जोडीदार तू माझा ... भाग ५०

 


अनुनेही दूर उभं राहून हा आनंद सोहळा बघितला होता, मन तर तिचंही कासावीस झालं होतं, तिचं कुठे असं थाटात लग्न झालं होतं, ना बारात ना बाजा.... ती तर सरळ घरात आली होती आणि अजून घरातल्या लोकांच्या मनाच्या दारावर उभी होती, घरात शिरल्या पासून तर मनात शिरण्यापर्यंतच अंतर अजून तिला पार करायचं होतं. हा त्यातला एक प्रयत्न होता की ती आईचा शब्द पाळत मागे मागे होती. अंकित सारखा जोडीदार तिच्या सोबत उभा होता म्हणून आज ती आनंदात उभी होती. तेवढ्यात अनुच्या बहिणीने अनुच्या कानात सांगितलं,

“ताई, आपल्या घराजवळचे वाळके काका आणि काकी आले आहेत लग्नात. त्यांना आपण दिसलो वाटते. सांगतील बाबांना आता. त्यांच्या मंडळात आहे ते, उगाच बाबांचा पारा भडकायला नको.”

“त्यांना माहित आहे का काही?”

“म्हणजे! तू घरातून पळून लग्न केलंय हे सगळ्या कोळीवाड्यात माहित आहे, बाबांनीच तसं सागितलं आहे आणि तुझा त्यांचा काही संबध नाही हेही ते बोलले होते. मला तर आता भीती वाटत आहे. हे वाळके जावून सांगतील काहीपण, तेल मीठ लावून, तुला तर माहित आहे त्यांचा स्वभाव, आणि बाबांना परत एक कारण भेटेल.”

“पण तू म्हणाली होती ना कि आता बाबा शांत आहेत म्हणून...”

“हो ग, आईने जरा समजावलं आणि कधी नव्हे ते बाबा आईसाठी शांत झाले. पण हे वाळके जातील ना सांगत कि तू दूर दूर होती म्हणून... आणि सांगतील एकाचे दोन लावून...”

अग बाई, म्हणत तिने अंकिताला फोन लावला, त्याने उचलला नाही. सानूला लावला तिनेही उचलला नाही, ती मंचावर राणीसोबत होती. अनु घाबरली होती. इकडे तिकडे बघत होती तर आई तिला दिसली, ती धावली, पण आईलाच बोलणार कशी, ओठावर शब्द तयार होते तोच तिला बघताच आई म्हणाली,

“अनु, जरा स्टेजवर जा आणि सानूला पाठव इकडे.”

अनुने सुटकेचा श्वास घेतला, ती स्टेजकडे निघाली, तोच वाळके काका काकू तिला मध्ये भेटले, त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे बारीक चौकशी केली, अनुला कुणासोबत बोलतांना बघून मावशी इथे आली आणि तिने अनुला पाठवून दिलं. वाळके काकांनी मुदाम्म विषय काढून अनु त्यांच्या घराजवळची मुलगी आहे असं सांगितलं, तर मावशी त्यांना बिनधास्त म्हणाली,

“ती ना, आमच्या अंकितची पसंत आहे, तुम्ही जेवण केलं का? या मी वाढते तुम्हाला....”

मग मावशी पूर्ण वेळ त्यांच्या सोबत राहिली आणि त्यांना गेटवरून निरोप देवूनच ती परत मांडवात आली.

अनु स्टेजवर आली आणि तिने कानात सानूला सर्व सांगितलं.  पण सानूने आराध्या मावशीला वाळके काका काकू सोबत बघितलं आणि ती अनुला म्हणाली,

“अनु, मावशी आहे वाळके मंडळी सोबत, काही काळजी नाही. तिला चांगल माहित आहे कुणाला काय सांगायचं आणि काय नाही... तू थांब इकडे. मी आईला बघते, तिला उगाच माहित व्हायला नको, घाबरेल.”

सानूने अनुला तिच्या बहिणीसह स्टेजवर थांबायला सांगितलं आणि ती आईकडे आली.

अनुची धास्ती कमी झाली होती. ती घरच्या लोकांसोबत होती. राणी तिच्याशी बोलत होती तर कधी राजनरावं. दुरून बारीक नजरेने बघणाऱ्या वाळके काकांना अनु खूप खुश दिसली. पण वाळके काकूने मांडवात बायकांशी बोलून माहिती मिळवली होतीच. मांडवातच काही लोकं राणीच्या आईला अंकितसाठी स्थळ सांगत होते आणि आई निमूटपणे ऐकून घेत होती हे तिने बघितलं होतं. दिसतंय तसं नाही हे तिने भापलं होतं. पण आराध्या मावशीने त्यांना काय ते नक्की सांगितलं होतच.

समारंभ आटोपला होता, मांडवातले पाहुणे ओसरले होते, जेमतेम घरचे पाहुणे होते. आणि तिथेही कुजबुज सुरु होती. अनयाला जो तो बघत होता, आईच्या दूरच्या आत्ये बहिणीने तर अनुसाठी आईला विचारलं,

ताई, ही मुलगी कोण ग? सुंदर आहे, तिच्या आईशी भेटवून दे, आपल्या गणेशसाठी कशी राहिल? मला बाई जाम आवडली? जरा माहिती मिळाली की जावूया आपल्या गणेशसाठी बघायला. देवू बार उडवून सगळं जुळलं तर... तशी मला पसंत आहे. आणि गणूला तर आवडणारचं ही... खूपच सुंदर आहे ग, सालस, शांत वाटते. अश्याच मुलीच्या शोधात होते मी, नाहीतर आजकालच्या मुली नुसत्या बोलत असतात, तोंढाळ असतात, हि बघ कशी गालात हसत असते. आणि तुला सांगू आपला गणू सहा महिन्याने दुबईला जातोय. त्याच्या आधी लग्न करून देवूया, घेवून जाईल बायकोला सोबत, काय म्हणतेस?

आई काहीच बोलली नव्हती, तिला तर हा प्रश्न अपेक्षित नव्हता. जरा टाळा टाळ करत आई तिथून पाठवणीच्या तयारीसाठी निघून गेली. पण आत्ये बहिण काही पिच्छा सोडणारी नव्हती, ती सरळ अनुकडे पोहचली आणि विचारपूस करायला लागली, दुरून आईने ते बघितलं होतं, ती आराध्याला म्हणाली,

“अरु बघ ना ती अनुच्या मागे लागली आहे, गणेशसाठी बोलत होती मला, मला बाई कळलंच नाही काय बोलावं, सांग तू आता काय करावं ग?”

“अग ताई हीच वेळ आहे, दे सांगून, अनुला अंकितसाठी पसंत केलंय म्हणून, तुझी धाकधुक ही निघून जाईल आणि उगाच कुणाला उत्तर द्यावी लागणार नाही. आता ती मांडवात फिरत आहे तर अश्या चर्चा होणारंच ना आणि किती सुंदर दिसत आहे ती नजर हटत नाही तिच्यावरून.”

“बाई ग, हे काय भलतं? लोकं असंही बोलतील, मी विचार केला नव्हता.”

“मग, कधीपर्यंत थांबवशील? एका गोष्टीला लपवण्यासाठी काय काय करशील, जसं जे समोर येईल तसं उत्तर दे, ती तिच्या मुलासाठी बोलली ना, आपण आपल्या मुलाची पसंत आहे म्हणून सांगायचं, चालतं आजकाल, काही वाटणार नाही कुणाला, लग्नाआधी येतात मुली घरी... तुझं तेच आधीच लावू नको, राहिले ग चूप सर्व तुझ्यासाठी... अंकित किती समजदारपणा दाखवत आहे माहित आहे तुला, दुपारी तू बायकांमध्ये जरा बसली होती आणि तुला अंकितसाठी राणे काकूने विचारलं, तेव्हां अंकित जवळपास होता, बघत होता तुझ्याकडे तू काय बोलतेस म्हणून, तुही गोष्टीला काहीही तोल न देता सोडून दिली पण त्याचा चेहरा पडला होता. तेव्हाच बोलायचं होतं.”

“काय बोलणार होते ग, अंकितसाठी विचारात होत्या त्या...”

“काय बोलणार म्हणजे, म्हणायचं, त्याचं तो बघेल, बघितली असेल, किंवा सांगायला हवं होतं ती अनु त्याची पसंत आहे म्हणून... नाही सांगायचं लग्नाच पण पंसत आहे हे तर बोलू शकतो आपण, तेवढंच लोकांच्या तोंडावर झाकण पडते आणि आपली लोकं सुखावतात. अश्या वेळी आपली लोकं सांभाळायची असतात, परके काय म्हणतील हे सांभाळत बसायचं नसतं.”

तेवढ्यात सानू तिथे आली, “आई हो लग्नात अनुच्या घराजवळची लोकं ही होते, कदाचित राजन रावांकडून आमंत्रण असेल. अनु तर पार घाबरली होती पण मग तिने सावरलं स्वतःला. पण काहीही बोलली नाही.”

सानू मावशीच्या गळ्यात पडत म्हणाली,

“मावशी काय बोलत होते ते वाळके मंडळी. मी बघितलं होतं तुला त्यांच्यासोबत.”

“काही नाही, आपल्या अनुबद्दल चौकशी करत होते. आणि तिच्या वडिलांच्या श्रीमंती, कोळी वाड्यातील त्यांचा दादरा सांगत होते.”

“त्यांना काही जाणवलं का?”

“नाही, मी तसं जाणवू दिलं नाही... ते मंगळसूत्र नाही असं म्हणाली होती वाळके काकू. तर मीच म्हणाले, तिने एवढा मोठा लाचा घातला आहे मग त्यावर मेचींग घालणार ना.... आणि आमच्या घरी काही बंधन नाहीत... असं बोलले मी,... गेलेत ते आता. मस्त खातीरदारी केली मी त्यांची. टॅक्सीपण मागवून दिली. हसत धन्यवाद देत गेले. काही काळजी नाही.”

सानू हसली, “ओ माय गॉड! तुझ्याशी पाला पडला होता त्यांचा...”

मग सानू आईला म्हणाली, “शिक काहीतरी, घाबरत राहते नुसती....”

“चल ग मावशी आपण बोलूया गोमती मावशीशी. घेवू जरा तिची फिरकी, माझ्या भावाच्या बायकोवर डोळा ठेवते काय?” सानू आईला चिवडण्याचे इशारे करत मावशीला म्हणाली.

दोघीही परत बायकांच्या घोळक्यात आल्या आणि अनुजवळ उभ्या राहिल्या, गोमती मावशी अनुशी बोलत होतीच. तर आराध्या मावशी म्हणाली,

“ताई तीचं बुक्किग झालंय ग!”

“अग बाई, काय म्हणतेस? आणि काय ग हा शब्द, तू काय तिकडून घेवून आलीस का विदेशातून?”

“ओ माय गॉड, ताई तसं नाही... ह्या मुलांचा शब्द आला तोंडात, जावूदे, आपल्या अंकितसाठी निवडलंय आरती ताईने तिला, घरच्या लोकांमध्ये बोलणी झाली आहे अजून काही बाहेर चर्चा नाही.”

“अग, मग हिच्या घरचे कुठे आहे?”

“ही काय हिची बहिण आहे ना हिच्या सोबत, घरचे गेलेत लग्न लावून. मी आताच त्यांना गेटवर सोडून आले, वडिलांचा बिजनेस आहे बिझी असतात ते.”

“अग बाई, नक्षत्रा सारखी पोरं आहे ग, अंकित आणि हिची जोडी मस्त आहे, तेव्हाच मी म्हटलं हा बाळू का हिच्याशी मध्ये मध्ये बोलायला येतो... बऱ आहे. सांगायचं ना, मी आपली तिला विचरापूस करत आहे. आरती काही बोलली नाही मगाशी...”

“अग ताई तुला माहित आहे ना, आरती ताईची किती गडबड होते अश्या कार्यक्रमात, नसेल बोलली, ही अनया आहे आपल्या अंकीतची होणारी बायको.”

आराध्या अनयाला जवळ ओढत म्हणाली.

“अनु घे ग आशीर्वाद, काय माहित लग्नाला येणं होणार कि नाही ह्याचं, हैदराबादला असतात ह्या.”

अनुने वाकून आशीर्वाद घेतला, तर गोमती मावशी मागे झाली,

“बऱ बऱ... पण मला हे समजत नाही, आपली सानू काय लग्नाला नाही म्हणते काय? तर आता अंकित लग्न करणार आहे?”

“ये मावशी, मला भेटतच तर नाही आहे अजून कुणी राजकुमार... भेटला कि मी काही थांबायची नाही.” सानू अनुच्या गळ्यात हात घालत म्हणाली.

“आता दोन्ही भावंडांच जुळून आलेलं आहेच, आमच्या सानूचे ही योग लवकर येतील, तेव्हा कळवते तुला, ये मग परत, जमलं तर...” आराध्या गोमतीला म्हणाली.

“म्हणजे अंकीतच्या लग्नाची मजा नाही का घ्याची?” गोमित मावशी तोंडावर हात ठेवत म्हणाली.

“त्याचं काय! तो कोर्टमेरेज करतो म्हणाला आहे, देवू घराल्या लोकांमध्ये पार्टी. तू येशील का? नाही तू थांबच महिनाभर इकडे.”

“अग बाई, नाही ग, आणि लगेच महिनाभरात नाही येता येणार मला... माझा आशीर्वाद आताच घ्या म्हणा दोघांना.” म्हणत गोमती मावशी तिच्या मुलीकडे निघून गेली.

हळू हळू वार्ता मंडपात पोहचीली होती. अनया आता सर्वांच्या नजरेत आली होती. सावंता कडेही माहित झालं होतं. राणी तयारीसाठी गेली होती आणि राजन मांडवात येवून आईजवळ बसला होता.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments