जोडीदार तू माझा... भाग ८

 जोडीदार तू माझा...  भाग ८ पाहुणे सानूला बघून घरी निघाले होते, निर्णय अजून सुटला नव्हता. सानुचा निर्णय बाबांना कळाला होता. आई मनातून संतापली होती, बाबांची मनात कुरकुर सूर होती, आणि सानू बिनधास्त होती तसा सानुलाही राजन पसंत होताच ना! आज घरही तिच्या त्या बिनधास्तपणाला नमलं होतं, मग वळूया आजच्या भागाकडे.

आरतीने घरात सानू आणि बाबांना समोरा समोर बसवलं होतं,

“सानू आता सांग, काय म्हणणं आहे तुझं? कशाला थांबवलंस बाबांना, माझं लक्ष होतं तुम्हा दोघांवर.”

“आई, माझं काहीच म्हणणं नाही, राजन पसंत आहे मला...”

“असं म्हणतेस, मग का ग बाबांनी गोष्ट संपवली नाही? बोलायचं होतं ना पुढे. आजच काय तो निर्णय लागला असता.”

बाबा आता सानुला ओरडत म्हणले,

“ये बाई, मला का तोफेवर बांधतेस? तुचं तर मान हलवली होती नापसंतीची.”

“हो ना बाबा... मला नाहीच पसंत तो.”

“ये बाई दोन्ही तबल्यावर हात ठेवून उत्तर देवू नको... लग्नाची गोष्ट आहे ही.”

“हम्म्म.... म्हणूनच म्हटल ना बाबा,”

सानू आईला म्हणाली, “ये आई तुला तो राजन पसंत आहे का ग? मला तर आहे पण...”

“पण बिन काय, आणि मला पसंत पडून काय? लग्न तर तुला करायचं आहे ना?” आई चांगलीच जोरात म्हणाली.

“पण आई राजन एकदम झक्कास आहे ना...! आवडला बुवा आपल्याला. पण...”

सानू आईला चिडवत राणीकडे बघत म्हणाली.

बाबा आता चिडल्या सारखे म्हणाले.

“सानू तुझं काय सुरु आहे... अति होतंय आता. मी नाही हा तुझी बाजू घेणार, मला काय घरात राहायच नाही... तुझी आई काय मला असंच सोडणार, मीही आईसारखं बोलावं असं वाटतं का तुला?”

सानू मजा घेत होतीच तर राणी तिच्या खोलीकडे निघाली, सानू तिला थांबवत म्हणाली,

“ये राणी थांब ना ग, अजून गोष्ट पूर्ण झाली नाही, आणि तुझ्या शिवाय होणार पण नाही.”

“तायडे काहीही पण तुझं. मला नको अडवू उगाच.”

राणी सानुला इशाऱ्याने विनवत होती. तसा सानुलाही राजन पसंत होताच पण... राणीसाठी! तरीही सानू घरच्यांनी मजा घेत होती. ती बाबाच्या अगदीच जवळ जावून बसली आणि म्हणाली,

“बाबा आपल्या राणीला राजन पसंत आहे आणि राजनला राणी.... म्हणून मला तो राणीसाठी पसंत आहे.”

“असं...पण तुला नाही, नाही का?” आई सानूला म्हणाली.

“हो मला नाही, तसं त्याच्यात काहीच कमी नाही पण तो अगदीच माझ्या सारखा आहे, मग तो माझ्या नेहमी समोर उभा राहिल, सोबत नाही... आणि माझ्या मते जोडीदार सोबत हवा समोर नाही. जोडीदार ना दोन किनाऱ्या सारखे पाहिजे... सतत सोबत वाहणारे... एकमेकांच्या ओढीने... त्यातल्या पाण्याची पातळी कमी जास्त जरी झाली तरीही ते सोबत असणारे, समोरासमोर नाही. कधी चुंबकाचे सारखे भाग एकमेकांना आलिंगन देतात का? मग मी आणि राजन कसं शक्य आहे. तो उत्तम आहे पण माझ्यासाठी नाही. बसं म्हणून मला राजन नकोय जोडीदार म्हणून पण राणीला तो तंतोतंत आहे. त्या दोन किनाऱ्यात आकर्षण दिसलं आणि प्रेमबीजही. पण मला ते माझ्यासाठी जाणवलं नाही.”

आता आई चिडली, “काय ग आता तुला कसं सांगायचं... राजनच्या घरच्यांना तू पसंत आहेस...आणि राणीला कसं काय ते हो म्हणतील... कठीण आहे बाबा! तुम्ही मुली ना कठीण करून ठेवता सर्व.”

आई बाबाला रागावत म्हणाली, “बोलाणा हो तुम्ही काहीतरी, काय नुसते मुलीचं ऐकत असता, काय घोळ करून ठेवला आहे हा. कसं करायचं आता?”

आई राणीकडे वळली आणि तिने राणीला विचारलं,

“काय ग राणी तुला पसंत आहे का राजन?”

राणी दचकली, काय बोलावं सुचेना झालं तिला, अवघडत म्हणाली,

“हो... नाही नाही ....ये तायडे... सांग ना तू. कशाला फसवतेस! मी तर सहज बोलले होते तुला.”

“नाही हो काही नाही, स्पष्ट ते सांग... आणि तिला काय म्हणतेस. आता काय राजनला तू पसंत आहे म्हटल्यावर भिमाकाकाला भर द्यायला सांगावं लागेल... कुठे राहिले हे भीमा काका आता.” आई चिडून बाबांकडे बघत म्हणाली.

तेवढ्यात बाळू ओरडला,

“काय मग हे वादळ अजून इथेच असणार तर...”

“आ... शेंबड्या!”

सानु त्याला मिश्कीलपणे बघत होती.

“मग काय, वाटलं होतं, त्या राजनच्या घरच्यांनी दीला आधीच पसंत केलेलं, सगळं कसं जमून आलेलं पण... अरे देवा... आता कुठल्या देवाला नवस बोलू मी.”

“हा हा हा... म्हटल होतं ना तुला आपण काही गवसणार नाही म्हणून... तू चालू दे तुझा नवस कधी ह्या देवीला कधी त्या देवाला....तथास्तु.”

“हो आता कुठेतरी मोठाच नवस बोलतो. ये देवा आहेस का तू, माझी विनंती ऐकायला, वाचव रे बाबा ह्या वादळापासून आम्हाला.”

बाळू समोर ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीला नमन करून म्हणत होता. सानू त्याच्या जवळ गेली आणि त्याला परत आशीर्वाद देत म्हणाली,

“बाळा आपल्याला अजून तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा कुठे हे वादळ जरा शमेल! कठीण परीक्षा आहे बालका...तथास्तु!!!”

“चूप राहा ना रे... एवढा गंभीर विषय आणि तुम्हाला मस्करी सुचत आहे.... बाळू बंद कर तुझं ते नाटक आणि सानू तुला काहीच वाटत नाही का ग?” आई रागात म्हणाली होती. सारे कसे शांत झाले होते. बाबाने सानु आणि बाळूला जवळ बोलावलं आणि आईला म्हणाले,

“त्यात काय ग, तिला पसंत नाही हे तिने स्पष्ट सांगितलं, तिच्या जोडीदाराच्या संकल्पनेत नाही बसत तो... विषय संपला.”

“कसला संपला म्हणता, तुम्ही गप्प बसा हो, हा तर नवीन विषय सुरु झाला. सगळी तुम्ही फूस आहे तिला. संकल्पनेत बसत नाही म्हणे... मग कोण, कुठला राजकुमार बसणार तेही सांग म्हणावं. आम्ही कशाला मनाला कोरत बसायच. आण म्हणाव घरी.”

“तेही सांगेल, वेळ दे तिला.”

सानू बाबांच्या मागून हात घालून उभी होती. आणि बाबा आईला बोलत होते. तर आई परत म्हणाली,

“किती, किती वेळ हवा आहे, पुढल्या वर्षी तीसची होईल आता...”

“झाली नाही ना, अजून वर्ष आहे, वेळ आहे, उगाच माझ्या लेकीला त्रास देवू नको, सारखी लग्न लग्न करत असतेस.”

आईने बाबांना परत गप्प करत म्हटल,

“तुम्ही गप्पच बसा हो, काय भुरळ घातली ह्या वादळाने काय माहित.”

बाळू आणि सानू जोरात हसले, आणि बाळू म्हणाला,

“ये आई तू तिला वादळ म्हणाली...”

आणि तो ओरडत म्हणाला, “ये वादळ!”

आई परत बाळूवर ओरडली, “तू गप्प राहा रे आधी...” आणि ती सानुला ओरडत म्हणाली,

“काय ग सानू? काय बोलले ते राजनरावं अजून... कि बसं नाही म्हणून मोकळी झालीस. आणि हे राणी राजन तू तुझ्या मनाने तर लावलं नाहीस ना?”

“ये आयडे, असं मी कसं करणार ग, ती बघ राणी, तिला बघून काहीच वाटत नाही का तुला.”

“वाटतेना! पण मी तुझं काय करू, सांग आधी काय बोलले राजनरावं?”

“काही नाही, घरी बोलतो म्हणाला... त्याच्या आणि राणीसाठीच्या संबंधासाठी.”

“असं! मग इथेच बोलायचं होतं ना?”

“म्हणाले होते मी, तर बोलला कि तो आधी घरी बोलतो, मी तर वाचली रे बाबा. आपल्याला नको रे बाबा अजूनतरी लग्नाची बेडी.”

“पण अजून राणीची परीक्षा झाली नाही ना? आणि तू राणीसाठी बोललीस त्याला.”

आई कपाळाला हात लावत म्हणाली.

“हो, त्याला पसंत आहे ती, होईल ग परीक्षाही आणि हे लग्नही, आपल्या राणीला राजाशी पहिल्या नजरेच प्रेम झालंय... मग काय आता सर्व होईल...”

“काय राणी खरय ना, अरे प्यार किया तो डरना क्या?”

सानुने राणीला अगदीच जवळ खेचलं. राणी लाजून लाल झाली होती.

“तायडे, गप ना ग, तुझं काहीही सुरु आहे, असं काही नाही.” राणी जरा लाजत आणि उतरत्या स्वरात म्हणाली.

“ये गप्प ग बाई. तुझं काय करू मी आता, देवा, स्वतःला बघायला आलेल्या मुलाशी आपल्या बहिणीबद्दल बोलतेस... काहीच कसं वाटत नाही ग, म्हणजे निदान काही तरी. तो तुला बघायला आला होता.”

आईने काळजीने मान हलवली आणि विचारात पडली. ती जरा नाराज झाली होती सानूसाठी पण मनात अजून आशा होती तिच्या, कारण राणी पसंत पडली होती राजनला... स्थळ हातून गेलं नव्हतं.

आरती गुमान विचार करत बसली होती आणि घरात सर्व शांत होते तोच भीमा काका तिथे आले. त्यांचा नेहमीचा बूट काढत बडबडत म्हणाले,

“माझी ही पण ना! सोयरीक जोडायची असली की हाच बूट घालायला लावते, चावतोय मला तरीही घालावा लागतो, पण आज तर ह्या बुटाचा शुभशकुन खोटा ठरला... सानूची सोयरीक तर काही जुळणार नाहीच... आता घरी जावून हिला सांगतो सगळं.”

बघूया पुढल्या भागात भीमा काकांचा तो बूट शुभं ठरला का? आणि त्यांना आता काय करावं लागेल. सानू अजून काय करते.....

कथा क्रमशः 

कथा क्रमशः

कथेचे सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका जोडीदार तू माझा... ला क्लिक करा. आणि सर्व भाग वाचा.

नोट- माझी विषकन्या कश्यपी ही ऐतिहासिक कादंबरी सध्या मराठी साहित्यात खूप कौतुकाचा विषय ठरत आहेत.... सर्वाना धन्यवाद! आपणास हवी असल्यास आपण अमेझोन/ फ्लिप कार्ट वरून मागवु शकता. लिंक हवी असल्यास मला मेसेज करा...

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments