जोडीदार तू माझा... भाग ६

 जोडीदार तू माझा...  भाग ६ सानू आणि राजन माळ्यावर एकमेकांना बघत समोरचा गुलमोहर बघत होते. सानू राजनला वाचत होती. राजन गुंतला होता हे तिच्या लक्षात आलं होतं. दोघांची नजर पडली आणि सानू त्याला म्हणाली,

 “काय मग दिलेत का त्या टॅक्सीवाल्याला पैसे?"

"हो दिलेत ना, आता तुम्ही दिले नव्हते मग मला द्यावेच लागले ना... म्हणजे तू दिले नव्हतेस ना!"

"असुदे... तुम्ही म्हटलेलं योग्य ना!"

"म्हणजे,..?"

"म्हणजे मला तुमच्या सोबत लग्न करायचं नाहीच."

"पण का?"

"मला नाही वाटतं आपलं जोडीदारच नांत होऊ शकतं."

"पण आपल्या घरच्यांनी तर ठरवलं सर्व."

"ठरवू देत ना पण फायनल आपल्याला करायचं आहे. तुमच्या आणि माझ्या सहमती शिवाय काहीही होणार नाहीच ना!"

"मग आधीच कळवायचं होतं तसं... आम्ही कशाला आलो असतो. उगाच येणं झालं ना मग?"

"अहो मग ओळख कशी झाली असती, राणीशी...."

"राणी!" 

"हो राणी... आवडली ना तुम्हाला?"

राजन गडबडला, सानुने समोरून त्याला राणीसाठी विचरलं होतं. तो काहीच बोलला नाही. खरं तर त्याला सुचत नव्हतं. असा बिनधास्तपणा आणि असं बोलणं त्यालाही सानूच आवडलं होतं. आपण काही चुकतोय का असचं त्याला वाटत होतं. पण ओठात शब्द येत नव्हते.

सानुने पुरतं त्याला ओळखलं होतं. आता त्याच्या मनात शिरून सारं काही बाहेर काढावं ह्याच मार्गावर ती होती, म्हणाली

"माझा नकार आहे तुम्हाला."

"पण नकार का?"

"ते सांगायला मी बांधील नाही... बस मला नाही वाटत कि आपण जोडीदार होऊ शकतो. माझ्या जोडीदाराच्या संकल्पनेत आपण बसत नाही. बाकी मी का सांगावं. आणि ते काही महत्वाच नाहीच ना."

राजनला जरा खटकलं होतं... काहीसा बेचैन झाला होता तो... राणी मनातून पसंत होती त्याला पण सानूचा नकार पचत नव्हता. मनात युद्ध सुरु होतं सानू परफेक्ट होती पण राणी मनात शिरली होती. मन आणि मेंदू भांडत होतं, निर्णय कळत नव्हता. सानुने नकार दिलाच होता पण घरच्यांना कसा कळवायचा हे त्याला सुचेना झालं होतं.

राजन जरा गंभीर झाला होता तर सानू मनातून मोकळी, राजन तिला तसाही पसंत नव्हता, आणि राणीला तो पसंत आहे हेही तिने ओळखलं होतं. जरा बिनधास्त झाली होती ती. सानुचा असा बिनधास्त नकार काहीसा पचत नव्हता राजनला. पुरुष शेवटी आणि काय! एक पसंत मनातून होतीच पण एकीने समोरून नकार दिला होता.

राजन जरा भांबावत म्हणाला,

"ते ठीक आहे हो, पण खाली आपले मोठे बसलेत, त्यांना काय सांगणार?"

सानू स्मीत हसली,

"माझ्यात आहे हिंमत, तुम्हाला सर्वांसमोर नाकारण्याची. आणि मी माझ्या आई बाबांना समजावू शकते... कदाचित बाबांना तर कळेलही, नकळत."

राजन विचारातच म्हणाला, "नको आता, आज नको... निर्णय, आपण पुढल्या भेटीत ठरवू या का?"

"चालेल मला, काही हरकत नाही, चलायचं खाली, सर्व वाट बघत असतील."

सानू भराभरा पायऱ्या उतरून बाबांजवळ येऊन उभी राहिली. राजनही मागेच आला. बैठकीत सारे जणू त्यांना बघत होते, राणीही रागीनिसोबत गप्पा करत होती, बोलतांना तिची नजर परत थेट राजन पायऱ्या उतरत असतांना त्याच्यावर पडली, पडताच तिने नजर खाली केली, जरा हसली. स्मित हसतांना तिच्या गालावर खळी पडली आणि राजन परत पुरता बुडाला. तसा तो सारं विसरला, तीही काहीशी मनातून बावरली. दोघांच्या मनात उठणाऱ्या अंनत भावना जणू आलिंगन देत होते. क्षण थांबला होता, तोच सानूने राणीला डोळा मारला आणि टेबलचा उगाच आवाज केला.

राजनच्या आईच लक्ष सानूवर पडल, तिला बघत, हस्त तिच्या बाबांना म्हणाली,

"मग मोहिते साहेब, कधी उडवायचा बार लग्नाचा, अहो अहोभाग्य माझे कि अशी नक्षत्रासारखी मुलगी आमच्या घराची सून म्हणून येणार ते. मी तर केव्हांच होकार दिलाय."

राजनही अगदीच खाली आला होता, सोफ्यावर येवून बसला, आईच्या शब्दांना काटत म्हणाला,

"आई आपण नंतर बोलूया."

राजनचे बाबा म्हणाले, "नंतर काय रे, सगळं इथेच बोल... आमचं ठरलं आहे. पुढच्या खेपेत साखरपुडा उरकवून घेववूया. काय हो भीमा काका!  जबरदस्त जोडी आहे दोघांची, एकदम तोडीला तोड ..जोडीदार...!"

भीमा काका अगदीच उत्साहात म्हणाले,

"हो तर! परमेश्वर अगदी जोड्या तंतोतंत बांधतो, बस आपल्याला त्या गवसायला हव्या...”

भीमा काका अरूणकडे बघत म्हणाले,

“नाही का रे अरुण? पण काहीही मन रे अरुणा... आपली सानू लाखात एक आहे. आणि राजन एकदम फिट बघ पोरीला."

बाबांनी एक नजर सानूवर टाकली आणि सानूने अलगत मान हलवली, त्यांना कळून चुकलं होतं कि सानूचा नकार आहे ते. त्यांनी आरतीकडे बघितलं. तिचा उत्साह वाढत होता, ती तर राजनच्या आईसोबत बसून तिथी शोधायलाही लागली होती. महिला मांडळामध्ये सांर कसं जमलं होतं.

बाबांनी अलगत विषय बदलला,

"काय रे भीमा, त्या सुभेदार साहेबांच्या मुलीचं लग्न परवा आहे ना, येणार ना तू?"

"अरे, का नाही! मीचं जुळवलं ते लग्न. अरे मुलगा डॉक्टर आहे आणि आपली मुलगी पण, मस्त जुळून आलं सर्व. आणि योगायोग बघा मुलीला नौकरी बाहेर करण्याची गरज नाही, घरच्या हॉस्पिटलमध्ये दोघही जाणार."

“हो ना, तुझ्या हातची सोयरीक रे, अजून काय! बरीच धावपळ झाली तुला.”

“नाही रे, तीही आपलीच मुलगी आहे. आपलं काय स्थळ सुचवायचं, बाकी सर्व घरच्यांवर! नाही का हो सावंत साहेब. बरोबर ना”

सावंत साहेबही अगदीच होकार देत म्हणाले,

“हो, होना, तसचं असायला हवं, काय अरुण रावं?”

"हो हो सावंत साहेब.”

अरुण भीमा काकाला हात लावत म्हणाले,

“अरे मग बोलू कि परवा, मी जरा माझ्या लाडक्या लेकीशी बोलून कळवतो... कधी मुहूर्त काढायचा ते. तिलाही जरा सुट्टीच वगैरे बघावं लागेल ना?"

आरतीने आता सानूकडे बघतील, सानूने आईला डोळा मारला, आईला काही तरी गडबड असल्याच जाणवलं, मनातच पुटपुटली,

"काय सुरु असतं ह्या बाप लेकीचं कुणास ठाऊक, एवढा चांगला मुलगा... आणि ही पोरगी... काय बोलावं बाबा... आता अजून कुठला राजकुमार येणार आहे ह्या बाबांच्या राजकुमारीसाठी, कुणाला माहित?"

सानू पटकन आईच्या कानात म्हणाली जणू तिने आईचा चेहरा वाचला होता,

 "आई हो, येईल जरा धीर धर... "

आई आरतीनेही विषयाला मोड घातली आणि म्हणाली,

" मग ठरलं तर, बोलूया परवा सुभेदारांच्या मुलीच्या लग्नात. तोपर्यंत ठरवू आपसात, आम्हीपण बोलून घेतो घरी सर्वांशी, तुम्हीही ठरवा. नाही, तसं ठरलचं आहे आपलं पण आपसात चर्चा हवीच ना."

राजनचे बाबा म्हणाले, "तेही बरोबर... घरच्यांचं बोलणं व्हायला हवं म्हणजे सर्व क्लिअर होतं.”

राजनचे बाबा परत त्याच्या बायकोला म्हणाले,

“रंजना निघायचं ना, कि तुला अजून सानवीशी काही बोलायचं आहे, तुला अजून काही आपल्या सानवीला विचरायचं असेल तर...”

राजनची आई हसतच म्हणाली,

“काय हो, एवढी गुणाची पोर आहे, मला बाई काहीच विचरायचं नाही तिला. माझा होकार तर मी आधीच दिला आहे.”

आणि मग ती आरतीला म्हणाली, “आता काही जुन्या काळासारख राहिलं नाही, कि ती इथून तिथवर चालून दाखवेल, तरी बसं विचारते हो सानवी बाळा, स्वयंपाक येतो का ग तुला?”

सानूने बाळूवर एक नजर टाकली, त्यानेही तिला इशाऱ्यात चिडवलं आणि सानू पटकन म्हणाली,

“मला खिचडी करता येते.“

आता बाळू जोरात हसता हसता थांबला, आईने त्याच्याकडे नजर रोखून बघितलं आणि तो गुमान गप्प झाला.

रंजना, राजनची आई हसली,

“जमलं तर, आपल्या राजनला खिचडी आवडते. बाकी आपल्या घरी तुला काही करायची गरज नाहीच ना बाळा, बसं सावंत वाडा वाट बघायोय तुझी.”

सारेच जरा वेळ हसले होते, वातावरण परत काहीस हलकं झालं होतं, राजनचे बाबा हात जोडून म्हणाले,

“चला मंडळी, येतो मग आम्ही, पुढ्च्या बैठकीला... जरा आपण मोकळं बोलून घेववूया आपसात. आम्हाला सानू पसंत आहेच, मग काही काहीही बदलायचं नाही. तुम्ही जरा बोलून घ्या घरी, पुढल्या वेळी आपण सविस्तरपणे साखरपुडा ठरवू आणि मग उडवू बार लग्नाचा."

सानू बाळा, तुला त्या बिजवे गुर्पचा प्रोजेक्ट हाताळतांना मी बघितलं आहे, आलोही होतो तुझ्या ऑफिसला, मला तेव्हाच तू आवडली होतीस. मग काय कळवलं आपल्या भिमा काकांना.... जुळण आले बघ योग. अशीच प्रगती कर.”

सानुने त्यांना वाकून नमस्कार केला, त्यांनी तिच्या हातात हजारीची नोट ठेवली. आणि सगळे निघाले.

मनांचा खेळ सूर झाला होता, गुंता वाढत होता, तुम्ही ही गुंतलाय ना? मग भेटूया पुढच्या भागात. लवकरच... सानू आणि राणीसोबत!

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments