बर्नआउट...

 बर्नआउट...




समृद्धीचे काय सुरु आहे हे तिच्या घरी काही केल्या कळत नव्हते. सकाळी लवकर निघणे आणि रात्री उशिरा महागड्या गाडीतून घरी परत येणे. दादाने तिच्याशी बोलणे सत्यजितच्या प्रकरणानंतर थांबवले होते तरीही वहिनीला तिची काळजी होती. त्या दिवशीच्या पार्टीनंतर तर समृद्धी काही वेगळीच झाली होती. वहिनी सकाळी तिच्या खोलीत आली, “समु, काय सुरु आहे तुझं, कोण तो हल्ली सुमित त्याच्याशी बोलत असतेस. लग्न करणार असशील तर सांग बर, काहीच हरकत नाही आम्हाला.”
समृद्धी हसली, “वहिनी तो माझ्या बॉसचा मुलगा आहे. अगं मालक आहे घोसला कंपनीचा... काहीही काय बोलतेस.”
वहिनी हळूच म्हणाली, “असं असलं तरी जरा दूर राहा बाई… कॉर्पोरेट जगात कोणाचं काय चालतं सांगता येत नाही.”
क्षणभर थांबून ती परत म्हणाली,
“पण एक विचारू का, तू लग्न करणार नाहीस का आता?”
समृद्धीचा चेहरा हळूच गंभीर झाला.
“वहिनी, लग्न करायलाच हवं का गं? तू काय मिळवलं लग्न करून...”
“ऐ, काहीही नको बोलू... अगं, सगळ्यांना थोडी सोबत हवीच ना…”
“तसं नाही. करेन गं असं कुणी भेटलं तर... पण मला ना आता एवढ्यात लग्न करून बंधनात अडकायचे नाही... काही वर्षाआधी मीही प्रेमात पडले होते, रिलेशनशिप मध्ये होते.. पण एवढी गुंतले होते की मग तोडलं सारं... आणि मग ठरवलं, की आयुष्य आता माझं, माझ्या अटींवर.”
“हुम्म... तू सुहासबद्दल बोलत आहेस तर?”
समृद्धीने आश्चर्य चकित हास्य दिलं, “वहिनी... मग माहित असून तुम्ही सत्यजीतच स्थळ कसं आणलं माझ्यासाठी?”
“सुहासबद्दल आम्हाला उशिरा समजले...नाहीतर मी होते ना दादाशी बोलायला... बोलायचं होतं माझ्याशी... म्हणून म्हणते आता काही असेल तर सांग मला....”
समृद्धीने वहिनीचे गाल हलकेच ओढले.
“माझी काळजी करू नकोस गं. आता काही नाही, आणि असले तर नक्की आता फक्त तुला येऊन सांगेल”
ती तयार होत होती, लिपस्टिक लावली, लॅपटॉपची बॅग खांद्यावर घेतली आणि निघाली.
--
त्या पार्टी नंतर मंजिरी अजूनच अस्वस्थ झाली झाली होती. माधव आणि सुमित ह्या दोघांनीही समृद्धी आवडते हे गणित जरा सुटायला अवघड झालं होतं तिच्यासाठी. ती बर्नआऊट झाली होती... आजवरचा तिचा सारा प्रवास जणू तिला गोंधळात पाडत काहीही सुचू देत नव्हता. माधववरची पकड सुटत आहे असे तिला मनोमन वाटत होते. तिचा असा विचार योग्य होताही कारण समृद्धीला समजणे तिला अवघड जात होते. स्वतःला नव्या दमाची म्हणून वावरणारी नवीन विचारांना समजण्यात असमर्थ होती आणि म्हणूनच काय तर तिची चिडचिड तिलाच बर्नआऊट करत होती...
त्या दिवशी समृद्धी नेहमीसारखी उत्साही होती. हातात कॉफीचा मग आणि डोळ्यात झोपेच्या रेषा असूनही ती प्रसन्न दिसत होती. आज माधव लवकर येणार होता, कारण हनीवेल प्रोजेक्टचं दुसरं फेज सुरू होतं. मंजिरीचा मूड ओळखणं आज सगळ्यांनाच कठीण जात होतं. तिचं प्रत्येक बोलणं धारदार होतं, प्रत्येक निर्णय थोडासा झपाटलेला वाटत होता. ती सर्वांवर काही ना काही टीका करत होती. रिपोर्ट्समध्ये चुका शोधत होती, प्रेझेंटेशन स्लाइड्स परत करायला लावत होती. सगळेच ताणात आले होते.
आणि त्या तणावातही समृद्धी नेहमीप्रमाणे शांत होती. ती सगळं समजून घेत तिलाही समजून घेत होती, कुठेच प्रतिकार करत नव्हती. तिचा आवाज नेहमीप्रमाणे स्थिर, तिचं वागणं नात्याच्या मर्यादेतलं, पण आत्मविश्वासाने परिपूर्ण. ती न बोलताही उत्तरं देत होती ते तिच्या कामातून.
माधव येताच त्याने समृद्धीला कॅबीनमध्ये बोलवून घेतलं, दोघेही हनीवेल कंपनीच्या पुढच्या कामासाठी चर्चा करत होते तर मंजिरी आत शिरली. समृद्धीने उठून तिच्यासाठी खुर्ची ओढली. “गुड मॉर्निंग, मॅडम.”
मंजिरी थोडी थांबली. थोडं हसत तिने माधवकडे लक्ष दिलं. माधव सहजपणे म्हणाला,
“मंजिरी, समृद्धी हा पुढचा फेज संपूर्णपणे स्वतंत्र हाताळणार आहे.”
“अरे पण जबाबदारी मोठी आहे. आणि ही...” मंजिरीचा आवाज थंड पण तीक्ष्ण होता.
“ही नवीन पिढी आहे.... हनीवेलला समृद्धीच्या आयडीया आणि डिटेलिंग आवडते, त्यांना हिच्यावर जास्त विश्वास आहे...” माधव शांतपणे म्हणाला.
“आणि तुला?”
माधव गडबडला, तरीही समृद्धीकडे बघत म्हणाला, “मलाही...”
समृद्धी बोलून कॅबीनमधून निघून गेली. मंजिरी अस्वस्थ बसून होती... तिला काहीच कळत नव्हते. आता समृद्धीला कसे मार्गातून वेगळे करायचे ह्या विचारात तीने माधवला प्रश्न केला, “मला नाही वाटत ही हाताळेल सर्व, मी हिला त्या कॉस्मेटिक कंपनीमध्ये टाकते.”
माधव जरा गोंधळला, “का? मी बोललो ना आता...”
“तू मागे बोलला होतास, ह्या ऑफिसमध्ये माझे निर्णय मानले जातील... विसरला तू... आणि तुला म्हणून परत आठवून करून देते, माझे निर्णय चुकत नाहीत... विसरलास का सुरवातीचा काळ... ते सारे निर्णय माझेच होते.”
“ नाही, पण... त्या वेळी ते निर्णय योग्य होतेच , पण अगं...
“का? ती पंचवीस वर्षाची मुलगी तुला आवडते आता. ती काहीही करो तुला काहीच बोलायचे नसते.”
“अगं असं नाही आहे. तिच्या कल्पना आणि त्यांना मांडण्याची पद्धत बघ कधी.... नाही बोलणारा सुद्धा हो म्हणून मान हलवतो... मागे माझ्यासोबत तिने काम केले मला माहित आहे. ती हुशार आहे एवढंच... आणि हो, मला ती आवडते....”
जरा वेळ शांतात होती दोघात. तर माधव म्हणाला, “मला निघायचे आहे. एक मिटिंग आहे. तुला हवं तसं कर पण जपून.... आणि एक मी महिनाभर तरी इकडे नाही... आणि एक न्युज आहे... ह्यावर्षी मॅनेजमेंटने ‘स्टार परफॉर्मर’पुरस्कार समृद्धीला देण्याचे ठरवले आहे त्यात तुझे मत ही हवे आहे.”
मंजिरी सुन्न झाली आणि तो निघून जाताच त्याच्या जागेवर बसली. विचारांच्या जाळ्यात ती अडकली होती, मंजिरीला आता काहीतरी वेगळं वाटत होतं. माधव बदलतोय. मीटिंगमध्ये तिचं ऐकणं कमी झालंय, आणि समृद्धीच्या मताला तो जास्त महत्त्व देतोय. असा सगळा विचार तिच्या मनात राहून राहून येत होता.
महिना असाच गेला आणि मंजिरीने समृद्धीला हनीवेलमधून काढून नवीन कॉस्मेटिक प्रोजेक्टवर शिफ्ट केलं, तसा तिने तिला मेल केला. एचआरला बोलावून समृद्धीच्या टाइमशीट्सची चौकशी केली. तिचे इन आउट तिने रीपोर्ट करायला सांगितले. मेल मिळताच काही वेळात समृद्धी कॅबीनमध्ये आली,
“मॅडम, तुम्ही मला दुसऱ्या प्रोजेक्टवर शिफ्ट केलंय?”
“हो. मी विचार केला की तुला हा सुद्धा अनुभव मिळावा. तू तर लवकर शिकतेस ना? आणि आता हनीवेलचं सगळं सेट आहेच, तू नवीन प्रोजेक्ट हाताळ...”
“मला आवडेल हा अनुभव, पण हे बदल अकस्मात झाले आहेत. मी प्रोजेक्टच्या मध्यावर आहे आणि ठरल्याप्रमाणे मी क्लायंट्स सगळे डिटेल कळवले आहेत. मग हा अचानक बदल?”
मंजिरी थोडं हसली, “हे ऑफिस आहे समृद्धी, इथे वैयक्तिक भावना नसतात, आणि क्लायंट्सला अशा बदलांची सवय असते.”
समृद्धीही शांतपणे म्हणाली, “ठीक आहे मॅडम. मी त्यांना मेल करते.”
ती बाहेर गेली आधी तिने माधवला सगळं सांगितलं आणि क्लायंट्सना मेल पाठवला, "डिअर सर, ऍज आय ऍम बीइंग ट्रान्सफर्ड टू अनदर इंटरनल प्रोजेक्ट, आय विल इन्शुअर स्मूथ हँडओव्हर ऑफ ऑल डिलिव्हरेबल्स विदिन द वीक."
क्लायंट्सनी उत्तर दिलं, "वी वुड प्रेफर कॉन्टिन्युइटी. वी रिक्वेस्ट दॅट मिस समृद्धी रिमेन ऑन द प्रोजेक्ट अन्टिल कंप्लिशन."
ती मेल तिने आधी माधवला पाठवली आणि मग काही क्षणात तो मेल त्याने मंजिरीला फॉरवर्ड केला.. मेल बघताच मंजिरी खुर्चीत नुसती शांत झाली. तिचा डाव तिच्याच अंगावर आला होता. ती परत बर्नआउट झाली होती.
माधवने तिला फोन केला, “मंजिरी काही दिवस सुट्टी घे, तुला गरज आहे. आणि शांत हो... तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही पण आता नवीन विचारांना आपण चालना द्यायला हवी... समृद्धी नवीन आयडीया घेऊन पुढे येत आहे... आणि मी तिला कंपनीची पुढची पिढी म्हणून बघत आहे. आणि आपला सुमित तिला पसंत करतो... प्रियाला ती आवडली आहे... आबासाहेब इम्प्रेस आहेत तिच्या कामाने... मी काय विचार करत असायचो हे तुझ्या नजरेतून चुकलं नसावं कधी, पण अनेक वेळा तिला मी अशी संधी देवूनही तिने काम केलं फक्त... तिच्यावर नजर रोखता रोखता तिच्या काळजीपर्यंतचा प्रवास मी अनुभवला आहे. चतुर आहे, स्वाभिमानी आहे पण वाहवत जाणारी नाही आहे ती... लवकरच मॅनेजमेंट लेवलला बदल होणार आहेत.... तुला कळत आहे ना मला काय म्हणायचे आहे... तू समजून घेशील... मी वेळ काढून आज तुला भेटायला येतो.”
मंजिरीने फोन ठेवला, तिच्या विंडोमधून ती समृद्धीला बघत होती.... राग येत होता की काय पण मनात वाटलं... ह्या समृद्धीने ही कॉपोर्रेट लॅडर कशी चढली... ना स्वतःला हरवून घेतलं ना काही गमावलं पण तरीही ती टिकली.... ह्या दोन वर्षात तिने स्वतःला उभं केलं... ह्या पंचवीस वर्षाच्या मुलीमुळे मी विचारात पडावी मग नक्कीच हिच्यात ते सर्व आहे ज्याची कॉर्पोरेट जगाला गरज आहे... आणी मी.... माझा हा रुबाब पोकळ आहे का? मी सारं गमावून आज कुठे आहे... मी बर्नआउट आहे... म्हणूनच काय तर सर्वाना जाळत असते आणि ही... हिच्यासोबत काम करणारे हिचे होतात... आजवर हिची कुणी तक्रार केली नाही... आणि आज माधवने हिला सुमितसाठी निवडले! मी स्वतःला हा निर्दयी जगात गमावलं पण समृद्धीने स्वतःला शोधलं... माधव मला त्याचं समजूनही त्याचं माणू शकत नाही. आणि हिने कदाचित माधवला बॉसच्या वेगळं कधी समजलं नाही पण त्याचा वापर अचूक केला... वेल प्लेड समृद्धी...”
मंजिरीच्या कॅबीनच्या विंडोला बघत समृद्धी विचारात होती, “मॅडम, ह्या कॉर्पोरेट जगातले डावपेच मी तुमच्याकडूनच शिकले... बसं मी एक केले मला स्वतःला हरवून घ्यायचे नव्हते... मला मंजिरी व्हायचे नव्हते....”
घोसला कंपनीत बदलीचे वारे लवकरच वाहणार होते....
आधीचे सगळे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
@followers@topfans #उर्मिलादेवेन मन माझे मराठी #marathi
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments