जोडीदार तू माझा... भाग ३६

 भाग ३६

अंकितने अनयाला अचानक बायको म्हणून घरात आणलं होतं. सर्वांना अचानक धक्का होता तो, अंकित अनयासोबत खंबीर उभा आहे हे सर्वांच्या लक्षात आलं होतं. घरातले सर्व सकाळी कामाला निघून गेले होते आणि अनयाला आईच्या मनातला राग आणि गोंधळ कळाला होता. त्यावर अंजू आत्याने आणि बाबांनी घातलेली फुंकरही तिला उमगली होती.

बाबा आईला हायकमांड म्हणाले आणि अनु जरा स्मित हसली, तरीही भीतभीत बाबांकडे बघत अंजु आत्याला तिने प्रश्न केला,

“ हायकमांड? साहेब?”

“दादा वहिनीला म्हणतो, साहेब तर कधी हायकमांड म्हणतो, खूप आधीपासून, आईने सांगितलंय त्याला तसं म्हणायला.”

आणि ती हसायला लागली, आणि हसतच म्हणाली, माझे दादा आणि वाहिनी जगातले बेस्ट जोडीदार आहेत,

“काय रे दादा?”

बाबा नुसते हसले, तर आत्या परत मस्करी करत म्हणाली,

“माझा दादा आधी आईचा पदर पकडून असायचा आता बायकोचा पदर टाचून देतो.”

“काय करणार बाबा! आधी आईचा दरारा होता, आता बायकोचा आहे आणि पुढे सुनबाईचा असणारं... मोहित्यांची परंपरा! अजून काय? आम्ही आपलं नामधारी सिंहासनाचे राष्ट्रपती, जिथे शिक्का मार म्हटल तिथे गुमान डोळे मिटून मारायचा. आणि काय ग अंजली तुला बऱ आताच माझी पोल खोलायची होती.”

बाबा जरा वातावरण बदलण्याचा प्रयत्न करत होते. बाबा आता माळ्यावर जाण्यासाठी वळले होते तर आई खाली आली. आता मात्र वातावरण गंभीर झालं, बाबा परत मस्करी करत म्हणाले,

बा-अदबबा-मुलाहि‍जा होशियार माहिते हायकमांड पधार रही हैं..,,”

“अहो पुरे झालं बायको पुराण, दुसरं काही सुचत नाहीच ना तुम्हाला, कसलं काय आणि कसलं काय? आता हा येवढा पसारा करून ठेवलाय कोण उचलणार.”

म्हणत आई मशीनच सामान आवरायला लागली.

“वहिनी तू जेवण कर बऱ आधी, तुझ्या पोटात नाही ना काही म्हणून तूझी चिडचिड होतं आहे.” अंजली पानं वाढत म्हणाली.

“हुम्म्म, आण, निदान पोटाच्या भुकेला तरी शांत करते पण हे जे मनात सुरु आहे त्याच काय ग बाई...” आई डोक्याला हात लावत म्हणाली.

अनया परत घाबरली, आत्याने तिला इशाऱ्याने शांत केलं आणि गप्प राहायला सांगितलं. बाबा डायनिंगची खुर्ची ओढून बसले, त्यांनी अनयाला बसायला सांगितलं आणि हे बघून आई म्हणाली,

“अंजू, मला बाई इथेच दे, सोफ्यावर बसूनच जेवते मी आज.”

अनया हे ऐकताच परत खुर्चीवरून उठली, बाबाने तिला परत हाताने इशारा केला, तर ती परत बसली. बाबाने आता टीव्ही लावला, आईच आवडत टीव्ही सीरिअल सुरु होतं. मग आई जरा रमली, सर्व निवांत जेवले. जेवून झालं तरी आई काही उठत नव्हती, तशीच निमूट बसली होती ताट घेवून. अनया अचानक जावून तिच्या समोर उभी झाली,

“आई ताट देताय ना?”

का कुणास ठाऊक आईने काहीही न बोलता तिच्या हातात ताट दिलं. आणि परत बाबांवर किरकिर करायला लागली,

“काय हो समजत नाही का तुम्हाला? हे... हे ओइलिन्ग तुम्हीच केलं ना? उचला ते, नीट जागेवर नेवून ठेवा, मी काय सर्वच करायचं का? लग्नाचं घर आहे शंभर काम पडली आहे. हा असला पसारा उचलत राहू का मी?”

बाबा गुमान कामाला लागले, तर परत म्हणली,

“राहूद्या, मला काही जड नाही एवढसं, चालले मोठे उचलायला, कुठतरी द्याल ठेवून आणि मग नंतर मलाच शोधून द्यावं लागेल. व्हा बाजूला.”

बाबाने परत सामान हातून सोडलं तर परत म्हणली,

“अरे उचललं होतं ना? मग ठेवायचं ना! नुसतं नाटक करता येतं तुम्हाला, आपण गोडं बोलायचं आणि आम्ही सहन करायचं, व्हा बाजूला, मीच करते.”

बाबा परत गुमान बाजूला झाले. आणि गुपचूप सोफ्यावर बसले. आरतीच्या मनातला ज्वालामुखी धग धग करतोय हे त्यांना कळालं होतं, शांत राहण्यात समजदारी होती. मग काय तोंडावर बोटं. 

आत्या आणि अनया स्वयंपाक घर आवरत होत्या, अंजली आत्या म्हणली,

“अनया मला निघायचं आहे, माझ्या मुलीला घ्याला जायचं आहे ग, दोन पर्यंतच असते तिची शाळा. तू अवरतेस का?

अनया घाबरली, “आत्या मी एकटी, आईंना आवडायचं नाही ना?”

“हो ते दिसत आहे, पण नाही करून पण मार्ग निघणार नाही ना? आणि मार्गही तुझा तुला शोधायचा आहे.”

अनयाने मान हलवली, आणि म्हणली, “आत्या एक विचरू का?”

आत्या निघण्याची तयारी करत म्हणली, “हो विचार, पण उत्तर भेटेल ह्याची अपेक्षा ठेवू नको, सारे कप्पे एकाच वेळेस उघडायचे नसतात.”

“तुम्ही मगाशी म्हणाल्या होत्या ना कि तुम्हाला मुलं झाले नाहीत म्हणून मग ही छकुली, तुमची मुलगी.... क ss कशी ?”

“हुम्म्म, ती एक भली मोठी कथा आहे, तू नको ऐकू आता, तुझं आताच लग्न झालंय.. चांगले चांगले विचार कर... माझा विचार नको करू. माझं काय... काही राहिलं नाही ग..... आता तू सून आहेसच ह्या घरची... कळेल सर्व तुला हळू हळू.... काय करतेस आताच ऐकून... चल निघते मी...”

अंजुने चपला घातल्या आणि जाता जाता ती परत म्हणाली,

“आयुष्याचे सारेच गणितं सहज सुटत नसतात, कितीही प्रयत्न केला तरी.”

अनयाने परत मान हलवली. आणि हळुवार घाबरत स्वयंपाकाचा ओटा पुसत होती, आईच्या घरी असतांना कधी तिने एवढा विचार करून ओटा पुसला नव्हता पण आज ओट्याचा प्रत्येक कोपरा तिने पुसून काढला, पुसल्या नंतर कापड कुठे वाळत घालायचं ह्यासाठी तिचा गोंधळ सुरु होता, घाबरगुंडी उडाली होती. कापड नळावर ठेवू की बाहेर तिला कळेना झालं होतं. आईकडे बघितलं तर तिला विचारण्याची हिंमत झाली नाही. आधी तिने नळावर कापड वाळत घातलं मग ते काढलं परत नळाखाली धुवून काढलं, बाहेर गेली वाळत घातलं, परत काढलं ते नळावर होतं म्हणून परत नळावर टाकलं. तिचं तिलाच कळत नव्हतं. बाबा बसल्या बसल्या पेपरच्या कोपऱ्यातून बघत होते पण शप्पत त्यांची बोलण्याची हिंमत होईल. शेवटी अनयाने ते कापड बाहेर टाकलं. आणि सगळं नीट झालं आहेना ह्याची बऱ्याचदा शहानिशा केली. खोलीत गेली परत आली, ओट्यावर ठेवलेलला ग्लास तिने धवून परत रॅकवर ठेवला, परत काढला आणि ओट्यावर जिथे होता तिथे ठेवला. खोलीत निघून गेली. खोलीच दार लोटावं की नाही हा ही विचार ती करत राहिली आणि गुमान बसून होती. अंकितशी बोलावं असं वाटत होतं पण मोबाइल नव्हता, तो तर आईकडे घाईत राहिला होता. घडीच्या कट्याकडे बघत तिने दुपार काढली.

चार वाजले होते, आई दुपारची झोपं घेवून स्वयंपाक खोलीत शिरली, तिने बाहेरून ते कापड आणून परत नळावर ठेवलं, भांडी बरोबर लावली. चहा ठेवला, आणि आवाज दिला,

“अहो चहा घ्या, आणि त्या दागिने वाल्याकडे जायचं आहे आज, विसरलात का?”

“हो हो साहेब, तयार होतो मी, चहा घे हॉलमध्ये.”

आरती आणि अरुणला बाहेर जायचं होतं, बाबांनी तयारी करतांना आरतीला इशारा केला कि अनयाला ही घेवून जावू, पण आरतीने सपष्ट नकार दिला. मग बाबानेही गोष्ट ताणली नाही. दोघांनी चहा घेतला, निघतांना, बाबा अनयाच्या खोलीसमोर आले,

“अनया, झोपली आहेस का? आम्ही बाहेर जात आहोत, काम आहे. तुला चहा लागत असेल तर कर तू. आम्हाला यायला वेळ होईल, राणी येईल आता पाचपर्यंत. मग आहे ती तुला सोबतीला.”

अनया खोलीतून बाहेर आली, “हो ठीक आहे, बाबा, अंकित किती वाजता येतो?”

“हुम्म्म, तो, उशीरच येतो पण आज कदाचित येईल लवकर. त्याचाही जीव टांगला असेल.”

“आणि सानू दी?”

“सानू! ..तिचं काही माहित नाही बुवा... मनमर्जीत जगणारी ती... येईल पण... निश्चित वेळ मी नाही सांगू शकत.”

अनया जरा हसली, बाबा परत म्हणाले, “आम्ही निघतो, वेळ होतोय.”

“बाबा तुम्ही छान बोलता म्हणून बऱ वाटते, नहीतर आई तर माझ्याशी नीट बोलतही नाहीत.”

बाबा निघाले होते तर परत पलटले आणि म्हणाले,

“पोरी हिच्याबद्दल अळी ठेवू नकोस ग, तुम्ही जे केलत ना त्याची उलट रिअक्श्न आहे ती, आणि ती आणि मी वेगळे नाहीत, तिच्या मनात जे चालू आहे ते माझ्याही मनात आहे. माझी घुसमट माझा त्रागा तिच्या मार्फत बाहेर निघतो येढंच, तुझ्याशी बोलतोय ह्याचा अर्थ मी तुम्ही केलेल्या गोष्टीने दुखावलो नाही असं मुळीच नाही. मी हिच्या येवढाच मनातून स्वतःला सावरतोय, तिचं दिसतेय तुला पण ती माझं प्रतिबिंब आहे. सवय असते आम्हा पुरुषांना घरच्या स्त्रीच्या मार्फत प्रत्येकापर्यंत पोहचण्याची, तिच्या पासून आम्हाला सारं समजतं, पुरुषांचा कधीच घरच्या प्रत्येक नात्याशी सरळ संबध येत नसतो, तो होतो तो घरच्या स्त्रीपासून. मुलांना काय नको काय नाही हे बाबांना कुठे माहित असतं ते तर आईकडून कळत असतं पण बाबा ते पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस एक करत असतात. आम्ही पुरुष नेहमी स्त्रियांच्या मागेच असतो ग, आम्हाला काय हवं ते आम्ही त्यांच्या कडून करवून घेत असतो, कारण आम्ही कधीच समोर जावून व्यवहार करत नाही. म्हणून कदाचित बाबा कधी कधी वाईट दिसत नाही, ती आई दिसते. पण मुळात तिची वागणूक, बोलणं आणि सारचं हे माझं प्रतिनिधित्व करत असते. हा आता ह्याचा अर्थ असा ही कि मला बिलकुल तुम्ही जे केलं ते मान्यच नाही... पण ते कबुल करायला जरा वेळ लागणार ना? आणि मुख्य म्हणजे आई जसं करते, वागते, बोलते ह्याला मी थांबवू शकत नाही, ते तुला थांबवायचं आहे. मी माझ्या जोडीदार सोबत होतो, आहो आणि नेहमी असणारं, तेव्हा तू तिला वाईट समजत असशील तर मलाही लागू होते.”

अनया काहीच बोलली नाही. पण पहिल्याच दिवशी जोडीदाराचा अर्थ तिला कळला होता. बाबांबद्दल आणि त्यांच्या आईशी असणाऱ्या नात्याबद्दल आदर तिच्या मनात शिरला होता. तोच, आईचा बाहेरून आवाज आला,

“अहो येताय ना? वेळ होतोय. काय सूर असतं निघण्याच्या वेळेवर माहित नाही ह्याचं. ह्या मोहित्यांच्या ना बायका समोर असतात आणि हे मागेच, म्हणजे मी वाईट आणि हे गोडं. अहो येताय ना?”

आई आता आत मध्ये आली आणि अनयाला बघून म्हणाली,

“बाहेर निघू नको ग? राणी आली की सोबत जा, कुठे जायचं असेल तर... उगाच लोकांना बोलायला चर्चा देतो आपण.... काय काय दिवसं दिसणारं कोण जाने!”

अनयाने दाराजवळ येवून स्मित हसत होकार दिला. आणि दार लावूनही घेतलं. विचारांच्या अनेक रंगाची उधळण तिच्या अंतरंगात होत होती. जोडीदार कसा असावा हे तिने आज अनुभवलं होतं.

मग तुमचा जोडीदार असाच आहे ना.... तुम्हाला समजून घेणारा... भेटूया पुढल्या भागात...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments