मेकअप !




सकाळीच आराध्या सर्व आवरून तयार होतं होती, आजही तिने नेहमी प्रमाणे आरसा बघितला, कपाळावर टिकली लावली, केंस नीट केलेत, डोळ्या खालच्या वर्तुळात अगदीच हात लावत जरा चेहऱ्याला पावडर लावलं. उठतच होती तर गालावरचा मारल्याचा लाल डाग तिला काही केल्या आरश्या समोरून हलू देई ना, मनात विचार शिरला,

"पाहुणे आहेत घरात, उगाच कुजबुज करायचे, नको त्या प्रश्नांना समोर जावं लागेल, उलट घरातले रुसतील ते वेगळं."

 विचारांच्या ओघात परत पावडर पुसलं, फौंडेशन काढलं. चेहऱ्यावर लावलं, सुंदर दिसत होती. साडी आवरली, खोलीतून बाहेर आली, सासूबाई समोर दिसल्या, एक मोठीशी स्माईल देत ती स्वयंपाक खोलीत शिरली. चहा केला, सासऱ्याला आवडला नाही, तोंडावरच म्हणाले," पाणचट झालाय आज चहा." पाहुण्यासमोर चेहरा पडला होता तिचा तरीही  आराध्याने निमूट ऐकून घेतलं आणि म्हणाली, "दुसरा ठेवते तुमच्यासाठी."

कही दिवसांपासून तब्यतिची कुरु कुरु सुरु होती. चालतांना पायाला त्रास होतं होता, तरीही दुखण्याची झळकही चेहऱ्यावर दिसत नव्हती. रात्री सर्व झोपले कि स्वतःच्या पायाला तेल लावून चोळत बसायची आणि सकाळी कामाला लागायची. 

 गेल्या दहा वर्षाच्या संसारात स्वतःचा खरा चेहरा तिला कधी आरश्यात दिसलाच नव्हता. लोकांना हवा असणारा चेहरा सतत हसत सांभाळत ती स्वतःचा खरा हसरा चेहरा आता दुर्मिळ झाला होता. लपला होता मेकअपच्या मागे.

दिवस जात होती आणि तिचे मुलंही मोठे होतं होते. सासू सासरे राहिले नव्हते. आज परत ती आरश्यासमोर बसली, स्वतःला नेहाळत म्हणाली,

 "सोपं नसतं रे आरश्या, एका स्त्रीच्या चेहऱ्याला वाचणं, मनात कही दुःख साठवूनही सतत हसत समोर राहावं लागते, तू काय माझं प्रतिबिंब दाखवणार! माझा मुखवटा दाखवतोस तू. चेहऱ्यावर चेहरे बसवता बसवता आता माझी मीचं मला माहित नाही. नात्यांना मेकअप करता करता चेहऱ्याला मेकअप करायला लागले आणि तू तेच माझं रूप समजायला लागलास."
 ---
शारूल, आराध्याची मुलगी, तिचं लग्न झालं जरा चिंता रेषा कमी झाल्या होत्या मस्तकावरून. लग्न एकदम राजेशाही झालं होतं. पण लग्न म्हटलं कि कमी जास्त होतंच असतं. लग्नाच्या काही दिवसात आराध्या आणि तिचा नवरा अरुण मुलीकडे सहज भेटायला म्हणून गेलेले. तशी शारूलही नेहमी टाप टीप राहायची, तिलाही मेकअपची आवड होती पण डोळ्यांना मेकअप ती कधी करत नव्हती. हॉल मध्ये सर्व बसले होती आणि शारूल तिच्या खोलीतून आली, कुठलीच पार्टी नसतांना शारूलने एवढं मेकअप का केलंय हे कोडं आई आराध्याला बोचत होतं. 

शारूलच्या लाल डोळ्यामागचं कारण तिला कळत होतं, तिचे ते सुंदर फिक्कट गुलाबी आणि लाल रंगाने रंगविलेले डोळे खुप काही बोलत होते. सुंदर दिसत होती पण त्या मेकअप खाली दडलेला चेहरा रडत होता. आई बाबांना कळू नये आणि घरतल्या लोकांची शान कायम राहावी म्हणून तो नात्याला मेकअप करण्याचा तिने चेहऱ्यावर केलेला मेकअप होता.

 काहीतरी चुकतंय ह्या विचारात आराध्या पडली होती, तिच्या घासत गेलेल्या स्वभावाने ती काही बोलूही शकली नाही, आनंदात दोघेही नवरा बायको परत आले. पण ते शारुलचे लाल डोळे तिला छळत असायचे. मी भोगलं आता शारुल पण हेच सर्व भागणार काय ह्या विचाराने ती त्या दिवशी आरश्यासमोर परत थबकली, आज आरश्यात तिचं थकलेले प्रतिबिंब दिसत होतं, मनातली चिंता स्पष्ट दिसत होती. 

सवयीप्रमाणे हात परत फिरला मेकअपच्या कीटकडे. पण जरा आवरल्या गेला, पोहचलाच नाही त्या मेकअपच्या कीटपर्यंत. मन त्या थकलेल्या प्रतिबिंबाकडे नजर रोखून म्हणाली, "तुला आता गरज नाही ह्या मेकअपची, तुला ते तेज देणार नाही ते. नात्यांना मेकअप करता करता तुझ अस्सल तेज कधीच उडालं. मेकअपचा मुखवटा बसवता बसवता तू तशीच बनून राहिली, हिला काहीही करा ही सतत शोभेची बाहुली म्हणून हसत सगळ सहन करत राहणार आणि समोरचा काहीही करो ही मात्र त्या नात्याला मेकअप करत राहणार. "

आराध्याच प्रतिबिंब क्षणात जरा फुललं आणि परत बोललं, "आता हे स्वतंत्र मिळून काय अर्थ, त्या वयात हे मिळालं असतं तर कितीतरी गोष्टी मी मेकअप करू शकली असती, पण चेहऱ्यावरच मेकअप करून नाती मेकअप करण्यात वेळ निघून गेला तुझा, शारुल, शारुलसोबत असं होता कामा नये हा! जा तिच्या बाबांना सांग., तुला तर नाही समजले कधी पण मुलीला समजतील. "

ती लगेच बाहेर बागेत बसल्या असलेल्या अरुण कडे धावली, "अहो, शारुलबद्दल काही चुकलं का आपलं?"

"का ग? आनंदी आहे ती, नाती मेकअप करायला शिकते आहे. अजून काय?"

"नाही! त्या दिवशी तिचे डोळे लाल होते आणि बोलण्यात काहीतरी मला खटकत होतं "

"हो मलाही जाणवलं पण मी बोललो नाही."

"अहो पारं खोटं बोलली आपल्याशी, काहीतरी मुरते आहे,. मला माझी शारुल हवी आहे. तिच्या मेकअपच्या खाली काहीतरी दडलं आहे."

"असं का म्हणतेस तू ?काही नसेल."

"माझ्या शिवाय कुणाला कळू शकतं ते, रात्री तुमचा मार खायचे आणि सकाळी चेहऱ्यावर मेकअप लावून पाहुण्यामध्ये हसत असायचे, दिवस विसरले नाही मी. तुम्ही आज सरळ झाले हो, पण तुमची लाज राखता राखता माझी मी राहिले नाही. मी जगले, मागे पुढे कुणी नव्हतं माझ्या, पण माझ्या मुलीला मी आहे. मला शारुल त्या घरात नकोय. काही तरी गफलत आहे."

अरुणचे धागे दोरे जुडायला लागले होते. त्याने मुलाला गाडी काढायला सांगितली आणि सर्व निघाले न सांगता शारुलकडे.

शारुलकडे, पोह्चाच ते सर्व हॉलमध्ये शिरले, शारुल सर्वांसमोर खली बसली होती, काय सुरु होतं कळत नव्हतं पण असं सर्वाना बघून ती उठली आणि काहीच झालं नाही अस दाखवत बोलू लागली. अराध्याने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, "शारु, तुला ह्या नात्यांना मेकअप करण्याची गरज नाही, आयुष्य झिजून जातं ग, पण नाती मेकअप होत नाहीत. काही ना काही नवीन कारण येत राहतात. तू किती चेहऱ्यावरच्या मेकअप मध्ये लपवशील, कधी हसणं कधी रुसणं चालायचचं पण ज्याला झाकायसाठी ह्या मेकअपची गरज पडते ना ते मग बोचतं.आणि आयुष्यभर आपला तो स्वभाव होवून जातो. आम्ही घ्यायला आलोय तुला, चल, त्या दिवशी तुझे ते लाल डोळे खूप काही बोलून गेले."

मग परत शारुल चे बाबा जोरात बोलले, "बेटा तू सांगते आहे कि आम्ही ह्यांना विचरायचं?"

 "बाबा, हे सर्व ५ लाख मागत आहेत, आणि मुख्य म्हणजे मला मागायला सांगत आहेत, तुम्ही रिटायर होणार मग तुम्हाला काही रक्कम मिळेल त्यात माझा वाटा मला माग असं ह्या सर्वांच म्हणणं आहे. पण मला माहित आहे तुम्ही कर्ज काढून लग्न केलत आणि दादाच अजून शिक्षण सुरूच आहे मग मी नाही म्हणंत होते आणि ..."

ती रडत म्हणायला लागली, "मी नौकरी करायची म्हणत होते, तर मला नाही बोलले हे, म्हणतात आमच्या घरात बायका कामाला जात नाही."

आता तिचे शब्द फुटत नव्हते. अश्रूसोबत चेहऱ्यावरचा मेकअप वाहून गेला होता....

 अराध्याने तिच्या मुलीचा मेकअप मध्ये जीव गुदमरू दिला नव्हता...तिला बोलतं केलं होतं. 

सह परिवार उभे होते तिच्या पाठीशी...आणि प्रयत्नात होते कसं तिचं आयुष्य मेकअप करता येईल...

कथा कशी वाटली नक्की कळवा! कारण नाती मेकअप करण्यात आपण पटाईत असतो पण स्वतःला मेकअप करताही यायला हवं तेव्हांच त्या चेहऱ्यावरच्या मेकअपमध्ये चेहरा खुलून दिसतो
बघा पटलं तर...

©️उर्मिला देवेन

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

stay connect आणि stay safe... नवीन कथेसाठी पेजला लाईक/ फॉलो नक्की करा. 

https://www.facebook.com/manatlyatalyatब्लोगलाहि फॉलो करू शकता.

 

फोटो साभार गुगल...

 सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.






Post a Comment

0 Comments