ब्लॉक... द कॉर्पोरेट लॅडरभाग१८
आज समृद्धीने सुहासला भेटायचे पक्के केले होते, ती घरून लवकर निघाली, त्याच्या खोलीवर पोहोचली, सुहासला समोर बघून जणू तिला अश्रू आवरणे अशक्य झाले होते. ती त्याला बिलगली, दोन महिन्यांपासून दोघांची भेट होत नसल्याने समोर आल्यावर दोघेही ऐकमेकांना आवरू शकले नाही. क्षणभर दोघेही एकमेकांत विरघळले. भेटीच्या आनंदाचा रंग तिच्या चेहऱ्यावर जणू चढला होता.
जरा वेळ दोघात शांतता होती, समृद्धीने विषय काढला, सुहास आता घरी सांगावे लागणार आहे. तो सत्यजित आणि घरचे काही निर्णय घेण्याआधी मला तुझ्याबद्दल घरी सांगायचे आहे. 
“का गं? घाई कशाला? आपलं ठरलं आहे ना... मला जरा वेळ हवा.” असं म्हणत त्याने तिच्या केसांना सावरलं.
तशी ती परत ओरडत म्हणाली, “सोड रे, नको काही करू...उगाच गुंतते मी..”
“मग, गुंतलीच तर आहेस तू... नाहीतर आली असती का?”
“मी आले कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर... आणि तुझी सोबत हवी आहे मला... घरी लवकर सांगायचे आहे...”
तसा सुहास बोलला, “काय लग्न लग्न लावतेस गं! हल्ली लिव्ह-इनमध्ये राहतात सगळे. आपण दोघे मिळून एक ब्लॉक भाड्याने घेऊ आणि राहू तिकडे... लग्न करायलाच हवे का? सोबत राहूया कशाला हे लग्नाचे बंधन.”
समृद्धी स्तब्ध झाली, सुहास बोलत होता, कसा त्याचा एक मित्र आणि मैत्रीण एकत्र राहतात, असं काही....
आणि समृद्धी त्याच्याकडे बघत थक्क झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला. तिला विश्वास बसत नव्हता की सुहास असं बोलतो आहे. ती रागात म्हणाली, “म्हणजे तुला लग्न नाही करायचे?”
सुहास गडबडला, “नाही म्हणजे... तसे नाही.. पण अजून जरा वेळ नको?”
“तसे नाही तर काय? हे बघ मी मनाने गुंतली आहे. आणि खरं तर तुझ्या स्पर्शाशिवाय मी कुणाला सहन करू शकणार नाही... आणि तू असे ऑप्शन मला देत आहेस... मी दुसऱ्या सोबत नाही राहू शकणार रे... आणि अजून किती वेळ हवा आहे?”
“मी तुला दुसऱ्यासोबत राहायला कुठे बोललो, आपण सोबतच राहूया ना, हे बघ तुझा आता पेमेंट येतो, मीही थोडं फार कमवतो, माझ्या प्रयत्न सुरु आहेतचं, तुझा घोसला कंपनीचा अनुभव कामी येईल ना आपल्याला बिझनेस सेट करायला.”
घोसला कंपनीचे नावं घेताच समृद्धीचं लक्ष घडीवर पडलं, तिला निघायचं होतं. 
“सुहास मला लिव्ह-इन मान्य नाही... आणि मी आता थांबू शकत नाही.”
तसा सुहास ताडकन बोलला, “मग नको थांबू..... निघ मी कुठे अडवून ठेवले आहे तुला... जा की.”
आता समृद्धी चिडली, “म्हणजे?”
“म्हणजे काय जा तुला ऑफिससाठी वेळ होत आहे.”
“एवढचं...”
समृद्धीने रागाने सुहासकडे बघितलं, चप्पल पायात घातली. आणि दार जोरात आपटून निघून गेली. 
तिथून निघताच तिच्या मनात चक्र फिरू लागले होते. शब्द फुटत नव्हते. अश्रुही डोळ्यात दाटले होते पण सारं काही आवरत ती ऑफिसच्या आवारात पोहोचली.  सकाळचा तो सुहाससोबतचा प्रसंग तिच्या मनात अजूनही गरगरत होता, त्याचे शब्द, त्याचा निश्चय, आणि तिची असहाय्यता का कुणास ठाऊक आज ती अस्वस्थ झाली होती. ती लिफ्टमध्ये उभी होती, पण मन कुठे तरी अडकलेलं होतं, शेजारी असलेली शनाया आज तिला दिसली नव्हती. शेवटी शनाया लिफ्टमधून बाहेर येऊन तिच्या पुढे उभी झाली, “हे.... काय झालं, कुठे आहेस तू... कधीची मी आवाज देत आहे. सोबत लिफ्टमध्ये होतो आपण. तुझं लक्ष कुठे आहे आज...”
समृद्धीच्या डोळ्यात पाणी होते, जसे तिने शनायाकडे बघितीले तसे तिने ते लपण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात शनायाने तिला कोपऱ्यात ओढले, “काय झालं? रडत आहेस तू? घरी सगळं नीट आहे ना?”
समृद्धीने सावरासावर केली, “हो गं, ते खाली काम सुरु आहे ना... काहीतरी डोळ्यात गेलेलं दिसते. मी जरा चेहरा धुवून येते. तू हो पुढे.”
शनायाने पुढे काही विचारायचे नाही असा भाव आणत तिने तिला जाण्यास परवानगी दिली आणि ती जशी एक नवीन बातमी गवसल्यासारखी उत्साहात आत शिरली. कॉरीडॉरमध्ये तिला बिपाशा भेटली, लगेच म्हाणाली, “समृद्धी रडत होती लिफ्टमध्ये.”
बिपाशाने तिचा तो तिरका कटाक्ष शनायावर टाकला, “शी, मला नको सांगू तिच्याबद्दल, शी सो लो यार... मंजिरी कशी सहन करते हिला देवच जाणे. नाहीतर आजच्या मुली बघ... आताची जनरेशन आहे यार... रडत असेल बॉयफ्रेंडसाठी... ब्रेकअप कर म्हणावं आणि पुढे जा म्हणा तिला... कशी ती... तुला सांगू ही मंजिरी ना... बघ तिला, मालकीण समजते कंपनीची स्वतःला...”
शनाया जरा गोंधळली, काय झालं होतं बिपाशा आणि मंजिरीततिला काही कळत नव्हतं. पण ती बिपाशाला समजून घेत तिच्या होला हो करत होती. दोहींचा संवाद जरा मागून शिरणाऱ्या समृद्धीने ऐकला होता... आता तिला गिल्टवाटू लागली होती, बिपाशाने कसे ओळखले असावे असेही वाटत होते. आपण जास्त मनावर घेऊन बसलो आहोत असेच वाटत होते. ती दोघींना टाळत तिच्या डेस्कवर आली. लॅपटॉप उघडला पण नजरेत कुठेही फोकस नव्हता. डोळ्यांसमोर सतत सुहासचा  चेहरा, मग मधेच सत्यजित आणि काही वेळात माधव सर तिला आठवत होते... तिचं काय सुरु आहे हेच तिला कळत नव्हतं... तीनही पुरुष वेगळेवेगळे होते पण ते सर्व आज समृद्धीच्या मेंदून गोंधळ घालत होते.  
दरम्यान, रुद्र तिच्या डेस्कजवळून गेला. त्याने तिला असं हरवलेलं बघितलं आणि  विचारलं,
“समृद्धी, ठीक आहेस ना आज?”
तीने नुसती मान हलवली, “हो, जरा झोप झाली नाही काल...”
रुद्र तिच्याकडे काही क्षण बघत राहिला,  त्याला जाणवलं, काहीतरी बिनसलं आहे. पण तो काही बोलला नाही. कारण त्याचं धोरण होतं, कॉर्पोरेटमध्ये कुणाचं वैयक्तिक विचारायचं नाही. मनात असूनही त्याने तिचा डेस्क सोडला. त्याच्यासाठी तिने त्याच्याकडे स्वतः मदतीसाठी यावं एवढंच होतं.
थोड्या वेळाने मंजिरी आली. ती थेट तिच्या टेबलाजवळ येते,
“समृद्धी, कालचा रिपोर्ट मी पाहिला. एक-दोन आकडे चुकीचे आहेत. तू पुन्हा एकदा डेटा क्रॉसचेक कर. आणि हो, आज तुला प्रेझेन्टेशनसाठी नवीन लेआउट बनवायचा आहे. मला सात वाजेपर्यंत मेल कर.”
समृद्धीने नुसतं “ओके मॅडम” म्हटलं.  मंजिरी मात्र उत्तराने थबकली, तिला तिच्या चेहऱ्यावर ना थकवा दिसला ना उत्साह... तरीही काहीही न बोलता ती निघून गेली. कदाचित तिला समृद्धीसाठी हेच हवं होतं. पण अशी ती नाही हेही तिला वाटलं, मंजिरी तिच्या कॅबीन मध्ये पोहोचेपर्यंत समृद्धीचा विचार करत होती, तिला वाटतही होतं की ती उगाच तिचा मार्ग खडतर करत आहे. तिच्या मागून आलेला सागर पुढे निघून गेला होता आणि अजूनही समृद्धी नुसती एस्केल आणि प्रेझेन्टेशनच्या चुकांनामध्ये फिरत होती. जरा थांबली, ती परत तिच्याकडे येणार तोच माधव तिला समृद्धीच्या डेस्कजवळ उभा दिसला, काय बरं हा माधव समृद्धीशी बोलत असावा असे तिच्या मनात आले आणि का कुणास ठाऊक समृद्धीसाठी मनात आलेलं सर्व पार उडून गेलं. ती तशीच तडक माधवकडे आली, “हे, माधव, मी तुझी कधीपासून वाट बघत आहे. चल मला महत्त्वाचे बोलयाचे आहे. तुझं काय काम हिच्याकडे.” बोलत तिने चक्क माधवचा हात धरला आणि त्याला घेऊन त्याच्या कॅबीनकडे निघाली.
समृद्धीने लगेच खाली मान घातली... तिला आता इथे काय झालं हेच कळत नव्हतं. माधव फक्त तिच्याजवळून जात होता. तो तर तिच्याशी बोलताही नव्हता.  जाऊदे मनात बोलत तिने कामाला सुरुवात केली. तिकडेच कॉरीडार च्या कोपऱ्यात उभी असलेल्या  बिपाशाने सर्वाना ऐकायला येतील एवढ्या आवजात म्हंटल, विच आहे ही.... “मांजर, नुसती बघत असते. हिला काय वाटते हिचा बोका कुणी पळवून नेणार....”
तिच्या ह्या शब्दाने चक्क शांतता पसरली होती. पण सर्व गालातल्या गालात हसत होते...फक्त ती आणि शनाया तेवढ्या मोठयाने हसत तिथून निघून गेल्या. त्याचंही समृद्धीला वाईट वाटलं.... 
ती पुन्हा लॅपटॉपकडे वळली, काम करायला लागली पण परत तिच्या मनात दोन स्क्रीन्स उघडल्या झाल्या, एक एक्सेलची आणि एक सुहासच्या शब्दांची. त्याचा तो लिव्ह-इनमध्ये राहू हा आग्रह तिला मनातून तोडत होता. कामात फोकस करूच देत नव्हता. 
तिने जबरदस्तीने लक्ष कामावर केंद्रित केलं, पण तिचे हात वारंवार थांबत होते. काही आकडे चुकत होते, काही फॉर्म्युला काम करत नव्हता. 
“फोकस, समृद्धी, फोकस…” ती स्वतःशीच म्हणाली.
दुपारच्या सुमारास कॅफेटेरियात गेली. शनाया आणि सागर तिथे गप्पा मारत होते. शनाया तिला बघत म्हणाली,
“काय गं, काल रात्री पुन्हा ओव्हरटाईम केला का? जरा डाउन दिसत आहेस...”
समृद्धीने कॉफी घेत म्हणाली, “हो, काही फाईल्समध्ये प्रॉब्लेम होता तेच करत वेळ झाला...”
“प्रॉब्लेम फाईल्सचा नाही, मंजिरी मॅडमचाच आहे. तुला असं बघूनही तिने आज पुन्हा काम दिलंय, अनबिलीवेबल!” शनाया म्हणाली.
समृद्धीला परत हे बरोबर वाटलं नाही... तिचं बोलण, असं बघून हे तिला जास्त खटकलं होतं. ती नुसती हसून कॉफी घेऊन निघाली, वाटलं, “सुहासने मला काय बनवून ठेवलं आहे, मी काय आहे इतरांसाठी.... मला ह्यातून निघायला हवं..” 
तिने विचारात कॉफी संपवली, आणि काम सुरु केलं, स्क्रीनवर रुद्रचा मेल होता, 
“नीड युवर पार्ट ऑफ अॅनालिसिस बाय ६. लेट मी नो इफ यू नीड हेल्प...”
तिने रिप्लाय केला, “Will do, सर.”
काही वेळ ती विचार करत राहिली, “माझ्याकडे काम जास्त आहे की मी काम करत नाही... की सुहासचा विचार करते... ने नातं मला ब्रेक करत आहे आणि मी इथून अप जाताच नाही आहे...”
तिने मोबाईल काढला आणि सर्वात आधी सुहासचा नंबर ब्लॉक केला. जरा वेळ दीर्घ श्वास घेतला... आणि अर्ध्या तासात तिने मंजिरीला मेल पाठवला. त्यात तिने माधवला ccमध्ये टाकलं होतं. मेल पाठवली आणि आता तिला समजलं, मग जरा वाटलं, उगाच मी माधव सरांना ccमध्ये टाकलं.. विचारत होती तर माधवचं बोलावणं तिला आलं... मनात आता काहीही नव्हतं. ती पूर्णपणे रिकामी होती. कॅबीन मध्ये पोहोचताच माधवने तिला बसायला सांगितलं, “समृद्धी... मला तुला एक जवाबदारी द्यायची आहे.. तू ह्यांनंतर माझा सगळा शेडूल बघ...काही दिवस तरी दोन तीन तास दिवसाचे ह्या कामासाठी ब्लॉक कर… ती जुली काही दिवस सुट्टीवर आहे... ”
समृद्धी दचकली, अवघडत म्हणाली, “सर मी आणि...”
“हो हो... बिजनेस समजायचा असेल तर सुरवातील काहीही काम करावे...  आणि हे तात्पुरतंच आहे.. माझ्यासोबत रहाशील तर बऱ्याच गोष्टी तुला कळतील.. आणि मी काही तुला पूर्ण वेळेसाठी हे काम देत नाही आहे.”
समृद्धीने नकार दिलाच नाही, खरं तर द्यायला हवा होता कारण अशाने ती मंजिरीच्या विरुद्ध उभी राहणार होती.... पण माधव सरांना ती नाही बोलू शकली नाही. माधव तिला बघून गोड हसला, तीही हसली, आज का कुणास ठाऊक तिला माधवची भीती वाटली नव्हती. उलट मनात एवढी उलाढाल असताना आज तिला माधवचं हसणं भावलं होतं. क्षणात आपण काय विचार करत आहोत हयची तिला जाणीव झाली आणि ती कॅबीनमधून निघाली. 
मनावरचा ताण पार निघून गेला होता. सुहासनावाचे प्रकरण तिने ब्लॉक केले होते. येऊन जागेवर बसली तसा सत्यजितचा कॉल होता, ती क्षणभर थांबली. मग फोनकडे बघत म्हणाली,
"नाही, आता नाही..."
आणि फोन सायलेंटवर ठेवून बाजूला ठेवला.  डोळे बंद केले तर माधव त्याच्या खुर्चीवर बसून तिला दिसला, झपकन डोळे उघडले... तरीही काहीच वाटले नाही. मोकळेपणा वाटला त्या विचारात... आता तिचे रुद्रच्या मेसेजवर लक्ष पडले आणि ती कामाला लागली. काम पूर्ण करून तिने रुद्रला मेल केली. सागरला तयार केलेल्या चार्ट्सची अॅक्सेस दिले आणि त्यालाही मेल केला. साऱ्या फाईल्स इम्पोर्ट करून बेकअप घेतला. 
काम संपवून ती बहारे आली. इमारतीच्या काचेच्या भिंतीत तिचं प्रतिबिंब दिसलं, प्रसन्न, हलकं... आज तिला तिचा हा ब्रेकअप एकटीला सेलिब्रेट करायचा होता...  सुहासशी नातं ब्रेक झालं होतं तिच्याकडून आणि आज तिला मनातून मोकळं वाटत होतं.. तिच्या प्रगतीचा ग्राफ अप जाणे सुरु झाले होते.... ती हसत निघाली होती. शनाया तिला परत क्रोस झाली. तीही गोंधळली, सकाळी रडकी समृद्धी आता संध्याकळी अशी आत्मविश्वासने परिपूर्ण तिला दिसली... आणि हा सुद्धा तिच्यासाठी गॉसिपचा नवीन विषय होता... 
to be continued...
आधीचे सगळे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... 
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे. 
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता. 
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

 
 
 
 
 
 
0 Comments