जोडीदार तू माझा..... भाग ४०

 भाग ४०



धाकधूक मनात होती तरी काही असं धक्का बुक्की होण्यासारखं घडलं नव्हतं, हा मनात धास्ती मात्र कायम बसली होती, अनू अंकित मनातून बावरले होते पण भक्कम होते, घरातल्या प्रतेकांच्या मनात काही ना काही सुरू होतं, तरीही ते एकत्र होते...

राणी तिचं आवरायला खोलीत गेली आणि सानू अनुला म्हणाली,

“अनु, ये आपण हे सर्व खाण्याचं गरम करून घेववूया.”

अनुने मान हलवत सानुला होकार दिला आणि दोघींनी जेवण गरम केलं. जेवणं झाली आणि सर्व परत आपल्या आपल्या खोलीत निघाले. अंकितने अनायाकडे बघितलं तर आई म्हणाली,

“ह्म्म्म, आता राणीचं लग्न आटपू द्या नंतर रीती भाती करू साऱ्या... सारं काय तुमच्या मनानेच होणार काय?”

बाबाने अंकितकडे बघत त्याला डोळ्याने इशारा केला आणि अंकित त्याच्या खोलीत निघून गेला. सानूने अनायाला तिच्या खोलीत नेलं. अनया काहीच बोलली नाही पण डोळे पाणावले होते तिचे. सानूने तिला बसवलं,

“ये रडू वहिनी, तुला माहित झालं असेलच मोहित्यांची सून रडलेली चालत नाही इथे. रडणं बंद कर.”

“सानूताई मला सून कुठे समजतात सर्व.”

“अह्ह्ह, असं कुणी बोललं तुला, आणि शांत राहा... तुम्ही जो घोळ घातलाय ना तो निस्तरावा आम्हाला लागतोय, हे कळतं का तुला, वाटेल तसं बोलू नकोस, उगाच वाईट व्हायची तू. आणि कशाला हवंय ग सूनपण तुला आतापासून, मुलगी म्हणून राहा ना, तुझी आई तुला कधी रागावली नाही का? तुझ्याशी कधी तिने अबोला धरला नाही? तुझी प्रत्येक गोष्ट आवड्लीच तिला?”

“ताई, असं नाही...”

“मग कसं? आई ती आई... भांडली बोलली तर चालेल... पण नवऱ्याची आई का नाही?”

“ताई पण आई, रागवल्या आहेत ना?

“का तिला हक्क आहे. तू अशी घरात सून म्हणून आलिस, तिने काय जरा रागवू पण नये का?”

“ताई तसं नाही हो..”  

“राहूदे ग, वेळ लागेल तुला समजायला...   आणि ती तिच्या मुलावर रागावली आहे.... चालुदे त्याचं...  आणि प्रत्येक अधिकार मागल्याने मिळत नाही, कुठल्याही नात्यात कर्तव्य महत्वाच असतं अधिकाराने नुसतं पद मिळतं, मान नाही. आधी मुलगी म्हणून घरातल्या मनात शीर, मग सुनेचा अधिकार गाजव... मग बघ तुझ्या शब्दाबाहेर ह्या घरातलं कुणीही आणि काहीही जाणार नाही, आणि ह्या घराला वारसा आहे सुन्याच्या आवाजाचा... तू काही वेगळी नसणार इथे... आता आमच्या सोबत आमच्या खोलीत आहेस तर मुलगी बनून रहा.”

अनया शांत झाली, तिलाही सारं पटत होतं पण... अनया आज दिवसभर प्रत्येकाकडून काही ना काही ऐकायला मिळालं होतं, तिच्याही मनात गोंधळ सुरु होता, सारे तिलाच बोलून जातं होते. तिचीही काही बाजू असावी ह्याच कुणालाच काही पडलं नव्हतं. मनातला गोंधळ ती बोलूही शकत नव्हती, प्रत्येकाची बाजू मजबूत होती. मुलगी, बायको आणि सून ह्या सर्व नात्यांच्या बंधनात ती बांधल्या गेली होती. जरा लक्षात आलं होतं कि तिला स्वतःलाच ही सारी नाती निभवायची आहे कुणाचाही सहारा न घेता पण साथ सर्वांची असणारं आहे हे ही ती जाणून होती. तिचा घरातला पहिला दिवस निघून गेला होता. खोलीतले दिवे विझले होते पण मनातले काही दिवे अजूनही जागेच होते.

“मन रडतं ते कुणाला कळतं

ज्याचं जळतं त्यालाच ते कळतं!”

आणि अनया आता विचारांच्या कोषात होती. सर्वीकडे फक्त विचार होते, सर्वांचे विचार विचार विचार करण्यासारखे होते. जवळपासची सारी नाती धक्याने हादरली होती. कुणी हळवं झालं होतं तर कुणी कठोर, कुणी अधीर झालं होतं तर कुणी काळजीत होतं. अनयाच नेमकं काय झालं होतं तिला काही सुचत नव्हतं. कुणाशी चांगलं बोलावं तर वाईट तर होणार नाही ना कि वाईट बोलून चांगलं होईल हे तिला कळत नव्हत. मागे एक अखं घर ती सोडून आली होती आणि समोर एक घर तिच्या येण्याने हादरलं होतं. एका नात्यातून ती वजा झाली होती आणि एका नात्यात ती बेरीज. रडून उशी ओली झाली होती तिची, सुचेना झालं होतं, अचानक तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लागला आणि एक विचार मनात शिरला,

“आपल्या मनातला गोंधळ आज कुठे कुणाला कळणार... सर्वांना आपलं मन कळण्या आधी समोरच्याच कळालं असतं तर मग वाद काय होता... माझं तर सर्व नवीन आहे... मनाचे धागे जुळायला वेळ लागले, आणि हाच नात्यांचा गुंता पुढे खूप सुंदर दिवस घेवून येईल माझ्यासमोर. असो, आपण ज्याचा हात धरून इथवर आलोय तो आपला असावा मग काय कुठलीही लढाई लढू आपण. बसं हेच हवं मला... त्याला दुखवता कामा नये मी..” 

अंकितचा विचार करत तिला झोपं कधी लागली कळाल नाही. सकाळी डोळा उघडला नाही, सानूने ऑफिसला जाण्याच्या तयारीत खोलीतले परदे ओढले आणि अनया जागी झाली.

अनु, झोप ग, तुझी उशी ओली आहे, कळलं मला म्हणून तुला कुणीच उठवलं नाही, अजून झोपायचं आहे का?

नाही नाही ताई, अंकित, अंकित गेला का ऑफिसला?”

“नाही, तो कधीची वाट बघतोय हॉलमध्ये. तू आटोप मग सोबत नाश्ता करूया.

अनया धाडकन उठली, खोलीतून बाहेर आल्या आल्या तिची नजरभेट आईशी झाली, अनया दचकली,

आई मी... मी जास्त झोपले ना...सॉरी ...मी आलेच.”

ठीक आहे, कळतं आम्हालाही, माणसं आहोत आम्ही, आणि त्या उश्या बाहेर उन्हात घाला, वास लागायचा.

अनया गडबडली, ती खोलीकडे उशी घ्यायला वळली, आई परत म्हणाली,

नंतर ठेवली तरी चालेल.

अनया परत पलटली, तोच अंकित तिच्या जवळ आला. आई इथून निघून हॉलमध्ये गेली,  अंकितने अनयाला परत खोलीत घेवून गेला, त्याने तिला जवळ बसवलं, तिचा हात हातात घेत म्हणाला

अनु काय करतेस? कशाला रडत होतीस? तुला कुणी काही बोललं का?”

“नाही पण मला कसंतरी होत होतं, माझं मन अवघडते रे... मी काय केलंय असं?”

“तू आणि मी काय केलंय हे मी परत सांगू का?”

“तसं नाही...”

“मग तेच सत्य आहे... रडून ते उत्तम होणार नाही.”

“पण मी रात्री रडले ना, कुणासमोर नाही.”

“घरात काही लपून राहत नाही, खोलीत कळलं असणार. राणीने सांगितलंय सर्वांना, सगळे काळजी करतात तुझी, तुच अशी धीर सोडून वागली तर... कसं व्हायचं ह्या घरातल्या लोकांच. सगळे आईला बोलत होते ग... उगाच असं काही करू नको ग.”

“अंकित, घाबरले होते रे मी, मग काय करू.”

“मग काय रडायचं! आणि रडू बाई तू रडलीस तर मी काय करू, तुच तर हिंमत केली लग्नाची नाही तर मी हरलो होतो. तू समोर आहेस म्हणून आयुष्यात काय काय करायचे स्वप्न बघतोय मी.”

अनयाने अंकितला मिठीच मारली,

“अंकित सर्व नीट होईल ना रे... आईची तब्यत कशी असेल आता? आणि काही अजून गोंधळ तर होणारा नाही ना रे?”

“आई ठीक आहे, हा बघ तुझ्या बहिणीला सकाळी मेसेज केला होता मी...’

अनया जरा हसली आणि परत त्याला बिलगली,

अनु असं नाही करायचं, तू रडतेस हे घरात माहित झाल्यावर ह्या इथल्या लोकांच मन लागेल का ग घरात... आणि त्यांना चुकल्यासारखं वाटेल ना!”

“हुम्म... सॉरी रे...”

“हे बघ, आपल्याला लोकं जिंकायची आहे, नाती जपायची आहेत, थोपायची नाही आहे. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. काहीही झालं तरी मी काही तुला ऐकटा सोडणार नाही... अरे मोठ्या हिंमतीने लग्न केलंय, ते काय तुला ऐकट सोडण्यासाठी. आता तर तू म्हणशील तरी सोडणारा नाही.”

“अंकित, जावूदे ना, झालं रे... सॉरी!”

“झालं, आता नाही... आता पुढे काय काय करायचं ते विचार कर. मी घरी आलो कि मला तू गोड दिसायला हवी अगदी तशीच जशी तू माझी वाट बघत त्या बसस्टोपवर उभी असायची ना तशी. काय ती हुरहूर असायची ग तुझी.”

“अंकित... काहीही हा तुझं.”

“अरे... पडली खडी... आता दिसव मस्त जाणार माझा... ह्या गालावरच्या खाडीत तर पडलो आम्ही... बसं असचं त्या खडीत बांधून ठेव. निघू मी... वेळ होतोय मला.”

“अरे पण नाश्ता?”

अंकितने जरा इकडे तिकडे बघितलं अनुच्या माथ्यावर ओठं टिपून अलगत ओठं ओठांवर टिपले नी म्हणाला,

“हा काय आताच झाला माझा नाश्ता.”

“अंकित!... तुझं काहीही रे...”

“काळजी करू नको ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खाईल.”

आणि तो खोलीतून निघाला. अनयाही निघाली, अंकित हॉल मधून सरळ धावत निघाला, आई ओरडली,

“अरे नाश्ता तर कर...”

आई फाटकापर्यत गेली.

“आई वेळ झालंय ग, आज मिटिंग आहे माझी. मी करेन कॅन्टीनमध्ये.”

आई पुटपुटत हॉलमध्ये आली, अनुही शांत झाली होती. सकाळच्या वातावरणात सारच प्रसन्न झालं होतं....

Post a Comment

0 Comments