द कॉर्पोरेट लॅडर... भाग २०- मॅनेजमेंट रिस्ट्रक्चर
समृद्धी नेहमीप्रमाणे कामात हरवली होती. प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या नोट्सची तपासणी सुरु होती. स्क्रीनवर मेल्सचा ढिगारा उघडून तिने स्क्रोल करायला सुरुवात केली. आणि अचानक निळसर अक्षरांत चमकणारा एक ऑटो-जनरेटेड मेल तिच्या नजरेस पडला, “अभिनंदन! घोसला कंपनीत तुमची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.”
क्षणभर ती थबकली. तिचा श्वास जरा मंदावला. डोळे पाणावले, पहिल्या दिवशीचा तो गोंधळलेला, अस्वस्थपणा…
कॉफी मशीनजवळचे पहिल्यांदा हसणारे चेहरे… बॅचमधले सिनियर्स, टीममधले टेनशन…
आणि खास करून .... मंजिरी. सारं कसं एकदम आठवू लागलं. त्या आठवणींनी जणू एखाद्या जुन्या सिनेमाचा रील चालू झाला. अचानक तिला तिच्या शेजारीच मंजिरी उभी दिसली, तिची ती खवळलेली, तिरकी नजर टाकत म्हणाली,
“हे सलवार! तुझी ही लोंबणारी ओढणी नीट कर. माझ्या नोकदार हिलमध्ये अडकते आहे. तुझा काय पाडण्याचा विचार आहे का मला?”
समृद्धीने दचकल्यागत भानावर येत वळून पाहिलं, तर शेजारी कुणीच नव्हतं. तिने हलकेच कॉफी मशीनकडे नजर फेकली. तिथे बिपाशा आणि शनाया तिच्याकडे बघत हसत उभ्या असल्यासारख्या भासत होत्या. तीने क्षणभर पापण्या मिटल्या आणि पुन्हा बघितलं, खरं तर तिथेही कुणी नव्हतं. शनयाच्या आठवणीने जरा वेळ ती शांत झाली, तिला भेटायला जायचं आहे, तिच्या आईला पैसे पाठवायचे आहे... म्हणून विचार करू लागली.
मनाला जरा हलका थरकाप बसला होता तिच्यासोबत घडलेल्या घटनेच्या आठवणीने. ती पुन्हा मेलकडे पाहू लागली, आणि तेवढ्यात तिला कॅबिनच्या दरवाजाजवळ माधव सावलीसारखा उभा दिसला. ती झटकन उठून उभी राहिली... पण समोर पुन्हा रिकामी जागा होती.
“काय चाललंय माझं…?” ती स्वतःशीच पुटपुटली.
दादाला आनंद वार्ता सांगवी म्हणून फोन हातात घेतला तर दोन वर्षाआधी आपण घर सोडलं तो क्षण समोर आला, तरीही हळूच वहिनीला मेसेज केला, आणि तिच्या उत्तराची वाट बघत राहिली. मोबाईल स्क्रोल करत होती तर सुहासचा नंबर दिसला.. हळवे क्षण आठवले... आपण कधीच ते चॅप्टर बंद केलं हे तिच्या लक्षात आलं. मग काही वेळाने तिने सत्यजितच्या लग्नाचे फोटो बघितले.... हसली... जरा रमली!
ती दीर्घ श्वास घेत खुर्चीत मागे रेलली. भूतकाळ अजूनही तिच्यामागे सावलीसारखा फिरत होता.
प्रत्येक आठवण जणू तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारत होती....
“तू इथपर्यंत कशी आलीस?”
नजरेसमोरून काळ जणू धावून गेला, पहिल्या दिवसाचा ताण, मंजिरीची टोमणेभरी नजर, रोज रात्रीपर्यंत कार्यालयात जळणारा ट्युबलाईट, स्लाईड्सवर तिने केलेली हजारो सुधारणा, तिच्या शांतपणामुळे निर्माण झालेली चिडचिड. माधवची पहिली दाद... त्याच्या वागण्यातील बारकावे आणि हळूहळू बदलत जाणारी त्याची नजर आणि वाढणारा विश्वाश, क्लायंट्सचा अनपेक्षित विश्वास. आणि त्या एका क्षणी तिने स्वतःला हरवू न देण्याचा घेतलेला निश्चय…
हो.... ती तिच्या कॅबिनमध्येच होती. आजची समृद्धी .... पाच वर्षांपूर्वीच्या त्या घाबरलेल्या समृद्धीपेक्षा खूप वेगळी.
ही कॉर्पोरेट लॅडर तिने स्वतः चढली होती. कुणाला ढकलून नाही, कुणाला कमी लेखून नाही... कुणाला वापरूनही नाही किंवा स्वतःला वापरूनही नाही... फक्त स्वतःला खंबीर उभं ठेवून.
कदाचित जगाला दिसतं ते पद, पण न दिसणारी झुंज कळायला काळीज लागतं.
मेलमध्ये दिसतात ते टास्क, नंबर, पण मागे असतात असंख्य रात्री, ज्यात सारं काही विसरून स्वतःला झोकून दिलं जातं.
पाणावलेले डोळे हलके पुसले, तोच वहिनीचा फोन आला, “समु... मला अभिमान आहे तुझा.... मी तुझ्या सोबत आहे... स्त्रीने असचं असावं गं.... मग आता लग्नाचा विचार पक्का झाला ना? तुझ्या दादाला नुसता मिसकॉल दे, बघ तुला फोन करतील ते... आणि घर घेतलं तू तर आमंत्रण कधी देतेस जेवणाचं की तेही तुम्ही दोघे देणार आहात....”
समृद्धीला अश्रू आवरले नाही... आजवर गारठून ठेवले अश्रू वाहून गेले... ती शांत झाली, “वहिनी मला माहित होतं गं तू आणि दादा माझ्या कायम सोबत आहात, म्हणूनच मी इथवर आले. आजच घरी येते.”
काही वेळ शांत होती तर सुमित घोसलाचा कॉल तिला आला, “हे जान... आज काय पार्टी मग?”
“कसली रे....”
“अरे तुला पाच वर्ष झाली घोसला कंपनीत.”
“आहा... तुला कसं माहित?
“म्हणजे... प्रेमाच्या माणसाची माहिती ठेवावी लागते...”
“असं होय....”
“ते जाऊ दे, मी आबासाहेबांशी बोलणार आहे आपल्याबद्दल.... आणि पुढच्या आठवड्यात मी येतोय भारतात. बाकी डिटेल पपा तुला देतील....”
“अरे पण....”
“काही अरे बिरे नाही आता.... मिसेस सुमित घोसला होण्याची तयारी कर. तिकीट बुक झाली की कळवतो, एअरपोर्टवरून सरळ तुझ्या घरी येणार आहे मी.”
“ऐक ना...”
“मला माहित आहे काय बोलणार तू.. मी बघतो पपाशी कसं बोलायचं ते, तू ऑफिस मध्ये तुझं काम कर.... आणि मला झोपू दे आता... तुझ्यासाठी बोलायला जागा होतो पण मधेच एक कॉल लांबला... काळजी घे आणि एन्जोय! करतो तुला कॉल.”
समृद्धीचा आनंद गगनात मावत नव्हता....
समृद्धीच्या ओठांवर एक शांत, समाधानाचं हसू उमटलं होतं, ती तिच्या कॅबीनच्या बाहेर बघत होती... पुटपुटली,
“पाच वर्षे झाली.... पण खरी चढण… आताच सुरू झाली आहे.... आयुष्य लवकरच नवीन वळणावर वळणार आहे... कदाचित मी आणि सुमित हे समीकरण कॉर्पोरेट जगात लोकांना माझ्या यशाची सीडी वाटणार.... पण खरं काय ते मला आणि त्याला माहित आहे.... तो त्याच्या राज्यात आणि मी माझ्या तरीही आमचे सुर जुडले.... हे आता अजूनचं चालेन्जिंग आहे... चला समृद्धी लागा तयारीला नवीन लढाईच्या....”
त्या दुपारी ऑफिसमध्ये शांतता होती, पण ती शांतता म्हणजे वादळाआधीची पोकळीजणू. सगळ्यांना कुठेतरी जाणवत होतं. बोर्ड मिटिंग होती हे सर्वाना माहित होतं. मॅनेजमेंट रिस्ट्रक्चर होण्याची वेळ आहे असेही वर्तमान पत्रात आलेले होते... पण बोर्ड मिटिंग असूनही आज मंजिरी तिच्या कॅबीन मध्ये होती ह्याच विचाराने घोसला कंपनीत आता काहीतरी मोठं घडणार आहे ह्याची जाणीव जेमतेम सर्वाना होती. तिच्यासगट सर्वांचे श्वास अडकले होते.
साधारण चार वाजता मंजिरीला मेल आली, “Management Restructure, Immediate Release of Circular at 6 PM.”
ती मेल बघताच तिच्या छातीत जडपणा उतरला. मॅनेजमेंट रिस्ट्रक्चर? ओह वीस वर्ष लोटले... नवीन पिढी? हीच ती वेळ का…?
माझ्या जागेबद्दल…? माझ्या शक्तीबद्दल…? माझ्या निर्णयांबद्दल…? असे विचार तिच्यामनात जणू फिरत होते.
कधी काळी या कंपनीत तिचं वर्चस्व होतं. तिच्या एका नजरेनं लोक थरथर कापत. तिच्या निर्णयांची भीती आणि आदर दोन्ही होती. पण आता… तिला स्वतःची पायाभरणी हलताना जाणवत होती. कोणी हटवत नव्हतं तिला, पण कोणी आधारही देत नव्हतं.
आणि त्याच वेळी, तिच्या समोरच्या स्क्रिनवर आणखी एक मेल चमकला...
“विषय: Regarding Samruddhi’s Confirmation for Leadership Training Program – Urgent.”
पहिल्याच ओळीत लिहिलं होतं: “She is recommended by the Board for Fast-Track Leadership Pipeline.”
मंजिरीचे हात थरथरले. Fast-track leadership? समृद्धी? म्हणजे… पुढची मॅनेजेरियल पिढी… तिच्याद्वारे?
ती डोळे मिटून मागच्या पाच वर्षांचा प्रवास आठवत होती, समृद्धीचा पहिला दिवस, तिची शांत नजर, अडखळणारे शब्द. पण त्यातही आत्मविश्वासाचा एक धागा होता ज्याला त्या वेळी मंजिरीने लक्षही दिलं नव्हतं. पण आता समृद्धीला तिनेच तयार केल्यासारखी ती वाटत होती... कठोर, पण प्रामाणिक प्रशिक्षणाने घडवलेला एक अनुभव, एक वैक्तीमत्व.
दीर्घ श्वास घेतला मंजिरीने आणि... तिचा सारां घोसला कंपनीसोबतचा मागच्या वीस वर्षाचा प्रवास तिला काही क्षणात आठवून गेला... बरेच सहप्रवासी आले आणि पुढे निघून गेले पण तिच्या सोबतीला तिचं असं कुणीच राहिलं नव्हतं... आणी ही एकचं गोष्ट मंजिरीकडे नव्हती... कॉर्पोरेट जगात एक दिवस हे सर्व तिच्याकडून निघून परत कुणा नवीन माणसाच्या हातात जाणार हे नक्की होतं पण त्यात तिला किती सोबत मिळते ह्यात खरी ओढ्तोड होती.... आणि इथेच मंजिरी हरली होती...
कॅबीनचे परदे सारत सहज डोकावलं तिने तर समृद्धी जुनिअर स्टाफसोबत हसत बोलत होती... तिच्या बोलण्यात काहीच मोठेपणा नव्हता,... हेच तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आणि ह्या वागणुकीने ती आज घोसला कंपनीत जागा मिळवू शकली होती.
माधव ऑफिसमध्ये शिरताना मंजिरीला दिसला, तोही जरा वेळ समृद्धीजवळ थबकला.... आणि लगेच मंजिरीच्या कॅबीनकडे निघाला. तो येतोय हे बघाच मंजिरीच्या हृदयाची धडधड वाढली, ती जाऊन खुर्चीवर बसली, कामात मग्न झाल्यासारखी झाली. माधवने दार वाजवलं आणि तो आत आला,
“हे, मंजिरी कामात आहेस का? मेल वाचला असेल ना तू...”
“हो वाचली ना... नवीन पिढी उभी होत आहे घोसला कंपनीची. अभिनंदन!!”
तिच्या बोलण्यात थरकाप होता आणि तोच माधवने जाणला, तो पुढे आला आणि मंजिरीचा हात त्याने हातात घेतला, “मंजिरी हे होणारच होतं ना.... आपण काय कायम इथे राहणार नाही आहोत... आधी आबासाहेब बसायच्या इथे मग मी, आता कदाचित सुमित बसेल... पण आपण कायम असणार त्यांच्या मागे... प्रत्येक निर्णयात....”
“हो पण आजची मिटिंग माझ्याशिवाय झाली माधव....”
“हुम्म्म... मान्य! अगं त्याचं कारण आहे... तुला सांगेन मी कधीतरी...”
“नकोच सांगू.... मला ऐकायचे सुद्धा नाही.... मॅनेजमेंट रिस्ट्रक्चर हे शब्द पुरेसे आहेत माधव..”
“ते जाऊ दे.... बोलू आपण....मला काही कामं आहेत. पुढंच आपण मिटिंग मध्ये बोलूया...”
तो निघणार तोच मंजिरी म्हणाली, “माधव आता माझं काय रे... मी तर अजूनही एकटी असेल....”
तसा माधव अवघडला, “असं का म्हणतेस तू... मी आहे ना तुझ्यासोबत...”
ती शांत बसली, “कुठे रे.... आजवर तू ऑफिसला निदान यायचा, आपलं बोलणं होत असायचं, तुझ्यावर हुकून गाजवत असायचे मी.... तेवढच समाधान असायचं... आता तू इकडे येणार नाहीस आणि माझं काय ते अजून मला कळालं नाही... हे कसले बदलीचे वारे आहेत माधव.... मी तर अडकून राहिले रे..... ह्या वाऱ्यात वाहून जाऊ की काय करू.... ह्या ऑफिसच्या भिंती माझं घर आणि तू माझं सर्वस्व एवढचं माहित आहे मला... आणि हा बदल.”
माधव आता गप्प झाला, तो बोलणार तोच त्याला प्रियाचा फोन आला, त्याने मंजिरीला गप्प केले, आणि तो त्याच्या बायकोशी बोलू लागला,
“हे जान, काय झालं... घरी पोह्चलीस ना?”
“हो... अरे मला सुमितचा कॉल आला होता.... आपल्याला एका खूप महत्वाच्या विषयावर बोलयाचे आहे. तू घरी ये लवकर.”
“बंर, मी एका तासात पोहचतो. सुमितने तिकीट बुक केले का?’
“ते काही मला माहित नाही, करेल तो लवकर... ये तू आपण बोलूया.”
माधवने फोन ठेवला आणि म्हणाला, “मंजिरी सुमित येतो आहे, घाई आहे जरा... तुझ्याशी निवांत बोलतो मी, मी आहे गं... काळजी नको करू तू... तू माझी जवाबदारी आहेस हे मी कधीच विसारणार नाही काहीही झाले तरी... एवढचं लक्षात ठेव...आणि कसलाच विचार करू नको....मिटिंगला ये लवकर.”
माधव निघून गेला.... आज माधव मंजिरीच्या कॅबीन मध्ये होता.... हेही नवल होतं सर्वासाठी...
पुढचा भाग लवकरच पेजवर....
आधीचे सगळे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

0 Comments