जोडीदार...तू माझा...




जोडीदार... तू माझा... भाग १ 

मोहिते निवास, ह्या वस्तूला आणि ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सानवीच्या जोडीदारची वाट आहे. ह्या वास्तूचा आत्मा, सानवी!

जिला घरात लाडाने सर्व सानू म्हणतात, बरका!

जिच्यावरच्या जवाबदारीमुळे ती सतत लग्न हा विषय टाळत आली आहे. आजवर घरी येवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलाला तिने नकार दिला आहे, घरात आईच्या नाकात अगदीच दम आणला आहे तिने.

पण, आज बाबांच्या सांगण्यावरून पाहुण्यांसोमार येण्यास तयार झाली.

आई आरतीचा घरात नुसता गोंधळ उडाला आहे. आज तिच्या चढलेल्या लेकीने लग्नाचा उंबरठा चढण्यासाठी नाही नाही म्हणत फक्त होकार दिला आहे तोही बाबांमुळे. मग बघूया आज मोहिते निवासात काय सुरु आहे...

"अहो ऐकलं का?"

 "नाही ना, राणीसाहेब! तुम्ही बोललाच नाहीत अजून! मग कसं ऐकणार."

 "काहीपण हो तुमचं, लक्षात आहे ना? आज पाहुणे येणारं आहेत ते, भीमा काकांचा काही निरोप आलाय का? कि निघालं तुमच्या डोक्यातून लेकीच्या नादात.”

आरती केसांना आवरत होती.

 “अरे म्हणजे! माझ्या लेकीने होकार दिलाय, होकार! पहिल्यांना... बघ माझी पोर ऐकते माझं...”

 “हुम्म... हो! मी काय म्हणते…”

 “म्हणाना... तुम्ही काही म्हटलच नाही अजून, वाट बघतोय आम्ही.” आरतीने डोळे मोठे करून अरुणला बघितलं आणि अरुणने तसाच टाकून दिलेला पेपर घडी करून नीट बाजूला ठेवला.

 “काहीपण हो तुमचं, जरा मिठाई घेऊन या, सकाळी ऑर्डर केला होता ना आठवणीने, की बस विसरले होते?"

 "नाही नाही... लिहून ठेवलं होतं मी, आणि ऑर्डर केला होता आठवणीने, निघतो आता आणि घेऊन येतो. हा निघलो आणि हा आलो बघ!"

 आरती अरुणरावांना ओरडून ओरडून सांगत होती आणि ती स्वतः ची तयारी करत जणू घराला आणि घरातल्या सर्वाना तयार करत होती.  घर अगदीच सुंदर सजवलं होतं तिने. स्वतः जेवढी आनंदात होती तेवढीच ती सानुसाठी काळजीत होती. मनात कोलाहाल सोबत प्रचंड उत्साह होता तिच्या.

 अरुणराव गाडीची किल्ली घ्यायला त्यांच्या खोलीत आले आणि मग डोक्यावरचा चष्मा डोळ्यावर ठेवत ते म्हणाले, 

"काय दिसतेस ग तू! अजूनही...  आह आहा, जानेमन! ही नारंगी पैठणी भारी उठून दिसते ग तुला."

 "काहीपण हो तुमचं, तुम्हाला बऱ सुचतं हो असलं, काही बोलायला...एवढी धांदल सुरु आहे घरात आणि... या आता, आलेच तर माझा पदर मागून बरोबर टाचा बर. ही पैठणी पण ना भारीच आहे."

 

"अरे, तू पण भारीच आहेस कि, राणीसरकार! “

“काहीपण हो तुमचं, करा जरा मदत मला, बघताय काय नुसते.“

“मग, तू तर आपली जीगरा आहेस ग! आण ती पिन इकडे. बघ कसा एकदम फिट टाचून देतो. आणि तुला नाही बघू तर कुणाला बघू ग मी... तुचं तर आपली जीगरा, राणीसरकार."

“काहीपण हो तुमचं, पूरे आता, टाचा पिन आधी.”

आरतीने अलगत मान हलवली आणि पिन अरुणच्या हातात दिली. अरुणराव पिन टाचत होते आणि आरती त्यांना म्हणाली,

"काय हो, तुमची लाडाची लेक, येणार आहे ना आज तरी वेळेवर घरी? कि लावते वाट आपली वाट बघून बघून, मला बाई तिचं काही खरं वाटत नाही."

"हो तर! हाफ डे घेतो म्हणून सांगून गेली ती... येईल माझं पोरं वेळेवर, तू तिला बोलायचं नाही.  नुसती बडबड करत जावू नको माझ्या पोरींच्या मागे. कामाची पोरं आहे माझी, कळलं!”

“हुमम... अजून चढवा डोक्यावर तिला.”

“अरे टीम लीडर आहे माझी लाडाची लेक... आहे का आपल्या अख्या घराण्यात कुणी... अशी अशी बोलते फॉरेन क्लाइंटशी... मग, तुझ्या सारखी नाही चार लोकं जमा झाले कि बोबळी बंद."

 “काहीपण हो तुमचं, पूरे आता, आधी माझ्या साडीची पिन टाचा, पिन. तुम्हाला के माहीत तेच चार लोकं मागे पुटपुटतात तुमच्या लाडाच्या लेकीच्या नावाने.”

“ठेव तुझे ते चार लोकं तुझ्याजवळ, माझी लेक आहेच तशी... अरे शेर का बच्चा है!, अश्या चार लोकांच्या बोलण्याने भीत नाही ती.”

आरतीने अगदीच मान हलवत हुस्कारा दिला आणि साडी आवरायला लागली, अरुणरावांनी गुणगुणतच साडीला पिन टचण्यात आरतीला मदत केली, नंतर त्यांनी तिच्या साडीच्या निऱ्या बरोबर करून दिल्या. आणि डोळा मारत गुणगुणायला लागले,

“ऐ मेरी जोहरा जबीं
तुझे मालुम नहीं
तू अभी तक है हसी
और मै जवान…..”

 गाणं गुणगुणतच ते मिठाई आणण्यासाठी निघाले. आरती मात्र डोळे वटारून बघता बघता स्मित हसली, रागाने लाल झालेला तिचा तो चेहरा अलगत गुलाबी झाला होता. मनात हसतच तिने साडी आवरली आणि स्वतःला आवरत खोलीची आवराआवर केली.

 अचानक ती थांबली, हसली,

“अहो, काय हे!, अजूनही तुमचं हेच सुरु असतं, सोडा माझा पदर. आधी पदर ओढायचा आणि मग...”

आणि आरती पलटली, बघते तर काय अरुण रावं कधीच निघून गेले होते मिठाई घेण्यासाठी. आरतीचा साडीच्या पदराचा रेशमी धागा संदुकाच्या कोपऱ्याला अडकला होता.

आरती मनातच लाजली, हसली, म्हणाली,

“मीही अडकले आहे अशी माझ्या जोडीदारात, भास, आभास आणि सहवास फक्त तुमचा असतो अरुणराव... तुमचं आणि माझं नातंही असचं रेशमी धाग्यांनी गुंतलं आहे, आणि आता तर ते अटकलेलं आहे, माझा जीवं तुमच्यात आणि तुमचा माझ्यात, अडकलाय हो, जोडीदारच्या नात्याने... तू माझा मी तुझी मग ना कसली बाधा जोडीदार तू माझा...”

 बोलता बोलता ती परत मनातून हसली आणि अलगत ओठांवर हास्य आलं. मन विचारात होतं पण हलक्याश्या त्या स्मरणाने आनंदी झालं होतं.

 आरतीची मोठी मुलगी सानवीला पाहुणे बघायला येणारं होते. मनाने परत उभारी घेतली होती तिच्या. पण जरा वैतागून संतापली होती आरती, घरात तिलाच हुरूक होता मग कामाने कासावीस झाली होती. मुलींच्या खोलीत जाऊन परत ओरडली, 

"काय ग राणी! ताई कुठे आहे? लाव तिला फोन, अजून कशी आली नाही ती, आज तर हाफ डे घेणार होती ना?"

राणी सानवीची लहान बहिण, खोलीत अभ्यास करत होती, पदवी परीक्षा जवळ होती तिची.

राणीशी बोलता बोलता आरती हॉल मध्ये आली,

"काय सांगावं बाई ह्या आजकालच्या मुलींचं, आमच्या वेळ आम्ही घरात लाजून राहत होतो आणि ही टीम लीडर बाई तर अख्या ऑफिस मध्ये सांगून येईल घरी कदाचित."

 हॉलमध्ये बाळू होता, सानू आणि राणीच्या मधला, सानुपेक्षा लहान आणि राणीपेक्षा मोठा. अंकित, पण त्याला घरात सर्व बाळू म्हणायचे कारण सानू त्याला बाळू म्हणून बोलवायची.

 आरती त्याला म्हणाली, "बाळू, अरे ती लायटिंग लावली का तू?”

 बाळू मोबाईलमधून डोकं वर काढत म्हणाला, “हे काय सुरु आहे ना.”

 “आणि हा, तुला बजावते ताईला अजिबात चिडवायचं नाही, मोठी झाली रे ती आता, काही दिवसाने बायको होईल ती तिच्या नवऱ्याची, आवडायचं नाही हा.., असला फाजीलपणा तिच्या अहोला. काय म्हणते मी ऐकतोस ना?"

 बाळू आईच्या सांगण्यावरून दुपारपासून घरात लायटिंगच काम करत होता. बाळू लाइटिंग सुरु करून बघत होता आणि तेवढ्यात म्हणाला,

"आई, काय गळा काढून ओरडतेस ग?  पाहुणे तायडीला बघायला येणार आहेत, घराला नाही. हे बघ... तरी, तुझ्या समाधानासाठी चमकवलं सगळं. बघून घे कुठून लाईट हवा तुझ्या लाडाच्या लेकीवर, कुठे उभी राहणार आहे ती? आणि चिडवायच म्हणशील तर ते तू तिला आधी सांग."

 "असं, सांगतेच येवूदे, आणि तुला काय माहित रे! घरही बघतात सगळे, तुझ्या वेळेस जावू ना तेव्हां सांगते तुला. मग कसा चोरून मुलीकडे बघातांनी घराकडे बघशील. आणि घरी मला सांगशील. काय रे तुझ्या ताईला लाईट हवा का? येऊदे घरी सांगते तिला... मग बघ तू आणि ती. तिच्या समोर बोल ना असा."

 "ये आई, मी नाही करणार हा असला बघण्याचा प्रोग्राम.. एका वेळेस काय बघणं झालं! ओळख नाही पाळख नाही, या आणि खा. आणि विचारणार, मुलीला स्वयपाक करता येतो का? गाणं म्हणून दाखव... चालून दाखव... अर्र आपल्याला नाही जमायचं बुवा.

मला सांग, काय सांगशील माझ्या त्या चढलेल्या बहिणीबद्दल? आहे कुठे तुझी ती नक्षत्र! रुपाची राणी. टीम लीडर... कोणत्या मुहर्ताला जन्माला आली काय माहित? असा लाईट पाडतो ना तिच्यावर की एकदम पसंत पडली पाहिजे. सागते मोठी तिला, जा सांग. साधी चपाती येत नाही आपल्या तायडीला, 'पता नही दाल कैसे गलेगी.”

 "अरे बाळू, तू बघ, दाल गलेगी भी ओर पकेगी भी! मी आहे ना, बिलकुल ट्रेन करून सोडू तुझ्या ताईला आणि तुझ्या बायकोलाही शिकवेन काळजी करू नको. आणि कारट्या, तुझे बाबा मला एकदाच बघायला आले होते. अजून सोबत आहोत आम्हीं आणि राहू... आयुष्याचे जोडीदार म्हणून... समजलं का?"

“ये माझी गोड गोड आई, तू आणि बाबा तर आहातच ग पक्के जोडीदार, पण मला सांग तुला विचारले होते का ग असे प्रश्न... तू म्हणे चालून दाखवलं होतं, नाही, आजी सागायची... कशी चालली होतीस ग आयडे... तेही शिकव तुझ्या त्या तुफान मेल एक्ष्प्रेसला...”

“बाळू, अति होतंय रे, येऊ दे तिला...” आई सोफ्यावरच्या उश्या आवरत म्हणाली.

“काय अति होतंय ग! वादळ आहे ती! वादळ! कशी तयार झाली काय माहित बघण्याच्या प्रोग्रामला? नुसतं काम लावलं माझ्या मागे... घे लागले लाईटस सगळे... पण येणारं आहे ना आजतरी... नाही, अजून पत्ता नाही तिचा, बघ बाबा नाहीतर आपण सगळे इकडे वाट बघणार आणि ती टीम लीडर टीम वर मिटिंग करण्यात बिझी असणार... बघ काळजी मला तुझी आहे आई.”

“हो रे, तुला काळजी आहे माझीं , नाही? मग उचल हा सारा पसारा आता आणि लाईटिंग लावून दाखव मला.”

आईने बोलतांना हळूच बाळूचा कान धरला होता. आणि बाळूने तो अलगत सोडवत आईला लाईट्स ओके करून दाखवले होते.

आई परत स्वयंपाक खोलीकडे निघाली, तिचा पोहा अगदीच तयार होता. नवीन प्लेट्स, आणि कप ती काढत होती. शरबत अगदीच तयार ठेवलं होतं.

सर्व करतांना तिच्या मनात धाकधूक होतीच, सानू अजूनही आली नव्हती, ना तिचा काही फोन होता. पाहुणे येण्याची वेळ झाली होती तरी सानवीचा पत्ता नव्हता. आरतीची घालमेल वाढत होती.

हातातलं काम सोडून ती परत राणीच्या खोलीकडे बडबडतच निघाली,

"कधी येईल ही आणि कधी तयारी करेल, काय माहित, कुणी आवडतं असेल तर सांगावा अश्या मुलींनी, कशाला घालायचा हा एवढा घाट आम्ही. अजून... अजून बाईचा पत्ता नाही."

 "राणी..... केला का ग फोन तिला?"

आईने सानुला फोन कर म्हणून राणीच्या मागे तगादा लावला होता. घर सज्ज झालं होतं पण सानूचा अजूनही काही पत्ता नव्हता....


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

नोट- कथा रेजीस्टर केलेली आहे. तेव्हा कॉपीराईट कायद्याला हातात घेवू नये हीच विनंती


Post a Comment

0 Comments