जोडीदार तू माझा.. भाग ४६

 जोडीदार तू माझा.. भाग ४६ 



दुरून सर्वाना बघत हळूच सर्वांच्या भावनांसोबत स्वतःच मन अलगत गुंतवत अनया उभी होती हे आराध्याला कळला होतं. तिने एक मेकअप कीट बॅग मधून काढलं, दुरून बघत असणाऱ्या अनयाला हाताने इशारा करत बोलावलं. अनायाने एकदा अंकितकडे बघितलं, त्याने नजरेने होकार दिला नाग तिने आईकडे बघितलं. आईनेही ये म्हणून मान हलवली. अनया आत आली, तोच तिचा हात आराध्याने पकडला,

ये इकडे, दुरून काय बघतेस? घे तुझ्यासाठीही, वापर बरका! मला तुला काय आवडेल ह्याची काही कल्पना नव्हती मग मला जे आवडलं ते मी त्यात निवळलं आहे, बघ तुला आवडलं तर सांग... तसं सानू ज्या ब्रंडचे मला सांगते त्यातलं हे नवीन कलेक्शन आहे.

अनयाला हे अपेक्षित नव्हतंच तिला काय बोलावं सुचलंच नाही, मान हलवली आणि अंकितकडे बघू लागली, अंकितने हलकासा चोरून इशारा केला आणि तिने ते गिफ्ट घेतलं, मावशीला वाकून नमस्कार केला. गालातल्या गालात हसली, मावशी म्हणाली,

“ओ माय गॉड, गोड आहे ही... तू आंनदी राहा म्हणजे बघ सर्व कसं तुझ्या मनासारखं होतं जाईल.”

तेवढ्यात राणीचा फोन वाजला, नक्कीच तो राजनचा होता, राणी ने अलगत उचलला आणि बोलण्यासाठी खोलीतल्या ग्यालरीत गेली, सर्वानी दिलेल्या सामानाची ठेवाठेव केली पण अनयाला तो एवढा मोठा महागाचा मेकअप सेट ठेवावा कुठे हि चिंता वाटत होती, तिच्या हक्काची खोली कुठे होती अजून. तिच्या मनाची घालमेल बघून सानूने तिच्या कपाटात जागा केली,

“अनु, इथे ठेव सध्या पुरतं नंतर तुझं सामान रीतसर आम्ही शिफ्ट करून देऊ.”

अनया परत स्मित हसली, तिला असं बघून मावशी म्हणाली,

“ओ माय गॉड, पोरगी मुकी तर नाही ना? आतापर्यंत मी आवाजही ऐकला नाही हिचा, काय ती नुसती गालावरची खोल खडी तेवढी बोलते आणि अलगत सर्वांना त्यात बुडवते.”

आता मात्र सर्व हसले आणि अनयाही हसली,

“मावशी मी काय बोलू, तुम्ही सर्व खूप प्रेमळ आहात... मलाही शिकायचं आहे असं सारं ...”

“ओ माय गॉड, बोलली ही, आहे ना तुझी सासू तुला ट्रेन करायला, बघ पुढल्या खेपेत मी आले कि तू हे सर्व करशील…. माहित आहे मला... आहेस मोहित्यांच्या घराण्याला शोभेल अशी...”

मावशीला मधेच थांबवत आई तिला म्हणाली,

अग दम घे, जेवण वगैरे कर आणि आराम कर, झोप नसेल ना झाली तुझी? सोहमलाही जेवण भरव.”

“सोहम बडी मॉम ने तुझ्या आवडतं थालीपीठ केलं आहे... चल अंघोळ कर आधी, मग गरम गरम मीच भरवते.”

“ग्रेट बडी मॉम. मला पप्पा करून भरवतात तिकडे, ते तुमच्या कडून शिकले ना?”

आरती आणि सोहम गप्पा करत बाथरूम कडे निघून गेले.

अनया खोलीत होती, तिलाही कसं तरी होतं होत, काय बोलावं हेही कळत नव्हतं, जरा सामानाच्या खोलीत जात असणाऱ्या अंकितने तिला असं दुरूनच बघितलं आणि तो आला, “काय अनु काही हवं आहे का? ये इकडे, चल जरा मला मदत कर.”

अनुने सानूकडे बघितलं, सानू तिला म्हणाली,

 “माझ्याकडे काय बघतेस, जा कि माझा विश्वास आहे तुमच्या दोघांवर.”

अंकित म्हणाला,

 “तायडे.... काहीपण.”

आणि मग अनुला म्हणाला, “ये अनु... मी आहे खोलीत.”

अंकितसोबत अनया सामानाच्या खोलीत गेली, दोघेही बसून सामानाची यादी बघत होते, लग्नाचं प्रत्येक सामान दोघांच्या नजरेतून जात होतं आणि कधी त्याचं मन मनाला खात होतं तर कधी तिचं, अक्षदांच्या पाकिटांचा बॉक्स दोघांनीही एकदम बघितला. अनुने एक पाकीट हातात धरलं आणि मग बघून परत बॉक्स मध्ये ठेवलं. दोघांनाही एकमेकांच्या भावना कळल्या होत्या....  आशीर्वादाच्या अक्षंदा पडल्या नव्हत्या ना त्यांच्या अंगावर... आणि अजूनही तो आशीर्वाद बाकी होता, सोबत दोघेही होते पण नात्याला आशीर्वादाचा टीका अजून लागायचा होता.

सहज अंकित बोलला,

 “जावूदे!” 

अनया हसली, “किती अंकित...”

“जेवढं जावू देता येईल तेवढं, आणि जे नाहीच जावू देता आलं ना तिथे मी उभा राहील तुझ्या समोर... फक्त तू हसून सगळं सोडून दे माझ्यावर...”

“हो रे... पण मला जरा वेगळीच काळजी आहे.”

“कुठली? चुकून माझ्या वडिलांना हे कळालं ना की मी लग्न केलेय पण मला सुनेचा मान अजून नाही तर... येतील ते राडा करायला.”

“काय! कोण म्हणत तुला सुनेचा मान नाही म्हणून... तुला कुणी काही बोललं का?”

“नाही नाही तसं नाही पण माझ्या मनातली शंका रे, तरी दिसणारं तर तसचं ना... लग्नापर्यंत... आणि... मला इथे कुठे कुणी काही बोलतं? सगळे सांगत असतात. बोलणं आणि सांगण्यात अंतर आहे हे कळतं मला, आणि स्वतःच्या मनाला वळवणं येतं म्हणून सगळं नीट आहे ना इथे.”

“हो अनु, तू तू आहेस म्हणून सगळं नीट आहे आणि होणारही, तू कसलाही विचार करू नको, इथे तुझ्याशी कुणीही काहीही कसंही वागण्याआधी त्याला माझा विचार करावा लागेल, इथे मी तुझा आहे मग कशाला धुक धुक मनात ग तुझ्या?”

अनु अंकितच्या अगदीच जवळ आली, जरा बिलगलीच, अंकित तिला मिठीत घेत म्हणाला, “हे बघ तुझे बाबा येत कि कुणी अजून.. तुला जगासमोर माझी बायको म्हणून स्वीकारायला मला काहीच हरकत नाही... आहे आई माझी भावनिक, म्हणून तर सगळं सहन करतोय ना तिची मर्जी राखण्यासाठी, पण अशी वेळ जरी आली ना तर मी तुझ्यासोबत असेल... कारण तू माझ्यामुळे ह्या घरात आहेस. तू सर्वस्वी माझी जवाबदारी आहेस.”

अनया नुसती स्मित हसली, तर तिला अंकित म्हणाला,

“ये वेडाबाई, मोबाईल घेवून येतो आता, मग तर झालं, काहीही वाटलं तर कॉल कर,.. आणि सानूदिशी बिनधास्त बोल, ती करेल तुला मदत कुठेही, काहीही झालं तरी. माझी तायडी आहेच तशी.”

अनुच्या हातातली यादी सर्व टिक करून झाली होती, सामानांच्या खोक्यांवर नाव लिहून झाली होती. हळदीला लागणार सामान तिथेच ठेवून होतं, भिजलेली हळद तिथेच झाकून ठेवली होती, अनयाने ती उघडली, सुंदर हळदेचा सुगंध मनात शिरला होता. अंकित हे बघून मनातच हसला, एक बोट त्याने त्या भिजलेल्या हळदीत टाकलं, अनु डोळे मिटूनच होती तर त्याने तिच्या गालावर ते लावलं, अनु भानावर आली, अंकित तिला म्हणाला,

“भेट आज तुला चांगली हळद लावतो.”

अनया हसली, “पाहुणे राहतील.., काहीही तुझं... आईला विचार आधी... आला मोठा... बघ तुला भेटते का मी.”

“अरे! घर माझं आहे, तुला कुठे आणि कसं गाठतो बघच आता तू.”

“असं! बघू... मी आई सोबत राहिल...”

“तू आईसोबत राहा नाहीतर लपून राहा...”

“देखेंगे?”

“देखलेना,,,,”

“जाती ती हु मै...”

“जल्दी है काय...”

“आई को पुछो.... ये काय रे!!”

“अरे किती दिवसाने आपण असं बोलत आहोत... थांब ना ग जरा...”

“अच्छा तो हम चलते हैं!”

“फिर कब मिलोंगे?”

“नाही अभी नाही... गप रे... चल मी निघते, मला फोन आणलास कि सांग आणि माझा लाचा विसरू नको.”

अनया खोलीतून निघून गेली, अंकित इथेच बसून विचार करत होता... जरा मनाने शांत झाला होता, खूप दिवसांनी असा खुलला होता अनु सोबत.... अनुच्या बोलण्यात तथ्य होतं, लग्न केलं पण तो मान अजून नव्हता, पण असं काही समोर आलं तर अनुची साथ द्यायची हे तो मनोमन ठरवून होता, जरा शब्द ओठावर आले,

“जमे तोवर सगळं ढकलायचं राणीच्या लग्नासाठी... एकदा का लग्न सोहळा पार पडला कि नंतर नाही... अनु सोबत हवी आहे मला, नुसती समोर नको.”

राणीचं लग्न आटोपलं कि आईशी बोलायचं त्याने नक्की केलं होतं. जेवण झाल्यावर तो बाहेर निघून गेला.

चार वाजेपर्यंत घरात पाहुणे जमले होते, राणीचे मामा, मामी, आजी, आणि अजूनही चुलते, जवळचे, गावाकडचे, बाबांचे मित्र, राणीच्या मैत्रिणी. अनु सानूच्या खोलीतच होती, तिने डोकावत जरा खोलीतून बाहेर नजर टाकली.

घरात गोंधळ वाढला होता, आपल्या आपल्या ग्रुप मध्ये सर्व बसले होते. मनात पुटपुटली,  “आता ह्या एवढ्या गोंधळात मी अंकितला कुठे शोधायचं, आणि शोधायचं तरी कसं, नविरीचा भाऊ आहे तो, सतरा काम असतील त्याला. दुपारपासून घराच्या बाहेर आहे, पाणीही प्यायला मिळालं नसेल, आलाय कि काय हेही माहित नाही मला.”

कुणाला विचारायचं ह्या विचारत ती मनातच विचारात पडली. कुणीही ओळखीचं नव्हतं आणि जे होते तेही आताच ओळखीचे झाले होते, ओळखत कुठे होते. तिची नजर खोलीच्या दारातून बाहेर पडली, अंकित समोर कुणाशीतरी बोलतांना तिला दिसला, कामगार लोकं फुलांची सजावट करत होते आणि अंकित ते त्यांना नीट सांगत होता. अंकितच काही लक्ष नव्हतं. अनु मात्र त्याला बघून मनातच जरा रमली होती, तोच तिला अंकितच्या मामीने धक्का दिला,

“अग बाई सॉरी, लागलं का, कुणाला बघतेस ग अशी दारात उभी राहून, जा ना तिकडे काम कर तुझं इथे काय काम?”

सानू पटकन आली, मामी ती माझी मैत्रीण आहे.”

अय्या हो, तरीच म्हटलं बघितल्यासरखी वाटते मला...

सॉरी ग मला वाटलं तू स्वयंपाक करणाऱ्या मधली आहेस कि काय? आणि काहीतरी हवंय म्हणून घरात आलीस.

मामी अनुला डोक्यापासून पायापर्यंत बघत म्हणाली,

सानू मामीला चांगलीच ओळखून होती, तिने आराध्या मावशीला आवाज दिला, मावशी लगेच आली,

ओ माय गॉड, वहिनी किती बारीक झालीस ग तू, काय डाएटिंग सुरु केलंस कि काय, मस्त दिसतेस.

मामी खूपच खूष झाली, “हो काय ग? आता तुला काय सांगू... तूच ग तूच मला ओळखतेस इथे, नाहीतर तुझा तो पोटु दादा, त्याला तर मी कधी बारीक दिसतच नाही...

अरे, त्याला काय कळतं ग, पोटावर हात भिरवत असतो सतत... खादाड..., आताही मला तो तिकडे दिसला केटरिंन वाल्यांकडे, बाळूने त्याला सांगितलंय तिकडे उभं राहायला...

मामी आणि मावशी गोष्टीत रमल्या होत्या, सानू अनुला सोबत घेऊन निघून गेली.

संध्याकाळचे सहा वाजत आले होते आणि लवकरच हळद सुरु होणार होती, राणीला तयार करत सानू आणि अनु दोघीही तिच्या खोलीत होत्या, अनुची हुरहूर वाढत होती, अंकितशी अजून बोलणं झालं नव्हतं, तो त्यानंतर तिला दिसलाही नव्हता. हळदीचा मांडव बाहेर सजला होता आणि राणीही जाऊन बसली होती. आणि अनुच्या मनातली हळद अजूनही रुसली होती. अंकित तिला दिसलाच नव्हता, तिने जरा दूर उभी होती, तेवढ्यात छकुली तिच्या जवळ आली, म्हणाली,

दादाने मोबाईल दिलाय. अनुने घेतला तोच तो वाजला, “अनु, वर माळ्यावर ये, मला काही सांगायचं आहे. छकुलीला घेऊन ये...

अरे पण छकुली?”

तिच्यासाठी मोठ्या चॉकलेट आणल्या आहेत, विचार करू नको, माझी बहीण आहे ती, लहान आहे पण कामाची आहे माझ्या.”

अनु मोबाईलवर बोलत छकुलीसोबत माळ्यावर गेली. बघूया पुढल्या भागात...

 कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

 

Post a Comment

0 Comments