गुण्या भाईची माणसं हसत होती आणि अम्मा मनात जशी धकधकत होती, तिला तिचं उभं आयुष्य आठवत होतं. स्वतःला शांत करत ती त्यांना म्हणाली, “हा जी! जैसा भाई बोले तैसा, पण पोरीची काही हिस्ट्री!, कोण हाय, कुठून आली, नाय म्हणजे हमकु खुच लोचा नाही मंगता ना.” “हाय ना, भाईला तिची मायबी पसंत होती, चाखली एकदाचं पण तिनं आत्महत्या केली मग ही पोरं गावली भाईला १० वर्षांन. अजून एक, हिच्या बापाला भाईच्या सांगण्या वरून आम्हीच विहिरीत टाकलं होतं, भाईच्या हातून त्या चंपा आयटेमचा खून होतांना पायलं होतं त्यानं.आणि गावाकडे पळाला होता. धरलं अन फेकलं. काय!” ते परत हसायला लागले. त्यातला एक परत म्हणाला, “भाऊ हाय एक पण तोही मारला असलं बटाटा भाईन तिकडं, नायतर काही केलं असेल त्याचं, अम्मा तू काळजी नको करू, कोणी बी येणार नाय तुझ्या दारात पोरीसाठी. ना पोलीस ची झंजट हाय, ना कोण्या नातेवाईकांची...कर पोरीला तयार..एकदम फटाका. जालीम दिसली पाहिजे... हाय बिन गोरी चीट, अम्मा आता तुझा राज गेला, तू म्हणत होतीस ना तुह्या वाणी कुनीबी नाय इथे म्हणून, मग हाय ना तुले तोड ही पोरं...” अम्मा, स्मित हसली, काहीच बोलली नाही, मुजरा करत तिने त्यांना तिथून निघून जाण्याचा इशारा केला. भाईंचे माणसं निघून गेले आणि अम्मा तिच्या बैठकीत गुमान गप्प बसली, जरा वेळाने तिने भावनाकडे जाऊन बघितलं, ती अजूनही एका कोपऱ्यात बसली होती. रडत होती, दुःखाने कणहत होती. अम्माने जेवण मागवलं आणि घेऊन ती तिच्या खोलीत शिरली, “बेटा, जेवून घे, तुला बरं वाटेल. उद्या मी डॉक्टरला बोलावलं आहे.” “अम्मा दादा, माझा दादा येईल ना?” अम्मा स्मित हसली, “हो येईल, तू आधी जेव, अग बाई येईल... पण तुला आधी जेवावं लागेल ना ?” अम्माच्या सांगण्यावरून भावना जेवली आणि झोपली. दिवसं उजेडात येत होते आणि रात्री अंधारात लवकर शिरत होत्या. अम्मा भावनाची खूप काळजी घेत होती. आता ती रोज विचारात होती कि तिचा दादा कधी येईल आणि तिला घेऊन जाईल. आणि अम्मा रोज तिला काहीतरी बोलून गप्प करत होती. हळूहळू भावना तिथलं सर्व बघायला लागली, हळूच खोलीतून बाहेर बघायला लागली. वर्ष झालं पण दादा काही आला नव्हता. एक दिवस तीने स्वतःच तिथून निघून दादाकडे जाण्याचा विचार केला, खोलीच्या बाहेर आली, सर्व कामात व्यस्त असतांना ती हळूच रस्त्यावर आली. काहीच सुचत नव्हतं, बस स्टॅन्ड शोधत होती तर भाईच्या माणसांनी तिला पकडलं आणि परत अम्माकडे नेवून आपटलं, "अम्मा ये बाहर एस टी स्टॅन्ड की तरफ थी, क्या तुम! भाईको पता चालता तो तुम भी और ये भी वही गड्डे मे होते." अम्माने भावनाला ओढत खोलीत नेलं, “काय ग बाई, तुला कळत नाही का, आता तू इथून निघूच शकत नाही, बस्स निघायचं असेल ना तर हिम्मत ठेव.” “पण मले माह्या दादा कडे जायचं हाय. माह्या दादा कावून येत नाय, तो मनला होता येयीन म्हणून. तो कुठे हाय.” आणि ती परत रडायला लागली. “तो माहित नाही, कदाचित मारला असेल ह्या लोकांनी म्हणून आला नाही ना तुला घ्यायला!” भावना ओरडून ओरडून रडायला लागली, अम्मा तिला शांत करत होती. पण ती अम्माला म्हणाली, “मग मालेबीन मरायचं हाय, माझावाला बापू विहिरीत पडून मेला, आईने टांगून घेतलं, भावाला मेला म्हणतस, आता म्या काय करू.” आणि ती रडायला लागली, मनाने सैरावैरा झाली होती, रडणं थांबत नव्हतं, अम्माला आता राग आला, “काय करू म्हणजे, घे बदला, तुला बदला घ्याचा आहे म्हणून तू जिती हायस, तुला माहित नाही तुझ्या बापूने विहिरीत पडून आत्महत्या नाही केली, त्याला भाईच्या लोकांनी विहिरीत फेकलं होतं, तुझ्या सोबत जे गुण्या भाईने केलं ना तेच तुझ्या आईसोबत त्याने केलं होतं आणि नेहमी करणार होता म्हणून तिने स्वतःला समपवलं... तुझा भाऊ, तुला सोडवतांना कदाचित मारला गेला किंवा असेल तर हे लोक त्याला जगू देणार नाहीत. आत सांग तू ही मरणार कि ह्या सर्वांचा बदला घेणार गुण्या भाईकडून... काय म्हणतील तुझे माय बापू ..आणि तुझा भाऊ ?” भावना भावना शून्य झाली होती, अनाथ तर ती आधीच होती पण आता भावाचाही पत्ता नव्हता.... जगून काय करायचं हा तिला प्रश्न होता. तिला असं तुटल्या सारखं बघून अम्मा म्हणाली, “हे घे जहर हाय, कुछ नही मिठा है... एक घुट पिऊन घे आणि संपव सारं. नाहीतर ह्या आयुष्याचं जहर पी आणि हो ह्या जगावर राज्यकर्ती... निवड तुझी, मरायचं कि मारायचं, जिंकू द्यायचं की जिंकायचं... मरतात तर सारेच पण त्याला मारून आणि हरवून मर, ज्याने तुला मरणाच्या दारात उभं केलं... आपली निवड आपलं आयुष्य ठरवते असं म्हणतात.” म्हणत ती जोरात हसली, आणि तिच्या गालाला हात लावत म्हणाली, “नियतीने तुला ह्या वेशालयात आणून उभं केलं, निवड तू केली नाही, पण आता तू निवड कर... आणि काय ग! बदला काय आदमीच घेऊ शकतात? आपण नाही? स्त्री काहीही करू शकते पण ती चार भिंतीत राहणारीच का? भिंती तर इथे ह्या वेश्यालयातही आहेत... आणि दगड, सेमन्टच्याच आहेत....काय फरक आहे? त्या स्त्रियांनी केली तर त्या महान आणि आपण काही केलं तर आपण नुसती घाण...” आणि ती हसत खोलीतून निघून गेली. भावना बघतच राहिली, समोर जहराची बॉटल होती आणि कदाचित चवीला गोड पण आयुष्याचं जहर त्यापेक्षाही कडू आहे हे तिला माहित झालं होतं, मनात निश्चय केला हात पुढे करून तिने विषाची बॉटल उचलली, आणि जोरात समोरच्या भितींवर फेकली... आणि गाणं म्हणायला लागली, “एक होती भिंगरी...एक होती भिंगरी... तिचं नावं झीगरीं... तिचं नावं झिंगरी.... भिंगरी एकापायावर फिरते...मीही फिरणार आणि समोरच्याला माझ्या नोकाने गड्डा करून तिथेच दाबणार आणि परत त्याच जागी घुमणारं .... भिंगरी .....” आणि ती जोरात ओरडली ... “भिंगरी...” त्या चौदा वर्षाच्या भावनेत आता भावना उरल्या नव्हत्या, ती बदल्याने पेटून उठली होती, मरणाला तिला स्वीकारायचं होतं पण समोरच्याला मारून हे तिने पक्क केलं होतं. खोलीचं दार भावणाने उघडल, सर्व बायका तिच्याकडे बघत होत्या, समोर बसलेल्या अम्माकडे ती गेली आणि म्हणाली, “अम्मा आजसे मै भिंगरी... आज भावना मर गई, अभी आपके सामने भिंगरी खडी है! आप तालीम दो, मी तयार हाय... एका पायावर घुमायला... जोपर्यंत समोरच्याला गड्ड्यात दाबणार नाही ना मी घुमतंच राहणार.”
भिंगरी तयार झाली होती ...वादळ निर्माण करण्यासाठी ... मग पुढच्या भागाची वाट बघताय ना .... लवकरच पुढचा भाग...
आधीचे भाग इथे वाचण्यासाठी इथे क्लिक करा ->भाग १ ते ९ इथे वाचू शकता
पुढच्या भागाच्या अपडेट साठी माझी पेजला लाईक करा आणि लवकर अपडेट मिळवा ....
कथा
कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा.
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
तुम्ही
देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर
कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
0 Comments