जोडीदार तू माझा... भाग २९

 जोडीदार तू माझा...  भाग २९आई बाबा गंभीरपणातून बाहेर निघत परत त्यांच्या तुझं माझं जमेना ह्या रूळावर आले होते. आपणही आपल्या आजच्या भागाकडे वळूया.

इकडे राणी खोलीत स्वतःला बारकाईने आरश्यात बघत होती कि तिच्या थ्रेडिंग बरोबर आहेत कि नाही म्हणून. सानू नुकतीच फ्रेश होवून पलंगावर हाता पायाला विंटर क्रीम लावत राणीला बघत बसली होती. बहिणीच्या खोलीत शिरून बाळू त्यांच्या उद्याच्या दागिन्यांना बघत होता.


राणी आरश्यातूनच बघत ओरडली,

“ये, ठेव ठेव, तिथेच माझे उद्याच्या साडीवरचे दागिने आहेत ते. अजिबात हात लावू नकोस.”

“हो जी, मी आपलं बघत होतो, नुसता खर्च करून ठेवला आहे... हे असले माचींग दागिने आणि ह्या मोठाल्या हिल्स...कसं घेवून वावरता ना तुम्ही कळत नाही.”

आणि बाळू बाजूला ठेवलेल्या हिल्स घालून बघत होता.

“ये भदाड्या, तुझ्या पायात घुसणार नाही, तोडशील बेल्ट्स, ठेव ठेव म्हटल ना.” म्हणत राणी धावली.

“अग, मी जरा बघत होतो.”

“बघत होतास कि तोडत होतास?”

“लय भारी आहे ही हिल्स राणी, किती नंबरची आहे ग?”

“तुला काय करायचं आहे? पडली आहे का तुला कधी?”

सानू आता जोरात म्हणाली,

“पडलीच असणार ग, त्या स्कुटी वालीच... म्हणजे पहिल्यांदा... आता नसेलही पडत, काय बाळू?”

“काय पण तायडे, तिची काय हिंमत! आपल्यावर चप्पल उचलायची! म्याच शिकवलं तिला, वेळ पडल्यावर पायातली काढून थोपकाडीत देण्याचं... तू पण ना...”

“आयला तू तर सिरिअस झाला रावं. बोल पट पट आता तिच्याबद्दल.”

“बघ राणी बोलले होते ना मी, आपला अंदाज चुकत नाही, पोरगा हातून केव्हांच गेलाय.” सानू पटकन बोलली.

बाळू आता गडबडला, काय बोलून बहिणीच्या बोलण्यात फसला हे त्याला जाणवलं होतं, कसबसं काहीही नसल्याचा आव आणत पुढे म्हणाला,

“म्हणजे, सिरीअसंच आहो मी... तुम्हीच मला असा समजता. अपुन क्या चीज है आपको क्या पता, बहिणो.”

“हो हो दिसूनच राहिलं रे, काय चीज आहेस ते. काय रे ती विदर्भातली आहे का?”

“कावून ग, तुला कसं माहित?”

“म्हणजे हल्ली तुझी भाषा बदलते ना दर दोन मिनटाने. हे काही तुझं बोलणं वाटत नाही, काय तर तुझा विदर्भीय करून टाकला वाटते तिने.”

“ताई... तू ना! पकड्तेस ग...”

“अरे बोलावं म्हटलं उद्या कार्यक्रमाला, करून दे सर्वांची ओळख. आम्ही काही लगेच दगाबाज, नालायक म्हणून तुला घालवून देणार नाही, अरे प्यार किया तो डरणा क्या?”

“म्हणजे... आई बाबा! त्यांना कसं सांगायचं?”

“तू आधी बोलावं, ते नंतर बघू, मी बघेन ते.”

“तायडे, मनात हेच फिरत होतं माझ्या. कसं ओळखतेस ग सर्व.”

राणी येवून सानूला बिलगली,

“मग माझी ताई आहेच तशी, असं मन कोरून काढते ना की समोरचा अंदाज लावू शकत नाही आणि मग....”

“आणि मग बोलतं होता येते तिच्यापुढे, तायडा माझी…”

बाळू तिच्या पायाजवळ येवून बसला, त्याच्या केसांवर हात फिरवत सानू म्हणाली,

“तुझा जोडीदार येतोय पहिल्यांदा घरी, तेव्हा जरा जवाबदारीने वागा... आईच्या लक्षात नक्की येईल नाहीतर.”

राणी पायांच्या बोटांना नेल पेंट लावत होती तर म्हणाली,

“हे कधी कळालं ग ताई तुला? काय जासूस बिसुस सोडलेस का ह्याच्या मागे... नाही सोडायलाही हवेत.”

“नाही ग, मी आपले अशेच, गोटे फेकले...आणि ते नेमके लागले असचं झालं...फक्त एकदा मी ह्याला हलकसं बघितल्या सारखं मला आठवतं, हा कुण्या मुलीच्या मागे बसून जात होता. माझ्या मनाने धागे गुंतले आणि बघ हा फसला.”

“ताई भारी आहेस ग.” बाळूने ढोपरापासून सानूला दंडवत घातला. आणि सानूने त्याला हाताने आशीर्वादही दिला.

“पण बाळू उद्या बोलावं तिला, भेटव आम्हाला...,आणि तु कुणालातरी आवडतोस हे मात्र आमच्यासाठी नवल आहे,”

म्हणत सानूने राणीला हाय फाय दिला, दोघीही हसत होत्या. बाळू जरा लाजला आणि म्हणाला,

“कुठे फसलो मी, निघतो बाबा नाहीतर एका वादळाने मला आधीच गुरफटलय आणि ही दुसरी उथड नदी मला वाहून न्यायची.”

“ये ताई हा मला उथड नदी म्हणाला.” आणि राणीने त्याच्या अंगावर उशी फेकली. तसा बाळू खोलीतून पळाला.

राणीने आणि बाळूने जराही भनक लागू दिली नाही सानूला कि घरात काय घडलं होतं ती येण्याआधी म्हणून. बाळू गुमान खोलीतून निघून गेला, निघताच त्याने त्याच्या तिला मेसेज केला. उद्या येण्यासाठी आमंत्रण दिलं. मन अगदीच आनंदी झालं होतं त्याचं.

घराने परत सुटकेचा श्वास सोडला, दोन तासा अगोदर अटकेला श्वास आता परत मोकळा झाला होता. घरात रोषणाई होती. तन मनात आनंद आणि डोळ्यात भावी जोडीदारची स्वप्न घेवून घरातली भावी पिढी उद्याची वाट बघत होती.

-----

घरात रोषणाई होती. तन मनात आनंद होता, समोर सुखाचे क्षण होते आणि त्यांना वेचण्यासाठी सारेच सज्ज होते.

आज पहाटेच सानूला जाग आली होती. अगदीच सकाळचे चार वाजले होते, समोर पडलेलं चांदण आणि दुरून डोकावणारा सूर्य बघून ती नव्या आशेने मनातच म्हणत होती, हळूच मनाने मनाला विचारलं,

“तुला सुमंत आठवतो का? का बोलत नाहीस ग त्याच्याशी, पण कसं सांगू त्याला...सांगू कशी कधी तुला...”

सूर्य डोकावता डोकावता अगदीच दिसायला लागला आणि सानूच मन सुमंत मध्ये डोकावत परत बाहेर आलं.

आईची सकाळपासून गडबड सुरु झाली होती. तिच्या आवाजाने सानू भानावर आली, खोलीतून बाहेर आली आणि आईला सामानाची आवरा आवर करतांना बघून तिला मागून येवून बिलगली.

“अरे सानू आज बरी लवकर उठली ग तू.”

सानू आईला गच्च बिलीगली होती, लाडातच म्हणाली,

“आई तुझ्या हातची एक झक्कास कॉफी मिळेल का ग ?”

“हो, का नाही! माझ्या राजकन्येची ही मागणी तर मी पूर्ण करू शकते. आवर तू. आता ठेवते.”

सानुने आईचा पापा घेतला आणि ती वाशरूममध्ये निघून गेली.

आईने तिच्यासाठी कॉफी खोलीत आणून ठेवली. सानू त्या कॉफीचे घोट घेत तिचा लॅपटॉप सुरु केला. राणी तिला बघून उठली आणि  तिचा फेस पेक लावायला लागली. घरात गडबड सुरु झाली. सकाळीच पाहुणे यायला सुरवात झाली होती. सानूचे मामा मामी गावावरून पोहचले होते. मामी आल्या आल्या कामालाही लागली होती. भीमा काका आणि काकीही पोहचले होते. अंजली आत्या छकुलीसोबत घरीच होती. घर गजबजल होतं. कॅटरिन वाले घराच्या मागच्या अंगणात जेवणाच्या स्वयंपाकाची जमवा जमव करत होते. बाळू सर्व तयारी बघत होता.

प्रसन्न वाटत होतं. सकाळचा वेळ पंख लावून उडत होता. आवरता आवरता बारा वाजले होते. आता आईची गडबड वाढली होती तिने सर्वांना खायला बोलावलं होतं. हॉलमध्ये सर्व जमले होते. गप्पा सुरु होत्या. सर्व आनंदातच होते तर मामी बोलली,

“काय ग ताई सानूच लग्न करायला हवं होतं ना आधी, वय वाढत आहे आणि मोठी आहे ती, हे बाई बऱ, जी पसंत पडली तिच बोहल्यावर चढली. लहान मोठा काही मान आहे कि नाही?”

“हो, बरोबर आहे तुझं, पण जोड्या ओढून जुडवता येत नाहीत ना ग! आले होते राजनरावं सानूसाठी पण गाठ मात्र राणीशी बांधून होती त्यांची. आता माझी सानू माध्यम ठरली दोघांच्या मिलनात... तिचाही जोडीदार येईल नक्की लवकरच.... आपण तयार राहायचं अजून काय?”

आई कसलाही संकोच मनात न ठेवता अगदीच आनंदात म्हणाली.

मामिलाही आरतीला असं उत्तर देतांना बघून आश्चर्यच झालं, तीही स्वतः मध्ये हसली, मामा कडे बघत म्हणाली,

“आज तुम्ही तुमच्या भावासारख्या बोलल्या.... नाहीतर नुसती चिंता आणि तेही समाजाची, चार लोकांची, शब्दात असायची तुमच्या.”

“हो ग, वेळ आणि प्रसंग सगळं शिकवतं, तू जेव पटपट, खूप काम आहेत आपल्याला,”

आणि आई बाळूला म्हणाली, “काय रे बाळू मांडव आणि सगळं सजलं ना तुझ्या प्लानिंग सारखं.”

बाळू तोंडातला घास चावताच म्हणाला,

“हो हो, हा निघालोच आता सगळं एकदा बघून घेतो.”

म्हणत तो निघालाही, निघतांना परत म्हणाला, “बहिणीचा भाऊ होणं म्हणजे कमी टेन्शनच काम नसतं... सगळं बघावं लागतं, च्यायला आज दुपारच जेवण केलं पण ब्रश केलाच नव्हता कदाचित मी.”

त्याच्या त्या पुटपुटीने परत सर्व हसायला लागले. थोडं थोडं खाऊन सर्व तयारीला लागले होते. आईचा हा आग्रह अगदीच बरोबर होता, घरच्या कार्यक्रमात घरच्यांना कुठे काही खायला वेळ असतो मग तयारी आधी सर्वांनी थोडं खावं म्हणून तिची सकाळपासून चाललेली जमवा जमव आता सगळ्यांना कळाली होती. घडीचे काटे आज धावत होते, सर्व घरं तयारीला लागलं होतं.

सानू राणीला तयार करत होती आणि छकुली तिला मदत करत होती. राणीची सुंदर मेकअप सानूने करून दिलं होतं. गोऱ्या रंगावर ते अजूनच मस्त बसलं होतं. राणी नंतर सानूने छकुलीला तयार केलं. स्वतः ही तयारीला लागली, सुंदरशी निळी शिफोनची साडी तिने नेसली होती. आणि तो गव्हाळ रंग अजूनच खुलला होता.

घरात धामधूम होती भीमा काका, बाबांना म्हणाले, “अरे अरुण, पाहुण्यांकडे जरा फोन केला का रे, ते निघालेत का म्हणून, चार वाजलेत आता. “

“अरे तुचं लाव ना... बघतोस ना मी बिझी आहे ते.” बाबा जरा मित्राच्या अधिकाराने म्हणाले.

“बऱ, लावतो मी.”

भीमा काकाने फोन लावला आणि चौकशी केली तर कळालं, पाहुणे निघाले होते आणि अर्ध्या तासात पोहचणार होते. भीमा काकाने ओरडून सर्वाना सांगितलं,

“चला पाहुणे निघाले आहेत, कुठल्याही क्षणात पोहचतील” आणि घरात सर्व स्वागतासाठी तयार झाले.

तुम्हीही तयार आहात ना उद्याच्या भागासाठी. पुढचा भाग लवकरच.....


---

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments