जेव्हा सुनबाई मनात नांदते- भाग १

 


जेव्हा सुनबाई मनात नांदते- भाग १

सानिकाने सासरचा उंबरठा ओलांडताच सासू तिला म्हणाली,

"माझी मुलगी म्हणून ह्या घरात गृहप्रवेश करत आहेस. माझी एक मुलगी सासरी नांदायला गेलेली आणि दुसरी मी घरात आणलीय, असच समजते मी. तुझं स्वागत आहे ह्या घरात."

सानिकाने वाकून सासूला नमस्कार केला आणि आनंदाने हाताचे पंजे देवघरात उमटवले, हसत मुख जोड्याने सर्वांचा आशीर्वाद घेतला. सर्व पाहुणे मंडळीत सासूची चर्चा होती आणि सुनेच्या सौदर्याच कौतुक. दोघीही सासू सुना मोठ्या रुबाबाबत वावरत होत्या. सासूला सून अतिप्रिय भासत होती तर सुनेच्या नजरेत सासूबद्दल आदरभाव आणि आपलेपण.

लग्न घरात प्रत्येक रिती भाती निभावतांना दोघीमध्ये गोडवा जाणवत होता. सुरेशला हे बघून खूप आनंद वाटत होता. आपली पसंत आईने मनापासून स्वीकारली ह्या विचाराने बिनधास्त झाला होता. माझी आई सानिकाला अगदीच मनात जागा देईल आणि हळूहळू सानिका रुळेल ह्या घरात असंच त्याला वाटत होतं.

चार दिवसात घरात आणि घराबाहेर लागलेली लाईटिंग उतरली. मांडव ओसरला आणि सानिका जमवून घ्यायला लागली. दिवस भराभर जात होती सासू सुनीत नातं घट्ट होण्यापेक्षा हळू हळू नकळत स्पर्धेच्या वाटेवर आलं होतं. सासूला वाटयच कि सानिकाला त्या मुलीसारख जपतात आणि सानिका समजत होती कि ती सासूला मान देते. मग हि स्पर्धेची दरी मधात कशी वाहायला लागली होती.

सासू रोज सानिकाला हटकायच्या, कधी हे करू नको, कधी ते करू नको, भाजीत तिखट जास्त झालं तर कधी भात कोरडा झाला. बोलतांना सहज बोलायच्या, ”आमच्या घरी असं नाही चालायचं हा. माहेरचं माहेरी ग.”

माझं तुझं करता करता दुराव्याची दरी ओढता ओढता वाढतच गेली. सानिकाही आता दचकून चुकी करतच होती. हळूहळू तिलाही वाटयला लागलं सर्वच कसं काय सासूच्या मताप्रमाणे होणार मग तीही बोलायची,

"मला जरा तिखट आवडते, तुम्ही करा ना तुमच्या आवडीची."

"मला काम साग्तीस, माझी मुलगी असं कधीच बोलली नाही, दुसऱ्याची पोर ते दुसऱ्याचीच, आपली कशी होणार, मीच मनाची मोकळी, मुलगी म्हणून घ्यायला निघाले होते."

अश्या अनेक शुल्लक कारणाने तणावाच वातवरण घरात असायचं. रस्सीखेच सुरु झाली. रोज काहीना काही कारणांनी दोघी मध्ये बाचाबाची होत होती. आणि सुरेश पिसल्या जात होता, त्याला तर दोघीही प्रियच होत्या ना. दोघींचीही मनधरणी करता करता त्याच्या नाकी नव आले होते. बऱ्याचदा तो फक्त सानिकाला चूप राहायला सांगायचा आणि मग एकांत्तात तिला म्हणायचा, "अग मी तुलाच गप्प करू शकतो, आईला नाही, तिलाही माझ्याशिवाय कोण आहे, मी हक्क दाखवू शकतो तुझ्यावर पण त्याच प्रेमाच्या हक्काने आईला गप्प राहा म्हणू शकत नाही. मान्य आहे चुकते तीच पण प्लीज जरा माझी परिस्थितीही समजून घे."

सानिका शांत होत ऐकून घेत होती. सुरेशच्या प्रेमात ती ऐकून घ्यायची त्याचही. आणि अंग ज्या गोष्टीसाठी वाद झाला होता मग ती गोष्ट सासूच्या मनाने करायची पण रोज नवीन गोष्ट आव्हान म्हणून उभी राहत होती. घरात नेहमी सासू सुना दचकून राहत असत. आणि बोलणही झालं तर सुरेशच्या माध्यमातून होत होतं. बऱ्याचदा सानिका सासूला टाळत असायची आणि हेही सासूला पटत नव्हत.

त्या दिवशी सुरेशला सानिकाला घेवून मुव्ही बघायला जायचं होतं आणि सासूने सरळ टोमणा मारला, "घरची काम करायला नको, आम्ही काय बायको नव्हतोच, आमच्या वेळस नव्हत हे दोघच सिनेमाला जाणं. सर्व कुटुंब बघायचो आम्ही. आणि ह्यांना म्हणे कपल कि काय ते जायचं आहे."

"अहो आई, तुम्हीही गेल्या असलाच कि नाटकाला, आणि मी घरची काम आवरली आहे. आता चहा ठेवते तुमच्यासाठी, तुमच्या आवडीचा tv शो लावून देत ना, बघा मस्त नवीन एपिसोड आलाय."

"तूच पी तो...कसला पानचट चहा करतीस? आणि माझ्याशी उलट उत्तर देवून बोलतीस, माझ्या... हो माझ्या घरात नांदायला आली आहेस तू, तुझ्या म्हणण्यानुसार मी का वागू. आली मोठी मला सांगणारी."

"अरे ये सुरेश, तुझी बायको मला बघ काय बोलते ते."

"आई, माझे मित्र आणि त्यांच्या बायका पण येणार आहेत ग, बर दिसणार नाही तुला घेवून गेलो तर, आपण सर्व जावू लवकरच."

"अग बाई, आता आईची लाज वाटते का? आतापर्यंत बरी मी हवी असायची जिथे तिथे."  

"आई, कुठचा विषय कुठे नेतेस तू... ये चल ग, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. सर्व वाट बघत असतील आपली."

सुरेश सानिकाला हात धरून आई समोरून घेवून गेला आणि सासू रडत राहिली.

दिवस जात होती आणि सासू मुलीला फोन करून तिच्या संसारातल्या गोष्टी विच्रारायची, मुलीच्या घरातल्या छान छान वार्ता ऐकून तिला स्वतः च्या मुलीवर गर्व होत होता. आणखीनच सुनेला बोलायसाठी जोर चढायचा, वाटायचं माझी पोर कशी मस्त सासुसोबत राहते. आणि माझी सून धड समोर बोलतही नाही. स्वतला त्रास करून घेत रडत असायची, मुलाचा राग येत असायचा तिला, भेटेल त्याला मुलाच्या आणि सुनेच्या वागण्याबद्दल सांगायची. ऐकणारे एकाचे, दोन सहानुभूतीचे शब्द बोलायचे. त्यांना तर बोलायला विषय मिळायचा. आतापर्यंत सर्व नात्यात आणि जवळ पासच्या सर्वांना सांगून झालं होतं. अति जवळचे लोक सुरेशलाही बोलयचे, तोही चुक्ल्यागत व्हायचा. आणि मग राग सानिकावर निघत असायचा. मुलगा सानिकावर रागवला कि सासूला पुरण चढायच. त्या दिवशी ती घरात आनंदी राहायची. मुलाशी गप्पा करायची.

घरात स सासूचा आणि स सुनेचा अस तंत्र सुरु होतं. संसाराच्या मंथनात सुरेश पिसल्या जात होता. कधी तो इकडे तर कधी तिकडे ओढला जात होता. आई भावनिक छळायची तर बायको प्रक्टिकल उत्तर देवून चूप करायची.

उलट, मुलीला लवकरच बाळ झालेलं आणि सुनेला वर्ष झालं तरी काही खुणा दिसत नव्हत्या. चालू असायची कुरकुर पण सुनेशी बोलणं धड नाही मग विचारूही शकत नव्हती.  

दिवस वर्षाला भिडायला पुढ जात होती. आणि मग लग्नाला दोन वर्ष होणार होती तर सानिकाला दिवस गेलेत आणि तिच्या सासूने घरातून पाय काढला, "अरे, सुरेश माझी तिकीट करून दे, आरती कडे जावून येते, तिच्या मुलीला बघायला कुणीच नाही म्हणे."

"अग पण आई, सानिकाला फक्त एकच महिना झाला आहे, तिची निदान तीन महिने तरी काळजी घ्यायला हवी ना, तशी ती तिची काळजी घेते पण तू राहिलीस तर माझी चिंता मिटेल ना. माझा जॉब हा असा, घरून निघतो वेळेवर पण येत वेळेवर कधीच नाही."

"अगबाई, तिची ती काळजी घेते ना, मग मी कशाला हवी, तुमच्या दोघांच्या मधात.आणि तिला काय माझी गरज."

तिला नसेल पण मला आहे, माझ्या होणाऱ्या बाळाला आहे. माझ्या साठी...

“असं आता तू गरज का रे? जरा जाते म्हटल मन रमवायला तर...”

"तसं नाही ग, लग्न झाल्याझाल्या ताई तुला काही दिवसांसाठी तिच्याकडे चल म्हणाली होती तेव्हां तुला आमच्यात  राहायला काहीच वाटल नाही आणि आज तिला नेमकी गरज आहे तर तुला तुझी लेक आठवली, आणि तिची सासू असतेच कि तिच्याकडे, मी गेलो होतो काही दिवसाआधी मिझी मिटिंग होती त्या शहरात तर, आरतीला खूप जपतात त्या"

"ये, बायकोच वकीलपत्र घेवून बोलू नकोस, काय करते रे तुझी बायको माझ्यासाठी? इथे दिवसभर चहाची वाट बघत राहते मी पण बाईसाहेब त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हां करतात, उलट मला बिस्कीटहि देत नाही खायला, आणि माझ्या मुलीच म्हणशील तर ती किती करते तिच्या सासुच, तुझ्या बायकोसारखी सारखी कॉम्पुटरच्या त्या बटना नाही दाबत, संस्कारात वाढवली आहे मी तिला, घरच सर्व करून नौकरी करते, दिवसभर घरी राहून नुसत्या भाकड गोष्टी करत नाही"

"आई, तूच म्हणाली होतीस ना, हे तुझ घर आहे म्हणून, मी काहीही करून कधीही खाईल आणि पेयील. आणि तुझ्या अलमारीत तुझ खायचं असतच कि, बर, जा तू ताईकडे तुलाही कळू देत सून कुठे नांदायला हवी ते"

"हो रे हो, तुला तर तिचाच पुळका येणार, मी जम्दात्री आणि ती इथे राज करणार, मी उभ केलेय तुला, माझा हक्क आहे तुझ्यावर, ती कोण तुझ्यावर हक्क दाखवणारी, जाणार नाही तर काय? माझ्या पोरीला गरज आहे माझी."

सानिका सर्व खोलीतून ऐकत होती, बोलण्यासाठी शब्द ओठात फिरत होते. पण जरा मळमळत होत तिला, बोलायसाठी आली पण लागलीच बाथरूम मध्ये दोघांच्या समोरून धावत गेली, तिला असं बघून सुरेशही तिच्या मागे गेला.

सासू परत पुटपुटली, "हममं.. आम्ही काय मुल जन्माला घातलीच नाहीत, नुसतं नाटक करायचं आणि नवऱ्याला भूल पाडायची. नको करून देवूस तिकीट, मी जावयाला सांगते. कोण राहील इथे, नौकर नाही मी तुझ्या बायकोची, माझ्या मर्जीची मालकीण आहे मी. ती घरात नांदायला आली आहे का मी? मी.. मी खरी मालकीण आहे ह्या घरची"

बडबड करत सासू तिची सुटकेस भरत होती आणि इकडे सुरेश सारिकाला जमेल तसं सांभाळत होता. सारिकाला म्हणाला, "तुझ्या माहेरी सोडू तुला?"

"नाही, मला पळ काढायचा नाही, नाहीतर ह्या घराच्या मनात कधीच नांदणार नाही, मी घेईल माझी काळजी. आणि माझी वाहिनी ८ महिन्याची प्रेग्नंट आहे, उलट दोन बाळांना जन्म देणार आहे. तीच सर्व निपटेपर्यंत आई मोकळी होते, मग काय ते ठरवू. आणि आईला थांबवू नका त्या त्यांच्या मर्जीच्या मालकीण आहेत आणि त्यांच्या घरात मी नांदतेय त्या नाही. स्वतःच स्वतः कराव, कोणी कुठपर्यंत साथ देणार."

सासूचा सूर निघाला, "हो ग हो, कर कि स्वतः च, आम्ही नाही केलं, इथे कुणाला सांगतीस. मला नाही होय कौतुक मुलाच्या पोराच, पण काय करता. इथे तर गरजच नाही माझी, जावूदे कुणाला सांगते मी इथे, कोण ऐकणार माझं, आहे कोण मला आता."  

आणि त्या परत रडायला लागल्या. आज सुरेशने आईकडे लक्षच दिल नव्हत. त्याच पूर्ण लक्ष सानिकावर होतं. नाहीतर तो नेहमी आईजवळ येवून बसायचा तिला काय हव नको विचारायचा मग आज सासूला मुलाच्या अश्या वागण्यावर खूप वाईट वाटलं होतं.

सुरशला आई हवी होती घरात, कारण त्याची नौकरी खूप दूर होती आणि येण्या जाण्यात दोन तास लागायचे. सानिकाला गरज पडली तरी तो वेळेवर पोहचू शकणार नव्हता. इकडे सानिकाला सासू घरात असल्या तरी भीती वाटायची, घरात वावरायला घाबरायची कि कुठली गोष्ट सासूला पटणार नाही आणि वाद होईल. मनमोकळे पणा त्यांच्या नात्यात नव्हताच. तीच कितीही बरोबर असलं तरी शेवटी सुरेशच्या शब्दांसमोर तिला गप्प रहाव लागत होतं.

पुढ काय होणार हे नक्की वाचा पुढच्या भागात, सुरेशची आई सुनेसोबत थांबेल कि निघेल. कारण प्रत्येक नातं हे दोन्हीकडून निभवायला हवं.. गरजेच्या वेळी पळ काढणं कितपत योग्य... आणि नमतं जेव्हा कुणीच घेत नाही तेव्हां सगळ थांबतं आणि सुनबाई घरात रडत नांदते. 

सुरेशच्या आईमध्ये काय बदल होईल का मुलीकडे गेल्यावर कि अजूनही ताठच परत येतील? उत्सुकता तानते आहे कारण विषय खूप गभीर आहे. मोठ्यांनी लहानाच्या चुका पदरात घ्याव्या आणि लहाणांनी सहज त्याच्या मिठीत शिरावं हे आपण वाचतो, बोलतो पण अमलात आणणं भयंकर कठीण आहे. कारण परक्या मुलीला मनात जागा देणं म्हणजे कसोटी लागते. आणि ज्याने हि कसोटी पार केली त्याची सुनबाई मनात नांदते...

पुढचा भाग लवकरच वेबसाईट आणि पेज वर https://www.facebook.com/manatlyatalyat

कथा कशी वाटली नक्की कळवा...

उर्मिला देवेन

जोडीदार तू माझा कथेचा पुढचा भाग इथे प्रकाशित झाला आहे, नक्की बघा !




Post a Comment

0 Comments