जोडीदार तू माझा... भाग ३१
लग्न आणि साखरपुडा हे अशे प्रसंग असतात जिथे लग्न जुळवल्या जातात, अनेक जोड्या ह्याच प्रसंगांमध्ये जुळवल्या जातात. कुठे मुलामुलींची नजरा नजर होते, तर कुठे सून पसंत पडते. नाही का?
मग गोष्टीही त्याच सुरु होत्या मांडवात. लोकांना काय तोंडावर झाकण नसते. आणि बोलायला काय जातं. मांडवात कुजबुज सुरु होती कि सानूसाठी राघवच स्थळ मोहित्यांनी नाकारलं म्हणून. कुणीतरी सानूला लग्नच करायचं नाही असंही बोलत होतं. तर कुणी भावाचंही लग्न जुळलंय असं सांगत होतं.
अनया सर्व कार्यक्रमात सानूसोबत होती. सानूच तिला सतत सोबत घेवन फिरणं आणि बाळूच मध्ये मध्ये करणं आता आईला जास्त वाटायला लागलं होतं. आता मात्र आईने गुपचूप येवून सानूला विचारलं,
“सानू, कोण ग ही? माझ्या ओळखीतली तर नाही...”
“मग होईल ना, घाई काय?
“तुझी मैत्रीण तर नक्कीच नाही. सरळ सांग ना.”
“नाही मैत्रीण तर होईल ना... “
“सानू मस्करी नको ग.”
“आयडे, तुला सांगू... अग ही, तुझी होणारी सून आहे.”
आई दचकली, “सानू काहीही बोलतेस, सांग, तुझी मैत्रीण तर नाही, मी सर्वांना ओळखते...आणि बाळू ओळखतो का ग हिला?”
आता सानू आईला जाऊन बिलगली, “अग आई हो...हीच तुझी सुनबाई.”
आणि मग अनयाला म्हणाली, “अनया आशीर्वाद घे ग, तुझ्या सासूचा... भारी त्रास देणार आहे ही तुला... “
अनया वाकली सुद्धा, तर सानू तिला उठवत म्हणाली, “आणि ऐक, त्यापेक्षाही मी देणार... लक्षात ठेव तुझा सासुरवास आणि नणंदवास आजपासून सुरु...”
“सानू मस्करी पुरे,” म्हणत आईने बाळूला आवाज दिला. “बाळू... ये बाळू ..”
बाळू आईकडे आला आणि अनया जवळ येऊन उभा राहिला. तर सानू परत आईच्या कानात बोलली,
“आई, ही तिच स्कुटीवाली, आपल्या बाळूला स्कुटीवर लिफ्ट देणारी. आणि आता आयुष्याच्या सायकलवर त्याची डबल शीट.”
आईने अनयाला गोंजारत आशीर्वाद दिला आणि म्हणाली, “घरी माहित आहे तुझ्या बाळूबद्दल?”
“नाही आई... मी सांगेन आता...नंतर...” म्हणत अनया घाबरल्या सारखी झाली.
आईने परत तिला हात लावत म्हटलं, “बरं बरं, बघू काय करायचं ते, आता कार्यक्रम आटपू द्या. सानू जा ग हिला घेऊन जेवण कर. आणि इथे काही फूस फूस करू नका... गप्प राहा... अजून पाहुणे आहेत. बोलूया नंतर सविस्तर.”
आई विचारात होती पण मांडवात बोलून काय अर्थ होता म्हणून गप्प होती. राजनच्या आईने बोलावलं आणि आई राजनच्या आईकडे बोलायला निघून गेली. साखरपुडा समाप्तीवर आला होता, होणाऱ्या जोडीला असंख्य आशीर्वाद लाभले होते. नकळत मांडवात अरुण आणि आरती एकमेकांजवळ आले, आरिती अरुणला म्हणाली,
“अहो, जोडा शोभतोय ना! मस्त दिसत आहेत दोघेही, राजा राणी.”
“हो ना, मला तर आपला साखरपुडा आठवला, कसे होतो ग आपण? मठ्ठ, फुगल्या सारखे बसून होतो. मी तुझ्याकडे बघायचो पण तू बघत नव्हतीस माझ्याकडे. आणि आताचे हे दोघे बघ कसे वाटतात? आनंद ह्याच्या चेहऱ्यावर झळकतोय.”
“अहो आपला जमाना वेगळा होता... आता तर ...”
“मग करायचं का परत लग्न आपण... नवीन पद्धतीने.”
“काहीही सुचतं हा तुम्हाला... आधी पोरांच्या लग्नाचं बघा.”
“त्याचं काय बघायचं आहे.... माझी राणी लवकरच राजनची राणी होणार आहे आणि आजचं सुनबाईची पावलं ह्या मोहिते निवासात पडली... आणि माझी लाडाची राजकन्या सानू लवकर सांगेल...”
“अग बाई, तुम्हाला कसं माहित? अनयाबद्दल?”
“अरे, बाप आहे मी अंकितचा, पोराला चांगलाच ओळखतो. आपली नजर असते प्रत्येकावर.”
“असं, ती आहे ना तुमची चमची, ती आली असेल सांगत... “
“ये माझ्या लेकीला मध्ये आणायचं नाही... आणि काहीही बोलायचं नाही.”
“झालं... मीच वेगळी पडते नेहमी...”
“आणि लेक कशाला हवी ग, माझ्या लेकाच्या मनातलं ओळखू शकत नाही का मी?”
“तुम्ही आणि तुमचं ते मन ओळखणं, काहीही तुमचं, अहो पण बाळूने परस्पर मुलगी पसंत केली.”
“करू दे ग, आपला जमाना नाही आता, मुलं मुली त्यांच्या पसंतीने जोडीदार निवडतात. आपल्या सारखं नाही, लग्नाला दोन महीने झाले होते तरी आपल्यात संवाद नव्हता.”
“काय हो काहीही तुमचं आपलं, पण मुलगी गोड आहे हो.”
“मला तर पसंत आहे सूनबाई, बघू, बोलू आपण बाळूशी, आता सानूच काय ते बघू आणि मग आपला बाळू. तसा तोही समजदार आहे. मुलगी अजून शिकत आहे मग अवकाश आहे. काही घाई नाही आपल्याला. काय हो राणी सरकार.”
“तेही, पण ती ना जरा मला गोंधळलेली दिसली, म्हणजे तिच्या घरी काही आपल्या बाळूबद्दल माहीत नसावंच.”
“हुमम, आपण बोलू ना वेळ आल्यावर. मुलांबद्दल आपल्याला माहीत आहे हे काय कमी आहे. मला काही घाई नाही.”
अरुण आणि आरतीच हळूहळू बोलणं सुरु होतंच तर भीमा काका इथे आले,
“अरे अरुण, पाहुणे निघतो म्हणत आहेत.चल सावंत साहेबांशी बोलून घे.”
“हो हो.... मी आलोच” अरुण भीमा काका सोबत पाहुण्यांना निरोप द्यायला निघून गेले. मागेच आरतीही गेली.
राजनने राणीला नजरेने इशारा केला आणि तो नेमका बाळूने टिपला,
“काय जीजू, आखो ही आखो मै इशारा हो गया....”
“सालेसाहब, आप आपणा देखो, काहीपे इशारे काहीपे निशाना....”
बाळूने एक नजर राणीवर टाकली, राणी इशाऱ्यात तिने काहीही सांगितलं नाही म्हणून बोलली.
सानू आता मध्ये बोलली, “बोक्याला वाटतं आपण लपून दूध पीत आहोत पण.....?”
आणि सगळे हसले, हसतांना अनया अजूनच खुलली होती. तिच्या अश्या हसल्याने बाळू अजूनच लाजला.
साखरपुडा आटोपला होता आणि लग्न महिनाभराने होतं. दिवाळीच्या मस्तीत दिवसं आनंदांना पकडून धावत होते आणि रात्री स्वप्नांच्या कुशीत अलगत शिरत होत्या.
दोन्हीकडलं पाहिलं लग्न, तयारी जोरदार होती. राणीच कॉलेज सूर होतं आणि त्यातून वेळ काढून ती लग्नाची तयारी करत असायची. त्या दिवशी घरात लग्नाच्या खरेदी करून सर्व परतले होते, घरात चर्चा सुरु होती, खरेदीचा पसारा पसरला होता घरात. आई आल्या आल्या चहा टाकायला स्वयंपाक घरात गेलीली, बाबा आणि सानू थकल्या सारखे सोफयावर लोळले होते. राणी साड्यांच्या आणि सामानाच्या पिशव्या सावरत होती. भीमा काका आणि काकू आताच निरोप घेऊन त्यांच्या घरी निघाले होते.
सानू सारखी बाळूला कॉल लावत होती, कुठे गेला हा मध्येच आपल्याला सोडून काय माहीत आणि आता मोबाइल स्विच ऑफ येत आहे ह्याचा.”
बाबा, जावूदे ग, आलोय आपण घरी आता, येईल तो असेल काही काम, तुमच्या तरुण पिढीच हेच तर कळत नाही. मध्येच कुठेही हरवता.”
“अहो बाबा तसं नाही, तो तिकडे दुकानाच्या बाहेर कुणाशीतरी बोलत होता, त्याला सारखा फोन येत होता.”
“असेल कुण्या मित्राचा, येईल रात्री परत तेव्हा विचार.”
सानूने फोन सोफ्यावर टाकला आणि राणीला म्हणाली, काय मग स्वारी जाम खुश. आवडीची खरेदी झाली तुझ्या.”
“हो ताई, तू होतीस ना, मग मला काय कमी. पण तायडे खर्च झाला तुझा.
“हो पण परत परत नाहीना मागणार तू हे सर्व. माझ्याकडून सगळं तुला भेट आशीर्वाद म्हणून.”
“आई स्वयंपाक घरातून ओरडली, हुम्म, पण खूप खर्च झाला सानू. आता तू अजिबात खर्च करू नकोस. बाकी आम्ही बघतो. मी एफडी ठेवल्या आहेत. उद्या मी आणि बाबा बेंकेत जावून येवू.”
“जावू दे ग आई, चालायचं. राणीसाठी एवढं करू शकते मी. आता नाही माझी तेवढी येंपत की मी तिला सोन्याचं सगळं भेट देवू शकेल पण सगळं मेचींग घ्यायला काय हरकत आहे.”
“राणी तिचा नेकलेस बघत म्हणाली, तायडे कुंदनचा सेट बेस्ट आहे सोन्यापेक्षा कारण ह्यात तुझा आशीर्वाद आहे. मी हाच घालेन हा....”
सानू हिशोब मांडत होती आणि राणी सामान आवरत आनंदी होती आणि दारावर बेल वाजली, राणी उभीच होती ती दाराकडे वळली, दार उघडलं आणि थक्क झाली, काहीच बोलली नाही, सानू हॉलमधून ओरडली,
“कोण आहे राणी, बोल ना ग....” राणी तरीही गप्प होती.
दारातूनच अंकित म्हणाला, “सानू ताई मी आहे... आणि... “
बाळूचा आवाज ऐकताच सानू ओरडली, “अरे कुठे गायब झाला होतास रे शेम्बड्या सामानाच ओझं टाकून, मला आणि बाबांना आणावं लागलं ....” म्हणत ती दारात पोहचली, आणि परत ओरडली, “बाबा आई इकडे या लवकर... “
आई बाबा दारात धावले, सर्व चकीत होते, अंकित आणि अनयाने लग्न केलं होतं, अनया गळ्यात माळ घालून दारात अंकित सोबत उभी होती. कुणाला काहीच सुचत नव्हतं, जरा वेळ सगळे स्तब्ध होते. मग सानूने अनयाला आत घेतलं. पुढे काय होईल बघूया पुढच्या भागात. लवकरच...
---
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments