जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १2

 

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १2



सानवी आणि सुमंत घाईतच राजनकडे पोहचले आणि, धावती भेट घेवून निघाले होते, राजनची सासू सानूला हळूच म्हणाली,

“काय ग, बहि‍णीच्या घरी असं यायचं असतं होय? जरा वेळ हाताशी ठेवायचा असतो. नवीन नात्यांना वेळ हवा असतो, घाईत नातं टिकत नाही.”

सानू स्मित हसली, त्यांच्या हातात हात दिला आणि काही तरी बोलायचं होतं पण लक्ष राणीच्या पडल्या चेहर्‍यावर गेलं. राणीचा चेहरा पडला होता. ती राजन कडे बघत होती, त्याने खाणा-खुणा करत तिला शांत केलं. म्हणाला,

“आई, कमी वेळात जास्त काम करायची असली कि असं होतं ग, माझ्या शब्दाला मान देवून ते आले हेच खूप.”

“पण दी , पुढल्या वेळी मी आधीच एक दिवस बुक करणार तुमचा आणि सुमंत दादाचा. काहीच कारण चालणार नाही. अरे म्हणजे राणी पेशवाई रेसिपीज आणि फॉरेन रेसिपीज पण शिकून घेईल तोपर्यंत म्हणजे जेवण निवांत होईल सुमंत दादाचं.”

सुमंत हसला, “नाही राजन, स्वयंपाक उत्तम होता, आईच्या हाताला मस्त चव आहे. हलवा तर खूप टेस्टी झाला होता. अजूनही चव गेली नाही माझ्या जि‍भेवरून.”

“काय राणी, आईकडून रेसिपी घेऊन पाठव ताईला.”

आणि राणीच्या जवळ जावून हळूच म्हणाला,

“काय माहित बुवा तुझ्या ताईला येते कि नाही स्वयंपाक? कि माझी वाट लावणार आहे ती?”

“जीजू, खरच की, नाही येत दी ला, नुसती खिचडी लावता येते, तुमची मज्जा बाबा!”

“अरs अरs... वाट लागली आता!”

“तुम्हाला येतो का स्वयंपाक?”

“हे काय विचारण झालं, येतोच. अरे चपात्याही येतात मला.”

“जीजू मग झालं ना, तुम्ही स्वयंपाक करून जेवायला देत जा ताईला... तिला कसा झाला हे उत्तम सांगता येतो.”

“वाट लागली बाबा माझी, इकडे आलो कि चांगलं स्वादिष्ट खायला घाल ग मला, माझी लाडाची मेहुणी आहेस तू...”

राणीचा चेहरा खुलला होता. तिच्या सासूची स्तुति राजनने केलेली मग त्याही सारं काही विसरल्या होत्या, लगेच त्यांनी बाईला हलवा बांधायला सांगीतला. नेहमीच्या मिठाईवाल्याकडून मिठाया आणल्या होत्या. त्याही त्यांनी बांधायला लावल्या. स्वयंपाक खोलीत जावून त्या सुंदरश्या पिशवीत टाकून त्या घेवून आल्या,

“राजन राव हे आमच्याकडून मासाहेबांसाठी आहे.”

“अरे आई, मग माझ्यासाठी नाही का? निदान थोडासा हलवा?”

राणीच्या सासूचा चेहरा अगदीच प्रफुलीत झाला होता, हसत म्हणाल्या,

“आहे त्यात. खूप धन्यवाद आल्याबद्दल, पुढल्या वेळी वेळ काढून या. आमची रोहिणी पण आज घरी नाही. आणि आमच्या कडल्या बऱ्याच मंडळींना आपल्याला भेटायचे राहिले आहे.”

सानू आणि सुमंतने जोडीने राणीच्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला आणि ती त्या अल्प वेळात सांर काही निभावून नाती निखळ करून निघून गेले. सानुला आज राणीच्या घरून निघतांना घाई होती, एव्हाना ती आली कि निवांत बसायची, म्हणजे आलीच तर... पण आज तिच्या वागण्या बोलण्यात ती जाणीव नव्हती. कुठलीतरी खुमारी चढली होती तिच्यात. ती तिला जाणवत नव्हती पण समोरच्यांना अलगद हळवी करवून गेली.

--

दुसर्‍या दिवशी दोघही कंपनीतून सर्व काही आवरून मोहिते निवासात पोहचले, सर्वांच्या भेटी घ्यायच्या होत्या.

दोघांना असं जोडीने बघून घर जसं भारावून गेलं होतं. बाबा अगदीच जसे तिची वाटच बघत होते. ती येताच ते बाहेर आले. सानुही येवून बाबांना बिलगली, अरुण ने जावयाला जरा विचारलं,

“सुमंत राव, जरा लेकीसोबत वेळ घालवू ना, काय आहे ना आता ती मला रोज दिसणार नाही, मला रागवणार नाही....”

सुमंतने अगदीच नजरेने इशारा केला आणि तो निवांत हॉलमध्ये बसला. अंकित आणि अनया त्याच्यासोबत बसले. आईने अगदीच जावयाला गोड आवडतं म्हणून शिरा करायला घेतला. रवा साजूक तुपात भाजताना घरात सुगंध पसरला होता. तसेच नातेही एकमेकांत गुंतत होती. अनया मदतीसाठी उठणार होतीच तर आईने स्वयंपाक खोलीतून डोकावून तिला तिथेच सुमंत सोबत बसण्याचा इशारा केला.

सुमंतनेही गोष्ट छेडली, “काय अंकित मग कधी निघणार आहेस बँगलोरला?”

“अरे जीजू, सारखे फोन येत आहेत बॉसचे, लग्नासाठी मी विनंती करून सुट्या घेतल्या होत्या. पण आता लवकर निघावं लागेल. मी तिकीट बुक केली आहे येत्या रविवारची. “

“अरे व्हा, काही लागलं तर सांग. आपली ब्रांच आहे तिकडे. माझे बरेच ओळखीचे आहेत तिकडे.”

“नक्कीच सांगतो.”

“पण मग अनया ताई?”

“ती असेल इथे, घर खाली खाली होणार ना, नाहीतर. तसही मला तिकडे सांर जमवा जमव करावं लागेल. घर किरायाने बघेन आणि नंतर बघू...आई बाबानाही घेवून जाण्याचा विचार आहे. बघू काय म्हणतात, ते.”

“उत्तम! काही असलं तर हमखास बोल मला. म्हणजे सानवीला बोललास तरी हरकत नाही.”

“जीजू, सानू दी, महिन्या भरात येणार ना परत?

“आता तसा प्लॅन आहे. कारण इकडचा प्रोजेक्ट संपणार आहे. जो ती बघत होती. म्हणून फायनल डिलिवरी साठी ती येईल. आणि तिला तिकडे ऑफिस जॉईन करायचं आहे. ती माझं सर्व काम सांभाळेल, आता हातात असेलली सर्व प्रोजेक्ट सानू बघेल आणि मी नवीन प्रोजेक्ट हातात घेईल.”

“मग दी येणार नाही का? तिचा व्याप तर वाढणार आता.”

“अरे येईल ना, माझे आताचे सर्व प्रोजेक्ट भारतात आहेत. जे मी तिथून बघायचो. म्हणूनच तर तिला देणार ना?”

“असं होय, म्हणजे बाबांना निदान सवय होईपर्यंत दी ने वरच्या वर यावं असं मला आणि अनयाला वाटतं, तसं जमलं तर खूप उत्तम जीजू. पण जरा आम्ही स्वार्थी होतोय असंच वाटत आहे. आता दीला तिकडेही बघायच आहेच ना.”

हॉल मधल्या गोष्टी आई स्वयंपाक खोलीत ऐकत होती, अश्रु दाटले होते, आज सानू परकी होवून घरी आली होती. घराचा आत्मा आता कुणाच्या दुसर्‍याच्या घरात नांदणार होता. आपल्याच मुलीने आपल्या घरी येत राहावं ही विनवणी आपल्यालाच करावी लागत आहे हे तिला नकळत बोचत होतं. पण रीत ती रीत, म्हणून ती शांत होती. काळजी तिलाही बाबांची होती, गुंतले होते ना मुलीत, त्यांच्या प्रेमापोटी सानू लग्नाला तयार होतं नव्हती पण तिच्याही आयुष्यात सुमंत आला आणि मग... प्रेमाचं मधुबन फुलायला वेळ लागला नाही.

इकडे सानू बाबांशी बोलत होती, बाबांना तिने तिच्या शब्दात खडकपणे समजावलं,

“बाबा औषधी वेळेवर घ्यायच्या. उगाच कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. मी रोज तुम्हाला फोन करणार.”

बाबा गुमान गप्प होते. जणू काही ते रागवणं ते मनात बंद करत होते. म्हणाले,

“हो ग, पण ह्या बापाला विसरू नकोस तिकडे गेल्या नंतर. रोज नाही निदान तुला सवड असली कि कॉल कर मला सवडीने आणि सवडीचा, मोजका नाही ग बाळा.”

नंतर त्यांनी तिला भेट म्हणून तिच्या बालपणापासून तर आतापर्यंतचे फोटो असेलला एक अल्बम दिला. ज्याच्या पहिल्या पानावर ती बाबांच्या कळेवर होती तर मागच्या पानावर ती सुमंतचा हात धरून जोडीने उभी होती.

आईने अश्रु पुसत सर्वांना आवाज दिला. सानू बाबांना घेवून हॉलमध्ये आली. तिच्या वागण्यात कमालीचा बदल होता. चेहर्‍यावर एक वेगळी नशा होती. त्या हिरव्या कंच भरजरी साडीवर आणि मोजक्या सुरेख दागिन्यात तीला बघत राहावं असचं झालं होतं. चेहर्‍यावर कुठलीच भीती नव्हती, सारं काही नीट होणार ह्याची शाश्वती जणू तिला बघताना येत होती. आईने तिच्यावर एक नजर टाकली आणि तिलाच हायसं वाटलं. सहज ती बोलली,

“आज मुक्काम ना ग इकडे?”

सुमंत बोलणार होता पण सानू बोलली,

“नाही आई, पॅकिंग आहे खूप, आणि माझ्यामुळे सगळं मासाहेबांच खोळंबलं असणार. त्या वाट बघत आहेत. आम्हाला लवकर निघावं लागेल.”

“अग पण, आज थांबणार होतीस ना, बाबा बोलले नाही का?

सानूने बाबांकडे बघितलं, बाबा आईकडे बघत म्हणाले,

“काय आरती, उगाच नको आता, तिला काम आहेत.”

“अरे पण, काहीही काय हो तुमचं!”

“आई, मला निघायचं आहे. तिकडे बंगल्यात खूप काम आहेत. उद्या आम्ही सर्व निघत आहोत. मग सारं कसं नीट ठेवायचं आहे. मी येतेच ना... पुढल्या महिन्यात. मग इकडे राहणार...”

“बाळू तुझं काय ते लवकर कळव. घर किरायाने घे तिकडे. “ सानू बाळूला नेहमीसारखी बोलली.

त्यालाही तिच्या अश्या बोलण्याची सवय झाली होती, मनातून हायसं वाटलं होतं,

“हो दी, तू काळजी करू नकोस, माझं बोलणं झालंय जीजूशी. “

अनयाने पटकन शिरा आणि पुरी टेबल वर लावली. सानूने घाईत सारं काही संपवलं. सारे शांत होते. तिला असं बघून त्यांना त्यांची सानू जाणवलीच नाही. खरंही होतच ना ते, आता कुठे ती मोहिते होती.

सानूने निघण्याची घाईं केली, कारण तिकडे तिची गरज वाढली होती. निघताना, उंबरठ्यावर ती थांबली, मागे वळली, मनात शहारली, मनात स्वत:ला घट्ट केलं आणि पाऊल पुढे टाकलं... आपल्याच नात्यांशी एक परकी भेट ती घेवून सासरी निघाली होती.

कथेचा पुढचा भाग लवकरच.---
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक पहिल्या कॉमेंटला आहे. https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल/in.pinterest.

Post a Comment

0 Comments