जोडीदार तू माझा... भाग १९

 जोडीदार तू माझा...  भाग १९ 
घरात आनंदाचे क्षण हे येणं हे आनंदमय असतं, सुखाच्या एका किनारेसाठी आपण दुःखाच्या कही लाटा पार करायला तयार असतो. अरुण आणि आरती सानूसाठी चिंतेते होते. खर तर जोडीदार पिलांच्या जोडीदाराची वाट बघत होते... राणीला राजा मिळाला होता खरा, पण अजून राज्य प्रस्थापित झालं नव्हतं आणि बाळू तर आता उडायला लागला होता. सानू राणी खोलीत बोलत होत्या, आणि सानू राणीला समजावत होती आता पुढे

सानूला राणीच असं राजनसोबत परीक्षेच्या वेळवर बोलणं आवडलं नव्हतं. सानूच्या बोलण्याने राणीही जरा हिरमुसली होती, सानू तिला परत रागात म्हणाली,

“ताई बी काही नाही, भान ठेव त्याच्या घरात नौकरी करणारी सून हवी आहे, माहित आहे ना तुला? तुला सिद्ध करायचं आहे स्वतःला... नाहीतर तुझी नणंद जी आयसआयची प्रथम परीक्षा पास होऊन फायनलची परीक्षा लगेच देणार आहे. सासू जुनियर हायस्कुलची हेडमास्टर आहे. राजन प्रोजेक्ट मॅनेजर असून स्वतःची कंपनी रेजिस्टर केली आहे त्याने आणि त्याचे बाबा ह्यासाठी मला सून म्हणून पसंत करत होते. तू बहीण आहेस माझी आणि राजन खूप चांगला मुलगा आहे पण सगळं निभावून तुला न्यायचं आहे. प्रेमही तेंव्हाच सफल होतं जेंव्हा वास्तविक जीवनातला व्यवहार दोघांनाही समजतो. राग आज येईल तुला माझा पण तो मला मंजूर आहे पण तू रडत ह्या घरात येणं मंजूर नाही.”

“ताई चूक झाली, उद्या पासून मीच स्वतःला लिमिट करते.”

“बरं होईल, अभ्यास आधी राणी... एवढ्या वाजेपर्यंत तू अभ्यास केला असता ना तर मला किती आनंद झाला असता ग.”

राणी जरा गप्प झाली होती. ताई योग्यचं ते बोलत होती, सानूला पसंत करण्या मागे सावंतानचा हेतू होता. त्यांना त्याचं साम्राज्य सांभाळणारी मुलगी हवी होती. आणि राणी ते करू शकेल का ह्यावर आजही ते निश्चित नव्हते.

सानू  जरा शांत स्वरात तिला म्हणाली,

“तुला आईची काळजी कळली नाही का अजून ग? तुला राजन सारखा जोडीदार मिळणार ह्याने ती जितकी आनंदी आहे ना तितकीच तुझ्या नात्यासाठी काळजीत आहे. तिचं बरोबर आहे. नातं नुसतं असून चालत नाही, सुरुवातीला जोडीदार आपलाच वाटतो पण तो असतो त्या लोकांचाच ना. मग त्यांनाही जिंकण तेवढच महत्वाच असतं. खूप मोकळ्या विचारांचे लोकं आहेत ते, तुला कधी कश्यासाठी थांबवणार नाहीत पण तुझा न्यूनगंड तुझ्यात शिरला ना कि तू स्वतःहून वेगळी पडशील. अभ्यास तू स्वतःसाठी कर... कुण्या दुसऱ्यासाठी नाही, एवढी सुंदर आहेस ग मग ते रूप अजून उजळव तुझ्या कर्तृत्वाने... आज तुझ्या ह्या कमीपणामुळे त्या लोकांना खटकत आहेस, कधीपर्यंत राजनच्या मागे लपशील. दाखवून दे तू पण माझी बहिण आहेस म्हणून. मला माहित आहे राजनची अपेक्षा नाही कि तू नौकरी करावी, पण तू ती करावीस असं मला वाटतं. आता तूला आणि त्याला जे पटेल आणि जमेल करा तुम्ही तेच पण माझं मी सांगत राहणार... कदाचित तुला त्याची गरजही पडणार नाही. घुगऱ्या खाल्या आहे मी तुझ्या पाळण्या खालच्या, तुझा कान ओढायचा हक्क निदान तू ह्या घरात असेपर्यन्त आहे मला.”

आज खर तर राणीला सानूच्या बोलण्याचा चटकन राग येवून लगेच विरघळला. मनात हसली, राजनच्या सहवास हे मी शिकले असं मनात बोलुन ती सानूला जाऊन बिलगली, “नाही ताई, तू माझा माझं लग्न झाल्यावरही कान ओढू शकतेस. येवढं नातं खोल आहे आपल्यात. जरा भरकटले होते मी पण आता नाही, प्रेमात वाहून ज्याच नसतं, सर्वांना आपल्यासोबत घेवून वाहत राहायचं असतं, हे मी तुझ्याकडूनच शिकले. तू आहेस ना मला पदोपदी मार्गदर्शन करायला.”

सानूने हलकीशी मान हलवली आणि लाईट बंद करण्याचा राणीला इशारा केला,

“हो ग मेरी बेहणा, पण तुला करायचं आहे सांर, आणि आता अजून वेळ आहे तुझ्याकडे.”

राणीने खोलीचा लाईट बंद केला, पण तिचा लाईट लागला होता. सानू ताईच म्हणणं तिला कळालं होतं. ऐकीचा राजकुमार स्वप्नांच्या धुक्यातून बाहेर आला होता तर दुसरीचा अजूनही त्याच धुक्यात होता. हळू हळू रात्र सरकायला लागली होती. रातकिडे गाणी गात होती आणि दोघीही झोपल्या होत्या उद्याच्या स्वप्नांमध्ये रमत.

सकाळी आईने सानूला उठायला आवाज दिला आणि खोलीत शिरली, आज सोनू आधीच उठून अगदीच तयार होती,  सानू आरश्या समोर स्वतःला बघत गुणगुणत होती. आई काहीही न बोलता राणीच्या उशीजवळ येवून बसली, राणीही गुमान पडल्या पडल्या ताईला बघत होती, आईने राणीला इशारा केला आणि राणी आळस देत उठली आणि इशाऱ्यात मान हलवत काही माहित नाही असा इशारा केला आणि लगेच सानूला म्हणाली,

“तायडे, आज काही स्पेशल आहे का ग?”

सानू नुसती हुम्म म्हणत स्वतःत मग्न होती, मग लगेच म्हणाली,

 “व्हीडीओ कॉन्फेरंस आहे आज यूएसए टीम सोबत, प्रोजेक्ट सिनॅरिओ सेटअपसाठी.”

“ओ.. म्हणून तू तयार झालीस काय ग तायडे.”

“तयार म्हणजे! मी रोजच होते ग.”

“असं! काहीही काय ग तायडे. कुछ तो बात है!

आई राणीला थांबवत आता बोलली,

 “जावूदे ग, ती काही आपल्याला सांगायची नाही, ती काय बाबा! तिच्या वडिलांची लाडाची, सांगेल त्यांना. आपण वाट बघायची नुसती.”

“ये आई, असं काही नाही, अग माझी मीटिंग आहे सकाळी लवकर... तू ना काहीही विचार करू नको.”

“जावूदे ग बाई, चल मग नाष्टा करा आता. वेळ होईल तुला.”

”नाही ग आई, आताच निघायचं आहे. यूएसए टीम वाट बघत असेल, वेळेचा फरक ग, संध्याकाळ होत आली असेल तिकडे आता. माझ्यामुळे वेळ नको. मला निघायला हवं. तू ना... माझा नाष्टा पॅक कर.”

नंतर तिने आईचे गाल ओढले,

“ये माझी गोड गोड आई, कशी दिसत आहे मी?”

“मस्त ग बाई, पण जरा टिकली लाव ना, अजून सुंदर दिसशील... आणि हे काय केलंस केसांचं!”

“हे? काही नाही.”

सानुने केस परत आवरले. स्वतःला आरश्यात बघत म्हणाली,

“नाही आवडत मला टिकली ग. जावू दे, निघते मी, हा संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही,  आयडे, अंजली अत्तुला बोलावून घे आठवणीने, मी फोन करते मग, या सगळे तिकडे.”

खोलीतून निघतांना तिने बाळूला आवाज दिला,

 “बाळूरावं, उठले का तुम्ही, मी निघते आहे आता. बाळूरावं, दुपारपर्यँत ठरावा कुठल्या शोरममध्ये जायचं ते आणि या माझ्या ऑफिसमध्ये, तिथूनच जावूया तुझी बाईक घ्यायला, डॉक्युमेंट घेऊन येशील सर्व सोबत.”

बाळू खोलीतून डोळे चोळत आला आणि सानूला म्हणाला,

“जो हुकूम जी, हम पोहच जायेंगे.”

“पोहचो, और फोन करो शहजादे, आणि आधी येवून उगाच माझ्या ऑफिसच्या वॉचमॅनला छळू नकोस, बिचारा त्याच काम इमानदारीने करतो आणि तू आलास की त्याला त्रास देतोस.”

“हा जी... और कुछ?”

“येच करो. आणि ऑल द बेस्ट. काय रे, जरा ढंगाचे कपडे घालून जा तुझ्या ऑफिसला, डॉक्युमेंट द्यायला बोलावलं आहे ना?”

“अर्रर्रर्र,  तायडे... मी विसरलो होतो ग, बाईकच्या नादात.”

“चल निघ, तयार हो आणि आधी जा ऑफिसला. नौकरी आधी, नंतर बाईक शोध आणि बाईकवर बसणारीही. कॉल कर मला.”

ती घरातून बाबांजवळ आली,

“बाबा मी फोन करते तुम्हाला, माझी मिटिंग आहे महत्वाची.”

“अग, पण नाष्टा तर करून जा ना बाळा.”

“वेळ नाही हो बाबा.”

“मग, मी घेवून येवू का, तुझा लंच आणि...”

“नाही हो बाबा, तुम्ही ना तुमच्या राणीसरकारला सांभाळा.”

तिने बाबांना हाय फाय दिला, आणि म्हणाली,

“आईने दिलाय पॅक करून. खाते मी पोहचल्या पोहचल्या.”

निघतांना तिने बाळूला परत बजावलं, “वेळेवर ये, वेळेआधी नाही.”

सानू ऑफिससाठी निघून गेली आणि घर परत शांत झालं, बाळू परत म्हणाला,

“वादळ गेलं आता घरात किती शांत वाटत आहे. आहा! आह... काय होतं हे सकाळपासून बाबा. मोकळं वाटत आहे आता.”

“ये बाळू, ताई बरोबर बोलली तू आधी निघ ऑफिससाठी, सगळं बघ मग विसरशील काही आणि त्रागा करशील, लहान नाहीस कि तू विसरलेली गोष्ट आणि मी नाहीतर बाबा तुझ्याजवळ धावत आणून देणार.” आई बाबांना चहा देत म्हणाली.

बाळूने राणीची वेणी ओढली आणि म्हणाला,

 “हो ग आई, मी लागतो तयारीला. काय केलस आज नाश्त्याला.”

“ये सोड माझी वेणी, नाहीतर...”

“नाहीतर तू राजनरावांना सांगणारा.”

“नाही, ताईला सांगीन.”

“अरे बापरे... घे सोडली. त्या वादळाला तर मी खूप घाबरतो. घरात आल्या आल्या आदळेल माझ्यावर.”

बाहेरून खदखदून आनंदाने हसणारं आणि मनातून सर्वांची काळजी करणारं घर आज परत बहिण भावाच्या गमती जमतीत रमलं होतं. हेच क्षण ते साठवून ठेवत होतं. ही मजा कधीच येणारं नाही हे त्या घरालाही माहित होतं. वेगवेगळ्या दिशेने उडणाऱ्या पक्ष्यांना कुठे नंतर कधी एकत्र करता येत हे जणू घर जाणून होतं. पुढ आपल्या आपल्या संसारात रमल्या नंतर असं एकत्र यायला खूप कष्ट पडतात मग ही मजा आणि हा क्षण ते घर हृदयात साठवत होतं.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments