मी बाबा आहे तिचा !!!

बाप होण्यासाठी आसुसलेला तो किती मनातून बावरलेला असायचा. प्रत्येक महिन्यात बायकोला समजवतांना किती कष्ट पडत होते त्याला. बातमी कळताच जमिनीवर पाय नव्हते त्याचे. अगदीच बायकोला माहेरीही पाठवलं नव्हतं त्याने. ती त्याला अगदी समोर हवी होती. बाळाच्या प्रत्येक हालचालीला तोही जगला होता. 

तब्ब्ल बारा वर्षाच्या वनवासानंतर बाप होणार होता. त्या दिवशी काव्याला अडमिट केलेले पण धडकी मात्र कार्तिकेला भरली होती. त्याची आई देवाला नवस बोलत होती आणि खात्रीतच होती कि बारा वर्षानंतर मुलगाच होणार. अगदीच हॉस्पिटलमधल्या गणपती समोरही ती जप करत बसली होती...

तब्ब्ल चार तास कार्तिक जागेवर बसलाच नव्हता आणि मग बाळाचं रडणं ऐकलं त्याने. अश्रूच बाहेर निघाले त्याचे. मित्राने सावरलं. क्षणात नर्स बाळाला घेवून बाहेर आली आणि ते इवलंसं बाळ कार्तिकच्या हातात ठेवत म्हणाली, "लक्ष्मी आली आहे... मुलगी झाली तुम्हाला .." 

अगदीच काव्या कशी आहे हा शब्दही त्याच्या तोंडून हळबळीने बाहेर निघाला. पण मुलीला बघताच भान हरवले होते बापाचे. आज तो बाप झाला होता. त्या क्षणात जवाबदारी वाढल्याची अनुभूती झाली होती त्याला. हळूच मुलीला मिठी मारत म्हणाला, "मी बाबा आहे तुझा..." आणि मग तिचं इवलंसं बोट त्याने अलगत धरलं , तिनेही ते गच्च पकडलं. कार्तिक आंनद विभोर होवून काव्या कडे गेला.

असा एकही दिवस जात नव्हता जेव्हा कस्तुरीला बघिल्या शिवाय  तिचा बाबा झोपी जाईल. काव्या घरात काम करत असली कि त्याचं ते तिला घेवून घरात फेऱ्या मरात झोपवण. स्वतःच्या आईलाही आवाज करू नको म्हणून रागावणं अलगत कस्तुरीचा केसांना कुरवाळत तिचा पापा घेणं हे सगळं काव्यापासून लपलं नव्हतंच. शेवटी काव्यावरच वेळ आली एका बापाकडून स्वतःच्या नवऱ्याला मागण्याची. आणि आता काव्याला एका बापावर प्रेम करावंसं वाटत होतं.

हळू हळू कस्तुरी पाच वर्षांची झाली, आणि ती स्वतःही आता वडिलांच्या घरी परतण्याची वाट बघत असायची. बाबांचं घरी ऑफिस मधून येणं म्हणजे मस्तीला उधाण होतं. तिची प्रत्येक गरज पूर्ण कण्यासाठी कार्तिकची स्वतःशीच शर्यत लागली असायची. ऑफीसच्या कामातून पार थकलेला बाबा आता मुलींसाठी चॉकलेट नेता यावी म्हणून रोज बस स्थानकापासून २ किलोमीटर पायी चालत येवूनही कस्तुरीसोबत घरी येताच घोडा गाडी खेळत होता.

साधं कुठलच छोटसं कामहि कार्तिक मुलीला करू देत नसायचा आणि त्याची आई त्याला सारखं म्हणत असायची, "पोरीची जात आहे, आतापासून सवय लाव... हे काय करतोस तू...आणि काय काय "

पण, बाबा साठी तर त्याची मुलगी राजकुमारी होती आणि मुलीला राजकन्या म्हणून ठेवतांना आता बायकोलाही राणी सारखं वागवावं लागेल हेही त्याच्या लक्षात येत होतं. 

त्या दिवशी कस्तुरी हट्ट करून बसली होती कि तिला आईसक्रीम आताच पाहिजे. आणि आज्जी तिला समजावत होती कि असा हट्ट बरा नव्हे, पण सात वर्षाच्या कस्तुरीने सर्व घर गोंधळवून टाकलं होतं आणि आज नेमके बाबा उशिरा येणार होते. 

कस्तुरी बाबांची वाट बघत दारातच बसली होती आणि आजी घरात सारखी बडबड करत होती कि मुलीच्या जातीला असं वागू देवू नये. सुनेला तर तिने अगदीच धरेवर धरलं होत. मग काव्याही कस्तुरीला समजावण्याच्या प्रयत्नात होती. पण कस्तुरी काही केल्या ऐकत नव्हतीच. 

बाबा घरी १० ला आले आणि कस्तुरी अजून जागी म्हणून अवाक झाले. तिची बाजू एकूण घेतली त्यानी आणि ... ऑफिस ची bag  टाकली सोफ्यावर, म्हणाले, "अरे,  मी घेवून येतो, तू जेवायला घे ग काव्या," 

ते बाहेर निघणारच होते .

तोच त्याच्या आईने त्याला अडवलं आणि म्हणाली, "काय हे? तू थकून आला आहेस, आणि सारखे मुलीचे लाड पुरवू नको. नवऱ्याच्या घरी कोण पुरवणार तिचे असे लाड. मुलीच्या जातीला मन मारून राहता यायला हवं. चल आत मध्ये हो. आता कुठलं दुकानपण सुरु राहणार नाही, उद्या आण. थकलास आता "

कार्तिकने अलगत कस्तुरीला उचललं आणि तिला म्हणाला, "मी बाबा आहे तुझा... चल जावूया... आज आईसक्रीम पार्टी ... कुठली घ्यायची आपण."

आता आई दार लावायला उठलीच होती तर कार्तिक म्हणाला, "थांब आई, मी बाबा आहे माझ्या मुलीचा.. निदान मी असे पर्यंत तरी तिची कुठलीच इच्छा अपुरी राहणार नाही, माझी आस लावून वाट बघत होती ती, आणि मीही तिला नकारलं तर कुणाकडे बघणार पोर मोझी आणि मन मारायला नाही शिकणार ती. आज तिला मन मारायला लावलं तर ती आयुष्य एखाद्या मोठया गोष्टीसाठी मन मारेल. नाही... बाबा म्हणते ती मला, मुलगा असता तरी तू असच म्हंटल असतं का ?"

आई त्याच्याकडे अवाक होवून बघत राहिली आणि काव्याला पूर्ण शाश्वती झाली होती कि तिची मुलगी आयुष्य जगायला शिकेल, लहान पणापासून जे तिने सोसलं, तिची मुलगी कदापिही त्या गोष्टीला सामोरी जाणार नाही. बदलीचं वारं घरातूनच वाहतांना दिसलं होतं तिला. मनोमन सुखावली आणि परत एका बापाच्या प्रेमात पडली होती.

दिवस भराभर जात होती, कधी स्वतःच्या चेहऱयाला एखादी क्रीमही न लावणारा आज चक्क मुलीच्या खेळातील पार्लरचा ग्राहक म्हणून तोंडाला नाना तऱ्हेचे मेकअप लावून घेत होता. तिला सायकल यशश्वीपणे शिकवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठं काम केल्याचं सार्थक दिसत होतं. 

"का रे बाबा तुला ना काही येतच नाही" हे ऐकताच परत नव्याने गोष्टी शिकायला तयार असणारा कार्तिक आता वयस्कर बाबा झाला होता. कस्तुरीला दहावीत मार्क्स जरा साधारण पडले होते. घरात आईची जरा कुरकुर सुरु होती. त्यात शेजरच्या काकूही म्हणाल्या, "मुलगी चांगली शिकली नाही तर चांगला नवरा कसा मिळेल." आणि मग बाबा कस्तुरीला जवळ घेत म्हणले, "माझी मुलगी नवरा चांगला मिळावा म्हणून बोर्डात यायला हवी असं नाही मला वाटत, तर मन जुळतील त्या नवऱ्यासोबत आयुष्याच्या बोर्डावर यावं असं मला वाटते."

आईला त्या दिवशी परत खात्री झाली होती कि कस्तुरीचा बाबा तिच्यासोबत प्रत्येक चढ उतारावर बाबा म्हणून नेहमीच राहील.  कस्तुरी जेव्हाही घरात  गुमसुम असली, तर तिला कधी प्रेमाने तर कधी खोट्या रागाने मी बाबा आहे तुझा असं म्हणून तिला बोलतं करायचा. तिच्या प्रियकराचं नावही त्याने तिच्याकडून अलगत काढून घेतलं होतं. 

कस्तुरीचं लग्न झालं आणि लग्नात कान्यदान कराताना कार्तिक जावयाला म्हणाला, "कन्यादानाचा विधी करतोय, कन्यादान नाही करत आहे. ही माझी मुलगी आहे आणि आयुष्भर राहणार, तू नवरा असलास तरी मी बाबा आहे तिचा आणि नेहमीच राहणार."

काव्याचं पाठ्वणीच्या वेळेसच रडणं स्वतःला आवरत थांबण्याचं धाडस त्यानेही केलंच होतं. स्वतःच्या फुलासारख्या जपलेल्या मुलीला जावयाच्या स्वाधीन करतांना काहीसा डगमगला होता पण दाखवत नव्हता. मी बाबा आहे तुझा असं म्हणत खम्बिर होता.

मुलीच्या संसारातल्या गमती जमती ऐकत आता वयाची साठावी गाठली होती त्याने आणि आज कस्तुरी तिच्या प्रतिबिंबाला जन्म देणार होती. 

एक बाप म्हणून जावयाची धुकं धुकं समजून घेत जावयासोबत स्वतःही दवाखाण्याच्या व्हरांड्यामध्ये फिरत होता तो.  बाप म्हणून काळजीत होता ... आणि मग बाळाची  किंचाळी ऐकताच बाळाच्या बाबाला सर्वात आधी आत पाठ्वण्याचं धाडसही एक बाबाच करू शकला. 

जावयाने एका क्षणासाठी परत बाबांकडे बघतील आणि बाबा म्हणाला, "हो पुढे, तिला आता तुझी गरज आहे. बाप म्हणून बळावर आधी तुझा अधिकार आहे. बाकीचं सर्व मी बघतो .... अजूनही बाबा आहे मी तिचा."

प्रत्येक वडिलांना समर्पित

हॅप्पी फादर्स डे!.


©उर्मिला देवेन
धन्यवाद!!


कथा आवडली असेल तर माझ्या नवीन लेखासाठी मला इथे like किंवा फॉलो करा https://www.facebook.com/manatlyatalyat/

तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील.

Post a Comment

0 Comments