काय हो बाबा...”

“बर ते जावूदे, आम्ही आनंदी आहोत आमच्या मुलांच्या आनंदात नाही त्याच्या प्रगतीमध्ये. माझे रिपोर्टस काय म्हणतात?”

“शुगर वाढला आहे  तुमचा, कोलेस्ट्रॉल सुद्धा, म्हणून जरा त्रास होत होता, मी आता आईला सगळं सांगितलं आहे. आणि मी तशी फोनवर तुम्हाला आठवण देत राहणार.”

“बर बाई. आधी ती सानू होती जाम रागवत असायची आता तू रागावतेस.”

“मग, रागवायला हवं ना कुणी तरी.”

“हो, तशी सानू आता रागवत नाही, ति प्रेमळ होती आणि आता तर समृद्ध स्त्री भासते, तिच्याकडे बघितलं की समाधान जाणवते. तिच्याशी बोलतांना आपण विरघळून जातो. तिच्याशी बोलताना मलाच खूप काही जाणवलं, माझी सानू नव्हती ग ती, ती आई दिसली मला, एक धडाडीची स्त्री वाटली. नाऱ्याची बायको होती. मोठी पेशवेबाई भासली. तिच्या सासूसारखा स्वभावात मृदुपण भरला आहे तिच्या. एक अप्रतिम अस्तित्व वाटलं तीचं.”

सानूच्या गप्पा करत तिने बाबांना त्यांच्या औषधी समजावून सांगितल्या. वेगळाच आत्मविश्वास तिने त्यांच्या भरला होता. आई बाबांना तिच्या गोष्टी ऐकतांना सानूची कमी भासली नव्हती. अनुने मोहिते निवासातील सर्व धुरा हातात घेतली होती. राणी आणि सानूचा उल्लेख आता खूप होत नसायचा घरी. आई बाबाला अनु हवी असायची सर्व कामात.

काही दिवसात अनु आनंदात जर्मनीसाठी रवाना झाली. मोहिते निवास परत खाली झालं, आता तर घराला सवय झाली होती, पाहुणे येत होते आणि जात होते. आणि पाहुणे तरी कोण होते घरचे मुलं. ज्यांच्या सुखाचा विचार करून ती वास्तु बांधली होती तेच तिथे नव्हते.

आई बाबा अंगणात ऊन खात बसले होते, बाबा म्हणाले,

“आपली पिल्ल काही वेळासाठी येतात आणि मग परत त्यांच्या प्रवासाला निघून जातात. आणि आपण परत ह्या निवासात आपल्या आठवणी कोरत त्याच्या आठवणी करत राहतो.”

“आता आपल्याला काम तरी काय. काय हो राणी काय ते आयव्हीएफ करणार आहे म्हणे.”

“व्हा, बोलता आलं तुला.”

“घ्या, येणार का नाही, आता काय माझी मुलगी अमेरिकेत आहे, सून जर्मनीत आणि हे एवढं येणार नाही मला.”

“हो करणार आहे. राजन बोलत होता. तो तर थांबायला तयार आहे पण राणीची समजूत काढणं त्याला कधी कधी कठीण जाते म्हणे. तिच्या आनंदासाठी तो तयार झाला आहे.”

दोघे बोलत होते तोच घरी कैलास आला,

“काका अहो काका, कधी जाताय  त्या वादळाकडे?”

“बाबा, का रे, तुला माहीत नाही का आता वादळ सुमंतमय झालंय ते.”

“अरे हो, पण आपल्यासाठी तर वादळच बाबा. मोठी माणसं ती.”

“ते जावूदे, कसं येणं केलं?”

“अरे तुमचे पासपोर्टच काम आलं होतं ठाण्यात.”

“मग केलं का पास?”

“अरे म्हणजे, राणे मॅडमचा आदेश होता तसा.”

“कधी येतील मग आमचे पासपोर्ट.

“येतील पंधरा दिवसात.

“बरं, धन्यवाद रे.”

“येतो मी.”

आरती ओरडली, “अरे थांब ना, चहा करते. पिऊन जा.

“नाही काकू, मग येतो बायकोला आणि मुलीला घेवून निवांत.

कैलासने गाडीला किक मारली आणि तो निघून गेला, आई बाबांना म्हणाली,

“काय मग कधी जायचा विचार आहे मुलीकडे.”

“अग, आता मागे ती आली होती ना तेव्हा तिने केलं सगळं, बघू आपण. ती तर म्हणाली, पुढल्या वेळी आपल्याला सोबत नेणार म्हणून. पण आता आपलं आयुष्य सुरु झालंय बघू आपण पण…

“काय हो, काहीही तुमचं...

“अरे मग, आता आपण दोघेच आहोत. तू आणि मी. आहे कोण इकडे. आधी वेळ मिळत नसायचा आपल्याला आता वेळच वेळ आहे.”

“हुमम, पण तो वेळ येणे शक्य नाही. ती मौज मस्ती आता पुढे नाही.”

“ये वेडाबाई, मी तर आता परत सगळं जगणार, नवीन सगळं.”

“काय नवीन सगळं म्हणता, सगळं जुनं आहे बसं आपल्याला नवीन विचार करायचा आहे असं म्हणा.”

“मग एवढं कळतं तर कशाला काळजी करतेस.”

“काळजी नाही हो.”

“चल मग, तू बोलत होतीस ना, कधी तर चहा मांडा म्हणून, चल चहा टाकतो मी.”

“तुम्ही? कुठून दिवस उगवला.”

“मग, आता काय राहिलं माझं, जे आहे ते तुला माहित आहे. मी ठेवतो, तू बस. आणि दिवस रोज पूर्वेकडून उगवतो बसं आज तो मला बघातांना नवीन वाटला.”

आई बाबा हळूहळू त्यांच्या नवीन आयुष्यात रमले होते. आधी भरलं घर आणि सारं काही मुलांसाठी असायच अरुण आणि आरतीच, पण आता दोघेहि एकमेकांचा विचार करत एकमेकांसाठी जगायचे.

बघाना, कुठलं नातं असतं हो शेवटापर्यंत... ना रक्ताचं ना गोत्याच... काय तर नुसत्या प्रेमाचं... तुझं माझं... जोडीदाराच....

कथा लवकरच अंतिम भागाकडे..

@everyone
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल-

Post a Comment

0 Comments