जोडीदार... तू माझा...(भाग २)



जोडीदार...भाग २




भाग १ इथे वाचा जोडीदार भाग १

आरतीची घरात गडबड सुरु होती, मनातल्या मनात तिरपिट उडाली होती तिची. धाकधूक होतीच की सानुने ह्या वेळीही न येवून पाहुण्यांना परत पाठवेल. तिचा पारा वाढत होता. ती परत ओरडली,

“राणी लावला काय ग फोन त्या टीम लीडरला.”

"हो आई, तिची महत्वाची मिटिंग सुरु आहे म्हणत होती, संपली कि निघते म्हणाली. आतापर्यंत निघाली असेल, तू शांत हो. मी अजून करते तिला कॉल." राणी तिचे पुस्तक आवरत म्हणाली.

अरुणराव मिठाई घेवून परतले होते, हॉलमध्ये शिरताच म्हणाले,

"काय तापलय ग बाहेर! सहा वाजलेत पण अजून उन ओसरली नाही, आरती मी आलो ग, ह्या मिठाया ठेव फ्रीजमध्ये."

राणी हळू आवाजात बाबा जवळ जात म्हणाली, "बाबा आईचा पारा पार भडकलाय."

बाबा आताल्या खोलीत डोकावत म्हणाले,

"ह... तो काय! सदा कदा तसाच असतो, काय झालं?"

"अहो बाबा, अजून ताई आली नाही ना!"

"अरे.. आली नाही अजून! आतापर्यंत यायला हवी होती ती... येईल येईल... अजून काही पाहुणे आले नाही. ते येतील सात आठपर्यंत. तू ह्या मिठाया आधी आतमध्ये घेवून जा. मी जरा झाडांना पाणी देतो ग, माझी झाडं वाट बघत असतील माझी. झाडांना पाणी द्यायला हवं..."

खरं तर् बाबांना आता सानूची काळजी वाटत होती, हाफ डे घेवून येणारी सानू अजून घरी आली नव्हती. त्यानाही आता मागचा प्रसंग आठवत होता, सानू अशीच रात्रीपर्यंत घरी आली नव्हती, आरतीने अरुणला रागवून सारं घर अंगावर घेतलं होतं. अरुण गुमान चोरासारखा रात्री सोफ्यावर बसून सारंकाही ऐकत सानूची वाट बघत बसला होता, आठवून अरुण गडबडला. बाहेर बगीच्यात आल्यावर त्यांनी तिला कॉल केला तर तिने उचलला नाही. परत कॉल केला तर कट केला. बाबा मात्र गुमान झाडांना पाणी देत तिची वाट बघत होते.

तेव्हाच त्यांचा मोबाईल वाजला, हळबळीने हातातला पाण्याचा पंप त्यांनी बाजूला गवतावर टाकला आणि सदऱ्याचे खिशे चाचपत होते, हाताला मोबाईल लागला तोच बंद झाला, डोळ्यावर चष्मा ठेवेपर्यंत परत मोबाईल वाजला पण आता नंबर नवीन होता, अरुणरावांनी मोबाईल उचलला, समोरून भीमा काकाचा आवाज आला, जे मुलांकडच्यांना घेऊ येत होते,

"अरे अरुण हा मोठा रास्ता बंद केलाय हो, गाडी येणार नाही घरापर्यंत, मागच्या बाजूने मला काही घर गवसणार नाही."

"अरे हो का!, थांब, मी बाळूला पाठवतो, पण रास्ता कसा बंद झालाय रे.”

"काही नाही रे इथे विजेच्या खांबाच काम सुरु झालंय, होईल सुरु, काळजी नको. गाडी मी आपल्या सदाकडे लावली आहे.”

“आणि हा तुझा नंबर नाही ना रे? मी तर गोंधळलो होतो."

“माझा मोबाईल बंद झाला रे, हा आपल्या पाहुण्यांचा नंबर आहे. आणि गोंधळायला झालंय काय, आपली सानू येणार आहे ना? की आजही लावते माझी वाट पाहुण्यांसमोर."

 

“अरे तो तुझा फोन बदल आधी, साल्या किती दिवसाची ते डबी वापरतो... आणि माझी लेक मला बोलून गेली. येईल.... ये तू...”

“बर, बर, बघतो तुला नंतर... आधी येतोय मी. हे जरा रस्ता सुचत नाही आहे मला.”

"बरं रे भीमा, तू होतास पाहुण्यांसोबत म्हणून बर झालं रे, थांब जरा तिथेच बाळूला पाठवतो."

मोबाईल बंद केला तर एक मिस कॉल अजून दिसला त्यांना, हळबळीत बघितला तर सानूचा होता. पण आधी बाळूला त्यांनी आवाज दिला,

 "बाळू, अरे जा रे समोरच्या चौकापर्यंत, पाहुणे थांबलेत, गाडी इकडे येत नाही म्हणतात."

बाळू घरातून धावत बाबांजवळ आला आणि हळूच म्हणाला,

"अरे हो बाबा, सांगायचंच राहिलं, काम सुरु होणार होतं आज त्या डीपीच, आपल्याकडे इनव्हर्टर आहे ना म्हणून समजलं नाही आपल्याला."

"आता रे?"

"काही नाही, दोन तासाच काम ते, काळजी नका करू, आणि आईला तर सांगूच नको, उगाच डीपीच्या नादात बीपी वाढवायची आणि आपली धावपळ."

बाबाने त्याच्या पाठीवर हात ठेवला, “अरे जा लवकर, पाहुणे थांबलेत “

बाळूने स्लीपर घातल्या आणि तो धावतच निघाला.

बाबांची काळजी मात्र वाढली, सानू काही अजूनही मोबाईल उचलत नव्हती. आणि पाहुणे समोरच्या चौकात पोहचले होते. आईची घरात गडबड आणि बडबड सुरूच होती. घरही काळजीत होतं.

बाबा घरात गुमान आले आणि आधी राणीकडे गेले,

“बाळा राणी, ताई अजून आली नाही ना ग? तुला काही माहित आहे. फोनही उचलत नाही ग ती.”

“अहो बाबा, ताई कशी आहे तुम्हाला माहित आहे ना.”

“हो, पण मला बोलली ती येईल म्हणून. नाही करत ग अशी ती. ह्या वेळी नाही करणार ग ती. येईल ना?”

“अहो हो, येईल ती पण तिच्या वेळेनुसार. मी केलाय तिला कॉल, तिची महत्वाची मिटिंग आहे म्हणाली, निघते म्हणून बोलली मला... कदाचित निघाली असेल.”

“बऱ... येईल माझी लेक... पण वेळ खूप झालंय ग, पाहुणे येवून ठेपलेत आता. आईची काळजी बरोबर आहे तिच्या जागी.”

“हो बाबा, पण तुम्हाला तर माहित आहे. तिने आधीच नौकरीशी लग्न केलंय.”

“अग राणी असले जोक्स नको ना करू आता.... तुला माहित आहे का? ते सांग. नाहीतर तुझी ती आई माझे उरलेली केसं आज पूर्ण उपडून टाकायची.”

“बाबा आई ऐकेल हा... मग मी काय घरात कुणीच वाचवू शकत नाही तुम्हाला.”

“ये बाई आता जीव घश्याशी आलाय ग, सांग ना.”

बाबा काळजीत पडले होते, राणीने त्यांना पाणी आणून दिलं. पाणी हातात घेत बाबा विचारात शांत राणीच्या खोलीत बसले होते. तोच राणीच्या फोनवर मेसेज आला. आणि राणी म्हणाली,

“बाबा, टेक चिल पिल. येत आहेत आपल्या लाडक्या बाईसाहेब, टॅक्सीने.”

बाबांनी पाण्याचा घोट घेतला, “चला येत आहे माझी राजकुमारी... वेळ का झाला ग तिला?

“बाबा, अहो आज तसाही फ्राइडे, सर्व लेट असतं ऑफिसमध्ये. आणि आपल्या बाईसाहेब तर टीम लिडर आहेत. अडकल्या होत्या मिटिंग मध्ये. बघा मेसेज आहे तिचा निघाल्याचा. येते ती. तुम्ही जरा शांत व्हा.”

“मी चिल आहे ग, मला माहित आहे माझी लेक मला बोलली तर नक्की येणारं पण ती तुझी आई आहे ना नुसती माझ्या लेकीच्या मागे लागत असते. घाबरतो मी तिला.”

“असं बाबा! सांगू का आईला?”

“ये बाई, आता कशाला अजून तिला भडकवते, आधीच ती तापली आहे.”

“बाबा, म्हणूनच तुम्ही शांत राहा, कसं ना कुणीतरी शांत हवं “

“असं, काय ग तेच तर करत आलोय मी आतापर्यंत.”

“बाबा, गोड आहात तुम्ही... उगाच हा वाव आणू नका, सानुदी अजून आली नाही म्हणून तुम्हीही तेवढेच काळजीत आहात, फरक काय सांगू, आई बोलून दाखवते आणि तुम्ही शांत राहून काळजीत असताच. पाणी संपवा, मी करते ताईला फोन अजून.”

बाबा उगाच आपण काळजीत नाहीच असा आव दाखवत होते. पण काळजीने कोरलं होतं त्यांना. जरा डोळे मिटून शांत होते. राणी परत सानुला फोन करत होती.

इकडे बाळू पाहुणे घेवून पोहचला होता. आवाज येताच आरती पाहुण्यांच्या स्वागतासाठी हॉलमध्ये आली, मोठ्या आदराने तिने सर्वाना बसायला सांगितलं. भीमा काकाने अरुनरावांना आवाज दिला,

"अरुण, अरुण, मित्रा, ये रे बाहेर, पाहुणे आलेत. आहेस कुठे?"

अरुणने पाणी संपवलं, दिर्घ श्वास घेतला, समोर सानुचा चेहरा आला त्यांच्या, आणि मनाला भरारी आली, अगदीच हसऱ्या चेहऱ्याने ते बाहेर आले,

“नमस्कार सावंत साहेब, त्रास झाला ना तुम्हाला, अहो जरा...”

सावंत साहेब हसत म्हणाले, “अहो नाही नाही मोहिते साहेब, त्रास कसला त्यात नाही, हे काय चालायचं. आज गाड्या आल्या नाहीत म्हणून काय झालं, बघा उद्यापासून येणार इकडे...”

“नक्कीच हो... असचं होवू देत आता.... आनंद आहे. या या, बसा.”

पाहुण्यांनी हॉल भरला होता. आता हॉलमध्ये बाळू, आणि आईबाबा होते, भीमा काकाने सर्वांची ओळख करून दिली, मुलाची आई, बाबा, मामा, मामी आणि काका, काकी, आणि मुलाची लहान बहिण आली होती. आता बाबांची नजर मुलाला शोधत होती तर भीमा काका म्हणाले,

"अरे अरुण, मुलगा येतोय, त्याची एक अर्जंट मिटिंग निघाली... पण तो पोहचतोय, टॅक्सीत आहे म्हणाला, आताच सावंत साहेब बोलले. आपण जरा एकमेकात मोकळे होवुया. आजकालच्या मुलांना काय हो! ते मोकळेच बोलतातच. काय हो सावंत साहेब."

“हो हो, भीमा काका, अगदीच खर बोललात तुम्ही, मुल बोलतीलच हों, आपण बोलूया आधी.” सावंत साहेब हसत म्हणाले.

वातावरण कसं मोकळं झालं होतं. आता अरुणरावांचा पूर्ण चेहरा तजेला झाला होता त्याच्या मुलीला तोड मुलगा आहे अशी जाणीव त्यांना झाली होती. मनातच पुटपुटले,

"आहे रे बाबा! असा कुणीतरी, माझ्या लेकीसारखा... येईल माझी सानू आणि घेईल सगळं सांभाळून, मग, आहेच माझं पिल्लू. परमेश्वर पण ना वर तोडीला तोड जोडी बांधतो, बसं गवसावी लागते इथे."

पाहुण्यामध्ये गप्पा रंगल्या होत्या. मुलाकडले घरही नेटून बघत होते. सावंत साहेब, अरुण आणि भीमा काका मंडळी, त्यांच्या आवडत्या म्हणजे राजकारण ह्या विषयावर बोलत सुटली होती.

 आईची घालमेल वाढत होती. घर परत आज दुमदुमलं होतंच, घराल्या गोष्टी ऐकत जरा हसत होतं. काहीस काळजीत होतंच, घरात अजून आत्मा शिरला नव्हता मग बेचैन होतचं. त्यालाही वाट होती सानू घरी येण्याची आणि तिच्या जोडीदाराची... मग भेटूया पुढच्या भागात.


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल


Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)