जोडीदार तू माझा... भाग १२

 जोडीदार तू माझा...  भाग १२ 



आई बाबा अजूनही काळजीत होते, राणीने राजनला पसंत केलं असलं तरी अजून काहीही निश्चित नव्हतं.

मग बघूया आजच्या भागात काही निश्चित होतं काय ते... वळूया आजच्या भागाकडे

आई बाबा बसले होते हॉलमध्ये गप्पा करत. आई तांदूळ निवडत होती तर बाबा पेपर नीट करत होते.

आरती, “काय हो पेपरच्या घड्या नीट करा, तो रद्दी वाला घेत नाही नाहीतर.”

अरुण, “अग, करतो ना, कुठला रद्दीवाला घेत नाही ग, रद्दी तर आहे.”

“तो दुकानात देतो म्हणे, ते जावू द्या, काय हो कसं होईल आता?”

“वह्याच काय जे होईल ते होईल, आपण काय करू शकतो. आता राणी राजा राजी तर लग्न लावेल भिमाजी...”

“अरे देवा, हा माणूस काही सुधारणार नाही.”

“कुठला माणूस? इथे मीच आहे”

“अहो तुम्हीच, तुम्हाला म्हणत आहे मी.”

“असं होय.”

“असं होय काय, करा ना फोन भीमा काकाला...”

“तू ना मागे लागू नकोस, जो तो बरोबर आपलं काम करतो.”

“हुम्म, तुम्ही सोडून.

“मी काय केलं, माझं काम मी चौतीस वर्षा आधीच केलं, आता सगळं तुझं काम.”

“अरे देवा, तुमच्याशी ना बोलणंच वाईट आहे, एक धड उत्तर मिळत नाही.”

“हुम्म्म, तू प्रश्न केला होतास होय? मला वाटलं आपण बोलत आहोत.”

“अहो अरुणराव कधी तर सिरीअस बोला, काय नुसतं, काहीही हो तुमचं, मुलींनी घोळ घालून ठेवलाय त्याचा विचार करा.”

अरुणने चेहऱ्यावरून हात फिरवला, “हा बघ झाला मी सिरिअस, आता बोल, आणि काय घोळ घातला ग माझ्या मुलींनी, अजिबात माझ्या लेकींना काहीही बोलायचं नाही.”

“हुम्म्म, एक तर आधीच डोक्यावर बसून आहे आणि आता एक काही बोलायला तयार नाही, म्हणजे तीही बसणार. माझं मात्र इथे कुणी नाही.”

“का? तो आहे ना तुझा चमचा... बाळू...”

“तुम्ही ना, मीच जाते, कुकर लावते लवकर...”

आरती उठून स्वयंपाक खोलीत निघून गेली. अरुण आता गंभीर झाला, तसाही तो आरतीला त्याची काळजी कधी बोलून दाखवत नव्हता. गुमान पेपरच्या घड्या मांडत राहिला.

तेवढ्यात भीमा काका त्यांच्या बायकोला घेवून आले,

“अरुण, रे अरुण कुठे आहेस?”

अरुण पेपरचा गठ्ठा बांधत घाम पुसत म्हणाला,

“अरे आहो ना, ये आधी. या वहिनी. बसा तुम्ही निवांत, सकाळीच खूप ऊन पडलय ना?”

“हो ना भावजी”

“काय तापलय ग आरती बाहेर.” सुनिता भीमा काकाची बायको आरतीला आलिंगन देत म्हणाली.

“अग काय किती दिवसांनी येतस तू? काल का आली नाहीस? मला मदत झाली असती ग.”

“अग येणारं होते, पण माझी ना सोसाइटीमध्ये मिटिंग होती. आणि तुला तर माहीत आहे, माझ्याशिवाय काही होतं नाही बघ आमच्या सोसाइटीमध्ये, आता तुला काय सांगू, ते जावदे, म्हणूनच आले मी आज, ह्यांच्या सोबत.” सुनिता ओढणी आवरत आणि चेहऱ्याला हवा मारत म्हणाली.

“बसं ग, चहा तर तू घेत नाहीस, मी कॉफी करू का तुला! तशीही तुला शरबत तर आवडत नाहीच ना? मी ठेवते तुझ्यासाठी कडक कॉफी. तुला उन्हात कॉफी आवडतेच ना, गरमी ला गरमी मारते, तशी तू हॉट दिसत आहेस.”

“अरे बाळू, एसी कर रे जरा थंडा, काकी आली आहे.”

“काय ग आरती, आता कुठे आपण हॉट दिसणार, आता काय हाय गरमी असं म्हटल तरी कुणी ढुंकून बघायचं नाही.”

तिने तिची बॅग जरा कोपऱ्यात ठेवली आणि म्हणाली,

“मी पण येते ग, राहू दे मीच करते माझ्यासाठी कॉफी!” सुनिता काकी आरतीचा हात धरून सोबत स्वयंपाक खोलीत शिरली.

हॉलमध्ये अरुण आणि भीमा बसले होते, भीमा म्हणाला,

“काय रे अरुण मस्त काम चालली आहेत तुझी.”

“अरे सकाळी हे काम दिलंय मला तुझ्या वहिनीने, नाही केलं तर काही जेवायला मिळायचं नाही मला आज.” अरुण भीमाला टाळी देत म्हणाला.

स्वयंपाक खोलीतून आरती ओरडली, “करा, तेवढं तरी, नाहीतरी घरात मुलींना डोक्यावर घेवून फिरण्याशिवाय काम काय करता तुम्ही.”

“हो ना वहिनी, ह्याला सांगत जा तुम्ही काम घरची करायला.”

“भीमा तू माझी आता परत वाट लावू नकोस रे, खूप झालीय माझी कालपासून वाट लावून... जावूदे, काय म्हणतोस बोल.”

अरुणने पेपरचा गठ्ठा बांधून बाहेर आणुन ठेवला.

भीमा त्याला म्हणाला, “अरे मला सकाळीच आपल्या पाहुण्या मुलाचा मेसेज आलेला, लागलीच तयारी केली मी आणि सुनीने.”

“हो, वार्ता पोहचली आमच्यापर्यंत, ते जावू दे, आता तुझी कसोटी आहे, त्याच्या घरच्यांशी बोलण्याची.”

“म्हणूनच मी आलोय, आपली राणी काय म्हणते रे?”

“तुला तर माहीत आहे आपली राणी, भडभड बोलून मोकळी होणारी नाही रे.”

“अरे मग राणीची बोलणं झालंय का कुणाच?”

“सानू तिला ओळखून आहे. ती बोलली आहे तिच्याशी, माझ्या पेक्षा ती ओळखते तिला. पसंत आहे आपल्या राणीला राजन. ती बोलली नसली तरी मुलीचे डोळे सारं काही बोलून गेले रे... आपली राणी जरा लाजाळू आहे.”

“मग झालं तर, मी बघतो काय बोलायचं ते सावंत साहेबांशी. तू काळजी करू नकोस.”

घरात गप्पा सुरूच होत्या तर आत्या अंजली आलेली, तिचे डोळे लाल होते, ती आली आणि हॉलमधून गुमान आत गेली, कुणाशी बोललीही नाही, वहिनीला हाक मारत ती स्वयंपाक घरात गेली. सुनी वहिनीला बघून जरा अजूनच लाजल्या सारखी झाली.  तिच्या आवाजाला थंबवत ती अवघडली. कोपऱ्यात उभी झाली. 

अरुण तिला बघून आता शांतच झाला. त्याचे शब्द फुटतच नव्हते. बहिणीचे लाल डोळे त्याला मनातून जाळत होते. काय झालंय अंजूसोबत हे जाणून घेण्यासाठी त्याच मन आतुर होतं, पण अत्तुशी तो फारसं बोलत नसायचा, तिच्याशी बोलतांना त्याला आपणच चुकलोय हे सतत वाटायचं मग कमीच बोलायचा तिच्याशी.  

अंजली, अरुणची लहान बहिण, प्रेम विवाह केला होता, तेही पळून जावून पण अमितने जोडीदार म्हणून तिला लग्नानंतर साथ दिलीच नाही. लग्नाचे नवलाईचे चार दिवस अगदीच मस्त गेले आणि मग.,. तिच्या वाटेला जे जे येत गेले ते तर कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं, त्यातलं काही अरुण आणि आरतीला माहित होतं तर काही अजूनही अंजूने स्वतः मध्ये गाळून ठेवलं होतं. ती कधी मोकळी बोलत नव्हती तर कधी परिस्थिती तिला बोलू देत नव्हती. तिने स्वतःला तसंच स्वीकारलं होतं.

अमित, अंजूचा नवरा, लग्नाच्या काही दिवसानंतर अंजलीशी तुटक वागू लागला होता. प्रेम विवाह केल्यामुळे तिने माहेरी सुरवातीला काहीच सांगितलं नव्हतं. पण हळू हळू अमितबद्दल माहेरी बाहेरून कळू लागलं. अंजलीला होणारी मारपीट आणि गलिच्छ वागणूक बघून वडिलांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते जागीच गेले. त्यानंतर पाठोपाठ आईही वारली. सर्व कसं विस्कटलं, ह्या सगळ्या गोष्टीला आपण जवाबदार आहोत ही सल अंजूच्या मनात खोलवर रुजली.

अंजली एकटी पडली होती. अरुणचा संसार नवीन होता. त्यात त्याची बाहेरगावी असणारी नौकरी, सर्वच नवीन होतं तोही तिला खूप मदत करू शकत नव्हता. आरती मुलांमध्ये गुंतलेली होती, तिचं तिलाच सुचत नसायचं.  

अमितच्या वाईट वागणुकी नंतरही अंजलीने त्याला सोडलं नाही, लग्नानंतर अनेक वर्ष तिने आईपणासाठी वाट बघितली पण दुर्द्वाने ती आई होवू शकलीच नाही. आणि मग अमितला तिला त्रास देण्यासाठी कारण सापडलं. मी प्रेम केलंय, करते आणि करत राहिल ह्या एका वाक्याने ती अमितशी बांधली होती, ह्या आशेवर की अमित परत येईल आणि मग प्रेमाच्या राज्यात परत प्रेम बरसेल.

आजही ती त्याच्या घरात राहत होती त्याच्या वरच्या प्रेमापोटी, अमितच्या लग्नबाह्य संबंधातून त्याला एक मुलगी झाली होती जी अमितने भावनेच्या भरात घरी आणली होती. पण नंतर तिचाही त्याला त्रास होवू लागला, तिच्यासाठी खर्च करणं त्याच्या जीवावर येत गेलं. त्याला ती नकोशी झाली होती. पण अंजूने तिच्यासाठी लहान सहान काम सुरु केली आणि तिच्यात गुंतत गेली. ती लहान मुलीगी छकुली आणि अंजली सोबत राहत असायच्या. दोघींचाही एकमेकीवर जीवं होता, दोघीही बांधल्या होत्या एक दुःखाच्या धाग्याने. छकुलीच्या आईने तिला टाकलं होतं आणि अमितने अंजलीला दूर केलं होतं.

अंजलीला लडा लागला होता तिचा, तिच्या सोबत तिला आयुष्याचे सुखाचे क्षण मिळत होते. छकुली दहा वर्षाची झाली होती. आज परत अमितने अंजलीवर हात उचलला होता, छकुलीला शाळेत सोडून ती जरा मन हलकं व्हावं म्हणून इकडे भावाकडे आली होती.

जोडीदाराची साथ नसली की आयुष्याचे सगळे रंग फिके पडतात. तसचं काहीसं होतं अंजू आत्याच, पण प्रेमविवाह नेहमीच असं वळण घेत नाही बरका...  तो समोरच्याला वळतोही. जसं आता पुढे वळणार आहोत, राणी आणि राजनसाठी.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments