बंदींनी... ती अजुनही...

 

बंदींनी... ती अजुनही 

बऱ्याच दिवसांनी, नाही हो वर्षांनी, ह्या ना कोरोना मुळे कुठे जायला मिळालंच नव्हतं, शहरातल्या फ्लॅटवर राहायला गेले होते. तसा तो फ्लॅट म्हणजे माझ्या मुलींसाठी हॉलिडे होम आहे. क्रिसमसच्या सुट्या होत्या, सगळे तिकडे सुट्यांमध्ये राहयला गेलो. फ्लाईट रात्री पोहचली, मनात धाकधूक होती कि आमच्या माळ्यावर म्हणजे समोरच्या घरी कुणीतरी असावं. पोहोचलो आणि बघितलं तर मोठासा लॉक नव्हताच. अगदीच हायसं झालं, म्हणजे सकाळ्च्या पाण्याची व्यवस्था झाली म्हणून मन आंनदी झालं. 

सकाळीच समोरचं दार ठोकलं, काही वेळाने एका रुबाबदार साधारण ३० वर्षाच्या पुरुषाने दार उघडलं, मी पाण्यासाठी बोलले तर त्याने आवाज दिला, 

"रेणू बघ ग, काय हवाय ह्यांना."

नंतर अगदीच जेमतेम वीस बावीस वर्षाची मुलगी म्हणजे त्याची बायको बाहेर आली, मी आपली सगळं सांगून मोकळी झाले, म्हणजे, काल आलोय, अजून महिनाभर असू. बोलू आपण, वगैरे वगैरे... तिने निमूटपणे एकूण मला पाणी दिलं. घरात आले, किचन आवरलं, पण मागच्या बाल्कनीतुन कुणीच दिसत नव्हतं. सर्व अपार्टमेंट मध्ये कुणी ना कुणी, काही ना काही तरी मागच्या बाल्कनीत म्हणजे किचनच्या साईडला करत होतं, निदान दार उघडं तरी होतं पण रेणु काही मला दिसली नाही. दहा वाजता परत एखादी कामासाठी बाई मिळेल का म्हणून विचारावं म्हटलं आणि समोरचं दार उघडलं, तर समोरच्या दाराला मोठंसं कुलूप! राहिलं, वाटलं गेली असेल कुठे, 

मग दिवसभर डोकावत राहिले पण कुलूप काही उघडलं नाही. वाटलं होतं समोर कुणीतरी राहायला आहे मग, बोलायला सतत कुणीतरी असणार, स्वयंपाकासाठी पाण्याची सोय होणार, म्हणजे माझा फ्लॅट वर्षभर बंद असतो मग आरो पार खराब झालाय आणि महिनाभरासाठी आम्ही कसतरी स्वयंपाकपुरतं पाणी समोरून किंवा खालच्या माळ्यावरून घेत असतो पण ह्या वेळी असं काही झालं नाही. पाण्याचा बंब बोलवावा लागला, असो पण रेणूच्या दारावरच्या कुलूप काही उघडं दिसत नव्हतं शिवाय ती मागच्या बाजूलाही दिसत नव्हती. 

ह्यांना असंच बोलले तर म्हणले, "आपले दिवस विसरलीस काय! दोघेही नौकरीवर असतील, सकाळीच आवरून निघत असतील, काल मी रात्री आलो तेव्हा कुलूप नव्हतं. तू जास्त विचार करू नकोस. "

मलाही पटलं, काय ते लग्नानंतर चे दिवस असतात, कुणाची काही पर्वा नसते, नवरा आणि नौकरी... म्हटलं हमम... मज्जा बाबा दोघांची. 

दोन तीन दिवस गेले, मुलींच्या आग्रहाने मी रांगोळी काढायला घेतली, जेमतेम मोचके रंग, अचानक समोरच्या दारावर नजर पडली, कुलूप नव्हतं, मुलगी म्हणाली, "मम्मा, त्या काकूंकडे रंग असतील खूप. मागायचे काय ग? आपण आणले कि परत करून देऊ "

मी हुस्कारा दिला आणि रंग भरायला लागले. तोच समोरच दार उघडल्या गेलं. रेणू झाडू लावत दारावर आली ,नजर पडली. मी हसली, सहज म्हणाले, 

"काय रेणू, आज सुट्टी काय ग? ऑफिस ला नाही गेलीस."

"मी, मी नाही ना नौकरीला, आज बुधवार आहे, हे घरी आहेत. " ती सहज बोलली

"आग मग लॉक असतं ना घराला रोज?" 

ती गोड हसली, आतमध्ये डोकावली, जरा बाहेर आली, "ताई, ह्या माळ्यावर कुणीच नाही ना, तुमच्या फ्लॅटला हि सतत कुलूप असतं, ते खालचे आता महिना झाला आले. मग मी एकटीच असते ना दिवसभर, आणि हे रात्री दहा पर्यंत येतात. मग भीती वाटते, म्हणून हे सकाळी जातांना कुलूप लावून जातात आणि रात्री खोलून आत येतात. "

माझा रोंगोळीने भरलेला हात तोंडावर आला, क्षणभर काहीच बोलले नाही, नंतर म्हणाले , 

"आग तुला दिवसभर काही लागत नाही, मला दोन दिवसात किती गोष्टी लागल्या. "

तेवढ्यात भाजीवाला ओरडला, मी म्हणाले, "भाजी, दूध काहीच घेत नाहीस का ? बोलतही नहिस काय ग कुणाशी?" 

ती दाराजवळ जात म्हणाली, "ताई हे सगळं आणतात मग काही गरज पडत नाही."

"किती वर्ष झालीत ग इथे राहून, म्हणजे आम्हीच तीन वर्षाने आलोय, आधी शाहू राहायचे इथे, कसं भरलं भरलं वाटायचं, आता जवळच त्यांनी घर बांधलंय, मी कालच जाऊन आले त्यांच्याकडे. 

"तीन वर्ष होतील, "

"मग हेच सुरु आहे का तीन वर्षांपासून ?"

"हो ताई, मला काहीच गरज पडत नाही. घरात राहते, "

"तू मागच्या दारात पण दिसत नाहीस?" 

"ताई फ्लॅटमध्ये सर्वच घरात आहे मग .... काहीच गरज पडत नाही."

मी आता शेजारच्या पायऱ्यांवर बसले... तेवढ्यात ती दार लावून आत मध्ये गेलीही.

तिचं बोलणं विजेचा शॉक लावून गेलं मला. तिच्या विचारात रांगोळीत रंग भरत राहिले, वाटलं आयुष्य असं रंगीत असतं मग हि रेणू मागच्या तीन वर्षांपासून चार भिंतीच्या त्या एकाच रंगात कशी रमते. 

मी कामात मग्न आणि दिवस भराभर जात होती. रेणूशी बोलायला काही जमत नव्हतं. पंधरा दिवसात माझ्या मुलींची सोसायटी मधल्या मुलांशी मैत्री झाली होती. चांगले दोन डझन मित्र मैत्रिणी त्यांनी जमवले होते. मग माझंही बोलणं त्यांच्या मम्माम्शी होतं असायचं, भाजी घेतांना, बाहेर जातांना, पायऱ्यांनी खाली जरी आले ना तरी माझी मुलगी पहिल्या माळ्यावरच्या मुलाला हाक मारत यायची मग त्याची मम्मा बोलायची, माझ्या त्या पंधरा दिवसात सारी सोसायटी ओळखीची झाली होती. बाल्कनीत कपडे टाकता टाकता मी आजू बाजूच्या बायकांना हाय हॅलो करत असायची आणि मग बोलणं होतं असायचं, पण रेणू काही गवसत नव्हती. 

शेवटी राहवलं नाही आणि सोसायटीतल्या बायकांजवळ चौकशी केली, तर कळला, काहींना तर माहीतही नव्हतं कि आमच्या फ्लॅट समोर कुणी राहायला आहे म्हणून. काही तर बोलल्या, तीच चरित्र ठीक नसेल म्हणून नवरा कुलूप लावतो. काहींनी तोंडात बोटं घातली. आणि हे ऐकून तर मला फारच वाईट वाटलं. 

मी स्वतःच एक वेगळं अस्तित्व जपणारी, खऱ्याला खरं आणि खोटं ते साप खोटं असा न्याय करणारी, स्वतःला अगदीच स्वतन्र विचाराची समजणारी असं सारं बघून स्त्री स्वतंत्र ह्या विचारसरणीवर प्रश्न लादू लागले होते. 

शेवटी दुसरा बुधवार आला आणि मी माझ्या मुलीला रेणूचं दार ठोकल्याला सांगितलं, ती बाहेर आली, मी तिला आर्यन आहे का म्हणून विचारलं. तिने अगदीच नाही असं उत्तर दिलं. मग तिला उगाच बोलले, "काय ग कशाला भितेस एवढी, आता निदान आम्ही आहोत तोपर्यंयत तरी कुलूप नको लावायला सांग कि तुझ्या नवऱ्याला." 

ती हसली, हो म्हणून आत शिरली, नंतर बऱ्याच वेळेने माझं दार ठोकलं तिने आणि म्हणाली,

 "ताई आयरन हवी होती ना, घ्या. "

मी अगदीच हसले.. कळालं नाहीच कि तिने आधी नाही का म्हटलं... मीही विचारलं नाही. 

दुसऱ्या दिवशी कुलूप नव्हतं मनाला खूप बरं वाटलं, मग तिचा नवरा दिसला, उगाच बोलले, माझे अहो हि बोलले, कुठल्या ऑफिस ला आहात, कुठचे सर्व चौकशी केली. रेणू गुमान दाराच्या परद्या मागून बघत होती. 

नंतर पुढचे सर्व दिवस दाराला कुलूप नव्हतं, मी माझं वर्क फ्रॉम होम ऑफिस संपलं कि कधी कधी मुद्दाम तिचं दार ठोकायची. चल चहा घेऊ सोबत म्हणून गप्पा करायची, हळू हळू कळालं, ती इथे तीन वर्षांपासून राहून कुणाला ओळखतही नव्हती, गप्प राहता राहता जरा बोलायला लागली पण नवऱ्याबद्दल जराही वाईट बोलायची नाही.... 

मला तर ती बंदींनी वाटत होती पण ती कदाचित तिच्या नवऱ्याची बायको होती... 

काळ किती पुढे गेलाय पण आजही हि विचारसरणी जिवंत आहे हा विचार करायाला मला रेणूने भाग पाडलं...  महिनाभर तिच्या घराला कुलूप नव्हतं.... पण तरीही ती बंदींनी वाटत होती.... सुंदर होती पण सुंदर दिसत नव्हती... काय होतं कळत नव्हतं... पण काहीतरी होतं जे तिला बांधत होतं. 

महिना झालं आणि आम्ही तिथून निघणार होतो, आदल्या दिवशी मी तीच दार ठोकलं, ती बाहेर आली, हसली, म्हटलं, "काय कसं वाटतं आता, कुलूप नसतं ना दाराला... आणि आता अजिबात लावायला देऊ नकोस. जरा बोलत जा सर्वांशी." 

ती हसली, हसण्यात खूप शांतता होती 

मग म्हणाले, "आम्ही निघणार ग उद्या, मुलींच्या सुट्या संपल्या, आणि आमच्याही. "

ती जरा नाराज झाली, परत मी म्हटलं, "पण तू कुलूप लावून घेऊ नकोस, भीती काय ग इथे, २४ तास सिक्युरिटी  असते ग सोसायटी मध्ये. गार्डस आहेत, बाहेर बायका गार्डन मध्ये बसल्या असतात, मुलं खेळत असतात, कुठल्या ना कुठल्या अपार्टमेंट मध्ये छोटा मोठा प्रोग्राम सुरु असतो... काय भितेस ग ?"

"नाही ताई तसं नाही..." 

"मग कसं ? तू आहेस हे कुणाला ह्या सोसायटी मध्ये माहीतही नाही "

"तसं नाही ताई..... "

"मग कसं ... ते तरी सांग."

"जाऊद्या ना, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, एवढ्या दिवसांत कुणाशीच बोलले नव्हते, आता कधी येणार ?"

मी स्मित हसले, "काळजी घे, आणि कुलूप लावायचं असेल ना तर त्या विचाराला लाव ज्याची तू  बंदींनी आहेस... मला माहित नाही तुझं काय आहे ते... पण तू बोलणार नसशील आणि स्वतः स्वतःसाठी उभी रहाणार नसशील तर कुणाच्या मनात असूनही तुझ्यासाठी कुणीच समोर येणार नाही... आधी तू तुझी बंदींनी आहेस मग कदाचित तुझ्या नवऱ्याची... कदाचित!

मी खाली सोसायटी मध्ये सांगून ठेवलं आहे कुणी ना कुणी इथे येऊन बघत जाणार कि तुझ्या दाराला कुलूप आहे कि काय ते. अधून मधून त्या खालच्या ताई तुझ्याशी बोलायला येतील."

ती काहीच बोलली नाही, मी तिच्या हातात तीळ गुळाच्या लाडवांचा डब्बा दिला आणि हसून निरोप घेतला... 

कारण, करावं काय हे मलाच कळत नव्हतं, माझ्यासाठी तर विचार करणंच अवघड होतं... चोवीस तास खोलीत बंद... बापरे !! एवढ्या मोठ्या भरगच्च सोसायटीत... विलक्षण होतं... रेणूचं काय होईल मला माहित नाही पण तुम्ही असं करू नको... 

ती कुणाची बंदींनी होती हे कळणं अशक्य होतं.... पण ती बंदींनी होती हे मात्र नक्की!! 

कथा सत्य घटनेवर आधारित आहे, मागच्या दोन महिन्यापासून प्रवासात बिझी होते, समाजाचे अनेक पैलू नजरेने बघितलेत त्यातला हा एक... बंदींनी ती अजूनही ... 

अश्याच कथा वाचण्यासाठी पेजला आजच लाईक करा... 

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Post a Comment

0 Comments