टेंडर #द कॉर्पोरेट लॅडर.

 

 टेंडर



महिना झाला होता समृद्धीला घोसला कंपनीत काम करून. कुशलचं वागणं तिला काही आवडत नव्हतं, त्याचं वरचेवरचे कॉफी डिनर साठी विचारणं तिला अजिबात आवडत नसायचं. आपलं काम करत ती गप्प असायची.

आज पगाराचा दिवस होता, ती जाम खुश होती. आज परत तिला सिलेब्रेशन सुह्सासोबत करायचे होते. सुहासालाही काम मिळणे सुरु झाले होते. पन्नास हरजाराचे काम त्याने पूर्ण केले होते आणि त्याला पेमेंट मिळणार होता. घोसला कंपनी कुणाचाही पेमेंट कधीच थांबवत नसायची. पण....

एस अंड एसचा पेमेंट थांबला होता... समृद्धीचा फोन वाजला, “समु बिल अजून भेटलं नाही गं...काही होऊ शकते का, माहिती मिळेल का?” सुहासचा थोडा वैतागलेला आवाज होता.

“अरे मी नवीन आहे इथे. महिना झाला मला फक्त... आणि सध्या मला कळत नाही कुठे चौकशी करावी ते. हल्ली मंजिरी मॅडम फार चिडचिड करतात.. ते रोहन सर आहे ना....”

सुहासने मधेच समृद्धीला थांबवले, “अगं बघ ना विचारून, ते रोहन चंद्राचं बघत होते काम कदाचित.”

“सुहास, कसं बोलतोस, कसं शक्य आहे. नाही जमणार... मला त्यांनी खूप भीती वाटते आणि रोहन सर नसणार रे.”

सुहास शांत झाला, तर ती हळूच म्हणाली, “बघते मी, पण खूप अपेक्षा ठेवू नको...”

बराच वेळ लॅपटॉपवर फाईल्स बघितल्यावर तिच्या लक्षात आले की, बिल पास झाले नव्हते. मंजिरी नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी असल्याने तिने ते बिल पास केले नव्हते. आणि आता तिला प्रश्न पडला होता की  हे मंजिरीला सांगणार कसे. मंजिरीची एक चूक मार्केटमध्ये घोसला कंपनीचे नावं खराब करणार होतं. आणि तिला हे दाखवून देणं ही समृद्धीसाठी चूक ठरणार होती.

दुपार तशीच गेली. समृद्धी काही केल्या मंजिरीशी बोलू शकली नाही. परत सुहासचा फोन आला, आता तो वैतागल्या सारखा बोलत होता, त्याच्या  बोलण्यात त्याची लढाई आधीची हार दिसत होती. समृद्धीने त्याची समजूत काढली. पण पैस्याचे सोंग आणता येणार नव्हते. तिचा पहिला पगार ती त्याला देऊ शकणार नव्हती आणि त्याचे कर्ज फेडणार नव्हती. तिच्या पहिल्या पगारावर तिच्या घरच्यांचा अधिकार होता हे तिला माहित होते. आयुष्य पडलं आहे सुहाससाठी पण हा मान तिला घरी द्यायचा होता. ती मनात लढत होती, सुचत नव्हतं...

तसा गणपत तिडके कॉफी घेऊन आला,समृद्धीला असं बघून म्हणाला, “मॅडम काय विचार, घ्या कॉपी आणि चालवा दिमाक...”

गणपत काकाला तिकडे सगळं माहित होतं, पण त्यांनी कधीच इकडे तिकडे लावलं नव्हतं. त्यांना कसं विचारावं हे काही समृद्धीला सुचत नव्हतं. तेवढ्यात रोहन चंद्रा तिकडे आला, समृद्धीला बघून त्याने तिला त्याच्या कॅबीनमध्ये बोलावलं, तो जाताच गणपत बोलला, “काहीही मंजिरीबद्दल बोलू नका मॅडम नाहीतर इकडे महाभारत होईल....”

समृद्धीने  स्मित हास्य दिलं. आणि ती मान हलवून लॅपटॉप घेऊन  निघून गेली. रोहनला माहित होते समृद्धी मंजिरीसोबत काम करत आहे ते. त्याला मंजिरीच्या चुका काढून तिला खाली दाखवताना आनंद मिळत असायचा. तो समृद्धीशी नीट बोलला, तिच्या घरच्यांबद्दल जाणून घेतलं. हसत तिची स्तुती केली. आज पहिल्यांदा तिच्याशी कुणीतरी आपुलकीने बोललं होतं. तिलाही हायसं झालं होतं. रोहन बोलतानी काही  टेंडर बघत होता जी थर्ड पार्टीची होती. समृद्धीच्या मनात प्रश्न फिरत होता. तिला सुहासचे शब्द त्रास देत होते. तिची व्याकुळता बघून रोहने प्रश्न केला, “हुम्म, तुला काही विचारायचे आहे का? बिनधास्त विचार. मी काही मंजिरी नाही, काहीही न ऐकता सरळ फायर करायला.”

“फायर हा शब्द ऐकताच समृद्धीच्या मनातील प्रश्नांची शृंखला तुटली, “नाही सर... काही नाही... आज एवढ्या दिवसांनी कुणीतरी छान बोललं माझ्याशी.”

बोलून ती परत गप्प झाली, हाताला घाम सुटला होता, शब्द ओठंवर येत होते पण... मंजिरीची भीती तिच्या मनात डोकावत होती. समोर गुमान टिपणाऱ्या रोहन चंद्राने हे सहज ओळखलं. तो उठला आणि  तिच्या मागे येऊन उभा राहिला, समृद्धी दचकली, पण त्याने तिला काही माधव सरांसारखा स्पर्श केला नव्हता. पण तो जवळ आल्याने समृद्धीच्या लॅपटॉपवर तिची टेंडरची फाईल चुकून उघडली आणि रोहनचं लक्ष त्या पेंडिंग लिस्टवर पडलं. त्याने तिच्या लॅपटॉप ओढला, आणि तो ते सगळं बघू लागला, लगेच त्याने ते डीटेल्स समृद्धीला त्याला  इमेल करायला सांगितले. तिला तो काहीही बोलला नाही. आणि समृद्धीला ही त्याचा काही हेतू गवसला नाही.

मी जरा ह्या फाईल्स बघतो, मला ह्यातला डेटा प्रेझेंट करायला हवा हे बोलून त्याने ती सगळी माहिती तिच्याकडून घेतली. समृद्धीही काही बोलली नाही. गुमान तिच्या जागेवर आली. तिच्या मनात अजूनही टेंडरचा प्रश्न कायम होता. सुहासचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. कुशल तिच्याजवळ आला आणि त्याने तिचा हात धरला, तशी मंजिरी तिकडे आली आणि ओरडली, “काय सुरु आहे हे? कुशल काय... काय चाललं आहे इकडे. हात सोड तिचा.”

मंजिरी कुशलला ओळखून होती. पण तिने तिचं रोख समृद्धीकडे वळवला, “ समृद्धी काय सुरु आहे तुझं? इकडे काम करायचं. समजलं जे काय असले ते ऑफिसच्या बाहेर.”

समृद्धी लाजली होती. पण तरीही मंजिरीला सांगावे असे तिला झाले होते पण नायालाज होता, कुशल सिनियर होता तिचा. ती काही बोलाणार तर मंजिरी म्हणाली, “त्या थर्ड पार्टी टेंडरच्या डीटेल्स प्रिंट घे आणि माझ्या टेबलवर ठेव, चेक करून बँकला अप्पृवल द्यायचे आहे पेमेंटसाठी... कामाच्या गडबडीत राहून गेलं ते.”

तशी समृद्धी मनातून सुखावली, ती सार काही विसरली आणि लगेच कामाला लागली. मंजिरीसोबत काम करून तिने सगळे पेमेंट चेक केले. सुहासला मेसेज करून कळवलं.

पण त्या दिवशी ऑफिस संपेपर्यंत समृद्धीच्या मनात अस्वस्थतेचे वादळ घोंघावत होतं.मंजिरीची भीती, रोहनचा आपुलकीने वावरणारा पण थोडा संशयास्पद स्वभाव, माधव सरांचा विचार आणि सुहासच्या सारखा तगादा हे सगळं एकत्र गुंफून तिला गुदमरायला लागलं होतं. हा टेंडर तिला अजून काय काय बघायला लावणार होता कळत नव्हतं.

Post a Comment

0 Comments