माझा हरवलेला एक दिवस ....
सकाळी सुमन उठली, आज तिला जरा बैचेन वाटत होतं, मन अशांत होतं, आठवण
येत होती, आईची बाबांची, लहानपणाची, सगळं सोडून निघून त्या आठवणीच्या कुशीत शिरावंस
वाटत होतं. आज काहीतरी तिला बोलावत होतं पण अडकली होती संसारात. घडीच्या काट्या सोबत कामाला लागली, काटा सरकत होता तसा
तिचा कामाचा वेग वाढत होता.
अरुण त्याचा तो तयार होऊन डायनींग टेबल वर येऊन बसला, "सुमू
... आज काही मिळणार आहे का मला, की, निघू मी असाच..."
सुमन धावल्या सारखी आली आणि तिने पोह्याची प्लेट अरुणच्या समोर ठवली,
“घ्या हो, जरा वेळ झाला, मला माझही आवरायचं आहे, मुलांना तयार करते मी...”
अरुण पोहे खात होता आणि पेपर वाचत होता, म्हणाला, “तू अजून शेंगदाणे
पोह्यात तसेच टाकलेस ग, कसे खुश खुशीत नाही ना वाटत... हुम्म..मला नाही खायचा,
ओमलेट कर ना माझ्या साठी, नाहीतर मी निघतो असाच...”
सुमन आता रागात आली, “निघा, आताच, गुमान मिळतोय तो गिळा ना, नाहीतर
जा, करा बाहेर...
अरे यार, मी काय नोकर लागली का, घरातल्या प्रत्येकाच सवडीने करायला...
मलाही माझं ऑफिस आहेच, उठा आणि मुलांना उठवा.. मुल काय माझी एकट्याची आहेत...ओमलेट
म्हणे... “
अरुणने चष्म्यातून सुमनला बघितलं, गुमान, पोह्याची सारलेली प्लेट जवळ
घेतली आणि खायला लागला.
“सुमु ........मी काय म्हणतो, तू आज सुट्टी घे ना... “
“मी, का म्हणून? तुम्ही घ्या...”
“अग माझी महत्वाची मिटिंग आहे...”
“असं, मी काय गप्पा मारायला जाते काय ऑफिसला...”
“तसं नाही, तूझी जरा चीड चीड होतं आहे ना...”
“मग, काय करता तुम्ही माझ्या साठी? आणि म्हणे मला सुट्टी घे...”
अरुण गुमान पोहे खात होता,
सुमन परत म्हणाली, “आज ना सुट्टी माझी, आताच निघते मी दूर जाते कुठतरी....
सगळी सुट्टी पाहिजे मला, कामंही नकोत, माझी मी हवी आहे...कुठे हरवली आहे मी हेच
कळत नाही... सगळ सगळ तुझ्यामुळे, माझ्या वाट्याला हे..”
“अग, असं काय, चिडलीस का ग? राहूदे ते काम, बसं तू आधी.... करेल ना
बाई आल्यावर.”
सुमन बसली, शांत झाली, अरुणला तिला काही म्हणार तर ती म्हणाली, “अरुण
आज गाडी घरी ठेव, मला माझ्या साठी हरवायचं आहे...बसं! मुलांना मी तयार करून सोडते
शाळेत, आईला सांगा पिक अप करायला. राहूद्या आजीकडे, काय ते नुसते लाडच करायला हवं
का, करा म्हणव एखाद दोन दिवस नातवाचं...मोठं प्रेम सुटत असतं ना, किवं येते
मुलांची, मी बाहेर ऑफिस मध्ये असली कि...”
“अग हो, मी करेन, पण तू गाडी नेशील ना बरोबर...”
“म्हणजे! लायसन काय लोणचं टाकायला मिळवलं काय मी, तुझ्या आधीपासून
आहे माझ्या कडे.... समजलं.”
“हो समजलं.” अरुण गुमान उठला, मुलांच्या खोलीत शिरला, “सनी, साक्षी,
आज आजीकडे जायचं आहे. चला उठा पटकन.”
सुमनने सर्वांचा नाश्ता टेबलवर ठेवला. मुलांना तयार करवून दिलं. अरुण
निघतांना तिला म्हणाला, “सुमु चिडली तरी तू गोड दिसतेस मला, वाटलं तर नक्की सांग ग
काय झालंय, मी हवं तर सुट्टी टाकतो दुपारची, आता नाही जमणार ग...”
“काही झालं नाही, जरा शांती हवी आहे मनाला.... तू खरच सुट्टी टाक आज.
माझी सुट्टी आहे. जरा गावाकडे जावून येते. येईल उद्या पर्यंत.”
“बऱ, गाडी सावकास चालव, नाहीतर ड्राइव्हर बोलवू का...”
“नाही हो, करेन मी ... नको ना आता नुसत्या सूचना...निघा तुम्ही...”
“बऱ, काळजी घे..” अरुण ऑफिसला
निघाला. सुमनने मुलांना शाळेत सोडलं, सगळ्या सूचना दिल्या. आजी घ्यायला येईल हेही
सांगितलं. ऑफिसला मेल केली.
घरी आली, स्वतःची bag
भरली, गाडी काढली गावाकडे तिने, जसं जसं गावं येत होतं तो मातीचा सुगंध ती मनात
भरत होती. गावाच्या शिवेवर पोहचली आणि सर्व हरवलं होतं तिच्या मनातून आतापर्यंतच,
हलवली होती त्या मातीच्या गंधात. तिची शाळा तिला दिसली. ती नवीन झाली होती पण तो
नुसता भास मनात भरला आणि मन कसं शांत झालं होत.
ती गावातली मोठी विहीर आली, आणि तिने गाडी थांबवली, विहिरी जवळ आजही
बायका, पाणी भरत होत्या, ओळखीचं कुणीच नव्हत, पण तिला ओळख होती. मुदाम बायकांशी
हसली. विहरीत डोकावलं. जरा बायका जाण्याची वात बघत फोन चाळत होती. कुणीही नाही
काळातच विहरीत डोकावून लहानपनासारखी ओरडली, तो विहरीतून बाहेर येणारं आवाज मनाला
अपार शांती देवून गेला. पडलेल्या दगडाने चिखलात नावं कोरलं, बालपण आठवलं, ही तिचं
विहीर जी नळाला पाणी आलं नाही कि सर्व गावाला पिण्याच पाणी पुरवायची, अलगत
ओठांवर नावं आलं “बडा कुवा”... नावं कानांनी ऐकलं आणि मन तृप्त झालं. विहीरीजवळ
मनसोक्त सेल्फी घेतल्या. गोगल डोळ्यावर लावला, मनात हसत गाडीत बसली, गावातल्या
घराकडे ती वळली, घर आता तिचं नव्हतं, आई बाबा वारले आणि भावाने गावातल गार विकून
शहरात flat
घेतला होता, बायकोला शहरात राहायचं होतं म्हणून...
घराजवळ गाडी थांबवली, त्या घरात पाय ठेवायला आज तिला अवाक वाटत होतं,
ज्या घरात येता जाता तिला भान राहत नव्हत. बराच वेळ बाहेर उभी होती, आवाज आला, “सुमन
काय ग?”
सुमन वळली, सुमनचा बालमित्र राहुल होता, “काय ग, एकटीच आलीस होय,
जावई कुठे आहे, बाकी सगळं ठीक ना ग...”
राहुल, लहान असतांना होळी खेळायची ती त्याच्या सोबत, मग तरुण होता
होता संवाद कमी झाला आणि आज परत त्याची ती आपुलकीची हाक तिला हळवी करवून गेली.
“अरे राहुल, मी मजेत रे, बसं आठवण झाली होती. सगळं ठीक आहे.”
“ये, ग, बसं माझ्या अंगणात आणि बघ घराला मनातून. मी बोलवतो कुणालातरी
घर साफ करायला, दादू ने विकलं पण अजून काही घरमालक आले नाहीत राहायला, घर पाडायचं
म्हणत होते ते... माझ्या कडे किल्ल्या आहेत. ठेकेदाराला मीच दाखवलं घर मागे. तू
बसं.”
लगेच त्याने बायकोला बोलावलं आणि चहा टाकायला सांगितला.
आज वयाच्या चाळीसीच्या उंबरठ्यावर राहुलशी बोलतांना वेगळाच भास होता,
तारुण्यात येता येता जणू बोलणं बंदच झालं होत आणि आज येवढ्या वर्षा नंतर तो आपलासा
वाटला... सुमन जावून बसली, त्याच्या बायकोशी गप्पा केल्या, राहुलने घर साफ करुवून
दिलं. आणि सुमन घरात शिरली. कोपरा नी कोपरा आजही आठवणीनी भरून होता. मन भरून येत
होतं कि आठवणी भरून येत होत्या. हे शोधण्यात ती हरवली होती.
घरच्या वरच्या छताच्या भागात तिला एक पोटळी खोचलेली दिसली, आज हात
पोहचला तिचा, तिने ती ओढली, उघडली आणि हरवली.... काचेच्या बांगड्यांचे तुकडे, कंचे,
गोट्या भरून होते, आईने अभ्यास करावा म्हणून रागावत ते कधी काळी कुठेतरी लपवून
ठेवले होते आणि आज सुमनला भेटले होते. आयुष्याच्या सुखाचा खजिना भेटावा असं झालं
होतं. रंगी बिरंगी बांगड्या तिला त्या आठवणीत रंगवून गेल्या.
आवाज आला, “सुमन, अग घरी ये, जेवण कर...” राहुलने आवाज दिला.
सुमन ते सर्व घेवून राहुल कडे गेली, राहुलही हसला,.... म्हणाली, “चल
एक डाव मांडूया का रे...” तोही हसला... “किती वर्षांनी ग... पण चल करूया... हरवूया
आपण जरा थोडं थोडं ... तेवढच पुरेल पुढच्या आयुष्याला... आता कुठे तू येणारं आहेस
इकडे....”
दोघेही रमले होते, थकले, खूप हसले. राहुल्या बायकोने केलेलं जेवणं
जेवले. राहुलच किराणा दुकान होतं... पण आज बंद होतं... कधी तारुण्यात त्यानेही सुमन
सोबत वेळ घालवावा हे स्वप्न बघितलं होतं पण आज आयुष्याच्या ह्या वळणावर त्याला हे
असं मिळालं होतं.... जावू देणार नव्हताच ना....बायकोसोबत त्यानेही सुमनसोबत गप्पा
केल्या... अगदी सागितलं ही कि त्याला सुमन आवडायची म्हणून....
संध्याकाळ झाली सुमन ने इकडे तिच्या घरीच झोपण्याची इच्छा दाखवली, मग
राहुलची बायको आणि सर्वच इकडे बाहेर सगळे झोपले. आज बऱ्याच दिवसांनी सुमन
आठवणीच्या कुशीत हळुवार शिरत झोपली होती. सहज वारां आला आणि आईच्या स्पर्शाची
जाणीव झाली, जणू तिनेच तिला कुशीत घेतलं होतं. सांर काही विसरून ती हरवली होती. सकाळी
उठली अगदीच प्रसन्न वाटत होतं. घरातून निघतांना मोठीशी ट्रंक तिला दिसली, तिने
उघडली, जुन्या वस्तू होत्या, वास लागला होता तरीही सुमनने बघितल्या, एक शॉल होती, तिला
आठवलं, ही तर बाबांनी आईला भेट म्हणून दिलेली शॉल आहे म्हणून. तिने ती घेतली, धुवून
काढली. आणि स्वतःच्या beg
मध्ये ठेवली. आई आणि बाबांचा भास अजूनही त्यात होता... जो तिला आता आयुष्यात आठवण
आली कि पुरेसा होता....
राहूलला मनापसून धन्यवाद देवून ती निघाली, हरवलेलं आयुष्यातलं खूप सापडलं
होतं... आणि स्वतःसाठी हरवलेला तो एक दिवस तिला आयुष्भारच बळ देवून गेला होता. फोन
बघितला, अरुणचे खूप कॉल्स होते. त्याला एक मेसेज केला नी तिने गाडी परतीच्या
वाटेवर काढली....
शनिवार होताच, घरी सगळे तिची वाट बघत होते. आज सासू आणि सासरेही
इकडेच आलेले होते. पण घरात सुमन नव्हती मन घराला जीवं कुठे होता. गाडीचा आवाज आला...
मुलं बाहेर धावली. घरचे सर्व बाहेर आले...
समोर सर्व कुटुंब बघून सुमन अगदीच आनंदी झाली, आईची शॉल तिने हातात
घेतली आणि मग सगळं तिच्या सोबत होतं... स्वतः साठी हरवलेल्या त्या एका दिवसाने ती
स्वतःला गवसली होती.
सासूने चहा ठेवला होताच आणि तो अरुणने आणून दिला... सामानातून
मुलांनी गोट्या काढल्या आणि मग सासू आणि ती बसल्या खेडायला.... हरवलेल्या आठवणीतून
नवीन आठवणी उभ्या होतं होत्या... साक्षी आणि सनी गोट्या खेळत होते...
मग तुम्ही कधी वेळ काढताय... स्वतः साठी हरवायला... फक्त एक दिवस
हरवून घ्या स्वतःला... आणि बघा... तुम्ही स्वतःला गवसाल....
कथा कशी वाटली नक्की कळवा...
माझ्या पुढ्याच्या कथेसाठी पेजला नक्की लाईक करा...https://www.facebook.com/manatlyatalyat
©उर्मिला देवेन
0 Comments