जोडीदार तू माझा भाग ६०

 

भाग ६०



सानुच्या आयुष्यात तिला हव्या असणाऱ्या जोडीदारने अलगत शिरकाव केला आणि सगळ कसं हवंस झालं होतं तिला, आजपर्यंत लग्नासाठी नकार देणारी आज मनोमन नवरी झाली होती. अलगत स्वप्नातल्या साजनाला समोर बघून आयुष्याचे रंग बदलले होते तिच्यासाठी. ही हरवली होती कधी सुमंतच्या बोलण्यात तर कधी मनातल्या प्रगट झालेल्या स्वप्नात, मन चिडवत होतं आणि मेंदू त्याला थांबवत होतं.

सानूचा उडालेला गोंधळ सुमंत मोठ्या मिजासात टिपत उभा होता. तिचं पाणी पिऊन झालं, आता बाटलीला झाकण लागत नव्हतं. नी गडबडीत ते पडलंच. सानू खोलीत शोधायला लागली तर तिच्या हाताची बॉटल परत उलटी झाली आणि पाणी फरशीवर सांडलं. आता मात्र सुमंत बोलला,

“काय हे, राहूदे तसंच. तू बस आधी.”

साडी आवारात सानू नंतर हळूच म्हणाली,

“ब बसं ना, इथे बसं, नको ही खुर्ची घे.”

“अग मी बसतो, घर आहे हे, हॉटेलची खोली नाही, काहीही आवरू नकोस, हा घे बसलो.”

“काय काय बोलायचं आपण?”

“काय म्हणजे?”

“तू सांग.“

“मी काय सांगू... “

“सांग तुला मी पसंत नाही म्हणून...”

“नाही नाही...असं मी कधी म्हटलं?”, सानू धडकन म्हणाली

आणि सुमंत हसला,

“मग बोल ना, सरळ... मी तुला पसंत म्हणून, तुला आता ओळखायला सुरुवात केली आहे, अजून तुझ्या बाबांसारखं तुझा चेहरा नाही वाचू शकत.”

“सकाळपासून करत आहेस ना, माझा इतिहास आणि भूगोल शोधतोय.”

“मला काहीही करायचं नाही त्याच, पण जरा माहिती काढली बसं! तेही तुझ्याशी बोलता यावं म्हणून.”

“मग, काय मिळालं माहितीत ?”

“काही नाही, माझा सामना वादळाशी आहे बसं! आणि मी तयारी सुरु केली. म्हटलं आता बोलून घ्यावं मग लग्नानंतर काही चान्स मिळणार नाही बोलण्याचा.”

“हो.....”

“तर काय... मग मी पसंत ना तुला, बघ बाबा, माझ्याकडे खूप वेळ आहे तुझ्यासाठी पण वेळ नाही ना ,... तू समजू शकतेस.”

“मग! लग्न करताय, वेळ काढावा.”

“बरोबर... काय मग इकडे शिफ्ट करू सगळं ?”

“करणार ?माझ्या सांगण्यावरून.”

“करायला पाहिजे का? नाही ग, अजूनतरी नाही, जरा प्रक्टिकल बोलूया, मी लहानचा मोठा तिथेच झालो, मोठा बिजनेस आहे. मला माझा जोडीदार फॉरेनचा नकोच होता, मी असा हा अर्धा अमेरिकन, निदान जोडीदार अस्सल मराठी असावा हीच इच्छा होती ग, आणि बघ तू भेटलीस. बघू मागे पुढे येवू परत भारतात, आईच मन तसही आता लागत नाही तिकडे. माझा व्याप खूप आहे. लहान बहिण भाऊ आहेत लग्न झालीत त्यांची पण जवाबदारी माझीच आहे अजून. म्हणून जरा लग्नाला टाळाटाळ होती, पण तूला आईने निवडलं आणि लग्न करण्याची इच्छा झाली आता. बघ बाबा, मी तर माझी पुस्तक वाचली.”

“मलाही प्रक्टिकल बोलायला आवडले, मी म्हणते म्हणून नकोस येवू, पण लागलीच लग्न घरी नाही जमणार, खर सांगायचं तर खूप जवाबदारी आहे माझ्यावर, अजून घरचा हप्ता सुरूच आहे. राणीचं लग्न आताच झालय. आणि आजून खर्च नाही झेपायचा आई बाबांना. म्हणूनच मी लग्नाला टाळत होते, पण तुचं समोर उभा राहिलास आणि नकळत होकार झाला.”

“अरे, म्हणजे मी पसंत तुला!”

“काहीही तुझं.”

“अरे, व्हा, काय गोड लाजतेस ग...”

“ये काहीही मी लाजत नाही....”

“पण मला हे आवडलं.... काहीही तुझं.”

ते ना... आला शब्द तोंडात, माझ्या आईच्या तोंडात असतो नेहमी... मग आला...”

“असुदे, गोड वाटलं... बघ, मलाही एवढ्या तडका पडकी लग्न करता येणारं नाही, निदान तीन महिने तरी मला वेळ हवाय, शिवाय इथे लग्न कोर्टमेरेज करूया, तुला हरकत नसेल तर, आणि तिकडे शिकागोमध्ये पार्टी देवूया.”

“ते ठीक आहे पण माझ्या घरचे नसणार ना तिकडे.”

“अरे मग इथेही देवूया , मग तर झालं .”

“हुहूम ...”

“तू इथला बिजनेस सांभाळ आणि नंतर तिथून मॅनेज कर, मी बाकीच बघतो. आणि लग्नानंतर तुझी जवाबदारी माझी पण होईल ना? घराचे हप्प्ते तू नंतरही दे, आपल्याला काय कमी असणारं, आणि इकडे ये जा राहीलच आपली, आणि आता तर यावं लागले सासर आहे म्हटल्यावर. आईलाही आता तिकडे करामत नाही, मामा मामी च्या शेजारी बंगला बुक करत आहोत आपण. म्हणजे मागे पुढे आपल्याला शिफ्ट होता येईल. आणि काही दूर नाही इथून आम्हाला येयला गाडीने दीड तास लागला. काळजी नको करू, आपण करू सर्व. आणि तू साथ देशील तर सर्वच होणार. “

सानू गोष्टीत रमली होती, दोघेही अश्या गप्पा करत होते जसे जन्माचे जोडीदार होते. दोघांची शोध संपला होता, आणि नवीन प्रवास सुरु होणार होता....जोडीदारचा....

तिला समोर हरवलेलं बघून सुमंत जोरात हसला,

“ये सानवी, मी तुला सानू म्हंटल तर कसं राहिल?”

सानू भानावर आली आणि म्हणाली, “हो चालेल ना... मला घरात सानूच म्हणतात.”

“मग सानू, चलायचं का हॉलमध्ये सर्व वाट बघत असतील.“

सानू आणि सुमंत दोघेही सोबत खोलीच्या बाहेर आले, आज घरात पंगत बसली होती, अनु, राणी आणि आई सगळ्या वाढत होत्या, आणि सगळे पाहुणे बसले होते. आईने छान पाटांवर ताट सजवून रांगोळी घातली होती, आणि हे सगळं तिने अनुच्या मदतीने केलं होतं, अनुच मनही आनंदी होतंच मग तिने सांर आनंदाने आणि स्वइच्छेने राणीला सोबत घेवून केलं होतं. सानू आणि सुमंतला सोबत बघून, सुमंतची आई उठत म्हणाली, “लक्ष्मी नारायणचा जोडा आलंय.”

ती सानूजवळ गेली आणि तिने तिच्या सोबत आणलेल्या बांगड्या सानूच्या हातात दिल्या, सानूने आईकडे नजर टाकली, आईने तिला घेण्याचा इशारा केला. आणि सानूने बांगड्या हातात घेतल्या आणि मासाहेबांच्या चरणाला तिने स्पर्श केला. मासाहेब लगेच म्हणाल्या,

“हेच हवं होतं, शिक्षण उंच, भरारी उंच आकाशाची आणि पाय जमिनीवर... अजून काय हवं मला. माझ्यासाठी तुचं माझ्या मुलाची बायको होणार, अजून मी काही मुली बघत नाही.”

नंतर त्या त्यांच्या भावाला म्हणाल्या,

“दादासाहेब, संध्याकाळी जाणार होतो तिथे सांगा निरोप, आता माझा शोध संपला. “

आणि सानूला धरून त्यांनी त्याच्या जवळ जेवायला बसवलं. अगदीच घरच्या वातावरणात सर्वांनी जेवण केलं. साधसं जेवण साधेच लोकं, न लपवाछपवी ना काही दिखावा, भावून गेला होता मासाहेबांना आणि त्यांच्या भावांना. आजवर बघितलेल्या मुली आणि त्यांच्या घरच्यांचा दिखावा त्यांना आठवत होता. सानूची जवाबदारी बाबांनी सांगितली होती, लग्नाची ऐपत नाही हे ही त्यांनी बोलून दाखवलं होतं. पण वेळ दिला तर लग्न मोठ्या रुबाबात करण्याचा प्रयत्न करू हेही बाबा सांगून मोकळे झाले होते. राजन आणि राणीच्या घरची सर्व माहिती राजन रावांनी मोकळेपणाने सांगितली होती. तरीही हलकीशी काळजी आईच्या नजरेत झळकत होती, तिला राहून राहून वाटत होतं, एवढ्या घाईत नको व्हावं सगळं, पण शब्दांना ती आवरत होती.

आरतीला असं बघून मासाहेब म्हणाल्या,

“ताई तुमची काळजी जाणतो आम्ही, आम्हाला काही घाई नाही लग्नांची, सून तर मला सानवीच हवी आहे. पण तुम्हा सर्वांवर घाई करून नाही.”

“मासाहेब, मी बोललोय सानवीशी, लग्न तीन महिन्यांनी करूया म्हणून, तोवर ही इथला आपला बिजनेस सांभाळेल आणि नंतर पुढे ती शिकागोच्या ऑफिस मधून सांभाळेल सगळं.” सुमंत म्हणाला.

मासाहेब, दीर्घ श्वास घेत म्हणाल्या,

“तू जा रे पुढच्या आठवड्यात, मी थांबते इकडे, सानवीच्या मदतीने नवीन बंगला सजवून घेईल. पुढे मागे आपण इकडे शिफ्ट झालो तर...”

“जशी आपली इच्छा मासाह्बे, मग पुढ कसं मामा, बोलताय ना...” सुमंत मामाला म्हणाला.

दादासाहेब म्हणाले, “हा तर मोहिते साहेब, आम्ही काय म्हणतो, ह्या रविवारी घरच्या लोकांमध्ये साखरपुडा घ्यायचा का करून... म्हणजे आपल्या सर्वाना काही हरकत नसेल तर...”

बाबा आईकडे बघत म्हणाले, “हरकत तशी नाही ...पण जरा वेळ द्याल का आम्हाला ?”

“हो हो नक्की, पण सुमंत निघणार आहे बुधवारी. आणि मग बाकीच बोलूया ना हळुवार... नंतर  मुलं ठरवतील त्याचं आणि सांगतील आपल्याला..”

बाबांनी हात जोडले, “हो जसं सुमंतराव आणि सानू म्हणतील तसं करूया नंतर ...पण रविवार बद्दल जरा मी बोलतो आणि कळवतो फोनवर, आपली हरकत नसेल तर...”

पाहुणे ज्या रुबाबात आले होते त्याच रुबाबात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद देवून गेले होते.

बाळू सानूजवळ आला आणि तिला म्हणाला,

“काय वादळ शांत झालं का?”

सानूने साडीचा पदर खोचला आणि ती त्याला पकडायला धावली. दोघेही धावत बाळूच्या खोलीत गेले, मागेच राणी ही धावली.

तिघेही पलंगावर तशेच पडले जसे ते बालपणी खेळता खेळता थकले की पडत असत, मध्ये सानू आणि तिच्या दोन्ही बाजूला राणी आणि बाळू, एकमेकांनी हात पकडले. आणि एकदम उठले, गच्च मिठी मारली. सगळे एकमेकांसाठी खुश होते.

जोडीदार! अलगत शिरणार वारं, आणि मग आयुष्याच्या प्रत्येक वळणार आपल्या सोबत घेऊन फिरतं, वळणांवरच्या प्रत्येक वळणावरही त्याच्या सोबत वळतांना आपण कधी वळत जातो हे कळतही नाही, आणि एक दिवस त्याला एकरूप होतो, कालांतराने तर जोडीदार हे एकमेकांसारखे दिसूही लागतात, विचार, बोलणं आणि वागणं हे एकच होवून जातं....आणि तथेच जोडीदाराचा खरा अर्थ पूर्णत्वास येतो. सखा,सोबती, जिवलग आणि सारंच काही जे आपल्यालाही माहित नसतं ते जाणणारा जाणकार, जोहरी, कधी जालीम दुश्मन तर कधी जिगरी ........ज्यावर हक्क, अधिकार आणि प्रेम ह्याचं एकत्र राज्य असतं.... असा एकमेव जोडीदार!!!

Post a Comment

0 Comments