जोडीदार तू माझा... भाग २८

  जोडीदार तू माझा...  भाग २८



जोडीदाराची निवड ही आपली आपली असते, कारण आपली निवड आपलं आयुष्य घडवते! कधीकधी काही निर्णय आपल्यासाठी आपल्या माणसांनी घ्यायचे असतात आणि आज बाळूने ते त्याच्या ताईसाठी केलेलं... बघूया आजच्या भागात काय होतं ते....

राजनचे बाबा आणि त्यांची बहिणजावई शांत झाले होते. जरा वेळ घरात अफाट शांतता पसरली होती. राजनच्या बाबांना घाम फुटला होता. काहीसे गडबडले होते. बाळूच्या ते लक्षात आलं. तो आता त्याच्या अगदीच जवळ आला आणि पाणी त्यांच्या हातात देत म्हणाला,

“या मग उद्या, किती वाजता निघणार सगळी मंडळी तिकडून?”

राजनचे बाबा पाणी हातात घेतलं, हळूच म्हणाले,

“आम्ही चारच्या जवळपास निघू.”

“आम्ही विसरलोय तुम्ही इथे काय बोललात ते, तुम्हीही विसरा. आनंदाचे क्षण आहेत, आनंद देवूया आणि घेवूया.” बाळू अगदीच आनंदात म्हणाला.

“हो बाळू, तुमची एकता आणि सानवीसाठी प्रेम बघून भारावून गेलो मी, राणी आहे घरातल्या सर्वांचा विचार करणारी, वाटलं होत ती स्वतःचा विचार करेल आणि आमची साथ देईल पण तिने योग्य गोष्टीची साथ दिली. नशीबवान आहे माझा राजन ज्याची राणी बायको होणार आहे.  आमचं बोलणं तेवढं मनावर घेवू नका, आलं मनात म्हणून आलो इथवर. आम्ही निघतो आता, भेटू उद्या.” राजनचे बाबा निघाले होते.

पाहुणे उठले होतेच तर सानू दारात पोहोचली,

“अरे काका, आजच आलात का तुम्ही? आज काही साखरपुडा नाही ठरला.” ती हसतच म्हणाली.

राजनचे बाबा परत तिला बघून गडबडले होते तर त्यांचे बहिण जावई म्हणाले,

“इकडे आलो होतो तर सहज चक्कर टाकली चहासाठी, मस्त कडक चहा झाला, फ्रेश वाटलं, आता निघतोय आम्ही. तू कशी आहेस बेटा.”

“मी मजेत काका. तुम्ही निघताय का आता? थांबा जरा, बोलूया आपण मी फ्रेश होवून येते.”

“आम्ही निघतो बेटा, तयारी करायची आहे ग उद्याची” सावंत काका तिला म्हणाले.

“बऱ! मग भेटू उद्या आपण.”

ती आत शिरली. सोबत राणीही तिची बॅग घेत शिरली. बाळू पाहुण्यांना घेवून गेटपर्यंत आलेला. आई आणि बाबा एकमेकांकडे बघत हॉल होते.

आज परत नवीन पिढीने जुन्या विचारांवर मात केली होती. बाबांना आज अंकित, त्यांचा बाळू नव्याने कळला होता. दोन्ही बहि‍णींना चिडवून सोडणारा बहिणीसाठी असा विचार करतो हे पाहून त्यांना आपण भाऊ म्हणून एकूलती एक बहीण अंजलीसाठी कमी पडलोय असचं वाटत होतं.

आज बाबांना, आपण का अंजलीसाठी वेळेवर ठाम निर्णय घेतला नाही, ह्याची खंत वाटत होती. जेव्हा अंजली आणि अमितच नातं विस्कटलं होतं तेव्हा ती आली होती अरुणकडे, पण अरुणने बघ्याची भूमिका घेतली आणि अंजली त्याच दलदलीत रुतत गेली. आज अंजलीच आयुष्य खूप आनंदाने भरून नव्हतं. जे थोडे फार आनंदाचे क्षण तिच्या वाट्याला होते ते तिने स्वतः कडे ओढून घेतलेले होते आणि ती आनंदी होती.

मोठा भाऊ म्हणून अरुणने तिच्यासाठी कुठलाच निर्णय घेतला नव्हता.  आजही तो तिला बघून नाराज होत असायचा पण तीच नाराजगी घालवण्यासाठी त्याने कधी काही पाऊल उचललं नव्हतं. मन खात होतं पण मेंदू बधीर करून बसले होते बाबा. बाळूमुळे त्यांचे डोळे उघडले होते. वडिलोपार्जीत जमीन विकून अंजलीला एखाद बुटिक टाकून द्यावं हा विचार त्यांच्या मनात घुमायला लागला होता. बाबांना त्यांची चूक गवसली होती, आपण अंजली साठी कमी पडलोय ह्याची सल त्यांना खात होती.

आईलाही तिच्या खुंटलेल्या विचारांची काहीशी लाज मनातच वाटत होती. अंकितने सांर काही संभाळलं होतं तरीही दोघांच्या मनाला काहीतरी बोचत होते...

बाबा विचारात होते, बोटांवर काहीतरी मोजत होते, ओठांमध्ये पुटपुटत होते, विचारात गरगरत ते म्हणाले,

“आरती आपल्या जमिनीचे कागद घेवून ये जरा.”

“अहो, असं काय झालं आता? आणि हे काय तुमचं नवीन हो, मध्येच!”

“आरती, मी चुकलोय ग, अंजूसाठी.”

“हो आपण चुकलो, तिच्यासाठी. मलाही काही वेळेआधी मनात आलं हो.”

“आणि मी साफ चुकलो ग, तू तर माझ्या सोबत होतीस ना? मी चुकलो ग.”

बाबा जरा हताश होवून सोफ्यावर बसले. मनाला आवरत होते. आज अंजली समोर नसतंना तिच्यासाठी डोळे पाणावले होते त्यांचे. चष्मा काढत म्हणाले,

“अंजू मी चुकलो पण आता नाही, आहे आहे अजून. मी आहे तोवर तुला कसलीच चिंता नको.”

आई अरातीच्याही मनाची दशा काही वेगळी नव्हती, स्वतःचे डोळे पदराने पुसत ती बाबांजवळ बसली

“अहो बाळू आणि राणीने आपले डोळे उघडले.  मी तर सतत सानूच्या मागे लग्नासाठी लागत आले. किती मूर्ख होते मी कधी असा विचार केलाच नाही. आज तर मी नकळत राघवसाठी तयार झाले होते, काहीच विचार केला नव्हता, बऱ झालं बाई बाळूने गोष्ट थांबवली.”

आई आज स्वतःला कमी लेखत होती. मुलीचं लग्न जुळाव म्हणून तिचा आटापिटा आज तिला कुठे घेवून जाणार होता हे तिच्या लक्षात आलं होतं. आपल्याला मुलगी एवढी जड झाली होती का? कि आपण तिला कुणाच्याही हाती सोपवणार होतो ही सल आईला खात होती. मन राणी आणि बाळूला धन्यवाद देत होतं.

“अहो ऐका ना, माझं चुकलं हो.”

“माझही चुकलं आरती, का ग मी आपल्या अंजू सठी असा ठाम निर्णय घेवू शकलो नाही. माझी अंजू एकुलती एक बहिण आहे ग.”

“आणि मी पण हो, सानूसाठी नाही असा विचार करू शकली कि तिने आज लग्न करायला होकार दिला तर तिच्यासाठी स्थळांची कमी नाही म्हणून.“ आईचे डोळे पाणावले होते.

मुलींसाठी लग्न हेच अंतिम हा भ्रम काहीसा तिचा तुटला होता. मनातल्या मनात कहीदा सानूची माफी मागून झाली होती. तीच निस्वार्थ घरातल्या प्रत्येकासाठी असणारं प्रेम एका आईच्या काळजीवर भारी झालं होतं. दोघेही विचारात मग्न होते तर बाळू पाहुण्यांना निरोप देवून घरात शिरला.

“अरे बाबा, आई, तुम्ही अजून इथेच आहात, अहो विसरा सगळं, नाहींतर ते वादळ शिरलंय ना घरात ते तुमच्या मनात शिरून सगळं मनातलं बाहेर काढेल. आई, विषय इथेच संपला ग, तायडीला काहीपण कळता कामा नये, नाहीतर ते वादळ कुठेही सुरु व्हायचं आणि सारेच गुरफटून जायचे.”

“बाळू, मनापासून धन्यवाद बाळा, माझी तर बोबडी बसली होती, एका मुलीच्या सुखासाठी दुसरीला स्वाह नाही करू शकत होतो मी, तुझा निर्णय आणि बोलणं आवडलं बाळा, सुखी राहा आणि असाच राहा जसा आहेस.” बाबा स्वतःचे अश्रू पुसत होते.

आईने बाळूला गच्च मिठी मारली, “ज्या वादळाचा असा भाऊ आहे त्या वादळाला कोण थांबवू शकतो.”

“अग ये, सेंटी नको मारू, लाग तयारीला, मी जरा त्या वादळाला भेटून येतो... करता पुरुष बाबा मी ह्या घरचा, सगळं बघावं लागतं... काय काय बघू अजून...” असं चिडवलेल्या चेहऱ्याने म्हणत बाळू सानूराणीच्या खोलीकडे वळला.

बाबा आईला म्हणाले, “चला साहेब, आपण तयारीला लागा, आणि काळजी करू नका आपली पुढची पिढी भक्कम आहे. आज मी बिनधास्त झालोय. माझे तिन्ही मुलं एकमेकांना जाणून आहेत आणि सोबत आहेत. स्वतःच्या आयुष्यात आणि स्वतःच्या जोडीदार सोबत राहूनही ते एकमेकांचा विचार नक्की करतील. त्यांच्या ह्याच विचारांचा सन्मान करणारे जोडीदार त्यांना लोभो हाच माझ्याकडून आशीर्वाद आहे सर्वांना.”

“हो ना, हो, माझ्याकडूनही... माझ्या सानुने घरातल्या सर्वाना बांधून ठेवलं आहे. बाळू बरोबर बोलला, आत्मा आहे ती ह्या घरचा, पोराने सांभाळून घेतलं रे देवा. नाहीतर चार लोकांनी तोंडात शेण घातलं असतं आपल्या.”

“अजून आहेच का ते चार लोकं तुझ्या ओळखीत. सोड ना आता माझ्या मुलीच्या मागे लागणं.”

“हो, आता मी ह्यांनंतर तिच्या मागे ती म्हणे पर्यंत कधीच लग्नासाठी लागणार नाही.”

“बऱ, मग मला लागावं लागेल.” बाबा परत आईची खिल्ली उडवत तिच्या कानात म्हणाले.

“काहीही काय हो. व्हा बाजूला, काम पडली आहेत.”

“अग जरा ते जमिनीचे कागत पत्र घेवून ये. मी बघतो काय होवू शकते ते, पडून तर आहे जमीन.”

“बऱ आणते, बघा तुम्ही, काढा जमीन विकायला, आपल्या अंजलीला देवू आपण काहीतरी सुरु करून.”

“आणि हो... तू तुझा मूळ स्वभाव कशाला सोडतेस... तू सोडला तर मला धरावा लागेल ना... म्हणजे मला आपला एक विषय मिळतो माझ्या लेकीच्या जवळ जाण्याचा, तुझ्या त्या लग्नाच्या विषयाने.”

“अग बाई! म्हणजे, मी आपली पोट तिकडीने म्हणत राहायचं आणि तुम्ही लेकीला प्रिय.”

दोघांची हॉल मध्ये मस्त जमली होती परत. एकमेकांना टोमणी मारत हसरे झाले होते. मनातले दुख जरा वेळ विसरले होते. जोडीदारच नातच असं ना, कुठची गोष्ट कुठे जाईलं बोलतांना कळतच नाही. आई बाबाही एकमेकांना सावरण्या साठी कुठचे कुठे निघाले होते, रमले होते दोघांमध्ये, तुम्हीही रमलात ना, भेटूया पुढच्या भागात काय होतं ते बघायला. घरचे सानूला कळवतील काय आलेल्या स्थळा बद्दल, सानूचा काय निर्णय असेल. बघूया पुढ्या भागात...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments