जेव्हा ex परत येतो... भाग १

 


जेव्हा ex परत येतो...

आज अमितचाला जावून तीन वर्ष झाली होती. अरुंधती नेहमीप्रमाणे देवळात निघाली, तिचा मोठा मुलगा तिच्या सोबत होता. अर्थ, ज्याला तिने जन्माला घातलं नव्हतंच पण त्याची आई म्हणून कुठेच मागे नव्हती. अमितच्या पहिल्या बायकोपासून त्याला तो होता. आणि मग अरुंधतीने त्याला अवघ्या वर्षभरापासून संभाळलं होतं. आणि आता तो त्याच्या आईसोबत तिच्या लाडात दहा वर्षाचा होता. तिला लहान मुलगीही होती जी तिला अमित पासून झाली होती. पण अमितची साथ तिला जास्त लाभलीच नव्हती, अवघ्या सहा वर्षाच्या संसारात अर्ध्यावर डाव परत मोडला होता तिचा, पहिला डाव मांडला तेव्हा राजा नकळत निघून गेला होता पण आता तिचा राजा कायमचा तिला सोडून गेलेला होता.

मनात विचारांचे धागे गुंता करत होते आणि ती अर्थला घेवून देवळात निघाली होती. मुलीला तिने घरची ठेवलं होतं तिच्या सासूकडे. गाडी हळुवार चालवत ती तिच्या अमितच्या आठवणीत चालली होती. तोच रस्त्याच्या बाजूला मोठा घोळका तिला दिसला, सगळे ओरडत होते, तिनेही जरा गाडीचा वेग कमी केला, तर कानावर शब्द पडले, “अबे मर जायेगा, कोई इसको उठाव अस्पताल ले चलते है!”

अरुंधतीने गाडीला ब्रेक लावला, गाडी बाजूला केली, अर्थ म्हणाला, “मम्मा का ग थांबवली गाडी? लवकर जावून येवूया ना देवळात, मग तुला आज ऑपरेशन आहे ना, आणि माझा क्लास आहे फुटबॉलचा.”

अरुंधतीने आधी फोन काढून अॅम्ब्युलेन्स बोलली आणि म्हणाली, “अरे हो रे, बघ तिकडे गर्दी आहे, बाबा असता तर थांबला असता ना, मदतीसाठी... आणि आपण बाबा साठी जातोय देवळात, नाही थांबलो तर कसं वाटेल बाबाला.”

अर्थने मान हलवली आणि तो त्याच्या मम्मा सोबत गाडीतून उतरला. अरुंधतीने तिची डॉक्टरी बॅग घेतली आणि धावत ती त्या घोळक्यात शिरली, “व्हा बाजूला, मी डॉक्टर आहे, कोण आहे तिकडे, बघुद्या जरा मला.”

सर्वांनी तिला जाण्यासाठी मार्ग मोकळा केला, अर्थला तर भारी मज्जा येत होती, त्याच्या आईला असं बघून त्याने त्याचा VDO सुरु केला, थेट fb लाइव केलं, my great मॉम..... वैगेरे वैगेरे त्याची कॉमेंट्री सुरु होती.

अरुंधती घोळक्यातून त्या जखमी माणसाजवळ पोहचली, रक्ताने चेहरा ओळखल्या जात नव्हता. तिने त्याची तापसणी केली, डोक्याला मार लागला होता, जखमीवर तिने पट्टी केली आणि मग तेवढ्यात अॅम्ब्युलेन्स पोहचली, त्या माणसला तिने तिच्याच हॉस्पिटलला पाठवलं. त्याची तिथे एक बॅग पडली होती, तिने ती उचलली, पोलिसांना फोन करून सांगितलं. अर्थ हे सांर बघून भारावला होता, त्याच्या मम्माचा त्याला अभिमान वाटत होता. Fb च्या vdoला खूप लाईक येत होते. मम्मा त्याची हिरो झाली होती.

दोघेही गाडीत परत बसले, देवळात गेले. अमितसाठी प्राथना केली. काही दान करण्यासाठी तिने सामान आणलं होतं तेही तिने मंदिरात पुजाऱ्याला दिलं. तिथून निघून ती मंदिराजवळच्या आश्रमात गेली, आश्रमातल्या लोकांसाठीही तिने भेटवस्तू आणल्या होत्या. अर्थने त्या सर्वांना दिल्या. जरा वेळ ती त्या आश्रमातल्या बगीच्यात एकटीच फिरत होती. अमित होता तेव्हा ती नेहमी तिथे त्याच्या सोबत येत असायची. त्या बगीच्यातल्या हिरवळीवर फिरतांना कितीतरी स्वप्न त्यांनी सोबत बघितली होती. मग तिथे फिरून तिचं स्वप्न ती परत परत बघत होती. अमित आता नव्हता पण त्याची स्वप्न तो अरुंधतीला देवून गेला होता.

अर्थ ने हाक मारली, “मम्मा वेळ होतोय ग, निघूया. “

अरुंधती आवाजाने स्वप्नातून बाहेर आली. आणि निघाली, अर्थला त्याच्या क्लासला सोडून ती हॉस्पिटलकडे निघाली, आज तिला एक महत्वाच ऑपेरेशन करायचं होतं. सगळे तिची वाट बघत होते. नर्स तिला म्हणाली, “मॅडम तो सकाळी आलेला पेशंट ना, त्याचं कुणी नाही आहे का? तुम्ही पाठवला असं बोलत होते सगळे.”

“ओ, विसरले होते मी, ती बॅग होती त्याची, बघा त्यात काही असेल तर आणि कळवा त्याच्या नातेवाईकांना. पोलिस येवून गेलेत ना?”

“हो मॅडम, त्यांनी FIR नोंद केली पण तेही आपल्याला भेटण्यासाठी परत येतो म्हणून गेलेत.’

“बऱ, मी भेटते त्यांना ह्या ऑपेरेशन नंतर, आले तर सांगा मला परत. तोवर ही बॅग बघा नाहीतर पोलिसांना सांगा बघायला. त्या पेशंटला जाग आली का?”

“नाही मॅडम, जखम खोल आहे, रक्तही खूप गेलेय, दारू पिऊन होता तो. जुनिअर डॉक्टरांनी टाके टाकले. अंडर ओब्झरवेशन आहे आता. शुद्धी वर आला कि दुसऱ्या वार्डात शिफ्ट करू त्याला.”

अरुंधतीने मानेने होकार दिला आणि निघून गेली ऑपेरेशन साठी, दोन तास झाले होते. ती ऑपेरेशन आटपुन तिच्या कॅबीन मध्ये आली. पोलीस आधीच तिची वाट बघत होते. ती नर्सही तिथे होती, अरुंधती हसत म्हणाली, “काय म्हणता, लागला का काही पत्ता त्या माणसाचा.”

इन्स्पेक्टर म्हणाला, “मॅडम तेच विचारतोय आम्ही, तुम्ही ओळखता का त्याला.?”

“अहो नाही, मी देवळात निघाले होते, त्याचा अॅक्सिडेंट झाला होता, मी बस माझं कर्तव्य केलं, ह्यापेक्षा मला काही माहीत नाही. त्याचा काही फोन बिन असेल ना?”

इन्स्पेक्टरने एक फोटो काढून अरुंधतीच्या टेबल वर ठेवला, तिने तो सहज उचलला, आणि गप्पच झाली, तिचा तो खूप जुना फोटो होता, हळूच म्हणाली, “हा फोटो...”

“हा फोटो त्या इसमाच्या बॅगेत होता, आपला आहे कदाचित..”

अरुंधती चकित झाली, “हो माझा आहे पण खूप जुना आहे, जेव्हां मी कॉलेज मध्ये होते, मॉडेलिंग करायचे, तेव्हाच आहे कदाचित, मला नाही माहीत त्याच्या कडे का आणि कसा आला ते.”

इन्स्पेक्टरने तो फोटो तिच्या हातातून घेतला, “मॅडम, म्हणूनच विचरतो, तुम्ही ओळखता का त्याला?”

अहो माहित नाही, शुद्धीवर येवू द्या, बघूया काही ओळख निघाली तर. पण आता मला माहीत नाही.”

इन्स्पेक्टरने मान हलवली आणि ते निघून गेले आणि अरुंधती विचारात पडली. तो फोटो घेवून ती आठवत होती. आता तिलाही उत्सुकता होती त्या इसमाच्या शुद्धीवर येण्याची.

अर्थला पिकअप करण्याचा वेळ झाला होता, ति निघाली होती तोच नर्स आली, “मॅडम त्या पेशंटला जाग  आली आहे.”

अरुंधती तशीच निघली, त्या माणसाला बघताच म्हणाली, “कोण आहात आपण, आणि हा माझा फोटो कसा आपल्याकडे. आपलं कुणी असेल तर सांगा. आम्ही बोलावू त्याला.”

तो त्याच्या आवाजाने परत म्हणाला, “अरु अरु...”

आता मात्र अरुंधती बावरली, अरु ही हाक ऐकून तिला पंधरा वर्ष झाली होती. मनाचे तार मनातच जुळत होते. आणि ती म्हाणाली, “माधव?”

“हो, तू अरुंधती आहेस ना?”

‘पण तू असा...”

“हो, मी जरा म्हातारा वाटतोय ग... “

नर्सने त्याला बसायला मदत केली. अरुंधतीही बसली. म्हणाली, “तू तर अमेरिकेत गेला होतास. आणि...”

“आणि काहीही नाही... अरु... हरलोय ग मी...पण तुला असं माझ्या समोर बघून मनाला खूप आनंद झाला. शेवटी मला त्या परमेश्वराने तुझ्या समोर आणलं....”

अरुंधतीचा फोन वाजला, समोरून अर्थचे सर बोलत होते, तिला यायला वेळ झाल्याने त्यांनी फोन केला होता. अरुंधती उठली, नर्सला म्हणली, “मी इन्स्पेक्टरशी बोलून घेईल, तुम्ही त्यांना कळवा, हे शुद्धीवर आले म्हणून. काय ते चौकशी करा म्हणावं. मी ह्यांना फारसं ओळखत नाही. माझा असा काही संबंध नाही. मी बोलते त्यांच्याशी, ह्यांची काळजी घ्या, मला अर्थला घ्यायला जायचं आहे. उद्या आले कि रिपोर्ट दाखवा ह्यांचा.”

माधव गुमान पडून राहिला, काहीच बोलला नाही. अरुंधती सर्व सूचना देवून निघून गेली. माधवच्या मनात खूप प्रश्न होते. अरुंधती अरु राहिली नव्हती. त्याने नंतर जरा नर्सला विचारण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही, डॉ अरुंधती राणे ह्यांची सूचना नर्स साठी जास्त महत्वाची होती.

कोण आहे माधव, अरुंधतीचा भूतकाळ काय आहे... आणि अशी अनेक प्रश्न आपल्याला पडली असतील... कथा वास्तविकतेला धरून गुंतली आहे... तेव्हा पुढचा भाग नक्की वाचायला विसरू नका...

पुढचा भाग पेजवर लवकरच..... तेव्हा स्टे connect टू मनातल्या तळ्यात. कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजलाही लाईक करू शकता.https://www.facebook.com/manatlyatalyat

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

फोटो साभार in.pinterest.

जोडीदार कथेचा पुढचा भाग प्रकाशित झाला आहे. नक्की बघा! आणि आपल्या आग्रहास्तव कथा लवकर नवीन स्वरुपात वाच्याला येणारं आहे ....
Post a Comment

0 Comments