जोडीदार तू माझा... भाग ३४

 जोडीदार तू माझा...  भाग ३४ 



आई बाबा घरी होते. आई गुमान गप्प काम करत होती, घरात भयाण शांतता होतीच... अनुही धास्तावली होती, तिलाही शब्द फुटत नव्हते... आता पुढे...

अनयाचा रडून घसा कोरडा आणि मन ओलं झालं होतं, तिला पाणी हवं होतं, खोलीतली  पाण्याची बॉटलमध्ये पाणीही नव्हतं, अनया हळूच बाहेर येवून जरा स्वयंपाक खोलीत शिरसावली तर आई लगेच आली,

“तुला काही हवं का? सांग मला.”

“नाही, मला जरा पाणी हवं होतं.”

“थांब, मी देते.”

“मी घेवू का?”

“नाही नाही... कशाला.”

बाबांनी आईकडे नजर रोखून बघितलं तरीही आईने पाणी तिला जवळ नेवून दिलं, अनया जरा गोंधळली तिला ते पाणीही जाई ना. नंतर ती तो ग्लास ठेवायला गेली तर आईने तोही हातात घेतला. आता तर अनया अवघडली. आणि काहीही न बोलता ती खोलीत शिरली. परत घरात शांतता होती. नंतर बऱ्याच वेळाने अनया बाहेर आली तेव्हा बाबा हॉल मध्ये काही पत्रिकांवर नावं लिहित होते आणि आई अक्षदा चीपकवत होती. अनया परत म्हणाली, “मी काही मदत करू का, मी लावू ही अक्षद ह्या पत्रीकेंवर?”

आई तिला लगेच म्हणाली,

“नको नको, तू राहूदे, जा अंघोळ वगैरे कर ना.”

अनया दचकली, मागे झाली, तर आई तिला परत म्हणाली,

“थांब मी तुला राणीचे काही कपडे देते, बघ तुला होतात काय ते. मग आपण जावू बाहेर तुझ्यासाठी काही घ्यायला.”

अनयाने मान हलवली आणि ती परत खोलीत शिरली, तिला काही सुचतही नव्हतं. आंघोळ केली, अश्रू शॉवर सोबत वाहून पाणी झाले होते. शांत झाली. राणीचा आईने काढून ठेवलेला ड्रेस तिने घातला, आणि परत बसून होती. बसल्या ठिकाणी तिला तिच्या घरच्या आठवणी तिला छळत होत्या. कळत नव्हतं, आपण चूक तर केली नाही ना हा विचार तिला सोडत नव्हता. खूप बोलावसं वाटत होतं पण कुणाशी साऱ्यांनी पाठ फिरवली होती आणि इथे नाती नवीन होती तीही एकाएकी जुळलेली. ती सारखी अंकितची वाट बघत होती. बराच वेळ झाला घरात काहीच आवाज नव्हता. तिने परत खोलीतून बाहेर डोकावत बघितलं पण कुणीच हॉलमध्ये नव्हतं. तिला भूक लागली होती, स्वयंपाक खोलीत डोकावलं तर तिकडेही कुणीच नव्हतं.

नंतर भीतभीत तिने सर्व घर शोधलं, कुणीच दिसेना. एक खोली बंद होती तिने तीही भीतभीत उघडून बघितली तर तिथे नुसतं लग्नाचं सामान भरून होतं. त्या सामानानेही तिला जरा चिडवलचं, लग्नाचं सामान होतं ते. मनाला ते सामान एक चटका लावून गेलं तिच्या, वाटलं...

“आपल्या लग्नात नाहीना असा लाजम्मा झाला...”

स्वतःला सावरत परत ती भानावर आली आणि आई बाबांना शोधायला लागली.... आता जरा मनातून घाबरली होती, तर तिला रडायचा आवाज आला... आणि ती आवाजाच्या दिशेन वळली....

अनया रडण्याच्या आवाजाच्या दिशने वळत होती, मनातून परत हादरली होती, अजून काय वाढून ठेवलंय आपल्यासाठी ह्या विचारणे बेचैन झाली होती. हळूहळू ती घराच्या मागच्या माळ्याच्या पायऱ्या चढत होती.

बाबांचा आवाज कानावर पडला,

“जावू दे ना आरती, तो तरी काय करणार होता, सुचलं नसेल ग त्याला. आपण समजून घ्यायला हवं ग. आता त्याला आणि तिला तरी कोण आहे आपल्याशिवाय.”

“काहीही काय हो तुमचं, अगदीच लग्न केलंय ना त्याने, फोन करायचा ना आपल्याला, सांगायचं काहीतरी. आपण, तुम्ही, माझ्या सानूने काही मार्ग काढला असता ना… हे काय असं एकदम काही नाही आणि त्या मुलीला घेवून आला हा...”

“सुचलं नाही ग मुलांना, समजून समजून घेववूया ना आपण.”

“अहो मी बोलले होते हिच्याशी साखरपुड्याच्या दिवशी, जरा शंका आली होती मला की हिच्या घरी काही माहित नसणार म्हणून.. पण हे असं एवढ्या लवकर घडून समोर असं उभ राहिल हे नव्हतं ना काही विचारात आलं.”

“आयुष्य असचं असतं अरु.... आयुष्यातले गणित माहित नसतात आणि आपल्या समोर येतात... सोडवायचे आपण. तू आधी शांत हो.”

“अहो पण, आता चार लोकांत काय सांगायचं?”

“अजून तुझे ते चार लोकं आहेतच का? आधी त्यांना मसणात नेवून टाक.”

“गप्प व्हा तुम्ही, जेव्हा तेव्हा मला थांबवत असता, ह्याच लोकांमध्ये राहायचं आहे आपल्याला, म्हणजे काय, काही तर सांगाव लागेल ना, काय बोलतील लोकं! आता ही बया, राणीच्या लग्नातही घरात असेलच ना मध्येमध्ये, पाहुण्यात, सोयरीकीत काय सांगायचं आपण?”

“हुम्म... प्रश्न आहे पण...”

“पण काय हो, बोला ना आता, काय सांगायचं?”

“सांगायचं जे आहे ते, अजून काय! खर सांगितलं नाही तर अंकित आणि तिला वाईट वाटायचं... तिचा अधिकार अंकित ने तिला दिलाय तर आपण का म्हणून नाही?”

“अहो मी कुठे नाही म्हणते पण असं अचानक, पचत नाही ना हो... मी तरी बाई नाही स्वीकारू शकत.”

“सारचं पचत नसतं, काही दुखून आणि सहन करून पचवावं लागतं अरु... आणि तुला ग नवीन काय सांगू. थांब ग, नको ना रडू... जावू दे, तुझी तब्येत खराब व्हायची. उगाच बीपी वाढायचा.”

“हो आपल्यालाच ना? सहन करावं तरी किती माणसाने. नवीन नवीन समोर उभं राह्त असतं हो, आताच काय ते सानूसाठी आलेल्या स्थळाला आपण राणीसाठी स्वीकारून मोकळे झालो, आणि आता हे...”

“हे तुझं काहीतरी, राणी राजन खुश आहेत... तो तरी विचार करू नको.”

“नाही मी आपलं बोलले हो... पण हे नवीन आता कसं?”

“आता तिच्या जागी राहून विचार कर बरं...”

“हो म्हणूनच गप्प आहोत ना? किवं येते मलाही तिची, रडक्या स्वभावाची आणि भावनिक आहे मुलगी, पण मी खूप प्रश्नात अडकली आहे. आणि मुख्य म्हणजे आता लग्नात काही गोंधळ व्हायला नको...”

“हो मीही तोच विचार करतोय, पण जावई समजदार आहे आपला.”

“अहो हिला आपण काही दिवसासाठी कुणीतरी पाहुणी म्हणून सांगितलं तर... किंवा कुठे पाठवून दिली तर...”

“ये बाई, तू अजून काही उभं करू नको, काही तरी लपवण्याच्या नादात, काहीतरी भलतं घडायचं, पोरगी साधी सुधी आहे, ऐकेल आपलं... मध्ये मध्ये नाही करणार ती, राहूदे आणि उलट आपल्या मुलाला वाईट वाटेल त्याच काय करणार, उगाच मुलाशी संबंध वाईट व्हायचे आपले. आयुष्यभर मनात बोचून राहतं... आणि मग संबंध खराब व्हायला वेळ लागत नाही... मी नाही करणार असं, आपल्याला त्या दोघाच्या मागे उभं राहायचं आहे नाहीतर ती फक्त बाळूची बायको होवून राहिल आणि मग काहीच उरणार नाही... आपल्याकडे तसाही पर्याय नाही ग... आताच वाईट झालो तर पुढचं सर्व वाईट होत जाणार, आता काय ते दोघं सांभाळून घेतील आणि आपण मात्र कायमसाठी वाईट होणार... म्हणून जे आहे ते उत्तम आणि मान्य, काय कळाल का?”

“आता काय आलेल्या भोगाशी असावे सादर....” आई परत रडायला लागली.

“तू आधी रडणं बंद कर, अग सून आली तुला आता.. हे रडूबाई, हस ग, जरा सासूपण दाखव, मजा घे... खरच सांगू का, ती अनया ना मला तुझ्या सारखीच वाटते बघ... तुझी सून शोभते.”

“तुम्हाला ना मस्करी सुचते आहे, इथे मी स्वतःला तयार करते आहे.”

“मग काय, सासू रडतांना पहिल्यांदा बघतोय मी!”

“रडू नाही तर काय करू, मुलाने तेच दिवसं आणलेत आपल्यावर.”

“ये आपल्यावर नाहीत, तुला असं वाटते, मी स्वीकारलं तिला, आता ती अशी घरात आली तर अशीच सही... मोहित्यांची सून आहे आणि तिचं राहिलं... बाळूची पसंत नाकारून मुळीच चालणार नाही. तुही स्वीकार लवकर... तेच उत्तम आपल्यासाठी.”

बाबा शिलाई मशीन साफ करत होते आणि आई अक्षीदाचे पाकीट भरत अश्रू ढाळत होती. बाबा जरा मनातून सावरले नव्हतेच पण स्थिर असण्याचा आव आणत आईला सावरत होते. मनात पसरलेला विचारांचा पसारा आवरणं दोघानांही कठीण होता, पण विखुरलेलं आवरणं काळाची गरज होती. इकडे दाराशी पोह्चेल्या अनायाने सर्व ऐकलं होतं.

पुढच्या येणाऱ्या भागात बघूया, अंकित कसा साथ देतोय अनायाला, आणि राजन राणीला.... आणि ह्यानां सांभाळत आई बाबा जोडीदार म्हणून कशी भूमिका पार पाडतात. सानूला जोडीदार कधी येणारं ह्या सगळ्या प्रश्नांना शोधूया क्रमशा...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments