जोडीदार तू माझा.... भाग ६२

 


भाग ६२

आईच्या अचानक निर्णयाने बाळू मनातून दुखावला होता. तो रागात त्याच्या खोलीत शिरला, आणि बडबड करायला लागला.

काय सूर आहे घरात, कुणीच समजून घेत नाही, आम्हीच का म्हणून समजून घ्यायचं, मध्यम मार्ग कुणीच काढत नाही, घरातल्या घरात तर छोटासा कार्यक्रम करतोय त्यालाही लांबणीवर टाकतात नुसतं... करता तरी कशाला म्हणावं.... अरे मान्य आहे, मान्य काय, मनातून आनंद आहे मला माझ्या तायडीसाठी, अरे आपली जान बसते तिच्यात... पण... मी ही कुणाचा जीव की प्राण आहे आता, माझीही काही जवाबदारी आहे.”

म्हणत त्याने सामान फेकायला सुरुवात केली. आईने हे ऐकलं होतं, तिलाही राग आला होता, त्याच रागात ती आता बाल्कनीतून खोलीत शिरणार होतीच तर अनु खोलीत आली. आणि आई परत तिथेच थांबली. तिच्याही मनात काळ्या ढगांनी जमायला सुरुवात केली होती. आता ही अनु परत अंकितला काय शिकवते हेच तिला बघायचं होतं.

अनु खोलीत शिरातच सामान उचलायला लागली आणि म्हणाली,

“अंकित, शांत हो, जावूदे, अजून आठवडा थांबू ना...?”

“थांबू म्हणजे, आपण काय समजून घेण्याचा ठेका घेतला आहे का इथे.”

असं काय बोलतोस रे, सानूदी रे किती आनंदात आहे... मी कधीच बघितलं नाही तिला असं स्वतःसाठी हसतांना... आणि किती गोड वाटतं जेव्हा ती सुमंत रावांशी बोलतांना गालात हसते तेव्हा... एवढ्या   जवाबदऱ्यांनी लादलेली जरा क्षणासाठी मोकळी वाटते... तिच्या त्या मोकळेपणातही स्वतः ला मोकळं वाटतं रे...”

“अग पण आपणच का नेहमी नमतं घ्यायचं... मान्य आहे मला... अरे माझी तायडी आहे ती... कदाचित ती आहे म्हणून मी एवढा मोठा झालोय...”

“मग, आता कुठे अडलास तू... तूच तर म्हणतोस ना  सानूदी तुझी शान आहे म्हणून..”

“आहेच ना,  माझी ही शान तिच्यामुळे आहे. पण...आपणच का ? का नमतं घायायचं ग.” म्हणत त्याने टेबलवरचे सर्व पुस्तक खाली झोकून दिले.

आता मात्र अनु ओरडून म्हणाली,

“कारण आपण ह्या घराचे आधार स्तंभ आहोत, हे मोहिते निवास आणि इथल्या परंपरा, आपल्या दोघांना सांभाळायच्या आहेत.”

अंकितने हातातली उशी जमिनीवर अलगद टाकली आणि टक लावून तो अनुला बघत होता, तोच अनु त्याच्या जवळ येवून परत म्हणाली,

“ह्या घरावर येणारी प्रत्येक झळ तुला आणि मला आधी सोसायची आहे... अजून कधी पर्यंत तू सानूदीच्या आधाराने उभा राहणार... तिलाही आयुष्य आहे, तिलाही जरा सुखाचे क्षण जगू दे ना, अरे त्या दोघी घरातला आत्मा आहेत पण तुला आणि मला ह्या घरात प्राण टाकायचे आहे...घर नुसतं भिंतीने उभं राहत नाही त्याला आधारासाठी छत लागतं... सानूदी आणि राणीदी ह्या घरच्या पक्या भिंती आहेत पण तू आणि मी ह्या घरचं पक्क छत आहोत. विसरू नकोस... विसरू नकोस, तुझ्या जराश्या वागण्याचा परिणाम मला भोगावा लागेल, आता इथल्या प्रत्येक आनंदाला मी कारणीभूत नसली तरी कदाचित तुझ्या जराश्या अश्या वागण्याने दुःखाला मात्र मी कारणीभूत असेल...  कारण मी बाहेरून आली आहे रे, म्हणून तुला आणि मलाच सगळं समजून घ्यावं लागेल. थांबूया, काय बिघडतं, मला तर सानूदीचा आनंद माझ्यापेक्षा मोठा वाटतो, माझी काही हरकत नाही.”

अंकितने हात जोडेल आणि म्हणाला,

“बसं, अजून काय बोलू, दोन वर्ष माझ्या सोबत काढलीस आणि दोन महिन्यात तू इथली झालीस, तू आईची भाषा बोलायला लागलीस.... मोहित्यांची सून ना... आधी घराचा विचार करशील. आणि मला ते बाबांसारखं गप्प राहावं लागेल. जातो खाली आणि गुमान बसतो सोफ्यावर. तसंही मोहित्यांची परंपरा... घरात चालती फक्त बायकांची. आणि माझी तर आतापासून बोलती बंद.”

बाळू खोलीतून निघून गेला. अनु गुमान खोलीतल्या पुस्तका उचलत होती, हुंदके ही देत होती. पण काहीच कीर कीर नव्हती तिची. सर्व खोली गुमान आवरली आणि खाली परतली.

आईने सर्व बोलणं बाल्कनीतून ऐकलं होतं. मनातले सर्व मळभ आज मिटले होते, बाळूने घरात बायको म्हणून आणलेली मुलगीच उत्तम सुनबाई आहे ह्या घरासाठी ह्यावर आज आई निश्चित झाली होती. आता ह्या पुढेही माझ्या मागे इथे माझ्या मुलींचं माहेर कायम राहिल ह्या आनंदाने ती मनातून आनंदली होती. अनु खोलीतून निघताच. ती निघाली, आणि लगबगिने खोलीत गेली, तिच्या सासूने तिला दिलेली नथ तिने कपाटातून काढली, हळुवार तिच्यावर प्रेमाने हात फिरवला,  सासूच्या गोड तिखट आठवणींना उजाळा मिळाला, नकळत अश्रू डोळ्यातून वाहू लागले, सासूची आठवणं झाली आणि मनातून आवाज निघाला,

“अनया, जरा इकडे येतस का? माझ्या खोलीत!”

अनया सानुच्या खोलीत होती, आवाजाने ती आईच्या खोलीकडे सरसावली, दारात उभी होती, तर आईने परत हाक मारली,

“ये आत ये.”

अनया खोलीत जरा दचकत शिरली, समोर टांगलेला आज्जी सासूचा फोटो बघून तिला नेहमीच धस्की भरायची, आईने तिला त्याच फोटो समोर उभं केलं, हळदी कुंकू लावलं आणि नथेची डबी तिच्या हातावर ठेवली,

“ही मोहित्यांची शान बाण आणि सन्मान तुझ्या हातात ठेवत आहे, माझ्या सासूला साक्षी मानून, आजपासून तू ह्याची खरी वारसदार आहेस.“

अनयाला काहीच सुचत नव्हतं, तिने ती चांदीची डबी उघडली, त्यात सुंदर नथ होती, तिला स्पर्श केला, आणि त्या स्पर्शानेही ती मोहरली,

“आई हे ...मला?”

“हो तुला, मोहित्यांच्या सुनेचा मान आहे तो, आजपासून तुझा, माझ्या सासूने मला खूप आनंदाने दिली होती आणि आज त्याच आनंदाने मी तुला देत आहे. बाळा, सांभाळा...”

“आई!”

अनुला काहीच उमगत नव्हतं, पण सहज तिचेही डोळे पाणावले होते, आणि आईने तिला आलिंगन दिलं, म्हणाली,

“तुझं आणि बाळूच लग्न उद्याच संपन्न करते मी... काळजी करू नकोस... खूप धीर धरला... आणि खूप धिराची आहेस. मागच्या जवळपास दोन महिन्यापासून काहीच बोलली नाहीस, पण अजून नाही... तुझा सन्मान आणि हक्क तुला नक्की मिळणारं... आधी तुझं आणि बाळूच लग्न आणि नंतर सानूचा साखरपुडा... मध्यम मार्ग निघू शकतो... नाहीका?”

“आई... पण मी... काही..’

“तू काही बोलली नाहीस हे मला माहीत आहे आणि काहीही बोलायचं नाहीस आता.”

आईने अनुच्या ओठंवर बोटं ठेवलं... नंतर तिने परत कपाट उघडलं, आणि दागिन्याचा संदुक काढला, म्हणाली,

“ह्यातलं काय तुला आवडेल ते तू घे, आणि वेगळं कर, त्याला मी पोलिश करून घेवून येते आजचं. जरा जून आहेत, पान घाल काही दिसव मग तुला हवे तसे हयातून करूनवून घेतलेस तरी काही हरकत नाही माझी.

“आई पण ...?”

“पण बिन काही नाही ....”

तोच सानू खोलीत आली,

“अरे व्हा, मस्त जमतंय बघा सासू सूनेच. आता काय बाबा आमचा पत्ता गुल... राणी आपल्या राज्यासोबत आणि मालाही माझ्या राजकुमारा समोर उभं केलं आईने.”

“ये बाई, उगाच काही बाई बोलू नको, सून नाहीच ती माझी, माझी तर मुलगी आहे, सुनबाई तर ह्या मोहिते निवासाची आहे, सून म्हणून तिला ह्या निवासात वावरायचं आहे पण माझ्या मनात नांदायला सून नकोच मला...आणि त्या पदाला अजून वेळ आहे. तो तिचा प्रवास असेल.“

“हो ग आई, जेव्हा तिच्यात तुझ्या सारखा रुबाब येईल ना तेव्हा ती सुनबाई होणार...आता तर ती तुला मुलगी शोभते. नाही ? ये किती गोड दिसेल ना ही तुझ्या वयात आली की.” सानू आईला मागून बिलगत म्हणाली.

“अगदीच आई, मला मुलगी म्हणून राहू द्या.” आणि अनुही बिलगली,

बाळूने जरा खोलीत डोकावलं, आणि तोही तिघींना बिलगला, असं सर्वाना बघून गुपचूप आराध्या मावशीने फोटो घेतला आणि फ्लेशच्या आवाजाने सगळ्याच लक्ष भरकटलं. आईने लागलीच बाळूला बाहेर जावून तयारी करायला सांगितली, आणि बाबांच्या नावाचा नाद करत आई खोलीतून बाहेर आली,

“अहो, अरुणरावं, कुठे आहात?”

आज कितीतरी दिवसांनी आईने बाबांना नावाने हाक मारली होती, तेही ओरडले,

“अहो साहेब काय हुकूम आहे? आता हाजीर होतो.” म्हणत ते वरच्या माळ्यावरून खाली आले.

आई आल्या आल्या अजून ओरडली,

“काय सुरु आहे हो तुमचं तिकडे, जवळ या बऱ,”

“अग काय करतेस, आता तुला शोभते काय असं...”

“वास घेते, या इकडे. वाटलंच होतं मला माळा साफ करायला लावला होता मग हे असं काही तरी करालंच म्हणून.”

“अग मी बसं...हा ना भीमा होता बघ तिकडे, आणि हा सदा...”

माळ्यावरून सदा काका आणि भीमा काका उतरत होते.

“मित्रांनो फसवलं मला... आता ह्या देवीपासून वाचवा...”

मग आरतीकडे बघत,

“अग थोडी थोडी उरली होती, मग संपवून बॉटल फेकून देण्यासाठी आम्ही वेगळ्या केल्या, काही नाही, काही नसतं त्यात, टॉनिक असते त्यात... लिवरसाठी उत्तम असते बघ... आहे अजून थोड्सी...तू ...”

“असं म्हणजे, घरात सून, मुली मोठ्या मोठ्या आणि आपण दोघं बसायचं, नाही.”

“अग काय मस्त आयडिया आहे ना? काय म्हणतेस... जमवू का आपल्या खोलीत, तू चकणा बघ मी ग्लास घेतो”

“झालं, पात्यांच्या महाल बनवून, घ्या मारली फुंकर... या जामिनावर...”

“हुम्म्म्... काय ग तू सारी नशा फुस्स करतेस नेहमी.”

“असं, माळा साफ करा म्हटलं तर हे असे नुसते उद्योग सुचतात तुम्हाला, काय  हो भीमा काका, सुनीताला सांगू. ती जरा आज घरी सामान आणण्यासाठी म्हणून गेली तर तुम्ही...”

“आणि काय हो सदा, तू तर माझा वर्ग मित्र, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आज काय रात्री माझ्या मैत्रिणीच्या फोटोशी भांडून हे सारं सांगणार आहेस का? आज इकडेच थांब... अजिबात जायचं नाही घरी, कामं आहेत.”

“अग हो... मी इकडेच राहतो... तू म्हणशील तर वरच्या माळ्यावर झोपू का...”

“तू ना, नाही सुधारायचा, इकडे सर्व हॉलमध्ये पाहिजे मला... चला यादी करा, उद्या आपल्याला अनु आणि अंकीतच लग्न लावायच आहे.”

आता मात्र बाबा आणि भीमा काका आरतीकडे बघत राहिले, बाबा हळूच म्हणाले,

“मी घेतली आणि तुला चढली काय ग? काल पासून तुझं सुरु आहे की, सानूच्या साखरपुड्या साठी त्याचं लग्न लांबणीवर टाकायचं म्हणून आणि आज आता काय झालं काय?

“ये भिम्या चढली रे मला, म्हणत होतो तुला नको पाजू भर दुपारी... तुम्ही ना मला फसवता, सदा तुला तर बघतोच मी.”

“हो तुमची नशा जशी चढली ना,  तशी माझी उतरली... आता मला माझ्या सुनेला आधी तो सुनेचा मान द्यायचा आहे... त्यांच जोडीदाराच नातं माझ्यासमोर बांधायच आहे.“

“अरे भीमा, जरा सानूला सांग बऱ निंबू पाणी करायला, मला खूप काम आहेत आता. सदा जा रे नीबू तोड बागेतले...”

“अहो त्याला कशाला सांगता, मी जाते आणि चांगलं निंबू पाणी तयार करते... तुम्ही ना काही काही कामाचे नाही... आणि तुम्ही तिघं जमले ना की काही एकायचे नाही.“

भीमा काका, सदा काका आणि बाबांची सर्व उतरली होती, सगळे एकमेकांकडे बघत हसत होते. पटापट घरात काम सुरु झाली, आईने भटजीला फोन केला, अनुचे दागिने घेवून सदाला सोनाराकडे पाठवलं, सानू आणि अनु स्वतः जावून कपड्यांची खरेदी करून आल्या. आणि नंतर सानू सुमंतला भेटायला निघून गेली. आराध्या मावशीने फोन करून अस्मित कुमारांना बोलावून घेतलं, तेही लग्नाच्या वेळेपर्यंत पोहचणार होते. घरात धामधूम सुरु झाली. सकाळी रुसलेली वातावरण दुपारी पार बदलून गेलं होतं...आणि ही किमया कुणाची हेही कुणाला जाणवत नव्हतं, आईला हे सारं अनुमुळे होतंय असं वाटत होतं तर अनुला आईमुळे.  

आनंदाचे क्षण आपल्यावर अवलंबून असतात, आता आपल्यावर असतं आपण त्यांना कसं घेतो.... भेटूया पुढच्या भागात...

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

 

Post a Comment

0 Comments